Friday, 28 August 2015

श्रीरामाचे घर म्हणजे रामायण - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले


   || श्रीगुरू ||

 'रामायण' या शब्दामध्ये 'राम : अयण' असे दोन शब्द आहेत. 'अयण' म्हणजे 'घर' म्हणून श्री प्रभू रामचंद्रांचे घर म्हणजेच 'रामायण' होय, असे ह. भ. प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी श्रावणमासानिमित्त सुरू असलेल्या प्रवचनमालेच्या दुसर्‍या दिवशीच्या निरुपणाच्या वेळी सांगितले. 

'अध्यात्म रामायण' या विषयावरील निरूपण करताना ते म्हणाले, हे 'अध्यात्म रामायण' महादेव आणि पार्वती यांच्या संवादातून निर्माण झाले आहे. पार्वतीने महादेवाला दोन प्रश्न विचारले आहेत. त्यात पहिला प्रश्न हा रामस्वरूपाविषयी आहे व दुसरा प्रश्न हा रामचरित्राविषयी आहे. श्रीराम हे जर परमात्मा असतील तर ते सीता विरहामध्ये एवढे व्याकूळ का झाले, व्याकुळता हा सामान्य जीवाचा धर्म असून, माणूस संसारात, व्यापारात, नोकरीत, शेतात व्याकूळ झाला असेल तर तेही एक सामान्य जीवच आहेत मग त्यांचे भजन का करावयाचे, हा प्रश्न पार्वतीने महादेवाला विचारला असता या प्रश्नाचे उत्तर देताना महादेवांनी जे सांगितले तेच रामायण असल्याचे बोधले महाराजांनी सांगितले.
प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी जी व्याकुळता निर्माण होते ती रामप्रभूंची लीला आहे. रामचरित्राच्या दोन पध्दतीने अभ्यास करावयाचा आहे ते म्हणजे एक अनुभवचरित्र व दुसरे लीलाचरित्र यामध्ये या लीलाच्या पाठीमागे असलेले अध्यात्म महर्षि व्यासांनी या रामायणाच्या माध्यमातून समाजासमेार मांडले असल्याचे बोधले महाराज म्हणाले.
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला 
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२