Sunday 21 February 2016

साध्य साधन विचार - प.पु.ह.भ.प.श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर

।। ज्ञानेशो भगवान विष्णु ।।

साध्य साधन

साध्य म्हटले की त्याच्या नियत साधनांचा विचार येतोच.साधन म्हणजे साध्यापर्यंत पोचण्याचा मार्ग. संसार अथवा परमार्थ दोन्हीकडे साध्य-साधनांचा विचार करावाच लागतो.कारण साध्याचे अज्ञान साधन चुकवितो आणि चुकलेले साधन साध्यापर्यंत पोचू देत नाही.त्यामुऴे साध्य आणि साधन या दोन्हींचे यथार्थ  ज्ञान माणसास हवे.
जगात काही लोक साध्याचाच विचार करतात.साधनाचा करीत नाही.वाटेल ते करतील पण साध्य प्राप्त करतील.सुभाषितकाराने विनोदाने म्हटले आहे,

घटं भिन्द्यात्पटं छिन्द्यात्कुर्याद्रासभरोहणम् ।

येनकेनप्रकारेण प्रसिद्ध:
पुरूषोभवेत्   ।।

वाटेल ते करावे पण आपले साध्य प्राप्त करून घ्यावे, असा त्यांचा विचार असतो.पण ते योग्य नाही.त्याचा परिणाम साध्याच्या अप्राप्तीत तर होतोच, पण साधनांची बंधने निर्माण होतात आणि मनुष्य त्याच्यातच अडकून पडतो.याविरूद्ध काही साधनांचाच विचार करतात. पण तेही योग्य नाही.ज्याप्रमाणे एखादा भिकारी गाडीत बसतो, ते गाडीत जागा आहे म्हणून.कोठे उतरायचे,काय करायचे हे काही निश्चित नसते.गार्ड जेथे उतरवून टाकेल तेथे उतरायचे आणि तेथेच भीक मागायची, असे असते.येथे साध्याचा काहीच विचार नाही.त्याप्रमाणे काही साध्याचा विचार करत नाही.जेथे पोचू तेथे विचार करू,अशी प्रवृत्ती असते.तीही घातकच असते.
संसार आणि परमार्थात साध्य-साधनांचा विचार आवश्यक आहेच.तो लोक करतातही.फक्त दोन्हीत फरक एवढाच, की व्यवहारात साध्य प्राप्तीनंतर साधन संपते,साधनांचा विचार थांबतो.

तृप्ती झालीया जैसी ।

साधने सरते आपैसी ।।

असे श्रीज्ञानेश्वर महाराज सांगतात. पण परमार्थात साध्याच्या प्राप्तीनंतर साधन संपत नाही, नष्ट होत नाही, तर ते साध्यमध्ये विलीन होते.
ज्ञेयाच्या प्राप्तीनंतर ज्ञान
( आणि ज्ञाताही )  ज्ञेय स्वरूप होते हेच परमार्थाचे वैशिष्ट्य !

-  ह.भ.प.श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर, पंढरपूर

Varkariyuva.blogspot.in