Saturday, 18 June 2016

परमार्थात गुप्ततेची जरूरी असते - श्री महाराज

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।
वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे. कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो. त्या वासनेला जिंकणे, म्हणजे आपण मरून जाण्या‍इतके कठीण आहे. वासनेच्या पोटी जन्म, आणि जन्मानंतर अहंकार, ह्या जोडप्यापोटी कामक्रोधादि विकार जन्माला येतात. या जोडप्याचे वैशिष्ट्य असे की, त्यामध्ये बायको नवर्‍यापेक्षा वडील असते; कारण आधी वासना, आणि त्यातून पुढे अहंकार. भगवंताजवळ 'वास' ठेवला तरच वासना नष्ट होते. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. प्रपंचातली वासना बाहेर काढणे, याचेच नाव परमार्थ. प्रपंचात प्रसिद्धीची जरूरी वाटते. त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरूरी लागते. समजा, एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवर्‍याजवळ हट्ट धरला, आणि नवर्‍याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचे कबूल केले; पण अट अशी घातली की, जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्या वेळी ते घालून खोलीची दार-खिडक्या बंद करून आत बसले पाहिजे. अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल ? कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे. ही झाली प्रपंचातली रीत. परमार्थात याच्या उलट गुप्ततेची गरज आहे. आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी; कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते. ती केवळ इतर लोकांचीच लागते असे नसून, आपली स्वतःचीसुद्धा लागण्याचा फार संभव असतो. म्हणून परमार्थात गुप्तता असावी; आणि आपल्या हातून जे साधन होते आहे, ते सद्‍गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करवून घेतले जात आहे, ही जाणीव ठेवावी.
आजारी माणसाने नुसते पडून राहावे, पण औषध मात्र नियमाने घ्यावे. बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात; औषध मात्र आपण स्वतःच घेतले पाहिजे. एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा रोग बरा होत नाही. त्याचप्रमाणे, परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वतःलाच करायला पाहिजे. उगीच कुणाच्या नादी लागू नये. परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजावून घ्या आणि मग त्या मार्गाने जा. कोणाला फसू नका, कारण स्वतः फसणे हे जगाला फसविण्या‍इतकेच पाप आहे. ज्याच्या प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे, त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो. उलट ज्याचा पाठिराखा अभिमान आहे, त्याचा परमार्थदेखील प्रपंचच म्हटला पाहिजे.
बाहेरून प्रपंची दिसावे पण आत मात्र परमार्थी असावे. ही खरी कला होय.
- Varkariyuva.blogspot.in

मन में है विश्वास ! - युवा पिढीचे एक आदर्श मा. विश्वास नांगरे पाटील (I.P.S.)

मन_में_है_विश्वास‬....!

काही लोकांचा जन्मच मुळात इतरांना प्रेरित करण्यासाठी झालेला असतो. ज्या क्षेत्रात आपल्याला करियर करायचंय त्या क्षेत्रात आधी नेत्रदिपक यश मिळविलेली, यशानंतर मिळालेली उंची टिकविलेली आणि त्या क्षेत्रात आपल्या खमक्या कामगिरीनं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलेली व्यक्तिमत्व ही नेहमीच समाजाची प्रेरणास्थान राहिलेली आहेत. सांगलीतील बत्तीसशिराळा सारख्या एका खेडेगावात जन्माला आलेला एक मुलगा (भावड्या) आपल्या स्वप्नांच्या आणि अथक परिश्रमांच्या जोरावर यु.पी.एस.सी. सारख्या परीक्षेमध्ये यश मिळवून IPS अधिकारी बनतो. मोठ्या स्वप्नांमुळे यशाचा पाया रचला जातो, पण काही यशोगाथा अशाही असतात ज्यांच्यामुळे लाखोंच्या मनात स्वप्नं पेरली जातात. सांगलीतील बत्तीसशिराळा या गावातील भावड्या हा सर्वसामान्य मुलगा ते आय.पी.एस. अधिकारी विश्वास नांगरे-पाटील ही यशोगाथाही अशीच माझ्यासारख्या महाराष्ट्रातील लाखो मुलांच्या मनात लढण्याचा आणि जिंकण्याचा विश्वास निर्माण करणारी होती. मा. विश्वास नांगरे पाटील सरांचं नुकतंच मन में हे विश्वास हे मार्गदर्शनपर पुस्तक प्रकाशित झालं. माझी सर्व वारकरी संप्रदाय व इतर संपर्कातील सर्वांना विंनती आहे . आपण कृपया याची किमान एक तरी प्रत घ्यावी .स्वतः करीत व जमल्यास आपल्या मित्रपरिवारातील व्यक्तींना भेट द्यावी . स्वतःच्या हिमतीवर आपलं विश्व निर्माण करण्याची जिद्द हे पुस्तक आपणास देईल . व आपण हि म्हणाल हो खरच हाती घेतलेले कार्य मी नक्की करीन कारण कि मन में हे विश्वास ! 

- Varkariyuva.blogspot.in

कसोटी - ह.भ.प.पु.श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

कसॊटी

अनेक संकटातून,प्रतिकूल परिस्थितीतून तावून-सुलाखून बाहेर पडल्यानंतर माणूस परिपक्व होतो.
सर्व मोठ्या महात्म्यांची चरित्रे पाहिली तर याची अनेक उदाहरणे पाहावयाला मिऴतील.छत्रपती शिवाजी महाराज,महाराणा प्रताप वगैरे योद्ध्यांची किंवा संतांची चरित्रे पाहिल्यास अत्यंत हालअपेष्टातून त्यांना जावे लागले असे दिसते.पण त्यामुऴेच त्यांची चरित्रे घडली.श्रीतुकोबाराय म्हणतात,

तुका म्हणे तोचि संत ।

सॊसी जगाचे आघात ।।

सुभाषितकाराने ते आघात कोणते, हे दृष्टांताने सांगीतले आहे.

यथा चतुर्भि: कनकं परीक्ष्यते,
निघर्षणच्छेदनतापताडनै: ।

तथा चतुर्भि: पुरूष: परीक्ष्यते: श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा ।।

एखाद्याला सोन्याच्या शुद्धतेबाबत संशय निर्माण झाला तर तो सोनाराकडे जातो.सोनार कसोटीवर घासतो.सोन्याची कसोटी चार प्रकाराने होते.त्या कसोटीतून सोन्याचे गुण तपासले जातात.कसोटीवर घासून त्याची चकाकी तपासली जाते,त्याला तोडून त्याचा चिवटपणा पाहिला जातो,त्याला तापवून त्याचा रंग बदलतो,त्याला हातोडीने ठोकून त्याचा मऊपणा, ते ताणले जाते की नाही हे पाहिले जाते.नंतर सोन्याला किंमत येते.सोनेसुद्धा कसोटीला लावले जाते,तेव्हांच त्याला सोने म्हटले जाते.त्याप्रमाणेच माणसालाही मोठे व्हायचे असेल तर त्यालाही कसोटी लावावी लागते.त्याच्या ठिकाणचे ज्ञान,त्याचे शील,गुण आणि त्याचे आचार यावरून माणसाचे मोठेपणं ठरत असते.यांपैकी एकही गुण नसेल तर त्याचे मोठेपणं कुचकामी ठरते.
छत्रपती शिवरायांचे चरित्र पाहिल्यास हे सर्व गुण त्यांच्या ठिकाणी प्रसंगपरत्वे पाहायला मिऴतात,म्हणूनच तर ते जगासमोर आदर्श ठरले.

- ©श्रीगुरु ह.भ.प.चैतन्यमहाराज देगलूरकर , पंढरपूर