Sunday 26 June 2016

श्री क्षेत्र देहू प्रवेश द्वार

गतगुरू श्री संत तुकाराम  महाराजांना पंढरपूर वारी करता निरोप देणार  !

वारीच्या अपडेट्स बद्दल "दैनिक - महाराष्ट्र टाईम्स" ने घेतलेली दखल !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

महाराष्ट्र टाईम्स आपण दखल घेतल्या वारीच्या अपडेट्सच्या माध्यमातून आजच काही तासांत ५०० हुन अधिक लोक या सेवेचा लाभ घेत आहेत . धन्यवाद .
- Varkariyuva.blogspot.in

श्री जगतगुरू संत तुकाराममहाराज श्रीक्षेत्र देहू येथून भूवैकुंठ पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवणार !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु:।।

श्री तुकोबाराय चैतन्य

आज श्री जगतगुरू संत तुकाराममहाराज श्रीक्षेत्र देहू येथून भूवैकुंठ पंढरीच्या दिशेने लाखो भाविकांच्या भजनानंदात प्रस्थान ठेवणार !

आपल्या सद्गुरूंच अर्थात श्री संत तुकाराम महाराज यांचं सार्थ वर्णन केलेली संत निळोबारायांद्वारे लिखित आरती -
प्रपंच रचना सर्वही भोगुनि त्यागिली ।
अनुतापाची ज्वाला देह बुद्धी हरविली ।
वैराग्याची निष्ठा प्रगटूनि दाखविली ।
अहंता ममता दवडूनि निजशांती वरीली ॥१॥
जय जयाजी सद्गुरू तुकया दातारा ।
तारक तू सकाळांचा जिवलग सोयरा ॥धृ ॥
हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला ।
विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडूंनि दाखविला ।
जगदोद्धरालागी उपाय सुचविला ।
निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला ॥ जय ॥२॥
तेरा दिवस वह्या रक्षूनिया उदकी ।
कोरड्याची काढूनि दाखविल्या शेखी ।
अपार कविता शक्ति मिरवूनि इहलोकी ।
कीर्तनश्रवणे तुमच्या उद्धरती जन लोकी ॥ जय ॥३॥
बाळवेष घेउनि श्रीहरी भेटला ।
विधिता जनिता तोचि आठवा हा दिधला ।
तेणे ब्रम्हानंदे प्रेमा डोलविला ।
न तुके म्हणोंनि तुका नामी गौरविला ॥ जय ॥४॥
प्रयाणकाळी देवे विमान पाठवविले ।
कलीच्या काळामाजी अद्भुत वर्तवविले ।
मानव देह घेऊनि निजधामा गेले ।
निळा म्हणे सकळ संता तोषविले ।
जय जयाजी सद्गुरू तुकया दातारा ॥ तारक ॥५॥

- Varkariyuva.blogspot.in

नियम थोडा करावा, पण तो शाश्वताचा असावा ! - श्री महाराज

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते, त्या झाडाला आपण पाणी घालतो, त्याची मशागत करतो, त्या झाडाकडे लक्ष पुरवितो. परंतु जे झाड वाढू नये असे वाटते, किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही, त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो. तसे, जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल, त्याची जोपासना करावी. देहाकडे, विचारांकडे, विषयांकडे दुर्लक्ष करावे, म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना, त्याला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्याभोवती कुंपण घालावे लागते, त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा; तो जितका गुप्त राहील तितका चांगला. त्याचे प्रदर्शन झाले तर त्याला दृष्ट लागते. म्हणून परमार्थ हा कोणाच्या न कळत, परंतु अत्यंत आवडीने करावा. झाड लावल्यावर ते किती वाढले आहे हे कुणी रोज उकरून पाहात नाही, त्याप्रमाणे अनुभवाच्या, प्रचीतीच्या मागे लागू नका; त्यामुळे प्रगती खुंटेल.

हट्टी आणि व्यसनी माणसे एका दृष्टीने मला आवडतात; कारण त्यांचा हट्ट भगवंताच्या मार्गाला लावला की झाले. परमार्थात नियम थोडाच करावा, पण तो शाश्वताचा असावा; म्हणजे, जेणेकरून भगवंताचे प्रेम लागेल याबद्दलचा असावा, आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा. जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यानमार्ग साधतो. हा मार्ग फार थोरांचा आहे. ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो; त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण वर्षेसुद्धा जातील, पण त्याच्या देहाला काही होणार नाही. आपल्यासारख्याला साधनांत साधन म्हणजे भगवंताचे नाम; दानांत दान म्हणजे अन्नदान; आणि उपासनांत उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय; या तिन्हींमुळे देहाचा विसर पडतो. म्हणून शक्य तो या तीन गोष्टींची कास धरा. मनुष्याची साहजिक प्रवृत्ती व्याप वाढविण्याकडे असते. द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असतो हेही खरे. साधे मधमाश्यांचे उदाहरण घ्या. त्या अनेक झाडांवरून मध गोळा करतात आणि नंतर पोवळ्यात एकत्र करतात. असा एकत्र केलेल्या मधाचा केवढा गोड साठा होऊ शकतो बरे ! अशा रीतीने सर्व द्वैतामध्ये एक अद्वैत, म्हणजे एक राम, पहायला शिकावे; आणि ज्याला सर्वत्र राम पाहणे असेल त्याने स्वतःमध्येच राम पाहून, प्रत्येक कृती ही रामाची समजावी. स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही. तेव्हा स्वतःचा म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही, आणि हा देहाचा विसर राममय झाल्यानेच होईल. म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहा. परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते .
-Varkariyuva.blogspot.in

पूज्य सद्गुरु ह.भ.प.श्रीभानुदासमहाराज देगलूरकर यांचा प्रथम पुण्यतिथी महोत्सव !

पूज्य सद्गुरु ह.भ.प.श्रीभानुदासमहाराज देगलूरकर यांचा प्रथम पुण्यतिथी महोत्सव श्री क्षेत्र पंढरपूर येथे ...!

२६ जुलै २०१६ ते ०२ ऑगस्ट २०१६

मुख्य मार्गदर्शन
श्रीगुरु श्रीप्रसादमहाराज अमळनेरकर  व श्रीगुरु श्रीचंद्रशेखरमहाराज देगलूरकर
कीर्तन भजन मार्गदर्शन - ह.भ.प.श्री रामचंद्रबाबा बोधे .
ज्ञानेश्वरी व्यासपीठ - ह.भ.प.एकनाथमहाराज कोष्टी .

सर्व मुख्य फड परंपरेतील सर्वच मान्यवरांची ३ सत्रांमध्ये ज्ञानदानात सहभाग .
प्रथम सत्र - सकाळचे कीर्तन सेवा
द्वितीय सत्र - सायं.प्रवचने
तृतीय सत्र - रात्रीची कीर्तन सेवा

दि.१ ऑगस्ट २०१६ - गौरवग्रंथ व स्मरणिका प्रकाशन
काल्याचे / समारोपचे कीर्तन - पु.श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर .

स्थळ : संत श्री गजाननमहाराज मंदिर प्राकार , पंढरपूर

भगवंत कृपेने मिळालेल्या आयुष्यातले हे ८ महत्त्व पूर्ण दिवस चुकवू नका. आजच सुट्टयांच नियोजन करा व आमच्या पूज्य सद्गुरु दादांच्या प्रथम पुण्यस्मरण महोत्सवास उपस्थित रहा नम्र विनंती !
- अक्षय चंद्रकांत भोसले
पाईक -  पूज्य देगलूरकर परंपरा