Friday 25 September 2015

जगप्रसिद्ध रामकथावाचक पूज्य श्रद्धेय मोरारी बापू यांचा आज जन्मदिन !

।। श्री गुरु ।।

जगप्रसिद्ध रामकथावाचक पूज्य श्रद्धेय मोरारी बापू यांचा आज जन्मदिन !
मासिक वैष्णव दर्शन यांस मागील  सलग तीन महीने तसेच पुढे ही कायम जीवन दिशादर्शक रामायण या सदरामध्ये अनेक लेख बापूंच्या वतीने येत आहेत हे आमच भाग्य 😇
पूज्य बापूंना उदंड आयुष्य प्राप्त होवो ही विठु  माऊली चरणी प्रार्थना 🙏🏻

- अक्षय भोसले ०८४५१८२२७७२

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

Friday 18 September 2015

" समाजप्रबोधनपर कार्यक्रमांना सार्वजनिक गणेश मंडळांचा फाटा "

।। श्री गुरु ।।

पूर्वी सार्वजनिक गणेश मंडळांकडे समाज प्रबोधनपर
कार्यक्रमाची रेलचेल असायची. मात्र, गेल्या काही
वर्षांत जनजागृतीच्या कार्यक्रमांवर भर न देता लाखो
रुपये खर्च करून वेगवेगळ्या मंदिराच्या व राजवाडय़ांच्या
प्रतिकृती आणि देखावे तयार केले जात आहेत. शिवाय
सजावट, रोषणाईवर जास्त भर दिला जात आहे. देखावे
आणि सजावटीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात
कोटय़वधी रुपये खर्च होत आहे.
गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हटले की सार्वजनिक गणेश
मंडळात नकला, नाटक, वाद्यवृदांचा कार्यक्रम, कीर्तन,
भजन, वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन,
चित्रपट आदी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक
कार्यक्रमांची रेलचेल असायची आणि त्याचा आनंद
वस्तीतील लोक घेत होते. राष्ट्रहितास्तव लोकमान्य
टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि
केसरीच्या माध्यमातून या उत्सवाला आकार देण्याचा
प्रयत्न केला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक,
वैचारिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून
समाजातील विविध पातळीवरील माणसे एकत्र आली
आणि काही विशिष्ट विचार रुजविण्याचा प्रयत्न
करण्यात आला. १८९३ मध्ये सुरू झालेल्या गणेशोत्सवाचे
स्वरूप करमणूक आणि उत्सव प्रधान झाले होते.
गणेशोत्सवात कुठले कार्यक्रम आहेत हे जाणून घेण्यासाठी
अनेक लोक गणेशोत्सव मंडळाच्या निमंत्रण पत्रिकांची
वाट पाहात होते. आज मात्र पत्रिका असल्या तरी
त्याचा उपयोग केवळ विविध कंपन्याच्या
जाहिरातीसाठी केला जातो आणि कार्यक्रमांचा
मात्र त्यात लवलेश नसतो. विविध देखावे तयार
करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात असून त्यासाठी
मुंबई आणि कोलकाताच्या कारागिरांना बोलविले
जाते. त्यांची किमान पंधरा दिवस राहण्याची,
खाण्याची व्यवस्था मंडळातर्फे केली जाते आणि
त्यांना लाखो रुपये दिले जातात. दहा दिवस देखावे
पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असली तरी
लोकमान्य टिळकांचा जो उद्देश होता त्या उद्देशाचे
काय हा प्रश्न अनुत्तरीत आहे. थोडा विचार करा आणि आपणच पहा उत्तर काय येत ते ?

- अक्षय भोसले
०८४५१८२२७७२
varkariyuva.blogspot.in

तुका म्हणे शोधून पाहे । विठ्ठल गणपती दुजा नोहे ।।

|| श्रीगुरू || 

सध्या सबंध महाराष्ट्र भक्तीमय  वातावरणात आहे जिकडे तिकडे ढोल ताशे गुलालाची उधळण ! 


आपणास तर माहीतच आहे कि सकल संतानी भगवंताविषयी त्याच्या रूपाविषयी अनेक ग्रंथात वर्णन केले आहे . जो मूळ आदी आहे असा ओमकार हा गणेशाचे रूप आहे हे सांगताना तुकराम महाराज म्हणतात " ॐकार प्रधान रूप गणेशाचे " . ज्या प्रमाणे आपणा सर्वांस अस वर्षभर वाटत असत कि कधी आपले बप्पा पुन्हा घरी येणार रोज रात्रीची आरती मग सारे एकत्र आलेले पाहुणे आणि एकंदर कुटुंबासमवेतचे आनंदाचे १० दिवस आणि सारीच ती आतुरता अगदी अशी आतुरता श्री संत तुकाराम महाराजां आदि संताना हि होती मात्र  श्री संत तुकाराम महाराजां  करिता विठ्ठल जळी स्थळी पाषाणी मग गणरायात विठुरायाच रूप पाहिलं तर नवल नसावे अगदी गणराया तू लवकर ये सगळ्यांना भेट दे तू विघ्नहर्ता आहेस , तू नाचत ये आमच्या घरी आणि अस बरच काही सांगणारा हा अभंग  - 
गणराया लवकर येई भेटी सकलासी देई ।।
अंगी शेंदुराची उटी केशर कस्तुरी लल्लाटी ।।
पायी घागु-या वाजती नाचत आले गणपती ।।
अवघ्या गणांचा गणपती हाती मोदकाची वाटी ।।
तुका म्हणे शोधून पाहे  विठ्ठल गणपती दुजा नोहे ।।

, आमच्या  मासिकाच्या सहकारी जयश्री पाटीलजी यांच्या घरी असणारे गणराया पाहिले  आणि अहो खरच पटल शोधा म्हणजे सापडेल , सार कुटुंब वारकरी आहे आणि अगदी गणरायाला हि पाहिलं तर साक्षात वाटत कि आज विठूराया गणेशाच रूप घेऊनच घरी आलेत , अगदी मस्तकावर धारण केलेला मुकुट , कानातली मकराकार कुंडलांपासून ते पिवळा पितांबरा गगनी झळकला पर्यंत विठूराया AS IT IS फारच आनंद वाटला हे मनमोहक रूप पाहून आणि मग चरण आठवल " तुका म्हणे शोधून पाहे  विठ्ठल गणपती दुजा नोहे ।।"  ( गणेश मूर्ती फोटो सौजन्य - जयश्री पाटील )


आणि असेच महाराजांचे श्री गणराया संदर्भातील  काही अभंग पुढे देत आहोत

धरुनिया फरश करीभक्तांची विघ्ने वारी ।।
ऐसा गजानन महाराजा त्याला नमस्कार माझा ।।
शेंदूर शमी बहु प्रिय त्याला तुरा दुर्वांचा शोभला ।।
उंदीर असे ज्याचे वाहन माथा जडित मुकुट पूर्ण ।। 
नाग यज्ञोपवीत रुळे शुभ्र वस्त्र शोभी साजरे ।।
भाव मोदक हारा भरी तुका भावे पूजा करी ।।

जगद्गुरू तुकोबारायांनी असेही लिहिले आहे.

सिध्दीकांता चिंतामणी माझी एका विनवणी ।।
घडो गणेशाचा संगमनी रंगो बुध्दारंग ।।
चराचरी गजानन माझे पाहोत नयन ।।
मायबापा सखया तुका वंदीतो मोरया ।।

विठ्ठल आणि गणेश हे दो्ही एकच आहेत असे तुकारामांनी म्हंटलेले आहेच, सर्व देव एकच आहेत असे सांगतांना संत नामदेवांनी आपल्या अभंगात असे लिहिले आहे.

गणेश म्हणू तरी तुझाची देखणा म्हणूनि नारायणा नमन तुज ।।
सारजा नमू तरी ते तुझी गायनीम्हणूनि चक्रपाणी नमन तुज ।।
वेद नमू तरी तुझाचि स्थापिता म्हणूनि लक्ष्मीकांता नमन तुज  ।।
नामा म्हणे भेटी भेटी झाली पै राया कोण गणो कोण गणो वा या सेवकासी ।।



नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे ।
माथा शेंदुर पाझरे वरी वरी दुर्वांकुराचे तुरे ।
माझे चित्त हरे मनोरथ पुरे देखोनि चिंता नुरे ।
गोसावीसुत वासुदेव कवी रे या मोरयाला स्मरे ।।
आज हि नमन आमच्या पवई च्या श्री  दुर्वाप्रीय गणेश मंदिरात नियीमित आरती प्रारंभी आमचे श्रीकांत गुरुजी कायम म्हणतात एकंदरच गणेशाचे किती सुंदर वर्णन या श्लोकात अभंगात  केले आहे .हे  गणराया आमच्या महाराष्ट्रावर यंदा दुष्काळाचे सावट आहे , अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत , बप्पा तू साऱ्यांच ऐकतोस ना ? मग यंदा आम्हा वारकरी वर्गाच ऐक ना रे ! माझा बळीराजा सुखावू दे एकदाचा पाउस होऊन जाउदे , आणि महत्त्वाच  म्हणजे दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारयणा ... हे जग सुखी व्हावे इतकच रे मागण तुझ्या चरणी !   


वारकरी संप्रदाय युवा मंचच्या वतीने आपणा सर्वांस गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! 

आपला ,
अक्षय  चंद्रकांत भोसले  - ०८४५१८२२७७२  
varkariyuva.blogspot.in

Thursday 17 September 2015

श्री गणेशाला वेड मासिक वैष्णव दर्शनचे - संपादक

माझ्या बप्पा ला ही वेड मासिक वैष्णव दर्शन चे बघा ना , घरी येता क्षणीच टेबलवरील मासिक हातात घेऊन वाचन सुरु - अक्षय भोसले 

Saturday 12 September 2015

महान कार्यात खारुताईनेही लावला हातभार- ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले


 || श्रीगुरू ||
सीता शोधाचा निरोप घेऊन हनुमान रामाकडे आल्यानंतर राम हनुमानाची स्तुती करतात, परंतु हनुमान म्हणतात की, तुझ्या रामनामामुळेच हे शक्य झाले. सीता लंकेत असल्यामुळे सर्व वानरसेना सुग्रीवासह समुद्राच्या काठावर येऊन थांबते. त्यावेळी सेतू उभारणीसाठी प्रभू रामाच्या या महान कार्यात आपलाही सहभाग असावा, यासाठी खारुताई देखील वाळू टाकण्याचे काम करते व तेव्हापासून 'खारीचा वाटा' हा शब्द प्रचलित झाला, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
ते श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या 'अध्यात्म रामायण' या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होते.
बोधले महाराज म्हणाले, वानरसेना समुद्र काठावर थांबलेली असताना तिकडे लंकेत रावण व बिभीषणात संवाद होऊन बिभीषण रावणाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, मात्र रावण न ऐकता बिभीषणाचा अपमान करतो. शेवटी बिभीषण आपल्या सहकार्‍यांसह रामाला शरण जातात. बिभीषण शरण आल्यानंतर प्रभू राम त्याचा स्वीकार करायचा की नाही, याचा विचार करतात मात्र हनुमान त्याचा स्वीकार करावा, असे रामाला सांगतात. पुढे सेतू बांधण्यासाठी समुद्राची पूजा करुनही समुद्र शांत होत नाही म्हटल्यावर रामाने धनुष्यबाण काढल्यावर समुद्रदेव रामाच्या पायाशी येतात. त्यानंतर सेतू बांधण्याचे काम सुरु होते. वानर मोठमोठे दगड पाण्यात टाकण्यास सुरुवात करतात, मात्र 'राम' हे शब्द लिहिल्यानंतरच दगड पाण्यावर तरंगण्यास सुरुवात होते. त्यावेळी एक खारुताई पाण्यात जाऊन परत वर येते, वाळूत मिसळून दगडाच्या खाचेत वाळू टाकण्याचे काम करते, राम तिला विचारतात तेव्हा तुमच्या या महान कार्यात माझाही सहभाग असावा म्हणून हे काम करीत आहे. सेतू बांधून झाल्यावर राम समुद्रकिनारी रामेश्‍वराची स्थापना करतात. सर्व सैन्यानिशी राम लंकेत दाखल झाले. ही बातमी रावणाला कळताच त्याचे दोन हस्तक पाहणीसाठी येतात त्यांनाही राम काही न करता जाऊ देतात. राम हे सुग्रीव, हनुमंत, लक्ष्मण यांना हे युद्ध होऊ नये म्हणून शिष्टाईसाठी कोणाला तरी पाठवा, असे म्हणतात व त्यानंतर अंगदाला रावणाकडे शिष्टाईसाठी पाठविले जाते, असे महाराजांनी सांगितले.
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 

Thursday 10 September 2015

शंभर योजने समुद्र पार करून हनुमान लंकेत- ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले


 || श्रीगुरू ||
 वालीच्या मृत्यूनंतर प्रभू रामाच्या साक्षीने सुग्रीवाला किष्किंदा नगरीचा राजा करण्यात आले. त्यानंतर सुग्रीवाने चारी दिशांना सीतामातेच्या शोधात आपली वानरसेना पाठवली, तर खास दक्षिणेकडे हनुमान निघाले. त्यावेळेस हनुमंत रामाला विचारतो की, मी सीतेला कसे ओळखणार? त्यावर राम म्हणतात की, जिथे सीता असेल त्याच्या चोहोबाजूला रामनामाचे स्मरण असेल. हनुमान पुन्हा म्हणतो की, सीता मला कशी ओळखेल? त्यावर राम आपल्या हातातील अंगठी देतात व ती अंगठी कोठे पडू नये यासाठी ती अंगठी आपल्या तोंडात घेऊन हनुमान अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत लंकेत प्रवेश करतात, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
ते श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 'अध्यात्म रामायण' या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होते. पुढे बोलताना बोधले महाराज म्हणाले की, हनुमान निघाला असताना वाटेत डोंगरावर एक गुहा दिसते, त्या गुहेत फळे आणि पाणी भरपूर असते. त्याठिकाणी तापसी नावाची स्त्री असते. तिच्यात आणि हनुमंतामध्ये संवाद होतो, ती सर्वांना डोळे झाकायला सांगते व नंतर उघडताच सर्व वानरसेना समुद्राच्या काठावर थांबलेले दिसतात. तिथे जटायूचा भाऊ संपाती याची भेट होते. त्याला सूक्ष्मदृष्टी असते. तो एका डोंगरावर उभा राहून पाहतो तेव्हा त्याला लंका दिसते व त्या लंकेत अशोक वनातील एका वृक्षाखाली सीता त्याच्या दृष्टीस पडते. मात्र लंकेत जाण्यासाठी शंभर योजनेचा समुद्र असतो. हे अंतर रोज पार करणाराच समुद्रात जाऊ शकतो. प्रत्येक जण प्रयत्न करतात; मात्र १0 ते ५0 योजनेच्या पुढे कोणीच जाऊ शकत नाही. मग जांबुवंत हनुमंताला त्याच्या शक्तीचे स्मरण करून देतात. हनुमंत प्रभू रामाचे स्मरण करून उड्डाण घेतात. जाताना समुद्रात मैनात नावाचा पर्वत त्याला आडवा येतो. तो विश्रांतीला थांबण्याची विनंती करतो; मात्र थांबणे हे माझे काम नाही, असे हनुमान म्हणतो.
शेवटी त्याच्या आग्रहाखातर तो आपल्या पायाचा स्पर्श त्या पर्वताला करतो. पुढे सुरसा व सिंहीका देखील त्याला आडव्या येतात; मात्र आपल्या बुद्धीच्या जोरावर तो शंभर योजने समुद्र पार करून लंकेत प्रवेश करतो, असे महाराज म्हणाले. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 

आत्मा अमर असतो - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले


 || श्रीगुरू ||
प्रभू राम शबरीच्या आश्रमातून पुढे जात असताना राम-लक्ष्मण व हनुमान या तिघांची भेट होते. ही भेट म्हणजे रामायणातील दुसरा त्रिवेणी संगमच होय. राम व सुग्रीवाची हनुमान भेट घडवून आणतात. रामाची भेट झाल्यामुळे सुग्रीवाच्या मनात असलेले वालीचे भय निघून जाते. ज्याप्रमाणे रामाची पत्नी रावणाने पळवून नेली आहे, त्याप्रमाणेच सुग्रीवाची पत्नी रुमा हिचेदेखील अपहरण केलेले असते. त्यामुळे या समदु:खी सुग्रीव व रामात चांगली मैत्री निर्माण होते, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
ते श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या 'अध्यात्म रामायण' या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होते.
बोधले महाराज पुढे म्हणाले की, सुग्रीवाची भेट झाल्यानंतर हनुमानाला सापडलेले सीतेचे दागिने तो राम व लक्ष्मणाला दाखवितो व हे दागिने तुम्ही ओळखता का, असे विचारतो. त्यावर लक्ष्मण म्हणतो की, मला कानातली कुंडले माहीत नाहीत की, गळ्यातला हारही माहीत नाही. मी फक्त पायातील जोडवी ओळखतो. कारण मी रोज सकाळी सीतामातेचे दर्शन घेत होतो, त्यामुळे मला जोडवी माहीत आहेत. यावरुन लक्ष्मणाची आचारशीलता लक्षात येते. पुढे सुग्रीव व वालीमध्ये युद्ध होते. रामाच्या एका बाणाने वालीचा मृत्यू होतो. त्यावेळेस वाली रामाला म्हणतो की, माझं अन् तुझं वैर नसताना तू मला का मारले? त्यावेळेस राम म्हणतात की, तू सुग्रीवाच्या बायकोला पळवून नेऊन अधर्म केला आहे. आणि सुग्रीव मला शरण आलेला आहे. शरण आलेल्या भक्ताचा भाऊ पुढे अध:पतनाला जाऊ लागला होता आणि तो जाऊ नये म्हणून मी माझ्या बाणाने तुझा उद्धार केला आहे. शेवटी वाली प्राण सोडतो. पुढे वालीची बायको तारा रडते व रामाला वाईट बोलू लागते. राम म्हणतात की, तू पती वालीच्या देहाला मानते की आत्म्याला, जर देहाला पती मानत असशील तर हा देह तुझ्यासमोर आहे, अन् आत्म्याला मानत असशील तर कोणाचाच आत्मा कधीच मरत नसतो. त्यामुळे तू शोक करु नको. व शेवटी राग शांत होतो. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 

रावण छळवादी तर जटायू सात्विक - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

 || श्रीगुरू ||
रावण सीतेचे अपहरण करून पुढे जात असताना वाटेत त्याला जटायू भेटतो, रावण हा छळवादी व क्रोधी वृत्तीचा होता तर जटायू हा सात्विक व सत्यवादी होता. या दोघात झालेल्या युद्धादरम्यान दोघे एकमेकांचा मृत्यू कशात आहे, असे विचारतात तेव्हा रावण खोटे बोलून माझा मृत्यू माझ्या डाव्या पायाच्या अंगठय़ात असल्याचे सांगतो तर सत्यवादी जटायू माझा मृत्यू माझ्या पंखात असल्याचे सांगतो. त्यानंतर जटायू रावणाच्या डाव्या पायाचा अंगठा फोडतो त्यादरम्यान रावण त्याचे दोन्ही पंख छाटून सीतेला घेऊन जातो. जखमी जटायूने रावणाला सीतेचे ओझे झेपणारही नाही अन् पेलणारही नाही असे म्हटल्याचे प्रतिपादन ह. भ. प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
ते श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 'अध्यात्म रामायण' या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होते. पुढे बोलताना बोधले महाराज म्हणाले की, या युद्धात जखमी झालेला जटायू म्हणतो अरे रावणा माणसाने आपल्याला झेपेल तेवढेच ओझे उचलावे, जेवढे पचेल तेवढेच अन्न खावे. तुला सीता उचलल्यामुळे हलकी वाटत असली तरी तुला ते ओझे झेपणारही नाही, पेलणारही नाही. मात्र रावण हे न ऐकता पुढे जातो. इकडून सीतेला शोधत असलेले राम-लक्ष्मण येतात. राम दंडकारण्यात सीता विरहाने व्याकूळ होऊन झाडांना, दगडांना, फुले-फळांना स्पर्श करून विचारतात की माझी सीता कुठे आहे. या झाडांना व दगडांना स्पर्श करताना त्यांचा उद्धार करणे हा त्यांचा हेतू होता. त्यानंतर विरहावस्थेतील जटायूजवळ आल्यानंतर जटायू सर्व वृत्तांत रामांना सांगतो. जटायूची अवस्था पाहून राम त्याला पंख येण्यासाठी स्पर्श करतो, असे म्हणतात. मात्र जटायू तयार होत नाही. तो म्हणतो आता माझ्या मुखात रामनाम आहे, माझ्या डोळ्यात रामदर्शन आहे आणि हृदयात स्थान आहे. अशा स्थितीत मला जीवदान देण्यापेक्षा मरणच बरे. शेवटी राम त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याचा उद्धार करतात.
त्यावर राम म्हणतात, सीतेच्या अपहरणापेक्षा जटायू मेल्याचे मला जास्त दु:ख झाले आहे. पुढे शबरीच्या आश्रमात येऊन तिच्या मनातल्या भावापोटी तिची उष्टी बोरे खातात व ऋषीमुख पर्वतावर सुग्रीवाची भेट घेण्यासाठी जातात. जटायूपक्षाने सीता अपहरणानंतर रावणाला समजावून सांगत असे वागू नको, अशी विनवणी केली. मात्र त्यांनी जटायूचे काहीच ऐकले नाही. त्यामुळे त्याला संकटात जावे लागले. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 

