Saturday, 29 August 2015

प.पू.माऊली शान्तिमाँ पजवानी - पुण्यस्मरण तथा अनमोल वचन

।। श्रीगुरु ।।
पूज्य श्रीगुरु महंत प्रमोदमहाराज जगताप यांनी आजवर अनेक संतचरित्रे वचण्याची सुचना केली गुरु आदेश म्हणून शक्य तितका नक्की प्रामाणिक प्रयत्न त्या पैकी एक
"प.पू.माऊली शान्तिमाँ पजवानी " याचं जीवन चरित्र

शान्तिमाँ यांची गुरुपरंपरा
।।आदिनाथ भगवान ।।
सदगुरु ज्ञानेश्वरमहाराज
सदगुरु गुंडामहाराज देगलूरकर
सदगुरु पंढरीनाथमहाराज श्रीगोंदेकर
सदगुरु श्रीकृष्णानंदमहाराज केणे
सदगुरु नारायणमहाराज श्रीगोंदेकर
पू. शान्तिमाँ पजवाणीजी
पूज्य महाराज यांनी मला त्यांच्या जवळील " परमार्थ  प्रकाश  "नामक पुस्तक आशीर्वादपर भेट दिल . शान्तिमाँ अणि त्यांचे शिष्य प्रभाकरजी माने यांच्यातील पत्रव्यवहार अस स्वरूप , एकूण ४० पत्रांच् संकलन यात आहे . पूजनीय माँ यांनी त्यांच्या पत्रातून अभूतपूर्व अध्यात्म , वेदांत , भक्तिशास्त्राचे प्रगट ज्ञान  आदि अत्यंत सहजपूर्वक मांडल आहे . त्याच पुस्तकातील शान्तिमाँ यांचे काही अनमोल वचन  आज त्यांच्या पुण्यस्मरणानिम्मित आपल्या पर्यन्त पोहवचवण्याचा हा छोटा प्रयत्न .
०१) जप करणे आपले काम - जप मोजण्याचे काम प्रभुवर सोपवा .
०२) संपत्ती पांच साधनांनि प्राप्त होते
प्रारब्ध / प्रभुकृपा / गुरुकृपा / आई वडिलांचा आशीर्वाद / व्यवसाय
०३ ) आपली विषयाची भूक कमी करा , म्हणजे भगवंताची भूक वाढेल .
०४)"सर्वांच्या सुखात आपले सुख असुन सर्वांच्या दुःखात आपले दुःख आहे " हे सत्य लक्षात घेऊन माणसाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर मानवी जीवनात सुखाचा सुकाळ झाल्याशिवाय राहणार
नाही .
०५)माणूस जन्माने मोठा होत नाही तर तो कर्तव्याने मोठा होतो.
०६)परमात्मा अंतरात्म्यात आहे त्याला पहा . दृष्टि प्रेममय ठेवा तरच सृष्टि प्रेममय दिसेल .
०७) माणूस नामांत रंगला म्हणजे सदगुरु कृपा करतात .
०८)दुसऱ्याला आकंठ खायला घालून तो तृप्त झालेला पाहणे , यातला आनंद अवर्णनीय असतो .
०९) प्रपंच मनापासून करावा , पण खरी ओढ भगवंताकड़े असावी
१०)सदगुरुंची भेट होणे या पेक्षा अधिक महत्त्वाचे काहींच नाही .
११)'नामब्रह्न' व 'नादब्रह्म' यांचा ज्या वेळी संयोग होतो त्यावेळी प्रभुला प्रगट व्हावेच लागते .
१२ )लोक शरीराची - कातडीची फार चिकत्सा करतात पण आत्म्याची चर्चा कोणी करत नाहीत.
१३) देव जसा दयाळु आहे तसा न्यायी पण आहे , हे विसरु नका .
  १४) सतत नामात राहिले म्हणजे देह सोडताना दुःख वाटत नाही .
१५) तळमळ असेल तर नामस्मरणासाठी एकांत काढता येतो .
१६) अन्नदानाने हात,
तीर्थयात्रेने पाय ,
नामस्मरणाने मुख ,
आणि शरणागतीने चित्त पवित्र होते .
१७) जसे आपन पैसाचे ध्यान करतो तसे परमेश्वराचे ध्यान केले पाहिजे .
१८)प्रेम मागू नका - त्याची अपेक्षा करु नका . प्रेम दुसऱ्याला द्यायला शिका .
आदि अनेक 
या पुस्तकाच्या मुख्य पाना वर लिहलेले एक मला आवडल ते म्हणजे मूल्य - सदगुरु सेवा
शान्तिमाँ यांच्या जीवना संदर्भातील साहित्य आपणास अवश्य प्राप्त होतील .
प्राप्ति स्थळ :
श्री सत्संग मंडळ ,
बंदररोड , डहाणू ४०१६०१
संकलन
अक्षय चंद्रकांत भोसले
०८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र
varkariyuva.blogspot.in

लक्ष्मणासारखा भाऊ सापडणार नाही - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरू ||
         वाचिक जपापेक्षा उपांशू जप श्रेष्ठ तर उपांशूपेक्षा मानसिक जप श्रेष्ठ आहे. कारण मानसिक जप हा प्रभू रामापर्यंत घेऊन जाण्याचे साधन आहे. हे रामस्मरण केल्याने जन्म-मरण संपते म्हणून कोणतेही कार्य करण्याअगोदर रामनामस्मरण करावे. सीतेसारखी दुसरी पत्नी या मृत्युलोकात मिळू शकेल; मात्र लक्ष्मणासारखा दुसरा भाऊ या जगात शोधूनही सापडणार नाही, असे प्रभू रामचंद्राने म्हटले असल्याचे प्रतिपादन ह. भ. प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले. 

