Saturday 1 October 2016

श्रीसंत ज्ञानेश्वरमहाराज व भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज रचित ओवी तथा श्लोक श्री भगवती देवी स्तुती ..!

|| ज्ञानेशो भगवान विष्णु: ||

भगवान श्रीज्ञानेश्वर माउली भगवती श्रीअंबाबाईची स्तुती करताना म्हणतात,
म्हणोनि अंबे श्रीमंते ।
निजजनकल्पलते ।
आज्ञापीं मातें ।
ग्रंथनिरूपणीं ॥ज्ञाने.१२.०.१०॥
श्रीमाउली भगवती अंबेला 'श्रीमंत' व 'निजजनकल्पलता' ही दोन मार्मिक विशेषणे येथे मुद्दामच वापरीत आहेत. भगवंतांच्या कृपाशक्तीलाच " श्री " म्हणतात तर त्यांच्या वैभवसंपन्नतेला " महालक्ष्मी " म्हणतात. येथे माउलींनी खुबीने भगवतीच्या या दोन्ही स्वरूपांचा सुंदर उल्लेख केलाय. श्रीज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रकटलेली ही अलौकिक कृपाशक्ती, तिला शरण आलेल्या भक्तावर या दोन्ही प्रकाराने कृपाप्रसाद करते, हेच त्यांना त्यातून सूचित करायचे आहे.
भगवती अंबा जेव्हा शरण आलेल्या जीवावर अनुग्रहकृपा करून त्याला परमार्थाचे दान देते, तेव्हा तीच श्रीरूप होते. तर जेव्हा ती त्या जीवाच्या सर्व प्रापंचिक इच्छा पूर्ण करते तेव्हा ती " निजजनकल्पलता " होते. तिला शरण आलेल्या जीवांच्या सर्व कल्पना पूर्ण करणारी तीच " कल्पलता " असते. मग आपण जर, " प्रपंचाचाच परमार्थ होऊ दे ", अशीच तिच्या चरणीं प्रार्थना केली तर? सगळेच काम फत्ते ! कल्पनाच नष्ट करणारी ही कल्पलता, अकल्पनाख्य असा भगवत्प्राप्तीरूप मोठा वरप्रसाद देण्यासाठी म्हणून आपल्यावर सर्वार्थाने वोळेल ! अर्थात् हे कृपाकार्य त्या भगवती जगदंबेच्या "श्रीसद्गुरु" या रूपाद्वारे होत असते. म्हणूनच भगवान शिव, त्यांची अभिन्न शक्ती भवानी व श्रीसद्गुरु हे तिन्ही एकरूपच आहेत, असे माउली बाह्या उभारून वारंवार सांगतात.
तर
भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
भवानी भवानी भवानी त्रिवारं
उदारं मुदा सर्वदा ये जपन्ति ।
न शोको न मोहो न पापं न भीति:
कदाचित्कथंचित्कुतश्चित् जनानाम् ॥
भवानी हे नाम जो केवळ तीनवेळा सतत आनंदाने जपतो, त्याला शोक, पाप, मोह व भीती इत्यादी कधीच, केव्हाही, कोणाकडूनही व कुठेही अनुभवाला येत नाहीत, असे साक्षात् श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज 'भवानीभुजङ्गस्तोत्रा'मध्ये स्पष्ट सांगतात. त्यांचेे हे सांगणे आपण या नवरात्र महोत्सवामध्ये मनापासून पालन करून धन्य होऊया !!
- ज्ञानदा
varkariyuva.blogspot.in

( श्री.रोहन उपळेकर यांचा एक पूर्वी  वाचनात आलेला लेख संकलन करून ठेवला  होते त्यातील काही भाग देत आहोत )