Thursday 30 July 2015

।। गुरुपोर्णिमा ।।

।। श्रीगुरु ।।

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः|
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ||

उद्या निज आषाढ पौर्णिमा(३१/७/१५) म्हणजे "व्यास पौर्णिमा"! अर्थात "गुरुपौर्णिमा" !! गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुंचे पूर्णत्व पाहण्याचा दिवस! ह्या दिवशी शिष्यांचे मुख्य कर्तव्य म्हणजे "गुरु-दर्शन,गुरु-पूजन,गुरु-तीर्थप्राशन,गुरु-उपदेशग्रहण"! भारतीय संस्कृतीमध्ये ह्या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपुजनाची परंपरा दैवी गुरूंच्या परंपरेतून निर्माण झाली.ही परंपरा साक्षात भगवान शंकरांनी निर्माण केली.त्यामुळे या परंपरेला "गुरुपुजनाचा" अधिकार आला आहे.
आपले हे स्थान "गुरुपरंपरेतील" एक स्थान आहे. ज्यांच्या ठिकाणी श्रद्धा आहे,भक्तीभाव आहे,सेवा,उपासना आहे,त्यांच्या जीवनामध्ये निर्धास्तपणा नक्कीच येतो.
गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरुंचे पूर्णत्व पाहण्याचा दिवस! गुरूंना "पूर्णत्व" कशामुळे येते तर गुरु स्वतःच्या गुरूंकडून आलेला उपदेश लोकांपर्यंत पोहोचवतात,या उपदेशाच्या परम्पार्तून परमार्थ साधतात.तेव्हा या पूर्णत्वाला शरण जाण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा!जे दुसऱ्यांना ज्ञान देऊ शकतात,शिकवू शकतात अशा परंपरेतील जे पुरुष आहेत त्यांची सेवा करण्याचा हा दिवस!आजची ही पौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हंटली जाते.व्यास ऋषींनी स्वतःच्या अनुभवावरून सामान्य माणसाला सुद्धा अनुभव मिळावा म्हणून स्वतः गुरुपुजनाला सुरुवात केली.
गुरुपौर्णिमेनिमित्त शिष्यांचे मुख्य कर्तव्य म्हणजे गुरु-दर्शन,गुरु-पूजन,गुरु-तीर्थप्राशन,गुरु-उपदेशग्रहण!गुरुपूजन करताना मनात अत्यंत पावित्र्याची भावना असली पाहिजे.तुम्ही हा विचार केला पाहिजे,कि आपल्याला जास्तीत जास्त गुरुसहवास कसा घेता येईल?दोन शब्द ऐकून समाधान कसे मिळवता येईल?आजचा जो दिवस आहे तो गुरुदर्शनापेक्षा सुद्धा "गुरुभेटीचा दिवस" असतो.ज्या भक्तांच्या मनात अशी सतत भावना असते कि हा दिवस कधी येतो आणि त्या चरणांना मी स्पर्श करतो!अशा शिष्यांची पापे खरोखरच नाहीशी होतात.
आजच्या दिवसाचे महत्व म्हणजे प्रत्येकाने एक नियम करायचा असतो आणि तो नियम निरंतर कसा टिकवता येईल याची प्रत्येकाने काळजी घ्यायची असते.आपल्या ठिकाणी असलेले दोष,गुरुपूजनाच्या वेळी म्हणजे चरणांवर डोके ठेवताना कसे कमी होतील याचा विचार केला पाहिजे.प्रत्येक गुरुपौर्णिमेला एक एक दोष कमी करण्याचा निश्चय करून तो अमलात आणला असता बारा वर्षानंतर तुम्हाला स्वतःमधील बदल जाणवू लागेल!

अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया |
चक्षुरुन्मीलितं येन,तस्मै श्रीगुरवे नमः||

(अज्ञानरूपी काळोखाने ज्याला अंधपणा आलेला आहे,त्याचे नेत्र,ज्ञानाचे अंजन ही शलाका,तिने ज्यांनी उघडले त्या श्रीगुरूंना नमस्कार असो.)
संदर्भ- श्रीरामकृष्ण उवाच         

श्रीगुरु महंत प्रमोद महाराज जगताप यांच्या मुळे मी घडलो त्यांच्या चरणांना त्रिवार साष्टांग दंडवत !

वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र

भारतरत्न डॉ ए.पी.जे.अब्दुलजी कलाम सर यांस भावपूर्ण श्रद्धांजली !