भगवंत मंदिरात श्रावणमासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थानतर्फे आयोजित 'अध्यात्म रामायण' प्रवचनमालेत ते बोलत होते. दशरथांच्या तीन राण्यांच्या पोटी राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न हे चार अलौकिक पुत्र अवताराला आले. संपूर्ण अयोध्या नगरी रामनामात तल्लीन झाली. योगी, मुनीवर ज्या नामात रमतात ते नाव राम असल्याने वसिष्ठ ऋषींनी हे नाव निवडले तर नवमीला प्रभुरामाचा जन्म झाल्यानंतर दशमीला सुमित्रेच्या पोटी लक्ष्मणाचा जन्म झाला. शोभा, सौंदर्यवान, दास्यवती, लक्ष्मीयुक्त म्हणून वसिष्ठांनी त्याचे नाव लक्ष्मण ठेवले. राक्षसी सुवर्ण मृगामागे जाऊ नये म्हणून लक्ष्मणाने केलेली विनवणी, सुग्रीवाने दिलेले दागिने ओळखणे, राम-सीतेपैकी कोणाचे पाय सुंदर या प्रश्नाचे अलौकिक उत्तर सृष्टीच्या निर्मात्याला सीतेसाठी व्याकूळावस्थेत असताना लक्ष्मणाने केलेली सोबत लक्ष्मणाच्या गुणांची महती हे सगळ्य़ात महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 

Friday, 28 August 2015

प्रभू रामाचे शरीर हे चिन्मय होते - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरू ||
अवताराला आलेल्या भगवान श्रीरामाचे शरीर हे सच्चिदानंद शरीर असून त्याला दिव्य देह म्हणतात. उलट सामान्यांचे शरीर हे दिव्यही नाही अन् नित्यही नाही. स्वर्गातील देवादिकांचे (इंद्र, चंद्र, सूर्य) शरीर हे दिव्य आहे पण नित्य नाही, प्रभू रामचंद्राचे शरीर हे दिव्यही आहे आणि नित्यही आहे म्हणून त्याला चिन्मय शरीर म्हणतात, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले. 

ते श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 'अध्यात्म रामायण' या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होते. पुढे बोलताना बोधले महाराज म्हणाले की, चिन्मय शरीर हे भगवंताच्याच ठिकाणी असते, सत्शक्तीने हे शरीर अवतारी बनते, तर भगवंताच्या ठिकाणी असलेल्या चित्तशक्तीने हे शरीर प्रकाशमय बनते असे महाराजांनी स्पष्ट केले. भगवंताच्या ठिकाणी असलेल्या आनंदशक्तीने ते शरीर आकर्षक बनते. अशा या आनंदस्वरूप बाल प्रभू रामचंद्रांना पाहण्यासाठी अयोध्येतील लोकांची गर्दी होऊ लागली होती. त्यावेळी एक दासी धावत -धावत येऊन कौशल्या मातेकडे गेली. त्यावेळी कौशल्येने तत्काळ आपल्या गळ्यातील नवरत्नांचा हार त्या दासीला दिला, मात्र त्या दासीने तो तसाच परत देऊन मला काही द्यायचे असेल तर रामाला माझ्या हातात दे हार नको, असे सांगितले. 
रामाचे शरीरच असे होते की, त्याला पाहिल्यास सर्व स्त्री-पुरुष मंडळी स्वत:ला विसरून जात होती. या रामाला पाहण्याकरिता साक्षात भगवान महादेवसुद्धा एका सामान्य माणसाचे रूप घेऊन अयोध्येत आले होते. प्रभू रामाच्या अवताराबरोबरच लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या तिघांचे देखील अवतारच होते. राम हा विष्णूचा, लक्ष्मण -शेषाचा, भरत शंखाचा तर शत्रुघ्न हा चक्राचा अवतार असल्याचे महाराजांनी शेवटी सांगितले. 
एकादशी असल्यामुळे सायंकाळऐवजी सकाळच्या सत्रात झालेल्या या प्रवचनासाठी बारामतीचे श्री महंत प्रमोद महाराज जगताप, पुण्याचे सदानंद महाराज बग, मुंबईचे अक्षय महाराज भोसले यांच्यासह गुरुवर्य प्रभाकरदादा बोधले महाराज उपस्थित होते. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 

भगवंताचा अवतार कर्मबंधनातुन मुक्त करणारा - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरू ||
भगवंताच्या अवताराचे अंश, अशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णतम हे सहा प्रकार असून भगवंताच्या दशावतारामध्ये प्रभू रामचंद्र व श्रीकृष्ण अवतार हे दोनच अवतार पूर्ण अवतार आहेत. जे भगवंताला, अवताराला व जे त्यांना जाणतात या दोघांनाही कर्माचे बंधन नसते, नव्हे तर भगवंताचा अवतार हा कर्मबंधनातून मुक्त करणारा असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले. 

