Tuesday 7 February 2017

मराठी कीर्तन परंपरेचा इतिहास - ह.भ.प. शामसुंदरमहाराज सोन्नर


मराठी भाषेच्या विकास,विस्तार आणि प्रसाराचा विचार करताना कीर्तन परंपरेच्या योगदानाला टाळून पुढे जाता येणार नाही. मराठी भाषेच्या सर्वांगिण सौंदर्याचा अविष्कार कीर्तनातूनच खऱया अर्थाने अनुभवता येतो. संगीत,अभिनय आणि गायन अशा सर्व अलंकारांनी मंडित होऊन कीर्तनातून मराठी भाषा आपल्या समोर येते. कीर्तन परंपरेला हजारो वर्षांचा इतिहास असला तरी मराठी भाषेत त्याला प्रबोधनाचे साधन म्हणून संत नामदेव महाराजांनी पुढे आणले.ती परंपरा इतर संतांनी मोठय़ा जोमाने पुढे नेली. त्यातही या परंपरेवर झळझळीत कळस चढविण्याचे काम संत तुकाराम महाराजांनी केले. सर्वच संतांच्या अभंगांचा, ओव्यांचा, भारुडांचा अविष्कार कीर्तनातून होत असला तरी प्रत्येक संतांची भाषा सारखी नाही. त्या-त्या काळातील परिस्थितीचे,समाजजीवनाचे प्रतिबिंब त्या-त्या संतांच्या भाषेत आपल्याला पहायला मिळते.

आपल्या देशात कीर्तन परंपरेला मोठा इतिहास आहे.अद्य कीर्तनकार म्हणून महर्षी नारद यांचा उल्लेख केला जातो.आजही नारदीय कीर्तन परंपरा मोठय़ा आदरयुक्त भावाने जोपासली जाते. महाराष्ट्रात आज प्रामुख्याने चार प्रकारच्या कीर्तन परंपरा दिसून येतात.वारकरी कीर्तन, नारदीय कीर्तन,रामदासी कीर्तन आणि गुरुदेव संप्रदाय मंडळांचे कीर्तन. नारदीय कीर्तन परंपरेचे जनक महर्षी नारद, गुरुदेव संप्रदाय कीर्तन परंपरेचे जनक तुकडोजी महाराज रामदासी परंपरा रामदास स्वामी शिष्य मंडळ तर वारकरी कीर्तन परंपरेचे जनक संत नामदेव महाराज  आहेत.  यात नारदीय कीर्तन परंपरा ही सर्वात जुनी कीर्तन परंपरा म्हणून ओळखली जाते. संत नामदेव, ज्ञानेश्वरांच्या अगोदर ही कीर्तन परंपरा अस्थित्वात होती. परंतु संत नामदेवाने वारकरी कीर्तन परंपरा सुरू केली. आता आपल्या मनात असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की नामदेवांना अशी किर्तन परंपरा सुरू करण्याची गरज काय निर्माण झाली. त्यासाठी या दोन्ही कीर्तन परंपरांची पद्धत आपल्याला समजून घ्यावी लागेल. नारदीय कीर्तन परंपरा हा एकाधिकार पद्धतीची आहे.नारदीय कीर्तनात डाव्या बाजूला हार्मोनियम वादक, उजव्या बाजूला तबला वादक असतो.कीर्तनकार स्वत:च गातात आणि प्रबोधन करतात. या कीर्तनात इतर कोणाचाही समावेश नसतो.

पंढरपूरच्या वाळवंटात संत नामदेव महाराजांनी वारकरी कीर्तन प्रकार करून त्याला सामोहिक स्वरूप दिले. कीर्तन हा एकटय़ाचा खेळ न राहता त्यात वीणेकर, टाळकरी, गायक अशी समुह रचना केली. या सामोहीक कीर्तन परंपरेतूनच पुढे कीर्तन करण्याचा वा भक्ती करण्याचा अधिकार काही मर्यादित लोकांपुरता सीमित नाही, तर

सकळांशी येथे आहे अधिकार।

ही वारकरी संतांची व्यापक भूमिका पुढे आली. नामदेव महाराजांनी सामोहिक कीर्तन परंपरा सुरू करीत असतानाच त्या मागचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला. ते म्हणतात-