छायारुपी सीतेचे रावणाने केले अपहरण- ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

 || श्रीगुरू ||
 राम, लक्ष्मण व सीता पंचवटीमध्ये राहत असताना, इकडे रावण व मारिच यांचा संवाद सुरु होतो. व तो सीता अपहरणासाठी तयार केलेली युक्ती सांगतो व मारिचाला तू हरणाचे रुप घेऊन पंचवटीला जाण्यास सांगतो, मात्र मारिच तयार होत नाही म्हटल्यावर तो, तुला मारुन टाकीन असे म्हणतो, मग शेवटी इथे रावणाच्या हातून मरण्यापेक्षा पंचवटीला जाऊन रामाच्या हस्ते मेलेले बरे म्हणून मारिच हरणाचे रुप घेऊन पंचवटीला येतो, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या 'अध्यात्म रामायण' या विषयावरील प्रवचनमालेत ते बोलत होते. मारिच सोनेरी हरणाचे रुप घेऊन पंचवटीला आल्यानंतर सीता ते हरीण पाहते व त्या हरणाविषयी प्रभू रामाकडे इच्छा व्यक्त करते. हा संवाद ऐकत असलेला, सर्वत्र लक्ष ठेवून असलेला लक्ष्मणलादेखील या हरणाविषयी संशय येतो. मात्र रामाला अपूर्व काम करावयाचे असल्यामुळे प्रभू राम धनुष्य घेऊन त्या हरणाच्या पाठीमागे लागतात. रामाने मारिच हरणावर बाण सोडला व नंतर लक्ष्मण हाका मारायला लागला. ही हाक सीतेने ऐकली तेव्हा तिने लक्ष्मणाला बोलावून घेऊन रामाकडे जाण्यास सांगितले मात्र लक्ष्मण काही तयार झाला नाही. तेव्हा सीता वाईट विचार व वाईट उच्चार करु लागली. यावर महाराज म्हणतात की, वाईट विचार, वाईट उच्चाराला जन्म देतात. म्हणून विचार शुद्ध असतील तर उच्चार शुद्ध होतात अन् उच्चार शुद्ध असतील तर आचारदेखील शुद्ध राहतात. मग शेवटी लक्ष्मण रेघा ओढून रामाकडे गेला. त्यादरम्यान रावण भिक्षुकाचे रुप घेऊन पंचवटीत हजर होतो. सीता ज्यावेळी भिक्षा आणण्यासाठी झोपडीत जाते तेव्हा सगळे देव झोपडीत अवतरतात, ते सीतेला बाहेर जाऊ नको म्हणतात कारण रावणाने सीतेला हात लावला तर तो भस्मसात होईल अन् मग रावण मेला तर प्रभू राम लंकेत जाणार नाहीत, मग इंद्रजितच्या तावडीतून आपली सुटका कोण करणार? शेवटी सीतेने एक योजना आखली व आपल्या शरीरातून आपली छाया बाजूला काढली व ती स्वत: अग्निस्वरुप झाली. या छायेला स्पर्श केला तरी रावणाला काही होणार नाही. शेवटी रावण छायारुपी सीतेचे अपहरण करतो. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 

चित्रकुटावरील बंधूंची भेट म्हणजे त्रिवेणी संगम - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

 || श्रीगुरू ||


राजा दशरथाचा अंत्यविधी करुन, भरत अयोध्यावासीयांबरोबर चित्रकुट पर्वतावर रामाला भेटण्यासाठी गेल्यानंतर शत्रुघ्न ही वार्ता प्रभू रामाला सांगतात, त्या ठिकाणी दशक्रिया विधी झाल्यानंतर रामाला परत अयोध्येकडे येण्याची विनंती भरत करतो, मात्र राम ती मान्य करीत नाहीत. या ठिकाणी राम-भरत व शत्रुघ्न हे तीन बंधू एकमेकांना मिठी मारतात. ही त्यांची भेट म्हणजे त्रिवेणी संगमच, सर्वांना अनुभवायला मिळतो, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
ते श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या 'अध्यात्म रामायण' या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होते.
बोधले महाराज म्हणाले की, या ठिकाणी झालेला त्रिवेणी संगम म्हणजे काय हे सांगताना महाराज म्हणतात, राम म्हणजे गंगा, भरत म्हणजे यमुना तर शत्रुघ्न म्हणजे सरस्वती होय. रामाला विनंती करुनदेखील ते परत येत नाहीत म्हटल्यावर भरत रामाच्या पादुका घेऊन अयोध्येला परत आले. यानंतर सुदसुव नावाचा गंधर्व कावळ्याच्या रुपात येऊन सीतेच्या अंगावर बसतो. यावर राम त्याच्यावर ब्रह्मस्त्र सोडतात. त्यावेळी तो सुदसुव आपले मरण येणार म्हणून शरण येतो, त्यावर त्या कावळ्याच्या एका डोळ्यावर आघात होतो. तेव्हापासून कावळ्याला एक बुबुळ व दोन डोळे आहेत. व तेव्हापासूनच कावळ्याला पिंड ग्रहण करण्याचा अधिकार दिला आहे.
राम पुढील प्रवासाला लागतात वाटेत विराझ राक्षस भेटतो, त्याचा वध केल्यानंतर पुढे शरधंग ऋषींची तसेच अत्रिक व अनुसयेची भेट होते. पुढे अगस्ती ऋषींची भेट झाल्यानंतर त्यांच्या सांगण्यावरुन ते पंचवटीला राहतात. त्या ठिकाणी शुर्पनखा राम-लक्ष्मणासमोर येते व मला तुमच्याबरोबर विवाह करायचा आहे अशी मागणी करते. तिचे कपट पाहून राम तिचे नाक कापतो. ती रावणाकडे जाऊन रामाविषयी माहिती देते. याचे रावणाला काही वाटत नाही म्हटल्यावर ती रावणाला सीतेच्या सौंदर्याचे वर्णन करते हे ऐकून रावणाच्या मनात सीतेविषयी आसक्ती निर्माण होते व त्यानंतर रावण सीतेला पळवून नेण्यासाठी पंचवटीला येतो. या प्रवचनासाठी अँड. पुरुषोत्तम चव्हाण, कैवल्य उत्पात, कवी रामचंद्र इकारे उपस्थित होते. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 

सुख-दु:खाच्या कल्पना मनातच तयार होतात- ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

 || श्रीगुरू ||
 राम-लक्ष्मण-सीता अयोध्या सोडून वनवासाला निघाले तेव्हा नावाड्या लक्ष्मणला म्हणतो की, कैकयीने किती दु:ख दिले. यावर लक्ष्मण म्हणतो की, सुख-दु:ख देणारा दुसरा कोणी नसतो, तर आपल्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार आपले मन तयार होत असते व मनातच सुख-दु:खाच्या कल्पना तयार होतात. सुख-दु:ख हे वास्तवता नसून, त्या मनाच्याच कल्पना असल्याचे लक्ष्मण म्हणतो, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
ते श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या 'अध्यात्म रामायण' या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होते. राम वनवासाला निघाल्यानंतर गंगा नदीच्या तीरावर असलेला नावाडी गुहकाची भेट होत.े. त्याठिकाणी मुक्कामी गुहक व लक्ष्मणाचा हा संवाद या ठिकाणी महाराज सांगतात. तसेच सकाळी गंगा नदी पार करण्यासाठी गुहक नावाडी रामाला पलीकडे नेण्यास तयार होत नाही. राम जेव्हा याचे कारण विचारतात तेव्हा गुहक म्हणतो, तुमच्या पायाची धूळ लागली तर एका दगडातून अहिल्येचा उद्धार होतो तसे तुमचे पाय लागल्यानंतर माझ्या नावेचा उद्धार झाल्यानंतर मी माझे पुढील जीवन कसे जगू? तुम्हाला जायचेच असेल तर सर्वप्रथम मला तुमच्या पायाची पूजा करु द्या. हा नावाडी पूर्वजन्मी कासव होता, त्यामुळे त्याला भगवंताचे दर्शन घेता आले नाही. यंदा मात्र नावाड्याने पायाची पूजा केल्यानंतर राम पैलतीरावर जातात. व इकडे सुमंत प्रधान अयोध्येकडे परततो. त्यावेळी अयोध्येमध्ये आक्रांत सुरु असतो. राजा दशरथदेखील राम राम म्हणत आपला देह सोडतो. अयोध्येतील लोकदेखील म्हणतात, तू रामाबरोबर गेला होता मग एकटाच का परत आला. असे म्हणून त्याला शिव्याशाप देऊ लागतात. शेवटी वसिष्ट ऋषी भरताला बोलावून घेतात व घडलेली सर्व हकिकत सांगतात व भरत राजा रामाला भेटण्यासाठी चित्रकुट पर्वताकडे निघतात, असे महाराज म्हणाले.
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 

