Sunday 13 March 2016

श्री संत वामनबाबा महाराज , तळोजे मजकूर - पुण्यतिथी उत्सव २०१६

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।
श्री संत सदगुरु वामनबाब , तळोजे पुण्यसमरण उत्सव २०१६
संतपुरुष हे परमेश्‍वराचे प्रगट रुप. निर्गुण निराकार भगवंत संतांच्या रुपाने सगुण साकार होतो. त्यांच्या सहवासात राहाण्याचे भाग्य मात्र आपल्यापाशी असावे लागते. पूर्वसंचित जबरदस्त असल्याशिवाय संतांचा सहवासच नव्हे तर साधे दर्शनसुध्दा घडत नाही. माउली ज्ञानदेवांनी तर आपल्या अभंग भाषेमधून एक शाश्‍वत सत्य सांगितले आहे की,

पूर्व संचिताची जोडी | म्हणूनि विठ्ठली आवडी॥

श्रीविठ्ठलाच्या नामाला जेव्हा आपण आपल्या प्रत्येक श्वासात ओवतो ना, तेव्हाच श्रीविठ्ठल हा आपल्या प्रत्येक परमभक्ताला संतांच्या रुपात प्रत्यक्ष दर्शन देतो. तुकाराम महाराजांनीसुध्दा श्रीविठ्ठलाला आळवणी करतांना एकच प्रसाद मागितला की, संतसंग देई सदा॥ थोडक्यात सांगायचे झाले तर सर्वच संतपुरुषांनी आपल्या अक्षर-वाङमयातून संतसंगतीचे महत्त्व विस्ताराने सांगितले आहे. तुकाराम महाराज संतांना उद्देशून म्हणतात की,

तुम्ही संत मायबाप कृपावंत | काय मी पतित कीर्ति वाणूं॥

संत सज्जन सत् पुरुषांनो, मी तुम्हाला अंत:करणपूर्वक सांगतो की, तुम्ही माझे प्राणप्रिय मायबाप आहात. तुम्ही माझ्यावर आजपर्यंत केवळ कृपेचा चांदणवर्षाव केलेला आहे. वाटते, माझी विठूमाउली तुमच्या रुपात प्रत्यक्ष प्रगट होऊन मला तिने तिच्या कुशीत घेतले आहे. हे स्वर्गीय सुख मला केवळ तुमच्याच सहवासात लाभते. मी तर हीन-दीन आणि पतित आहे. माझ्यापाशी बुध्दीवैभव नाही की अप्रतिम भाषा नाही. तुमच्या असीम कृपेची आणि तुमच्या अस्तित्वाची कीर्ति मी कुठल्या शब्दात वर्णन करून सांगू … मी खूप कमी पडतो. तुमची कीर्ति अवकाशव्यापी आहे. शब्दांमधून ती कीर्ति गाणे मला शक्य नाही. कारण ते अपूर्व स्वर मजपाशी नाहीत. शाश्‍वत भक्तीभारले शब्द नाहीत. अवतार तुम्हां धराया कारण | उध्दरावे जन जड जीव॥ संत सज्जन सत्‌पुरुषांनो, तुम्ही प्रत्यक्ष परमेश्‍वर आहात हे मला पूर्णपणे ज्ञात आहे. धर्माला ग्लानी आल्यावर समाजातली वैरभावना, स्वार्थ, लांडीलबाडी प्रचंड प्रमाणात वाढल्यावर, सर्वसामान्य माणूस भवसागरात बुडायला लागल्यावर, त्यांचे रक्षण करण्यासाठी आणि समाजातील हा दुष्ट भाव निपटून काढण्यासाठी, धर्मभावना वाढविण्यासाठी तुम्ही हा अवतार धारण केलेला आहे. जड जीवांना तारून नेण्यासाठी, त्यांची नामसाधना वाढविण्यासाठी तुम्ही प्रगट झाला आहात. वाढावया सुख भक्ति भाव धर्म | कुळाचार नाम विठोबाचे॥ या मानवी विेशातला भक्तीभाव वाढावा, त्यांना आध्यात्मिक सुख मिळावे, धर्मभावना वाढावी, यासाठी, संत सज्जनहो, तुम्ही प्रगट झालात. श्रीविठूरायाचे अखंड नामस्मरण हाच तुमचा कुळ धर्म. विठ्ठलाच्या नामातच तर तल्लीन होऊन तुम्ही हे ईश्‍वरीकार्य करीत आहात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी | तैसे तुम्ही जगीं संतजन॥ तुकाराम महाराज म्हणतात की, चंदनवृक्ष जसा सभोवताल सुगंधी करून टाकतो त्याप्रमाणे तुम्हा संतांच्या सहवासात येणारा प्रत्येकजण संस्कारक्षम होऊन जातो. तुमचे सर्व गुण त्यांना आपोआप प्राप्त होतात. तुमची नम्रता, वाणीतील मार्दव, तुमची अक्षय कृपादृष्टी, इतकेच काय परंतु तुमच्या मुखातले श्रीविठ्ठलाचे अखंड नामस्मरण त्यांना प्राप्त होते.
आणि जे वर्णन श्री संत तुकाराम महाराज यांनी संत लक्षण म्हणून केले त्याला पूर्णतः साजेसे आमचे सदगुरु  वामनबाब महाराज👏🏻
एक भक्त : श्री संत सदगुरू वामनबाब महाराज
Varkariyuva.blogspot.in