Wednesday 29 July 2015

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आयोजित कीर्तन प्रशिक्षण शिबिर २०१५

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आयोजित कीर्तन प्रशिक्षण शिबिर २०१५

शिबिरार्थिं समवेत ह.भ.प.अक्षय महाराज भोसले रविंद्र नाट्य मंदिर ,दादर

Saturday 25 July 2015

ते या पंढरीसी घडे ।। - श्रीगुरु महंत प्रमोदमहाराज जगताप

।। श्री गुरु ।।

ते या पंढरीसी घडे  ।।

वारीमध्ये वार आठवत नाहीत,
त्यामुळं अनेकांचे आठवड्याचे
उपवासही विसरल्याची उदाहरणं
आढळतात. न्याहारी झाल्यावर
लक्षात येतं, की आज सोमवारचा
उपवास होता! या विसरण्यातही
एक आगळावेगळा आनंद दडला आहे.
दिनांक आठवत नाही. हातातल्या
घड्याळाकडं लक्ष जात नाही.
परिणामी, वेळही कळत नाही. एवढंच
काय, या भक्तिसुखात तहान-
भूकदेखील हरपून जाते.
आषाढी एकादशीच्या दिवशी
विठुरायाला भेटण्यासाठी वारकरी शेकडो मैलांचं अंतर
पायी कापतात. या वारीतून त्यांना काय मिळतं?
भजनानंदात ‘स्व’चंही विस्मरण होतं आणि वारकरी
हरिरूप होतो, असंच उत्तर द्यावं लागेल.खरंतर पंढरीच्या
वाटेवर पहिलं पाऊल घराबाहेर टाकलं की प्रतिकूलतेला
सुरवात होते; पण वारकरी या प्रतिकूलतेलाच अनुकूलता
मानतो आणि वाटचाल करतो. व्यावहारिक
जीवनातली प्रतिकूलता ही आध्यात्मिक जीवनातली
अनुकूलता ठरत असते! त्यामुळं वारीतल्या कोणत्याही
परिस्थितीला तोंड देण्याची वारकऱ्याची तयारी
असते.
अनेकांना पायी चालण्याची सवय नसते; त्यामुळं चालून
चालून त्यांच्या पायाला फोड येतात. पायाच्या
या जखमांकडं दुर्लक्ष करीत वारकरी हरिरंगात नाचतात,
तेव्हा...
‘देवा आता ऐसा करी उपकार।
देहाचा विसर पाडी मज।।
तरीच हा जीव सुख पावे माझा।
बरवे केशीराजा कळो आले।।’
या संतवचनाची अनुभूती येते.
वारीतलं स्नान ही एक मजेशीर घटना म्हणावी लागेल.
घरी अत्याधुनिक साधनांनी युक्त असणाऱ्या
स्नानगृहात स्नान करणारा
वारकरी वारीत जेव्हा टॅंकरखाली थंड पाण्यानं स्नान
करताना दिसतो, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटतं. ते
स्नान तरी कसलं? चार-दोन तांबे अंगावर पाणी पडतं न
पडतं तोच दुसरा माणूस वरच्या बाजूला नळाला तांब्या
लावतो. तेव्हा स्नान करणारा त्याला म्हणतो, ‘‘अहो
माउली, थोडं पाणी पडू द्या ना माझ्या अंगावर.’’
अशी घटना समजा घरी किंवा सार्वजनिक नळावर
घडली तर? एखाद्या बाईनं हंडा भरायला लावला असेल
आणि दुसऱ्या बाईनं त्यावर आपली कळशी भरायला
लावली तर...? तर ती पहिली बाई दुसऱ्या बाईला
‘माउली’ म्हणेल? म्हणेल असं वाटत नाही. वारीतच हे
चित्र पाहायला मिळतं. या ठिकाणी अहंतेचं विस्मरण
घडतं!
वारीच्या वाटेवर प्राप्त परिस्थितीनुसार
भोजनव्यवस्था असते, तरी वारीतलं जेवण रुचकर लागतं.
कारण, त्यात भक्तिरस असतो! घरी जेवणाचा
साग्रसंगीत बेत असला आणि जेवताना दाताला खडा
लागला, तर मुद्रा त्रासिक होते. बडबड केली जाते.
वारीत दुपारच्या जेवणाला बहुधा माळावर,
झाडाखाली बसावं लागते. पत्रावळीवर भात वाढला
गेला आणि समजा त्याच वेळी सोसाट्याचा वारा
सुटला तर धुळीनं भाताचा रंगच बदलतो. तरी ‘माउली’
असा घोष करत जेवण आनंदानं पार पडतं. या ठिकाणी एक
अनुभव टिपण्यासारखा आहे. भजनानंदात वारकरी
जेवणाची ‘चव’ विसरलेला असतो.
‘काय खातो आम्ही कासाया सांगाते।
नेणो हे लागते मुखी कैसे।।’
रसनेवर विजय मिळवणं सोपं नाही. वारीत हे सहज शक्य
होतं. पंढरीच्या वारीतला सर्वांत मोठा विधी