चौदा दरवाजे पार केल्याशिवाय रामाची भेट नाही - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

 || श्रीगुरू ||

 मिथिला नगरीत सीता स्वयंवर झाल्यानंतर अयोध्येमध्ये या दोघांचा संसार सुरू झाला तेव्हा संसारामध्ये रामाच्या मनोगताला अनुरूप असे सीतेचे वर्तन होते. सीता हा जीव तर प्रभू राम हे जीवन आहे. सीता हे चित्त तर राम हे चैतन्य असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
ते श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 'अध्यात्म रामायण' या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होते.
बोधले महाराज म्हणाले की, राम हे अखंड वृद्धांच्या सेवेत होते. रामाचे गुण हे लग्न झाल्यानंतर शास्त्रज्ञ, कृतज्ञ व लोकांच्या मनातील भाव ओळखणारे कुशल होते. प्रभुरामाला कोणाला शिक्षा द्यावी, कोणाला दया करावी याचे तारतम्य होते. लोक दु:खी असले तर त्यांचे दु:ख पाहून दु:खी होणारे होते. ते लोकांची उपासना करणारे होते, असेही महाराज म्हणाले. ते मनाला शिष्य बनविणारे होते. ही सर्व लक्षणे रामाच्या ठिकाणी दिसून येत असल्यामुळे राजा दशरथाने त्याचा राज्याभिषेक करण्याचे ठरवले. तेव्हा मंथरा दासीने कैकयीच्या मनात विकल्प निर्माण करण्याचा प्रयत्न करून रामाला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुमंत प्रधान रामाला बोलावण्यास पाठवले.
राम ज्या महालात राहत होता त्या महालाला चौदा दरवाजे होते, असे संत एकनाथांनी वर्णन केले होते. या चौदा दरवाजातील पहिल्या दारात रथ सोडला, दुसर्‍या दारात छत्र चामरे, तिसर्‍यात पादत्राणे, चौथ्यात अर्थ ऐहीक संपत्ती, पाचव्यात स्वार्थ, सहाव्यात सर्व साधने तर सातव्या दरवाजात मी-तू पणाचा भेद सोडला. या सात दरवाजांपुढे रामाकडे जात असताना पहिल्या सात दरवाजात सोडावे लागते पुढील सात दरवाजात स्वीकारावे लागते. त्यामध्ये श्रवण, साधना, ज्ञान, नित्य दर्शन, मनन, निधीध्यासना, वैराग्य व साक्षात्कार हे स्वीकारल्यानंतर प्रभू रामाची खरी भेट होते.
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 

शिवधनुष्याची तपश्‍चर्या राम-सीता स्वयंवराला कारण - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

 || श्रीगुरू ||
ज्यावेळेस विश्‍वामित्र ऋषी प्रभुरामचंद्राला घेऊन निघू लागले तेव्हा राजा दशरथ म्हणू लागले की, तुम्ही माझा आत्माच घेऊन चालला आहात. यावरुन दशरथाचे रामावर किती प्रेम होते हे दिसून येते. त्यानंतर राम तिथून मिथिला नगरीला गेले असता झालेल्या सीता स्वयंवरामध्ये जनक राजाचे शिवधनुष्य प्रभुरामचंद्रानेच उचलावे यासाठी शिवधनुष्यानेच केलेली तपश्‍चर्या राम-सीता स्वयंवराचे कारण झाले असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
बाश्री येथील भगवंत मंदिरात श्रावणमासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या अध्यात्म रामायण या विषयावरील प्रवचनमालेत ते बोलत होते. बोधले महाराज म्हणाले, विश्‍वामित्र राम-लक्ष्मणाला घेऊन जात असताना जाताना त्यांनी कृतिकेचा वध केला होता. हा यज्ञ, हा दिवस सुरु होता त्याकाळात विश्‍वामित्राचे पूर्ण मौन होते. यज्ञाच्या काळात रामाने मारिच व सुबाहू या दोन राक्षसांचा वध या दोन बंधूंनी केल्याचे महाराज म्हणाले. त्यानंतर विश्‍वामित्र या दोघांना घेऊन मिथिला नगरीला आले. मिथिला नगरीचा राजा सिरध्वज हे त्याचे मूळ नाव होते तर जनक ही एक पदवी होती. राजा जनक व त्याची पत्नी सुनयना या दोघांना जमीन नांगरत असताना एका पेटीत सीता सापडली होती. जनकाला कुशध्वज हा एक भाऊ होता. जनकाचे गुरु शांतानंद मुनी म्हणजेच गौतम ऋषी व अहिल्येचे पुत्र हे होते. या जनक राजाकडे एक शिवधनुष्य होते. आणि हे शिवधनुष्य अत्यंत अवजड होते. परंतु सीतेने एकदा ते सहजरित्या उचलले होते. म्हणून जनकाने त्यावेळी प्रतिज्ञा केली होती की, जो कोणी हे शिवधनुष्य उचलेल व त्याला बाण लावेल त्याच्या गळ्यात सीता वरमाला घालेल. ज्यावेळेस राम-लक्ष्मणाला घेऊन विश्‍वामित्र मिथिलेला आले होते तेव्हा स्वयंवराची तयारी सुरू होती. त्यासाठी भूतलावरचे अनेक राजे आले होते. त्यामध्ये रावण देखील होता.हे कोणाला उचलू नये म्हणून सीतेनेच देवांना त्यात बसण्याची विनंती केली होती. हे शिवधनुष्य उचलताना रावणासहित अनेक राजांची फजिती झाली होती. प्रभुराम हे सर्व पाहत होते.परंतु विश्‍वामित्राची आज्ञा नसल्यामुळे ते स्वत:हून उटले नव्हते. ज्यावेळी ते उटले तेव्हा सगळ्यांना नमस्कार करुन शिवधनुष्य उचलताना त्याला देखील आनंद झाला होता. मात्र रामाने ते उचलून त्याला बाण लावला व सीतेने हार गळ्यात घातल्यानंतर हे स्वयंवर संपले. त्यानंतर जनकाची दुसरी कन्या लक्ष्मणाला तर जनकाचा भाऊ कुशध्वजाच्या कन्या मांडवी व श्रुतकीर्ती या अनुक्रमे भरत व शत्रुघ्नाला दिल्याचे महाराजांनी सांगितले.
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 