श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या अध्यात्म रामायण या विषयावरील प्रवचनमालेत ते बोलत होते. भगवंत अवताराला येतो म्हणजे तो जन्माला येतो. सामान्यांचा जन्म हा वासनेनुसार आहे, पण भगवंताचा अवतार हा वासनेच्या आहारी नाही. सामान्यांचा जन्म असला तर भगवंताचे प्रकटीकरण आहे. सामान्य माणसाला मरताना जी इच्छा असते त्यानुसार त्याला पुढे जन्म मिळत असतो. भगवंत मात्र भक्ताकरिता अवताराला येतात. सामान्य माणसाला जन्माला यावेच लागते, संत हे स्वत:हून येत असतात आणि देवाला मात्र हाक मारून आणावे लागते, असे महाराज म्हणाले. चैत्र शुद्ध नवमीला सोमवारी व पुनर्वसू नक्षत्रामध्ये प्रभू रामचंद्र अवताराला आले. हा अवतार सूर्यवंशाचा असल्यामुळे सूर्य हा देखील अत्यंत आनंदात होता. ज्यावेळी भगवंत कौशल्या मातेच्या पोटात होते तेव्हा ती स्वानंद स्थितीत होती. राजा दशरथाने वशिष्ठ ऋषीला हे काय चालले आहे असे विचारले असता वशिष्ठाने भगवान तुमच्या घरात अवताराला येणार असल्यामुळे सूर्यकुळाला चांगले दिवस येणार आहेत, असे सांगितले होते. त्यामुळे राजा दशरथ देखील खूप आनंदी झाले होते व ते देखील विदेह स्थितीत नाचू लागले होते. प्रभू रामाचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या कुंडलीतील गृह देखील स्वत: उच्च स्थानावर जाऊन बसले होते. सामान्यांचा जन्म असला तर भगवंताचे प्रकटीकरण आहे. सामान्य माणसाला मरताना जी इच्छा असते त्यानुसार त्याला पुढे जन्म मिळत असतोच असेही बोधले महाराज यांनी सांगितले.
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 

भक्तांना जो रमवितो तो राम - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरू ||
वसिष्ठ मुनींनी भाकीत केल्याप्रमाणे अयोध्येचा राजा दशरथांच्या घरी चैत्र शु. नवमीला विष्णू रुपात साक्षात प्रभूरामचंद्रांनी, चैत्र शु. दशमीला शेष रुपात लक्ष्मण, चैत्र शु. एकादशीला शंख रुपात भरत तर चक्र रुपात शत्रुघ्न या तीन अलौकिक भावंडांसह अवतार घेताच अवघी अयोध्या नगरी प्रकाशमय झाली. वसिष्ठांनी नवमी, दशमी व एकादशीला तिघांचे नामकरण केले, पण राम असं नाव का ठेवलं, यावर स्पष्टीकरण देताना ह. भ. प. बोधले महाराज म्हणाले, भक्तांना जो रमवितो तो राम, मुनीजन जेथे रमतात तो राम म्हणून राम हे नाव ठेवले. 

भगवंत देवस्थान ट्रस्ट व बोधराज भक्त मंडळातर्फे आयोजित श्रावणमास प्रवचनमालेत ते बोलत होते. राजा दशरथाला या चारही पुत्रांच्या माध्यमातून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थ प्राप्त झाले आहेत. पार्वती मातेनं भगवान शंकराकडे रामायणातील रामकथेचा नायक प्रभू रामचंद्र स्वरुप आणि चरित्र जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर शंकरांनी सूर्य, वंशावळ त्यातील ६0 वे वंशज राजा दशरथ, त्यांच्या कौशल्या, सुमित्रा आणि कैकयी या तीन राण्या. त्यांच्या पोटी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचा जन्म, रामायणातील रामभक्त हनुमान, रावण, बिभीषण, कुंभकर्ण, मंडोदरी, शूर्पणखा आदी इतर पात्रांचा त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांसह परस्पर पण आध्यात्मिक संबंध, परमात्मा अवतार घेतो म्हणजे नेमके काय ? परमात्मा इतका व्यापक असताना संकुचित असा अवतार घेऊन स्वत: येण्याची गरज काय? तो मानवीय देहात अवतारीत झाला तर त्याला कर्मबंधनं आहेत काय आदी प्रश्न उपस्थित करून दृष्टांत दाखल्यासह विविध प्रसंगावर विस्तारानं भाष्य केल्याचे महाराजांनी सांगितले. 
भगवंतांच्या दशावताराचे अंश, अशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णतम असे सहा प्रकार आहेत. सामन्यांचा जन्म वैषयिक तर परमात्म्यांचा अवतारिक असतो, असे महाराजांनी सांगितले. याप्रसंगी बहुसंख्य रसिक श्रोते उपस्थित होते. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२