कोणता असेल? तर तो म्हणजे एकमेकांच्या पाया पडणं हा
होय.
‘पंढरीसी लोकां नाही अभिमान।
पाया पडे जन एकमेका।।’
वारीत चालणारा प्रथम वर्ग अधिकारी जेव्हा
त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या
शिपायाच्या पायाला हात लावतो, तेव्हा त्या
अधिकाऱ्याला आपल्या पदाचा विसर पडलेला असतो.
वारीत चालत असणारी सासू नकळत सुनेच्या पाया
पडताना दिसते, तेव्हा त्या सासूला आपल्या
‘सासूपणा’चे आणि खाष्ट स्वभावाचे विस्मरण होतं!
‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म।
भेदाभेद भ्रम अमंगळ।।’
या तत्त्वप्रणालीनुसार वारकरी जेव्हा एकमेकांच्या
पाया पडतात, तेव्हा त्यातून जी सुंदर फलश्रुती बाहेर येते,
तिचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं आहे.
‘निर्मळ चित्ते झाली नवनीते।
पाषाणा पाझर फुटती रे।।
वर्ण-अभिमान विसरली याती।
एक एका लागतील पायी रे।।’
या ठिकाणी वारीतली समता पाहायला मिळते.
वारीतली निवासव्यवस्था तंबूत असते. आलिशान
बंगल्यात कदाचित शांत झोप लागणार नाही; मात्र
एरवी गादीवर झोपणारी माणसं तंबूत साध्या
बारदानावर शांत झोपी जातात, तेव्हा मानसिक
शांतीचा साक्षात्कार वारीतच प्राप्त होतो. आज
एखाद्या कर्मचाऱ्यानं एखादं घर विकत घेतलं, तर बॅंकेचे हप्ते
सेवानिवृत्तीपर्यंत भरावे लागतात. वारीत रोज नवा
‘बंगला’! सायंकाळी तंबू ठोकायचा आणि सकाळी
झोपेतून उठल्यावर पाडायचा आणि पुढच्या
वाटचालीला प्रारंभ करायचा. यातून...
‘वस्तीकर वस्ती आला।
प्रातःकाली उठोनि गेला।
तैसे असावे संसारी।
जोवरी प्राचीनाची दोरी।।’
अशी संतबोधाची अनुभूती येते.
वारीमध्ये वार आठवत नाहीत, त्यामुळं अनेकांचे
आठवड्याचे उपवासही विसरल्याची उदाहरणं आढळतात.
न्याहारी झाल्यावर लक्षात येतं, की आज सोमवारचा
उपवास होता! या विसरण्यातही एक आगळावेगळा आनंद
दडला आहे. दिनांक आठवत नाही. हातातल्या
घड्याळाकडं लक्ष जात नाही. परिणामी, वेळही कळत
नाही. एवढंच काय, या भक्तिसुखात तहान-भूकदेखील
हरपून जाते.
‘तुका म्हणे जीवा
थोर जाले सुख।
नाठवे हे भूक
तहान काही।।’
सर्वांत मोठं दुःख क्षुधा आणि तृषेचं आहे. या आनंदवारीत
या दुःखाचं विस्मरण होतं. पंढरीच्या वारीमधे
अशक्यप्राय असणाऱ्या गोष्टी सहजच घडून जातात.
तेव्हा...
‘ते या पंढरीसी घडे’
असंच म्हणावं लागतं.
एकवेळ मनुष्य (माझं) विसरतो मात्र ‘मी’ विसरणं अतिशय
अवघड असतं. वारीच्या या आनंदकल्लोळात वारकऱ्यांचा
‘मी’ हरवून जातो. अशा अवस्थेचं वर्णन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर
महाराजांच्या शब्दांत सांगायचं झालं, तर...
‘मी, माझी ऐसी आठवण।
विसरले जयाचे अंतःकरण।
पार्था तो संन्यासी जाण।
निरंतर।।’
काषायवस्त्र परिधान न करताही वारकरी संन्यासी
होतो. तो पांढऱ्या वस्त्रातला संन्यासी म्हणावा
लागेल.
पंढरीच्या पायी वारीची सांगता श्रीविठ्ठलदर्शनानं
होते. आपल्या घरातून निघालेला वारकरी शेकडो मैल
चालत येतो. दमतो, भागतो मात्र भक्तितेजानं उजळतो.
चंद्रभागेत स्नान करतो. भक्त पुंडलिकरायाचं दर्शन घेतो.
पंढरी क्षेत्राची नगरप्रदक्षणा करतो. पाच-पंचवीस तास
बारीत उभा राहून ‘श्री’च्या राउळात प्रवेश करतो
आणि समोर ‘श्रीविठ्ठला’ची निळीसावळी मूर्ती
दिसते.
‘श्रीहरी’दर्शनानं त्याच्या जीवनाचे सार्थक होतं.
भागशीण निघून जातो. डोळ्यांतले आनंदाश्रू गालावर
ओघळतात. ओघळलेल्या अश्रूतून त्याचा ‘स्व’
श्रीविठ्ठलचरणी समर्पित होतो!

