Thursday, 10 September 2015

चौदा दरवाजे पार केल्याशिवाय रामाची भेट नाही - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

 || श्रीगुरू ||

 मिथिला नगरीत सीता स्वयंवर झाल्यानंतर अयोध्येमध्ये या दोघांचा संसार सुरू झाला तेव्हा संसारामध्ये रामाच्या मनोगताला अनुरूप असे सीतेचे वर्तन होते. सीता हा जीव तर प्रभू राम हे जीवन आहे. सीता हे चित्त तर राम हे चैतन्य असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
ते श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 'अध्यात्म रामायण' या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होते.
बोधले महाराज म्हणाले की, राम हे अखंड वृद्धांच्या सेवेत होते. रामाचे गुण हे लग्न झाल्यानंतर शास्त्रज्ञ, कृतज्ञ व लोकांच्या मनातील भाव ओळखणारे कुशल होते. प्रभुरामाला कोणाला शिक्षा द्यावी, कोणाला दया करावी याचे तारतम्य होते. लोक दु:खी असले तर त्यांचे दु:ख पाहून दु:खी होणारे होते. ते लोकांची उपासना करणारे होते, असेही महाराज म्हणाले. ते मनाला शिष्य बनविणारे होते. ही सर्व लक्षणे रामाच्या ठिकाणी दिसून येत असल्यामुळे राजा दशरथाने त्याचा राज्याभिषेक करण्याचे ठरवले. तेव्हा मंथरा दासीने कैकयीच्या मनात विकल्प निर्माण करण्याचा प्रयत्न करून रामाला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुमंत प्रधान रामाला बोलावण्यास पाठवले.
राम ज्या महालात राहत होता त्या महालाला चौदा दरवाजे होते, असे संत एकनाथांनी वर्णन केले होते. या चौदा दरवाजातील पहिल्या दारात रथ सोडला, दुसर्‍या दारात छत्र चामरे, तिसर्‍यात पादत्राणे, चौथ्यात अर्थ ऐहीक संपत्ती, पाचव्यात स्वार्थ, सहाव्यात सर्व साधने तर सातव्या दरवाजात मी-तू पणाचा भेद सोडला. या सात दरवाजांपुढे रामाकडे जात असताना पहिल्या सात दरवाजात सोडावे लागते पुढील सात दरवाजात स्वीकारावे लागते. त्यामध्ये श्रवण, साधना, ज्ञान, नित्य दर्शन, मनन, निधीध्यासना, वैराग्य व साक्षात्कार हे स्वीकारल्यानंतर प्रभू रामाची खरी भेट होते.
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२