अहंकाररूपी शत्रूचा नाश करणारा तो शत्रुघ्न - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरू || 
रामायणाचा विचार केला असता राम, लक्ष्मण व भरत या पात्रांचा सातत्याने उल्लेख होतो. मात्र पडद्याआड असलेला व अहंकाररूपी शत्रूचा नाश करणारा असा शत्रुघ्न रामाचा दास, आज्ञाधारक तसेच कोणत्याही गोष्टीचे मूळ शोधणारा वा कोणतीही अपेक्षा नसणारा असा तो शत्रुघ्न होता, असे प्रतिपादन ह. भ. प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 'अध्यात्म रामायण' या विषयावरील प्रवचनमालेत ते बोलत होते.
बोधले महाराज म्हणाले, रामायणामध्ये चार बंधूंपैकी शत्रुघ्नचा फारसा विचार झाला नाही. ज्यावेळी राम- लक्ष्मण चौदा वर्षे वनवासात होते त्यावेळेस भरत हादेखील चौदा वर्षे अयोध्येशेजारील नंदीग्राममध्ये होता. अशा प्रसंगामध्ये १४ वर्षे अयोध्येचे राज्य ज्यांनी सांभाळले असा तो शत्रुघ्न होता. वनवासाला गेलेल्या राम-लक्ष्मणाला राज्यगादीची अपेक्षा नव्हती. त्याचप्रमाणे नंदीग्राममध्ये राहणार्‍या भरताला देखील नव्हती. परंतु राज्यगादी समोर दिसत असताना त्याची अपेक्षा नसलेला शत्रुघ्न होता, असे महाराजांनी स्पष्ट केले. या शत्रुघ्नचे विविध पैलू उघडून दाखवताना महाराज म्हणतात की, शत्रुघ्नने जो अहंकार जिंकला होता तसेच स्वत:चे मी पण त्याने कधीही रामायणात मिरवले नाही. म्हणून शत्रुघ्नचा विचार हा रामाच्या दासाचा दास म्हणजे राम-भरत-शत्रुघ्न असा होतो. नावातच शत्रुघ्न असलेला तो आज्ञाधारक होता. रामायणामध्ये या शत्रुघ्नने लवनासूर नावाच्या राक्षसाचा नाश केला होता. तो नाश करताना प्रभू रामाला ब्रह्मदेवाने दिलेला एक बाण रामाने शत्रुघ्नला दिला होता. असा हा शत्रुघ्न रामायणात जास्त कोठे दिसत नाही. परंतु त्याचा सर्व कार्यात सहभाग होता. ज्या वेळेस शत्रुघ्न आणि भरत अयोध्येत आले होते तेव्हा त्यांना राम-लक्ष्मण वनवासाला गेल्याची बातमी कळाली आणि भरत कैकयीला नावे ठेवू लागला. परंतु शत्रुघ्न हा कैकयीच्या मनात हा विकार कोणी निर्माण केला, त्याचा शोध घेऊन दासी मंथराला शिक्षा देण्यास तयार झाला म्हणजेच त्याचा स्वभाव कोणत्याही गोष्टीचे मूळ शोधणारा असा तो शत्रुघ्न होता. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 

Sunday 30 August 2015

भरताची भक्ती सर्वश्रेष्ठ - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

 || श्रीगुरू ||

                मीराबाई, गोपिका आणि भरत हे भगवद्भक्तच असले तरी भरताची भक्ती अनुकरणीय होती. ती इतर कोणाच्याही भक्तीपेक्षा श्रेष्ठ असून, राम स्वरुपाला प्राप्त करायचे असेल तर भरत चरित्र समजून घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ह. भ. प. अँड. जयवंत बोधले महाराजांनी केले.भगवंत देवस्थान व बोधराज भक्त मंडळाच्या संयुक्त विद्यमाने भगवंत मंदिरात सुरू असलेल्या श्रावणमास प्रवचनमालेत ते बोलत होते. भरत या नावाच्या व्युत्पत्तीबाबत बोलताना बोधले महाराज म्हणाले, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असो की नवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई असो की तुकाराम, चोखोबा, निळोबा असो येथे फक्त नावात भिन्नता आहे. तत्त्वात नाही. सर्वांचे तत्त्व एकच. कालावधीत, कामामध्ये भिन्नता, अधिकारात नाही. सार्मथ्य एकच. काही नावे अवतारद्योतक, काही नावे कर्मसूचक तर काही नावे गुणवाचक असतात.
भरत या नामाधिकरणावर भाष्य करताना महाराज म्हणाले, भरत हे नाव अगदी साधं, सोपं आहे. भ म्हणजे भरण, पोषण करणारा, र म्हणजे रमणारा आणि त म्हणजे तारणारा असा त्याचा गर्भितार्थ आहे. आपण चातकाला प्रेमाचे तर हंसाला विवेकाचे प्रतीक मानतो. भरताकडे हंसाचे विवेकत्वही आहे आणि चातकाचं प्रेम तत्त्वही आहे. भरत कुलाभिमानी, चारित्रसंपन्न आहे. सात्विक आहे. तो त्यागी आहे. सेवाभाव समजण्यासाठी भरत समजून घ्यावा. भरत साधू, संतही आहे.
ज्ञानदेव पासष्ठीमधील ज्ञानदेवांनी चांगदेवांना लिहिलेलं पत्र, भगवंतांच्या हातातील तीन अस्त्रासोबतचे कमळाचे प्रयोजन, १४ वर्षांनंतर परत येतो म्हणून भरताला आश्‍वासन दिल्याप्रमाणे प्रभू रामचंद्र परतले, पण त्यांनी त्या अगोदर भरत काय करतोय, हे पाहण्यासाठी हनुमंताला पाठविलं तो प्रसंग, रामायणास कारणीभूत ठरलेल्या भरताला गादीवर बसवा आणि रामाला १४ वर्षे वनवासाला पाठविले जाण्याचे कैकयीचे दोन वर या संबंधीचा प्रसंग, प्रभू रामचंद्र आणि भरत यांच्या संवादामधील बौद्धिक व भावनिक द्वंद्व आणि पुढे राम गादीवर बसल्यानंतर भरताने स्वीकारलेली छत्र चामराची जबाबदारी आदींवर महाराजांनी दृष्टांत, दाखले, नित्य व्यावहारिक उदाहरणांसह भावोत्कट शब्दात विवेचन केले. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 

संत सद्गुरु विठोबादादा महाराज चातुर्मास्ये यांची २२४ वी पुण्यतिथी उत्सव

।। श्री विठ्ठल ।।

दि. १० सप्टेंबर २०१५ गुरुवार रोजी प्रातःस्मरणीय
संत सद्गुरु
विठोबादादा महाराज चातुर्मास्ये यांची २२४
वी पुण्यतिथी आहे.

वारकरी सांप्रदायातील अनेक प्रासादिक
परंपरेपैकी हि एक परंपरा असुन तिचे जतन करुन वृद्धीगत
झालेली आहे.
श्रीभानुदास पैठणकर | भगवंताचे भक्त थोर | तेच आले महीवर | या पुुत्ररुपाने ||
श्रीदासगणूंची वैखरी | भक्तिसारामृतामाझारी | वदली  आहे यापरी | ते पहा विबुधहो ||
सद्गुरुदादामहाराज हे संत भानुदास महाराजांचे अवतार
होते. अनवे
या गावी अवतारास येऊन पंढरपूर येथे कीर्तनसेवा
केली. ३६वर्षेपर्यंत
सेवा केल्यावर शके १७१३ मध्ये पंढरपूर येथे समाधिस्त
झाले. पूज्य
महाराजांचा व आर्याकार कवी मोरोपंतांचा स्नेह
होता. पंत
महाराजांना गुरुस्थानी मानत. केलेले काव्य
महाराजांकडे अवलोकनास
पाठवुन मगच प्रकाशित करत असत.
पंढरपूर येथे पुण्यतिथी निमित्त भव्य
सोहळा होत असतो.
१३ दिवस गाथा भजन,नामजप कीर्तनादि कार्यक्रम
होतात........
पंढरपूर इथे दि. २९ ऑगस्ट २०१५ ते १० सप्टेंबर २०१५ पर्यंत
पुण्यतिथी निमित
मठा मध्ये तेरा दिवस पुढील प्रमाणे आदी कार्यक्रम होतील तरी सर्व गुरु
भक्तांनी लाभ घ्यावा हि नम्र विनंती ................
सकाळी ४.०० - ६.०० काकडा भजन.......
सकाळी ६.०० - ७.३० सद्गुरूच्या समाधीस अभिषेक,
आरती .......
सकाळी ७.३०- ८.३० श्रीमद्भागवत कथा ...
सकाळी ९.३० ते ११.०० नामजप
सकाळी ११.००-१२.०० भजन
दुपारी १२ - ३ महाप्रसाद
दुपारी ४.०० - ५.०० हरिपाठ
संध्याकाळी -
५. ३० ते ७. ३० - चातुर्मासाचे नित्य नियमाचे
कीर्तन .........
रात्री १०.३० - हरी जागर .......
संतचरणज -
ह.भ.प.श्री.कैवल्य उर्फ भानुदास महाराज चातुर्मास्ये
संपर्क : +९१ ९७६३३६३६९४
श्री चातुर्मास्ये महाराज मठ
२२९५,दत्त घाट रामायणे गेट,श्रीक्षेत्र पंढरपूर

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र
शाखा - पंढरपूर

Saturday 29 August 2015

प.पू.माऊली शान्तिमाँ पजवानी - पुण्यस्मरण तथा अनमोल वचन

।। श्रीगुरु ।।
पूज्य श्रीगुरु महंत प्रमोदमहाराज जगताप यांनी आजवर अनेक संतचरित्रे वचण्याची सुचना केली गुरु आदेश म्हणून शक्य तितका नक्की प्रामाणिक प्रयत्न त्या पैकी एक
"प.पू.माऊली शान्तिमाँ पजवानी " याचं जीवन चरित्र

शान्तिमाँ यांची गुरुपरंपरा
।।आदिनाथ भगवान ।।
सदगुरु ज्ञानेश्वरमहाराज
सदगुरु गुंडामहाराज देगलूरकर
सदगुरु पंढरीनाथमहाराज श्रीगोंदेकर
सदगुरु श्रीकृष्णानंदमहाराज केणे
सदगुरु नारायणमहाराज श्रीगोंदेकर
पू. शान्तिमाँ पजवाणीजी
पूज्य महाराज यांनी मला त्यांच्या जवळील " परमार्थ  प्रकाश  "नामक पुस्तक आशीर्वादपर भेट दिल . शान्तिमाँ अणि त्यांचे शिष्य प्रभाकरजी माने यांच्यातील पत्रव्यवहार अस स्वरूप , एकूण ४० पत्रांच् संकलन यात आहे . पूजनीय माँ यांनी त्यांच्या पत्रातून अभूतपूर्व अध्यात्म , वेदांत , भक्तिशास्त्राचे प्रगट ज्ञान  आदि अत्यंत सहजपूर्वक मांडल आहे . त्याच पुस्तकातील शान्तिमाँ यांचे काही अनमोल वचन  आज त्यांच्या पुण्यस्मरणानिम्मित आपल्या पर्यन्त पोहवचवण्याचा हा छोटा प्रयत्न .
०१) जप करणे आपले काम - जप मोजण्याचे काम प्रभुवर सोपवा .
०२) संपत्ती पांच साधनांनि प्राप्त होते
प्रारब्ध / प्रभुकृपा / गुरुकृपा / आई वडिलांचा आशीर्वाद / व्यवसाय
०३ ) आपली विषयाची भूक कमी करा , म्हणजे भगवंताची भूक वाढेल .
०४)"सर्वांच्या सुखात आपले सुख असुन सर्वांच्या दुःखात आपले दुःख आहे " हे सत्य लक्षात घेऊन माणसाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर मानवी जीवनात सुखाचा सुकाळ झाल्याशिवाय राहणार
नाही .
०५)माणूस जन्माने मोठा होत नाही तर तो कर्तव्याने मोठा होतो.
०६)परमात्मा अंतरात्म्यात आहे त्याला पहा . दृष्टि प्रेममय ठेवा तरच सृष्टि प्रेममय दिसेल .
०७) माणूस नामांत रंगला म्हणजे सदगुरु कृपा करतात .
०८)दुसऱ्याला आकंठ खायला घालून तो तृप्त झालेला पाहणे , यातला आनंद अवर्णनीय असतो .
०९) प्रपंच मनापासून करावा , पण खरी ओढ भगवंताकड़े असावी
१०)सदगुरुंची भेट होणे या पेक्षा अधिक महत्त्वाचे काहींच नाही .
११)'नामब्रह्न' व 'नादब्रह्म' यांचा ज्या वेळी संयोग होतो त्यावेळी प्रभुला प्रगट व्हावेच लागते .
१२ )लोक शरीराची - कातडीची फार चिकत्सा करतात पण आत्म्याची चर्चा कोणी करत नाहीत.
१३) देव जसा दयाळु आहे तसा न्यायी पण आहे , हे विसरु नका .
  १४) सतत नामात राहिले म्हणजे देह सोडताना दुःख वाटत नाही .
१५) तळमळ असेल तर नामस्मरणासाठी एकांत काढता येतो .
१६) अन्नदानाने हात,
तीर्थयात्रेने पाय ,
नामस्मरणाने मुख ,
आणि शरणागतीने चित्त पवित्र होते .
१७) जसे आपन पैसाचे ध्यान करतो तसे परमेश्वराचे ध्यान केले पाहिजे .
१८)प्रेम मागू नका - त्याची अपेक्षा करु नका . प्रेम दुसऱ्याला द्यायला शिका .
आदि अनेक 
या पुस्तकाच्या मुख्य पाना वर लिहलेले एक मला आवडल ते म्हणजे मूल्य - सदगुरु सेवा
शान्तिमाँ यांच्या जीवना संदर्भातील साहित्य आपणास अवश्य प्राप्त होतील .
प्राप्ति स्थळ :
श्री सत्संग मंडळ ,
बंदररोड , डहाणू ४०१६०१
संकलन
अक्षय चंद्रकांत भोसले
०८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र
varkariyuva.blogspot.in

लक्ष्मणासारखा भाऊ सापडणार नाही - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरू ||
         वाचिक जपापेक्षा उपांशू जप श्रेष्ठ तर उपांशूपेक्षा मानसिक जप श्रेष्ठ आहे. कारण मानसिक जप हा प्रभू रामापर्यंत घेऊन जाण्याचे साधन आहे. हे रामस्मरण केल्याने जन्म-मरण संपते म्हणून कोणतेही कार्य करण्याअगोदर रामनामस्मरण करावे. सीतेसारखी दुसरी पत्नी या मृत्युलोकात मिळू शकेल; मात्र लक्ष्मणासारखा दुसरा भाऊ या जगात शोधूनही सापडणार नाही, असे प्रभू रामचंद्राने म्हटले असल्याचे प्रतिपादन ह. भ. प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले. 