- श्रीगुरु महंत प्रमोदमहाराज जगताप , सुपे -बारामती

दै सकाळ , सप्तरंग पुरवणी पृष्ठ क्र ०४,१२

(संपूर्ण महाराष्ट्र आवृत्ती )

Tuesday 7 July 2015

पंढरपुरा नेईन गुढी - live updates पालखी सोहळा मार्ग

  

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

यांद्वारे आजपासुन 

#पंढरपुरा नेईन गुढी

घरबसल्या आपल्या स्मार्टफोन वर संत साहित्य आणि वारीच्या क्षणा क्षणाचे #live updates आपल्या anroid mobile वर

समावेश

संत साहित्य - सार्थ ज्ञानेश्वरी / अभंग

विस्तृत माहिती

पालखी सोहळा updates -

श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज , श्रीक्षेत्र नाशिक - श्रीक्षेत्र पंढरपुर मार्ग

श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज , श्रीक्षेत्र आळंदी -  श्रीक्षेत्र पंढरपुर मार्ग

श्री संत मुक्ताई माहाराज , श्रीक्षेत्र मुक्ताईनगर -  श्रीक्षेत्र पंढरपुर मार्ग

श्री संत सोपान काका महाराज , श्रीक्षेत्र
सासवड - श्रीक्षेत्र  पंढरपुर मार्ग

श्रीसंत एकनाथ महाराज , श्रीक्षेत्र
पैठण - श्रीक्षेत्र   पंढरपुर मार्ग

श्रीसंत तुकाराम महाराज , श्रीक्षेत्र
देहु -   श्रीक्षेत्र  पंढरपुर मार्ग

विशेष सहकार्य

पूज्य गुरुवर्य ह.भ.प.श्रीमहंत प्रमोद महाराज जगताप

फेसबुक दिंडी समूह

वारी संतांची - स्वप्निल कापसीकर

चोपदार फाउंडेशन , आळंदी

सर्व संत  संस्थान कमिटी ( आळंदी/ नाशिक /मुक्ताईनगर /सासवड / देहु/शेगाव  आदि )

साऱ्या updates साठी केवळ आपल नाव व वास्तव्य ठिकाण ८४५१८२२७७२  वर पाठवा व सारे updates मिळवा

इंटरनेट च्या माध्यमातुन संत साहित्य आपण सर्व मान्यवरां पर्यन्त पोहचण्यासाठी आम्हास सहकार्य करा जास्तीत जास्त msgs forward करा व आपल्या समवेत इतरांना ही आनंद दया 👏

वेढा रे वेढा रे पंढरी । मोर्चे लावा
भीमा तीरी ।।
चला चला संतजना । करू देवासी
भांडण ।।
लुटा लुटा पंढरपुर । धरा रखुमाईचा
वर ।।
तुका म्हणे चला चला । ठाव
निशाणी लावला ।।

चला तर मग वारीला आमच्या समवेत 🚩

संतचरणरज ,

अक्षय चंद्रकांत भोसले
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

Varkariyuva.blogspot.in

धन्यवाद !