Saturday 29 October 2016

हुतात्मा नितीनसाठी आकाशदिवे उतरवले

सांगली - जम्मू-काश्‍मिरमधील कुपवाडा जिल्ह्यात मच्छिल सेक्‍टरमध्ये पाकिस्तान सीमेवरून झालेल्या गोळीबारात जिल्ह्यातील दुधगाव (ता. मिरज) चा सुपुत्र सीमा सुरक्षा दलाचा जवान नितीन सुभाष कोळी (वय 32) हा शहीद झाला. काल रात्री साडे दहाच्या सुमारास तो गोळीबारात जखमी झाला होता. पहाटे अडीचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी दुधगाव येथे नितीन शहीद झाल्याचे समजताच संपूर्ण गाव बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. घरावरील आकाश कंदील उतरवले. तसेच फटाके न वाजवण्याचा निर्णय घेतला.

दुधगाव येथे दहावीपर्यंत शिक्षण झालेला नितीन 2008 मध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये भरती झाला. 2010 मध्ये त्याचा विवाह संपदा हिच्याशी झाला. त्यांना देवराज (वय 4), युवराज (वय 2) ही दोन मुले आहेत. वडील सुभाष, आई सुमन, भाऊ उल्हास असा नितीनचा परिवार आहे. गणेशोत्सवात नितीन गावी आला होता. त्यानंतर त्याचा मोबाईलवरून कुटुंबाशी संपर्क असायचा. काल दुपारीच त्याने घरी मोबाईलवर कुटुंबाशी अखेरचा संवाद साधला. दिवाळीनंतर 5 नोव्हेंबरला घरी येणार असल्याचे त्याने कळवले होते. परंतू आज सकाळीच तो शहीद झाल्याची दु:खद बातमी भाऊ उल्हास याला सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी कळवली. भाऊ शहीद झाल्याचे वृत्त ऐकताच त्याला धक्का बसला. स्वत:ला सावरत त्याने वडीलांना हकीकत सांगितली.

दरम्यान गावातील नितीन शहीद झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरताच शोककळा पसरली. ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवले. घरावर लावलेले आकाशकंदील खाली उतरवले. ग्रामपंचायतीजवळ शोकसभा झाली. सरपंच सुरेखा आडमुठे, पंचायत समिती सदस्य प्रमोद आवटी, उपसरपंच संजय देशमुख, माजी सरपंच विलास आवटी आदींनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. गावचा सुपुत्र नितीन शहीद झाल्यामुळे सर्वांनी यंदाची दिवाळी साधेपणाने साजरी करावी असे ठरले. गावात फटाके वाजवू नयेत असे आवाहनही केले.

अखेरचा संवाद साधला..
नितीनने काल दुपारी अडीचच्या सुमारास मोबाईलवरून कुटुंबाशी संवाद साधून दिवाळीनंतर येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आठ तासांनी रात्री साडे दहा वाजता मच्छिल भागात पाकिस्तानी सीमेवरून झालेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. उपचार सुरू असताना पहाटे अडीच वाजता तो मृत झाला. मोबाईलवरून त्याने कुटुंबाशी साधलेला संवाद अखेरचा ठरला.

तो दिवाळीला नाही आला, आली ती बातमीच...
नितीनने काल दुपारीच बोलताना दिवाळीनंतर 5 नोव्हेंबरला येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. परंतू आज सकाळीच भाऊ उल्हास याला तो शहीद झाल्याची बातमी समजली. दुपारपर्यंत नितीनची आई, पत्नी आणि मुलांना नितीन शहीद झाल्याचे सांगण्यात आले नव्हते.

उद्या पार्थिव येणार-
नितीनचे पार्थिव रविवारी सायंकाळपर्यंत गावात आणले जाईल असे सांगण्यात आले. त्यानंतर शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

सोशल मिडीयावर श्रद्धांजली
पाकिस्तानच्या गोळीबारात नितीन शहीद झाल्याची बातमी आज फेसबुक, व्हॉटस्‌ ऍपवर पसरली. अनेकांनी ती फॉरवर्ड करून शोक व्यक्त केला. तसेच पाकिस्तानचा निषेध व्यक्त केला.

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र
   - Varkariyuva.blogspot.in