भगवंत मंदिरात श्रावणमासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थानतर्फे आयोजित 'अध्यात्म रामायण' प्रवचनमालेत ते बोलत होते. दशरथांच्या तीन राण्यांच्या पोटी राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न हे चार अलौकिक पुत्र अवताराला आले. संपूर्ण अयोध्या नगरी रामनामात तल्लीन झाली. योगी, मुनीवर ज्या नामात रमतात ते नाव राम असल्याने वसिष्ठ ऋषींनी हे नाव निवडले तर नवमीला प्रभुरामाचा जन्म झाल्यानंतर दशमीला सुमित्रेच्या पोटी लक्ष्मणाचा जन्म झाला. शोभा, सौंदर्यवान, दास्यवती, लक्ष्मीयुक्त म्हणून वसिष्ठांनी त्याचे नाव लक्ष्मण ठेवले. राक्षसी सुवर्ण मृगामागे जाऊ नये म्हणून लक्ष्मणाने केलेली विनवणी, सुग्रीवाने दिलेले दागिने ओळखणे, राम-सीतेपैकी कोणाचे पाय सुंदर या प्रश्नाचे अलौकिक उत्तर सृष्टीच्या निर्मात्याला सीतेसाठी व्याकूळावस्थेत असताना लक्ष्मणाने केलेली सोबत लक्ष्मणाच्या गुणांची महती हे सगळ्य़ात महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 

Friday 28 August 2015

प्रभू रामाचे शरीर हे चिन्मय होते - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरू ||
अवताराला आलेल्या भगवान श्रीरामाचे शरीर हे सच्चिदानंद शरीर असून त्याला दिव्य देह म्हणतात. उलट सामान्यांचे शरीर हे दिव्यही नाही अन् नित्यही नाही. स्वर्गातील देवादिकांचे (इंद्र, चंद्र, सूर्य) शरीर हे दिव्य आहे पण नित्य नाही, प्रभू रामचंद्राचे शरीर हे दिव्यही आहे आणि नित्यही आहे म्हणून त्याला चिन्मय शरीर म्हणतात, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले. 

ते श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 'अध्यात्म रामायण' या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होते. पुढे बोलताना बोधले महाराज म्हणाले की, चिन्मय शरीर हे भगवंताच्याच ठिकाणी असते, सत्शक्तीने हे शरीर अवतारी बनते, तर भगवंताच्या ठिकाणी असलेल्या चित्तशक्तीने हे शरीर प्रकाशमय बनते असे महाराजांनी स्पष्ट केले. भगवंताच्या ठिकाणी असलेल्या आनंदशक्तीने ते शरीर आकर्षक बनते. अशा या आनंदस्वरूप बाल प्रभू रामचंद्रांना पाहण्यासाठी अयोध्येतील लोकांची गर्दी होऊ लागली होती. त्यावेळी एक दासी धावत -धावत येऊन कौशल्या मातेकडे गेली. त्यावेळी कौशल्येने तत्काळ आपल्या गळ्यातील नवरत्नांचा हार त्या दासीला दिला, मात्र त्या दासीने तो तसाच परत देऊन मला काही द्यायचे असेल तर रामाला माझ्या हातात दे हार नको, असे सांगितले. 
रामाचे शरीरच असे होते की, त्याला पाहिल्यास सर्व स्त्री-पुरुष मंडळी स्वत:ला विसरून जात होती. या रामाला पाहण्याकरिता साक्षात भगवान महादेवसुद्धा एका सामान्य माणसाचे रूप घेऊन अयोध्येत आले होते. प्रभू रामाच्या अवताराबरोबरच लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या तिघांचे देखील अवतारच होते. राम हा विष्णूचा, लक्ष्मण -शेषाचा, भरत शंखाचा तर शत्रुघ्न हा चक्राचा अवतार असल्याचे महाराजांनी शेवटी सांगितले. 
एकादशी असल्यामुळे सायंकाळऐवजी सकाळच्या सत्रात झालेल्या या प्रवचनासाठी बारामतीचे श्री महंत प्रमोद महाराज जगताप, पुण्याचे सदानंद महाराज बग, मुंबईचे अक्षय महाराज भोसले यांच्यासह गुरुवर्य प्रभाकरदादा बोधले महाराज उपस्थित होते. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 

भगवंताचा अवतार कर्मबंधनातुन मुक्त करणारा - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरू ||
भगवंताच्या अवताराचे अंश, अशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णतम हे सहा प्रकार असून भगवंताच्या दशावतारामध्ये प्रभू रामचंद्र व श्रीकृष्ण अवतार हे दोनच अवतार पूर्ण अवतार आहेत. जे भगवंताला, अवताराला व जे त्यांना जाणतात या दोघांनाही कर्माचे बंधन नसते, नव्हे तर भगवंताचा अवतार हा कर्मबंधनातून मुक्त करणारा असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले. 

श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या अध्यात्म रामायण या विषयावरील प्रवचनमालेत ते बोलत होते. भगवंत अवताराला येतो म्हणजे तो जन्माला येतो. सामान्यांचा जन्म हा वासनेनुसार आहे, पण भगवंताचा अवतार हा वासनेच्या आहारी नाही. सामान्यांचा जन्म असला तर भगवंताचे प्रकटीकरण आहे. सामान्य माणसाला मरताना जी इच्छा असते त्यानुसार त्याला पुढे जन्म मिळत असतो. भगवंत मात्र भक्ताकरिता अवताराला येतात. सामान्य माणसाला जन्माला यावेच लागते, संत हे स्वत:हून येत असतात आणि देवाला मात्र हाक मारून आणावे लागते, असे महाराज म्हणाले. चैत्र शुद्ध नवमीला सोमवारी व पुनर्वसू नक्षत्रामध्ये प्रभू रामचंद्र अवताराला आले. हा अवतार सूर्यवंशाचा असल्यामुळे सूर्य हा देखील अत्यंत आनंदात होता. ज्यावेळी भगवंत कौशल्या मातेच्या पोटात होते तेव्हा ती स्वानंद स्थितीत होती. राजा दशरथाने वशिष्ठ ऋषीला हे काय चालले आहे असे विचारले असता वशिष्ठाने भगवान तुमच्या घरात अवताराला येणार असल्यामुळे सूर्यकुळाला चांगले दिवस येणार आहेत, असे सांगितले होते. त्यामुळे राजा दशरथ देखील खूप आनंदी झाले होते व ते देखील विदेह स्थितीत नाचू लागले होते. प्रभू रामाचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या कुंडलीतील गृह देखील स्वत: उच्च स्थानावर जाऊन बसले होते. सामान्यांचा जन्म असला तर भगवंताचे प्रकटीकरण आहे. सामान्य माणसाला मरताना जी इच्छा असते त्यानुसार त्याला पुढे जन्म मिळत असतोच असेही बोधले महाराज यांनी सांगितले.
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले