Saturday 25 June 2016

वारीला येताय मग या वस्तू घेतल्यात का ?

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

१) टाळ - प्रत्येकाकडे वैयक्तिक टाळ आवश्यक
२)वारकरी सांप्रदायिक भजनी मालिका
३) किट १
   (१)आपली औषधें (मधुमेह इत्यादी)
   (२) अंगदुखी , डोकेदुःखी
   (३) ताप सर्दी इत्यादी
   (४) वळकुटी - मिनी सतरंजी, त्याच आकाराचा प्लास्टिकचा कागद
   (५)कपड्यांची बॅग
   (६)ताट तांब्या चमचा ect
   (७) मोबाईल चार्जिंगसाठी एखादं एक्स्टेंन्शन बोर्ड असेल तर आपल्या सोबत इतर वारकऱ्यांचीही मोबाईल चार्जिंग सोय होते .
   (८) पुरुषांनी विशेष करून सांप्रदायिक पोषक वापरावा (शुभ्र सदरा धोतर व टोपी)
  (९)कैची , सुई , धागा इत्यादी वेळी प्रसंगी अचानक लागतात .
  ४) जे वारीला प्रथम येत  आहेत त्यांनी शुद्ध पाणीच प्यावं वारीदरम्यान पाण्याची बाटली ५ ते १० रु. उपलब्ध असते .
५)शबनम पिशवी किंवा बॅग - दिवसभराच्या प्रवासादरम्यान सामानाची बॅग अर्थात वळकुटी  ट्रक मध्ये ठेवलेली असते तिची गाठ ही रात्रीच्या मुक्कामवरच होत असते म्हणून शबनम अर्थात लहान बॅग आपल्या सोबत असावी जेणेकरून त्यात भजनी मालिका, टाळ, काही औषधे , पाण्याची बाटली त्यात ठेवता येतील.
६) मुक्कामाच्या ठिकाणी पाणी उपलब्ध झालं तर कपडे धुण्याकरिता लागणारी सामुग्री .
(पाण्याची काटकसर करावी ही विनंती)
७) लहान प्लास्टिकचा कागद .सहसा माऊली विसाव्याला थांबली असता त्यावर आराम करण्याकरिता  बसताही येतं व झोपताही येतं .
८)छत्री किंवा कोट पावसापासून संरक्षण करण्यासाठी .
९) एक मोठी गोण त्यावर ठळक अक्षराने आपले नाव व क्रमांक पत्ता  लिहीलेले असावे त्यात सामानाची बॅग बसेल इतकी मोठी गोण असावी. ती बांधून सामनाच्या ट्रक मध्ये टाकता येते व नंतर शेकडोंच्या सामानातून शोधताना सहज मिळते .
१०) आपल्या नावाच आयकार्ड (ओळखपत्र) आपल्या खिशात ठेवावे दिंडीत गेल्यावर सहसा दिंडी सोडू नये पण कदाचित चुकामूक झाली असता भेट घडावी म्हणून  पहिल्याच दिवशी सहकारी वर्गाचा क्रमांक व दिंडीची पत्रिका सोबत ठेवावी .
११)मौल्यवान वस्तू सोबत आणणे कृपया टाळावे.
१२) एक छान तुळशीची जपमाळ - निवांत वेळी नाम जप करण्यास उपयुक्त
१३) पूजेचे देव व ग्रंथ
१४) हरिपाठाचं पुस्तक सुरुवातीला असावे ज्यांचा पाठ नाही त्यांच्या करिता
वारी पंढरपूरला पोहचेपर्यंत तोही पाठ झालेला असतो .

चला तर मग साऱ्या वस्तू अगदी व्यवस्थित भरून घ्या आणि आता घरी बसुन काय करता? चला पाऊले चालती पंढरीची वाट.

प्रस्थान :
मंगळवार - २८ जून २०१६
श्री संत ज्ञानेश्वरमहाराज समाधी मंदिर , श्री क्षेत्र आळंदी देवाची  येथुन .

- Varkariyuva.blogspot.in

वक्रदृष्टी - श्रीगुरू पु. ह.भ.प.चैतन्यमहाराज देगलूरकर

|| ज्ञानेशो भगवान विष्णु  : ||

असे म्हणतात की देवाने माणसाची निर्मिती केली आणि देवालाच समाधान झाले.माणूस परिपूर्ण नाही, पण परिपूर्ण होण्याचे सामर्थ्य देवाने केवऴ माणसालाच दिले आहे.माणूस गुणसंपन्न होऊ शकतो.याचा अर्थ केवऴ माणसाकडेच गुण असतात,इतर प्राण्यांकडे काहीच नसतात असे नाही.जगाकडे सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर माणसाने ज्यांच्याकडून काही गुण घ्यावेत असे अनेक प्राणी आहेत.जे चांगले ते कोठून घ्यावे . ' बालदपि सुभाषितं ग्राह्यम् ' असे म्हटलेले आहे. केवऴ प्राण्यापासून नव्हे तर पृथ्वी , वृक्षादिकांच्या ठिकाणीही चांगले गुण आहेत. 


' जो खांडावया घावो घाली । का लावणी जयाने केली । दोघा एकचि सावली । वृक्ष दे जैसा ।।' 
हा क्षमा नावाचा गुण वृक्षात श्रीज्ञानदेवांना मिऴाला. कोणत्या प्राण्या-पक्ष्यांपासून कोणते गुण घ्यावेत याचा कौटिल्यांनी व चाणक्यांनी फार सुरेख विचार केला आहे.प्रभूतमल्प कार्यं वा याे नर : कर्तुमिच्छति । सर्वारंभेण तत्कार्यं सिंहादेकं प्रचक्षते ।।

कार्य लहान असो वा मोठे , ते पूर्ण सर्व सामर्थ्याने करावे हे सिंहाकडून शिकावे.