नाचू कीर्तनाचे रंगी।

ज्ञानदीप लावू जगी।।

कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप लावत असताना या दिव्याच्या उजेडात सर्व समाज उजळून निघाला पाहिजे, अशी नामदेव महाराजांची योजना होती. संत नामदेव, ज्ञानेश्वर महाराज यांनी सध्या अस्थित्वात असलेल्या भागत धर्माचा अर्थात वारकरी संप्रदायाचा पाया घातला आहे. हा पाया घालताना त्यांचा उद्देश स्पष्ट होता की कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला संघटीत सामाजिक ऐक्य करायचे. भक्ती करण्याचा किंवा ज्ञान सांगण्याचा जो अधिकार होता तो संकुचित झाला होता. त्याच्या कक्षा रुंदावण्याचे काम नामदेव महाराजांनी केले. म्हणूनच नामदेव महाराजांच्या काळात जेवढे संत महाराष्ट्रात निर्माण झाले तेवढे एकाच वेळी पुढे कधी झाले नाहीत. कारण नामदेवाने आपल्या संपर्कात आलेल्या प्र्रत्येकाला त्याच्या हक्काची आणि अधिकाराची जाणीव करून दिली आणि व्यक्त होण्यासाठी लिहिते केले.म्हणूनच नामेदवाच्या घरातील एकंदर चौदा जणांचा समावेश होता. त्या सर्वांच्या नावाने अभंग आहेत. दासी असणारी जनाबाई ही सुद्धा त्यांच्या कुटुंबाचा घटकच झाली होती.नामदेवाने तिलाही लिहिते केले.तिच्या अभंगाची भाषा तर अत्यंत बंडखोरीची असल्याचे दिसते. पंढरपूरपासून जवळच असणाऱया मंगळवेढय़ातील संत चोखोबा महाराज यांचा नामदेव महाराजांशी संपर्क आला.नामदेव आणि चोखाच्या कुटुंबांचा खूप मोठा जिव्हाळा होता. म्हणूनच जसे नामदेव महाराजांच्या घरातील सर्वच्या सर्व लोक लिहिणारे होते तसेच चोखोबाच्या कुटुंबातील सर्वांच्या नावाने अभंग असल्याचे आपल्याला दिसून येते.

मराठी भाषेला नवा कीर्तन प्रकार समर्पित करीत असतानाच नामदेव महाराजांनी कीर्तनासाठी `अभंग' हा स्वतंत्र काव्य प्रकार निर्माण केला.म्हणून नामदेव महाराजांना अद्यकीर्तनकार म्हणून जसे संबोधले जाते तसेच अद्य अभंग लेखक म्हणूनही त्यांचा गौरव केला जातो. या अभंग काव्य प्रकाराचा हात धरूनच महाराष्ट्रातील वारकरी कीर्तन परंपरा वाढली, विस्तारली आणि विकसित झाली. तिने मराठी भाषेलाही समृद्ध केले.

सर्वच संतांनी अभंग या काव्य प्रकाराला महत्त्व दिलेले असले तरी सर्वांच्या भाषेचा लहेजा मात्र वेगवेगळा आहे. अर्थात ज्या परिस्थितीत ते जगत होते वाढत होते, त्या परिस्थितीचे प्रतिबिंब त्यांच्या भाषेतून व्यक्त होणे स्वाभाविक होते. जीवनात आलेल्या अनुभवानंतर या संतांच्या मूळ भाषेत आणि भूमिकेत फरक पडत गेल्याचेही दिसून येते. अद्य वारकरी कीर्तनकार म्हणून गौरविले गेलेले नामदेव महाराज यांच्या ऐंशी वर्षांच्या आयुष्यात कालानुरूप बदल होत गेल्याचे दिसून येते. नामदेव महाराजांच्या घरात पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती होती. त्यांचे वडील दामाजी पंत हे नेमाचे वारकरी होते. त्यामुळे पांडुरंगाच्या भक्तीची ओढही नामदेवाला लहानपणापासून असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांची सुरुवातीची अभंग रचनाही भक्ती रसाने ओतप्रोत भरलेली पहायला मिळते.लाडका भक्त म्हणून नामेदवाची त्यावेळी ख्याती होती म्हणून त्यांच्या भाषेत खूप लडिवाळपणा आल्याचे दिसून येते. हा लडिवाळपणा बाळक्रिडा आणि गौळणीच्या अभंगातून अधिक पाझरताना दिसतो.

दोंदील दोंदील टमकत चाले।

गोजिरी पाऊले घालोनिया।।

पायी रुणझुण रुणझुणती वाळे।

गोपी पाहता डोळे मन निवे।।

भगवान पंढरीनाथ पांडुरंगाला नामदेवांनी आईची उपमा अनेक अभंगातून दिलेली दिसते.इतकेच नव्हे तर आईशी संबंधित इतरही अनेक उपमांची फखरण त्यांच्या उभंगातून पहायला मिळते.

पक्षिणी प्रभाती चारियासी जाये।

पिलू वाट पाहे उपवासी।।

तैसे माझे मन करी वो तुझी आस।

चरण रात्रंदिवस चिंतीतसे।।

किंवा तू माझी माऊली

मी ओ तुझा तान्हा।

पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे।।

सुरुवातीच्या रचना अशा लडिवाळ असल्या तरी भारत भ्रमण केल्यानंतर नामदेवांची भूमिका पूर्ण बदलल्Zाली दिसते. त्यातून पुढे समाजिक प्रश्नावर भाष्य करणारे अभंग त्यांच्याकडून लिहून झाल्याचे दिसते. विशेषत: जाती व्यवस्थेत होरपळणाऱया समाजाचे प्रतिबिंब त्यांच्या आणि त्यांच्या सोबत असणाऱया चोखोबा महाराज आणि त्यांच्या कुटुंबांच्या अभंगातून दिसते.स्वत: नामदेव महाराज लिहितात-

हिनदीन जात मोरी पंढरी के राया।

ऐसा नामा दर्जी तुने काहे को बनाया।

यावरून त्यावेळच्या समाज व्यवस्थेत जातीयवादाची स्थिती किती दाहक होती हे दिसून येते.चोखोबा महाराज आणि त्यांच्या इतर कुटुंबीयांनी लिहिलेल्या अभंगातूनही हे वास्तव समोर आले आहे. चोखोबाच्या पत्नी सोयराबाई आपल्याला हिन कुळात जन्माला घातल्यामुळे जातीय व्यवस्थेचे चटके सोसावे लागले. त्यामुळे उपाशी राहावे लागले. याची देवा तुला लाज कशी वाटत नाही, असा सवाल भगवंताला करतात.

आमुची केली हीन याती।

तुज ना कळे श्रीपती।

जन्म गेला उष्ठे खाता।

लाज नये तुझ्या चित्ता।।

याच कालखंडात असलेले संत ज्ञानेश्वर महाराज यांची भाषा मात्र खूपच सौम्य आहे. ज्ञानेश्वर महाराज यांनी नामदेव महाराजांच्या भेटी नंतर अभंग,गौळणींची रचना केली आहे.परंतु उपमा, उत्प्रेक्षा आणि अलंकारांनी मंडित भाषेचे खरे सौंदर्य ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवी या काव्य प्रकारातून पहायला मिळते. भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी,चांगदेव पासष्टी आणि अमृतानूभव हे त्यांचे ओवीबद्ध ग्रंथ आहेत. ज्ञानेश्वरांच्या ओवीबद्ध काव्य लेखनाची महती सांगताना संत एकनाथ महाराज म्हणतात-

ज्ञानेश्वरीपाठी। जो करील ओवी मराठी।

ते अमृताचिये ताटी। जाण नरोटी ठेविली।।

स्वत: ज्ञानेश्वर महाराजही आपला संवाद कसा असायला पाहिजे हे सांगताना म्हणतात-

साच आणि मवाळ। मिथुले आणि रसाळ।।

शब्द जसै कल्लोळ। अमृताचे।।

लालित्यपूर्ण भाषेचा गोडवा ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीतून जसा अनुभवाला येतो तसाच तो अभंगातूनही प्रकट होतो.

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा।

सांडी तू अवगुणू रे भ्रम।

किंवा

पैल तो गे काऊ कोकताहे।

शकुन गे माये सांगताहे।।

या अभंगांतून त्यांच्या कल्पाना अविष्काराचे भव्यदिव्य रूप पहायला मिळते. संत ज्ञानेश्ववरांनाही त्या वेळच्या समाज व्यवस्थेचे चटके बसले.त्यांना आई-वडिलांच्या मायेच्या छत्रालाही त्या व्यवस्थेमुळे पारखे व्हावे लागले. तरीही ज्ञानेश्वरांची भाषा कायम संशयमी राहिल्याचे दिसून येते.त्यात एक कायम मायेचा ओलावा पाझरत होता. म्हणून सर्व वारकरी ज्ञानेश्वरांना माऊलीच्या रूपात पाहातात.

ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रमाणेच निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यांनीही अभंग रचना केलेली आहे. या संपूर्ण कुटुंबाची भूमिका ही शोषीक असल्याची दिसून येते. अगदी संत ज्ञानेश्वर महाराज रागावून ताटी लावून बसले तेव्हा त्यांचे सांत्वन करण्यासाठी मुक्ताबाईने जे अभंग लिहिले ते `ताटीचे अभंग' म्हणून प्रसिद्ध आहेत.

जग झाले वन्ही। संती सुखी व्हावे पाणी।

असा सल्ला मुक्ताबाई आपल्या मोठय़ा भावाला देते. तेव्हा परिस्थितीमुळे आलेली समजत आपल्याला दिसून येते.

याच कालखंडात संत गोरा कुंभार, सावता माळी, नरहरी सोनार, सेना न्हावी यांचा कालखंड दिसतो. या सर्व संतांनी अभंग रचना करून मराठीच्या समृद्धीत भर घातलेली दिसते. यात नरहरी सोनार यांच्या रचना शिव-वैष्णवांमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न करते. तर सावता महाराजांची रचना आपल्याला भगवंतांच्या भक्तीबरोबरच आपल्या कर्तव्याकडे घेऊन जाताना दिसते. म्हणूनच ते पंढरपूराला जाण्यापेक्षा आपल्या कांदा,मूळ, भाजीमध्ये विठ्ठलाला पाहतात.

महाराष्ट्राच्या संत परंपरेत पुढचा कालखंड संत एकनाथ महाराजांचा येतो. एकनाथ महाराजांनी मराठी भाषेला विविध काव्य प्रकाराने समृद्ध केले असे म्हणावे लागेल. भावर्थ रामायण, एकनाथी भागवत अशा ग्रंथातून त्यांनी ओवी या काव्य प्रकाराला समाज मनामध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. तर अभंग, गौळणी आणि भारुडाच्या माध्यमातून त्यांनी तत्कालिन लोकांमध्ये समाज जागृती करण्याचा प्रयत्न केला.भारुडामध्ये त्यांनी तत्कालिन समाजातील प्रतिकांचाच वापर केल्यामुळे ते लोकांना जास्त आपलेसे वाटत होते. ज्यात गोंधळ, जागरण, वारी या समाजातील प्रथांबरोबरच इतर समाज घटकांचाही प्रतिकात्मक वापर केल्याचे दिसून येते.एकनाथ महाराज यांचा जन्म उच्चवर्णीय ब्राम्हण समाजात झालेला असला तरी त्यांनी जातीय व्यवस्थेमुळे पिढलेल्या समाजाला धीर देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. त्यांनी आपल्या साहित्यातून आणि कृतीतूनही वर्णव्यवस्थेला धक्के देण्याचे काम त्यांनी केले आहे.एकनाथ महाराजांची भाषा प्रसंगानुरूप बदललेली दिसते.कधी ती प्रेमळ होते, तर कधी ती अत्यंत आक्रमक होते. काय माय गेली होती भूताशी। असा सवाल करायलाही मग ते मागे पुढे पाहाताना दिसत नाहीत.

संत परंपरेपरेला पुन्हा सोळाव्या शतकात बहर आलेला दिसतो. बंडखोर संत कवी म्हणून संपूर्ण जगभर ज्यांचा गौरव केला जातो ते तुकाराम महाराज, रामदास स्वामी,निळोबाराय, बहिणीबाई चौधरी हे सोळाव्या शतकातील संत कवी. या संतांनीही मराठी भाषेला ऐश्वर्यवंत करण्यात मोठे योगदान दिले आहे. याच काळात ऐतिहासिक घडामोडींनाही मोठा वेग आल्याचे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य याच कालखंडात स्थापन झाले.छत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेत संत तुकाराम महाराज यांच्या साहित्याचा आणि कीर्तनाचा मोठा वाटा असल्याचे दिसून येते. तुकाराम महाराजांनी पाईकीचे अभंग लिहून स्वराज्य,त्यासाठी करावा लागणारा त्याग, प्रसंगी प्राणाचे बलिदान देण्याची करावी लागणारी तयारी यावर भर दिल्याचे दिसून येते.

