Wednesday, 11 July 2018

॥श्रीतुकाराममहाराजगाथाभाष्य ॥ - २

*✨॥श्रीतुकाराममहाराजगाथाभाष्य ॥✨*
  
          *☆☆☆ अभंग क्र.२ ☆☆☆*

नये जरी तुज मधुर उत्तर ।
दिधला सुस्वर नाही देवें ॥१॥

नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल ।
येईल तैसा बोल रामकृष्ण ॥२॥

देवापाशीं मागे आवडीची भक्ति ।
विश्वासेशीं प्रीति भावबऴें ॥३॥

तुका म्हणे मना सांगतों विचार ।
धरावा निर्धार दिसेंदिस ॥४॥

*अर्थ:-* तुला जरी मधुर बोलणे येत नसले आणि देवाने गोड स्वर दिला नसला तरी ॥१॥

त्यासाठी श्रीविठ्ठल भुकेला नाही.तुला जसे येईल तसे 'रामकृष्ण' म्हण ॥२॥

तू आपल्या श्रद्धेने,निष्ठेच्या बलाने व प्रेमाने देवाजवऴ देवाच्या आवडीची प्रेमलक्षणा भक्ती माग. ॥३॥

*चैतन्यभूषण श्रीतुकाराममहाराज* म्हणतात,मी माझ्या मनाला हाच विचार सांगतो की,हे मना,तू प्रत्येक दिवशी प्रेमाने 'रामकृष्ण' म्हणण्याचाच निश्चय कर ॥४॥

*प्रकाशक:-श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर सोशल मिडिया*

*॥ रामकृष्णहरि ॥*  🚩🙏🏻

Monday, 9 July 2018

श्रीतुकाराममहाराजगाथाभाष्य ॥ - ०१

*✨॥ श्रीतुकाराममहाराजगाथाभाष्य ॥✨*

       *☆☆☆ अभंग क्र.१ ☆☆☆*

समचरणदृष्टि विटेवरी साजिरी ।
तेथें माझी हरि वृत्ती राहो ॥१॥

आणिक न लगे मायिक पदार्थ ।
तेथें माझें आर्त नको देवा ॥२॥

ब्रह्मादिक पदें दु:खाची शिराणी ।
तेथें दुश्चित्त झणीं जडो देसी ॥३॥

तुका म्हणे त्याचें कऴलें आम्हा वर्म ।
जें जें कर्मधर्म नाशवंत ॥४॥

*अर्थ:-* हे हरी,समान चरण आणि समान दृष्टी असलेली जी तुझी विटेवर सुंदर मूर्ती आहे तेथे माझी अंत:करणवृत्ती अखंड राहो.॥१॥

देवा,तुझ्यावाचून इतर कोणतेही मायिक पदार्थ मला नको आहेत.येवढेच काय,पण त्याविषयी माझ्या मनात इच्छादेखील निर्माण होणे नको आहे. ॥२॥

आता ही विवेक - वैराग्ये मर्यादित पदार्थाविषयी नसून ब्रह्मलोकापर्यंत आहेत हे पुढील चरणात सांगतात. ब्रह्मलोक इत्यादी स्थाने दु:खाची पराकाष्ठा आहेत.॥३॥

देवा,संसारातील कोणत्याही पदार्थाचे वर्णन ऐकून आमचे अंत:करण विक्षिप्त आणि अनिश्चयात्मक होणे शक्य नाही.कारण *जगद्गुरु श्रीतुकाराममहाराज* म्हणतात, त्या पदार्थाचे खरे स्वरूप आम्हास कऴले आहे.ते असे की,जे जे कर्म - धर्मजन्य असते ते ते विनाशी असते.॥४॥

*॥ रामकृष्णहरि ॥*  🚩🙏🏻