इंद्रियाणिच संयम्य बकवत् पंडितोनर : । देशकाल बलं ज्ञात्वा सर्वकार्याणि साधयेत् ।।
बुद्धिमान माणसाने बगऴ्यापासून इंद्रियांचे संयमन,देश,काल,बलाचा विचार करून कार्यसिद्धी करणे हे गुण जाणावे.

सुश्रांतॊऽपि वहेद्भारं शितोष्णं न च पश्यति । ससंतोषस्तथा नित्यं त्रीणि शिक्षेच्च गर्दभात् ।।
अतिशय श्रांत असूनही ओझे वाहणे,काम करताना शितोष्णाची पर्वा न करणे आणि सर्वदा संतुष्ट असणे हे गुण गाढवापासून घ्यावेत.

प्रत्युत्थानं च युद्धं च संविभागं च बंधुषु । स्वयमाक्रम्य मुक्तं च शिक्षेच्चत्वारि कुक्कुटात् ।।

योग्य वेऴी जागे होणे, युद्धासाठी नेहमी तयार असणे,सर्वांनी मिऴून खाणे- सर्वांना समान भाग देणे,प्रसंगी आक्रमक होणे हे गुण कोंबड्यापासून घ्यावेत.

गूढ मैथूनचारित्वं काले काले च संग्रहम् । अप्रमत्तविश्वासं पन्च शिक्षेच्च वासयात् ।।
गुढ मैथुन, भविष्याकडे दृष्टी ठेवून संग्रहीवृत्ती ,आऴसाचा त्याग,सावधानता आणि कोणावरही विश्वास न ठेवणे हे कावऴ्याचे गुण आहेत.आणि 'बव्हाशी
स्वल्पसंतुष्ट : सुनिद्रो लघुचेतन : । स्वामिभक्तश्च शूरश्च षडेते श्वानतो गुणा : ।।'
अधिक अन्नाची गरज पण अल्पसंतुष्टता, गाढ झोप पण लवकर जाग येणे, स्वामिभक्ती, आणि शौर्य हे गुण कुत्र्याचे घ्यावेत.जगात गुण पुष्कऴ आहेत. दृष्टी गुणग्राहक असावी.सगऴीकडून चांगले घ्यावे !


संदर्भ - संतसंग

© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर

श्रद्धा - श्रीगुरू पु. ह.भ.प.चैतन्यमहाराज देगलूरकर

|| ज्ञानेशो भगवान विष्णु : || 
माणसाच्या भावना एका ठिकाणी स्थिर राहत नाहीत.एकाच्याच ठिकाणी श्रद्धा ठेवणे त्याला जमत नाही.माणूस एखाद्याबद्दल एके काऴी प्रेम व्यक्त करतो ,तर कालांतराने त्याच्याबद्दलच द्वेषाची भाषा करतो. कारण माणसाच्या भावना स्वार्थापोटी निर्माण होतात आणि स्वार्थ साधला की, ती भावनाही नष्ट होते.परामार्थातही माणसाची भावना एका ठिकाणी राहत नाही.अनेक देवतांवर माणसांची भावना असते.त्या त्या देवतेसंबंधाने विशिष्ट प्रसंगामध्ये तो आपल्या भावना व्यक्तही करीत असतो.श्रीज्ञानेश्वरीमध्ये भगवान हे अज्ञानाचे लक्षण मानतात.तेराव्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात,
'एकादशीच्या दिवशी । जेतुला पाडू आम्हासी । तेतुलाचि नागांसी । पंचमीच्या दिवशी ।। चौथ मोटकी पाहे । आणि गणेशाचाचि होये । चावदासी म्हणे माये । तुझाचि वो दुर्गे ।। पाठी सोमवार पावे । आणि बेलेसि लिंगा धावे । ऐसे एकलाचि आघवे । जोगावी जो ।।
माणूस प्रत्येकाच्या ठिकाणी श्रद्धा व्यक्त करतो; पण एकाच्याही ठिकाणी स्थिर नाही.
' एको देव: केशवो वा शिवो वा ।' असे म्हटले जाते.माणसाने एकाचेच चिंतन करावे.
श्रीतुकाराम महाराजांनी देवाला म्हटले आहे, ' सर्व संगे वीट आला ।
तू एकला आवडसी ।।'
उपनिषदांनीही परमात्म्याचे वर्णन ' एकमेवद्वितीयम् ' असे केले आहे.स्वगतसजातीयविजातीय भेदशून्य असा एकच परमात्मा आहे.बाकीचे देव हेही स्वरूपाने तेच आहेत.तसे तर स्वरूपाने सर्व परमात्मास्वरूपच आहे.पण माणूस अघोरी देवतांचीही उपासना करतोच.कारण माणूस प्रेमापेक्षा भीतीनेच त्यांची भक्ती करतो.श्रीतुकाराम महाराज तर स्पष्ट म्हणतात,
' शेदरी हेंदरी दैवते । कोण ती पूजी भूतखेते । आपुल्या पोटाजी रडते । मागती शिते अवदान ।।'
यांना संत देवच मानत नाही,जीवच मानतात.भागवतात म्हटले आहे,
मुमुक्षवो घोररूपान्हित्वा भूतपतीनथ । नारायणकला: शान्ता भजन्ति ह्यनसूयव:।। मुमुक्षूने अघोरी देवतांची भक्ती न करता केवऴ नारायणाचेच चिंतन करावे.एकातच समाधान असते.


संदर्भ - संतसंग
© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.