मराठी भाषेला सर्वच संतांनी आपापल्या साहित्याने समृद्ध केले असले तरी प्रत्यक्ष कीर्तनातून लोक जागृती करण्यात नामदेवानंतर तुकाराम महराजांचे कार्य अधिक मोठे आहे. नामदेव महाराजांच्या जीवनात जसे बदल होत गेले तशी त्यांच्या लेखानाची भाषा आणि दिशा बदलली. तसेच तुकाराम महाराजांच्या बाबतीतही दिसून येते.सुरुवातीला तुकाराम महाराज देवावर अवलंबून राहणारे दिसतात-

तुज वाटे आता ते करी अनंता।

तुका म्हणचे संता लाज माजी।।

किंवा

घालोनिया भार राहिलो निश्चिंती।

निरविले संती विठोबाशी।।

पण पुढे चिंतन, मननानंतर तुकाराम महाराजांची भूमिका बदलेली दिसते. ते पुढे देवावर विसंबून राहात नाहीत.

होईन तो भोग भोगिन आपुला।

न घाली विठ्ठला भार तूज।।

अशी प्रकारची भूमिका ते घेताना दिसतात. त्याशिवाय समाजात दांभिकतेवर, देवाच्या धर्माच्या नावाचा बाजार मांडणारांवर तुकाराम महाराजांनी जोरदार कोरडे ओढल्याचे दिसून येते. म्हणूनच ते पुराण सांगणाराला संत म्हणत नाहीत, भगवे कपडे घालणाराला संत म्हणत नाहीत.उलट हे लोकांना भुलविण्यासाठी घेतलेले सोंग आहे, असे सांगतात. त्यांनी साधू आणि देवात्वाची केलेली व्याख्यया तर एक शुभाषित म्हणूनच प्रचलित झाले आहे.

जे का रंजले गांजले। त्याशी म्हणजे जो आपुले।।

तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।

समाजामधील प्रत्येक घटकाला मार्गदर्शक ठरू शकेल अशा प्रकारची काव्य रचना तुकाराम महाराज यांनी केलेली आहे. करुण, रौद्र, वीर या सर्व रसांचा अविष्कार तुकाराम महाराजांच्या अभंगांतून दिसून येतो. म्हणून आज इतर संतांचे अभंग कीर्तनासाठी घेणे वर्ज नसले तरी तुकाराम महराजांच्याच अभंगावर जास्त कीर्तनकार निरुपण करताना दिसतात.

महाराष्ट्रात सध्या कीर्तनाला चार परंपरा सुरू आहेत. त्यात सर्वाधिक गावागावात आज तरी वारकरी कीर्तन परंपरा लोकप्रिय असल्याचे दिसते. नारदीय कीर्तन परंपरा शहरी विभागातील उच्चभ्रू वस्तीतून आजूनही जपल्याचे दिसते.नारदीय कीर्तनकारही वारकरी संतांचेच अभंग निरुपणासाठी घेत असले तरी त्यात आर्य,श्लोक यांची पखरण केली जाते.त्यात गायन कलेला जास्त महत्त्व दिसले जाते. या कीर्तनातील भाषणाही उच्चभ्रू आहे.

वारकरी कीर्तन परंपरा मौखिक स्वरूपात पुढे जात आली आहे. त्यामुळे ग्रामीण कीर्तनकार केवळ ऐकूण कीर्तन करीत असत. त्यामुळे ग्रामीण भाषेचा त्यावर प्रभाव असायचा.गेल्या पंचवीस-तीस वर्षांत सुशिक्षित कीर्तनकार पुढे आल्यामुळे भाषेमध्ये बदल होताना दिसत आहे. वारकरी किर्तनाताही आता गायनाला महत्त्व येऊ लागले आहे. गुरुदेव संप्रदायाच्या कीर्तनात प्रबोधनाला महत्त्व आहे. सप्त खंजीरी वादक सत्यपाल महाराज यांनी या कीर्तनाला वेगळा आयाम प्राप्त करून दिला आहे. या सर्व कीर्तन परंपरापरांमधून मराठी भाषा वेगवेगळय़ात नटलेली पहायला मिळते. मराठी भाषे संकटात सापडली असल्याचे बोलले जात असले तरी जोपर्यंत मंदिरात टाळ वाजत आहे, तोपर्यंत मराठी भाषेला कोणताही धोका नाही.

- ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर