Monday 28 November 2016

वेळीच जागे होऊन योग्य रस्त्याला लागा - श्रीमहाराज


कोणत्याही कर्माची सुरुवात हेतूपासून म्हणजे वासनेपासून होत असते. जन्म हा देखील वासनेतून निर्माण होतो. गंगेचा उगम अत्यंत पवित्र आणि लहान असला तरी स्वच्छ असतो. त्याप्रमाणे, आपला जन्म वासनेत झाला असला तरी सुरुवातीला मूळ स्वरूप निर्मळ असते. याच वेळी आई लहान मुलाला शिकवते, ’ देवा चांगली बुद्धी दे, ’ पुढे या निर्मळ मनावर निरनिराळ्या बर्‍यावाईट वासनांचे पगडे बसू लागतात. गंगेचे पाणी पुढे पुढे वाहात गेल्याने गढूळ होते होते. आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे तुरटी लावतो, त्याप्रमाणे वासनेचा गढूळपणा घालविण्यासाठी ’राम कर्ता’ ही भावना दृढ करायला पाहिजे. भगवंताच्या नामाची तुरटी फिरल्याने वासनेचा साका खाली राहून शुद्ध अंतःकरण प्रकट होईल. ’ गेल्या जन्मात मी जी काही पापे केली असतील ती आता भोगतो आहे, ’ असे नुसते म्हणून जगण्यात अर्थ नाही, कारण त्यामुळे आपण पुढच्या जन्माची तयारीच करीत असतो. जर पुढचा जन्म चुकवायचा असेल तर या जन्मीच त्यासाठी कार्य करायला पाहिजे; म्हणजे ती वासना नष्ट केली पाहिजे.

सत्तावान्, श्रीमंत, वैभववान् माणसे सुखी असतात, हा नुसता भ्रम आहे. जोपर्यंत यांना भगवंताचा आधार नसतो तोपर्यंत या सर्व गोष्टी कुचकामाच्या आहेत. आपले प्रापंचिक सुख आहे ते दिसायला वरवर बाळसेदार दिसते, परंतु ती सूज आहे, हे काही खरे बाळसे नव्हे. म्हणून आपल्याला प्रपंचात सुख लागत नाही. आपले वय जसजसे वाढत जाते, तसतसे आपले व्याप वाढतात आणि परमेश्वराकडे दुर्लक्ष होते. वासना कमी होण्याऐवजी वाढत जाते, आणि तीच पुढल्या जन्माची अधिष्ठात्री ठरते. तेव्हा यातून काहीतरी मार्ग वेळेलाच काढणे आवश्यक आहे. हा मार्ग अगदी सरळ आणि सोपा आहे. संतांनी तो अनेक वेळा दाखवून दिला आहे. त्या मार्गाने पावले टाका, भगवंत पुढला मार्ग दाखवायला उत्सुक आहे. तुम्हाला हे सर्व पटले असे म्हणता, परंतु पटले असून करीत नाही. बरे, पटले नाही म्हणावे, तर का पटले नाही तेही सांगत नाही, याला काय करावे ? मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणीमात्रापेक्षा जर काही जास्त असेल तर ते म्हणजे चांगलेवाईट कळण्याची बुद्धी. तेव्हा तुमच्या बुद्धीला पटूनही जर तुम्ही तसे वागला नाही किंवा नुसता प्रयत्नही केला नाही, तर तो दोष सर्वस्वी तुमचाच नव्हे का ? म्हणून मला पुनः सांगावेसे वाटते की, वेळेलाच जागे होऊन योग्य रस्त्याला लागा. भगवंताच्या नामात राहून सर्व काय ते करा, हेच माझे शेवटचे सांगणे आहे.

नामावर बळकट श्रद्धा ठेवून परमार्थ करू या. नाम न सोडता इतर गोष्टी करू.

भजनशिरोमणी वै.नामदेवबुवा खुटारीकर संगीत सेवा महोत्सव - श्रीअनिलमहाराज पाटील (प्रथम दिन)

ह.भ.प.अनिलमहाराज पाटील यांची किर्तनसेवा संपन्न !

आयोजक
श्री मनोहर कडू
श्री वैभव मनोहर कडू

पापडीचा पाडा , तळोजा .

श्रीगुरू संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज समाधी उत्सव कीर्तन ..!

कीर्तनकार - प.पू. केशवमहाराज नामदास ( संत नामदेवमहाराज यांचे वंशज )

संतश्री ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधी मंदिर , आळंदी देवाची

Online वारकरी परिक्षा अभ्यासक्रम - उदघाटन सोहळा

सद्गुरू जोगमहाराज यांद्वारे संस्थापित वारकरी शिक्षण संस्था शताब्दी उत्सव पर्वी श्रीसंत ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधी दीनाचे औचित्य साधून  प.पू. श्रीगुरु श्रीप्रसादमहाराज अमळनेरकर , प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर , प.पू. श्रीसंदीपानमहाराज हसेगावकर (अध्यक्ष - वारकरी शिक्षण संस्था) , श्री.योगीराजमहाराज गोसावी (संत एकनाथमहाराज यांचे वंशज ) , श्रीज्ञानेश्वरमहाराज जळगावकर (अध्यक्ष - वारकरी फडकरी दिंडी समाज) यांच्या हस्ते तथा श्री.रवींद्रमहाराज हरणे ( मुक्ताई संस्थान ),श्रीबाजीराव नाना चंदिले (सचिव - वारकरी शिक्षण संस्था ) , भाऊमहाराज फुरसुंगीकर ( संत निंबराजमहाराज यांचे वंशज ) ,  कीर्तनकेसरी संजयनाना धोंडगे (संत निवृत्तीनाथ संस्थान , त्र्यंबक ),श्री एकनाथमहाराज कोष्टी (गुरुजी)  श्रीजयवंतमहाराज बोधले , श्रीपरागमहाराज चातुरमास्ये , श्री पुरुषोत्तमदादामहाराज पाटील ( मठाधिपती - सद्गुरू अमृतनाथस्वामी महाराज मठ ) , श्री विवेकजी राऊत (सचिव - व्यसनमुक्त युवक संघ - महाराष्ट्र ) , प्रमोदभाऊ पवार (अध्यक्ष - वारकरी संप्रदाय युवा मंच - पिंपरी चिंचवड शहर), विशालमहाराज खोले , उद्धवमहाराज जुनारे -  कोथळी संस्थान ,  व फडकरी तथा संत वंशज , वारकरी शिक्षण संस्था आजी - माजी विद्यार्थी यांच्या   मुख्य उपस्थितीत सद्गुरू जोगमहाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था नवीन इमारत येथे संपन्न झाला . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भागवताचार्य श्रीमाधवदासमहाराज राठी , नासिक यांनी केले .

संकल्पना -श्रीयोगीराजमहाराज गोसावी .
विशेष सहकार्य - परागमहाराज चातुर्मास्ये , जयश्रीजी  पाटील व सर्व सहकारी

सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा .