Wednesday 8 March 2017

समर्पण - प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर


कोणताही अभिमान धारण न करता स्वत:ला सदैव भगवंताच्या चरणावर समर्पण करणे हे शरणागतीचे लक्षण आहे.
भक्त हे आपले सर्वस्व भगवच्चरणीच समर्पित करीत असतात.तसे पाहिले तर सर्वांच्याच अंत:करणात समर्पणाची भावना असतेच.आपल्या भावना कोणाच्या तरी ठिकाणी समर्पित केल्याशिवाय माणसाला चैन पडत नाही.स्वत: भगवानच 'मनुष्यजात सकऴ । स्वभावातच भजनशीऴ ।।' अशी मनुष्य स्वभावाची जाती सांगतात.आपल्या प्रेमाच्या ठिकाणीच समर्पणाची भावना निर्माण होत असते.व्यवहारामध्येही मनुष्य प्रेमातील माणसाला सर्व काही देण्याची तयारी दाखवीत असतो.तसे विषयी विषयीच्या ठिकाणी समर्पण करेल.भक्त देवाच्या ठिकाणी समर्पण करेल.पामर संसाराच्या ठिकाणी समर्पण करेल.श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी म्हटले आहे,
"प्रेमाथिलेनि भक्ते । जैसेनि भजिजे कुलदैवते ।।
तैसा एकाग्रचित्ते ।  स्त्री जॊ उपासी ।।"
विषयीच्या संदर्भातील हे उद्गार आहेत.आपणही संसारासाठी वाटेल ते करीतच असतो,पण भक्ताचे मात्र तसे नसते.तो केवऴ देवाच्याच चरणी समर्पणाची भाषा करीत असतो.कारण आपणास मिऴालेले सर्व काही देवानेच दिलेले आहे याची त्यांना जाणीव असते;त्यामुऴे आपणांस सर्व काही दिलेले आहे त्यालाच ते सर्व काही समर्पित करीत असतात.
'त्वदीय वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये ।'
अशी त्यांची भाषा असते. श्रीतुकाराम महाराजांनी म्हटले आहे,
"मनेसहित वाचा काया । अवघे दिले पंढरीराया ।।"
आणि भक्ताचे हे समर्पण कोणत्याही अभिमानाशिवाय असते.इतरांपेक्षा माझे समर्पण अधिक आहे किंवा इतर कोणी जे देवास देत नाही ते मी देतो आहे.असा कोणताही अभिमान त्या समर्पणामध्ये नसतो.उलट हे समर्पण हे स्वत:चे कर्तव्य मानत असतात.अशा अभिमानरहित परमात्मचरणी समर्पणाच्या भावनेस शरणागती म्हणतात

।। रामकृष्णहरि ।।

संदर्भ - संतसंग

© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.
https://m.facebook.com/chaitanyamaharajdeglurkar/