Friday 28 August 2015

प्रभू रामाचे शरीर हे चिन्मय होते - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरू ||
अवताराला आलेल्या भगवान श्रीरामाचे शरीर हे सच्चिदानंद शरीर असून त्याला दिव्य देह म्हणतात. उलट सामान्यांचे शरीर हे दिव्यही नाही अन् नित्यही नाही. स्वर्गातील देवादिकांचे (इंद्र, चंद्र, सूर्य) शरीर हे दिव्य आहे पण नित्य नाही, प्रभू रामचंद्राचे शरीर हे दिव्यही आहे आणि नित्यही आहे म्हणून त्याला चिन्मय शरीर म्हणतात, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले. 

ते श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 'अध्यात्म रामायण' या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होते. पुढे बोलताना बोधले महाराज म्हणाले की, चिन्मय शरीर हे भगवंताच्याच ठिकाणी असते, सत्शक्तीने हे शरीर अवतारी बनते, तर भगवंताच्या ठिकाणी असलेल्या चित्तशक्तीने हे शरीर प्रकाशमय बनते असे महाराजांनी स्पष्ट केले. भगवंताच्या ठिकाणी असलेल्या आनंदशक्तीने ते शरीर आकर्षक बनते. अशा या आनंदस्वरूप बाल प्रभू रामचंद्रांना पाहण्यासाठी अयोध्येतील लोकांची गर्दी होऊ लागली होती. त्यावेळी एक दासी धावत -धावत येऊन कौशल्या मातेकडे गेली. त्यावेळी कौशल्येने तत्काळ आपल्या गळ्यातील नवरत्नांचा हार त्या दासीला दिला, मात्र त्या दासीने तो तसाच परत देऊन मला काही द्यायचे असेल तर रामाला माझ्या हातात दे हार नको, असे सांगितले. 
रामाचे शरीरच असे होते की, त्याला पाहिल्यास सर्व स्त्री-पुरुष मंडळी स्वत:ला विसरून जात होती. या रामाला पाहण्याकरिता साक्षात भगवान महादेवसुद्धा एका सामान्य माणसाचे रूप घेऊन अयोध्येत आले होते. प्रभू रामाच्या अवताराबरोबरच लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या तिघांचे देखील अवतारच होते. राम हा विष्णूचा, लक्ष्मण -शेषाचा, भरत शंखाचा तर शत्रुघ्न हा चक्राचा अवतार असल्याचे महाराजांनी शेवटी सांगितले. 
एकादशी असल्यामुळे सायंकाळऐवजी सकाळच्या सत्रात झालेल्या या प्रवचनासाठी बारामतीचे श्री महंत प्रमोद महाराज जगताप, पुण्याचे सदानंद महाराज बग, मुंबईचे अक्षय महाराज भोसले यांच्यासह गुरुवर्य प्रभाकरदादा बोधले महाराज उपस्थित होते. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 

भगवंताचा अवतार कर्मबंधनातुन मुक्त करणारा - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरू ||
भगवंताच्या अवताराचे अंश, अशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णतम हे सहा प्रकार असून भगवंताच्या दशावतारामध्ये प्रभू रामचंद्र व श्रीकृष्ण अवतार हे दोनच अवतार पूर्ण अवतार आहेत. जे भगवंताला, अवताराला व जे त्यांना जाणतात या दोघांनाही कर्माचे बंधन नसते, नव्हे तर भगवंताचा अवतार हा कर्मबंधनातून मुक्त करणारा असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले. 

श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या अध्यात्म रामायण या विषयावरील प्रवचनमालेत ते बोलत होते. भगवंत अवताराला येतो म्हणजे तो जन्माला येतो. सामान्यांचा जन्म हा वासनेनुसार आहे, पण भगवंताचा अवतार हा वासनेच्या आहारी नाही. सामान्यांचा जन्म असला तर भगवंताचे प्रकटीकरण आहे. सामान्य माणसाला मरताना जी इच्छा असते त्यानुसार त्याला पुढे जन्म मिळत असतो. भगवंत मात्र भक्ताकरिता अवताराला येतात. सामान्य माणसाला जन्माला यावेच लागते, संत हे स्वत:हून येत असतात आणि देवाला मात्र हाक मारून आणावे लागते, असे महाराज म्हणाले. चैत्र शुद्ध नवमीला सोमवारी व पुनर्वसू नक्षत्रामध्ये प्रभू रामचंद्र अवताराला आले. हा अवतार सूर्यवंशाचा असल्यामुळे सूर्य हा देखील अत्यंत आनंदात होता. ज्यावेळी भगवंत कौशल्या मातेच्या पोटात होते तेव्हा ती स्वानंद स्थितीत होती. राजा दशरथाने वशिष्ठ ऋषीला हे काय चालले आहे असे विचारले असता वशिष्ठाने भगवान तुमच्या घरात अवताराला येणार असल्यामुळे सूर्यकुळाला चांगले दिवस येणार आहेत, असे सांगितले होते. त्यामुळे राजा दशरथ देखील खूप आनंदी झाले होते व ते देखील विदेह स्थितीत नाचू लागले होते. प्रभू रामाचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या कुंडलीतील गृह देखील स्वत: उच्च स्थानावर जाऊन बसले होते. सामान्यांचा जन्म असला तर भगवंताचे प्रकटीकरण आहे. सामान्य माणसाला मरताना जी इच्छा असते त्यानुसार त्याला पुढे जन्म मिळत असतोच असेही बोधले महाराज यांनी सांगितले.
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 

भक्तांना जो रमवितो तो राम - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरू ||
वसिष्ठ मुनींनी भाकीत केल्याप्रमाणे अयोध्येचा राजा दशरथांच्या घरी चैत्र शु. नवमीला विष्णू रुपात साक्षात प्रभूरामचंद्रांनी, चैत्र शु. दशमीला शेष रुपात लक्ष्मण, चैत्र शु. एकादशीला शंख रुपात भरत तर चक्र रुपात शत्रुघ्न या तीन अलौकिक भावंडांसह अवतार घेताच अवघी अयोध्या नगरी प्रकाशमय झाली. वसिष्ठांनी नवमी, दशमी व एकादशीला तिघांचे नामकरण केले, पण राम असं नाव का ठेवलं, यावर स्पष्टीकरण देताना ह. भ. प. बोधले महाराज म्हणाले, भक्तांना जो रमवितो तो राम, मुनीजन जेथे रमतात तो राम म्हणून राम हे नाव ठेवले. 

भगवंत देवस्थान ट्रस्ट व बोधराज भक्त मंडळातर्फे आयोजित श्रावणमास प्रवचनमालेत ते बोलत होते. राजा दशरथाला या चारही पुत्रांच्या माध्यमातून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थ प्राप्त झाले आहेत. पार्वती मातेनं भगवान शंकराकडे रामायणातील रामकथेचा नायक प्रभू रामचंद्र स्वरुप आणि चरित्र जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर शंकरांनी सूर्य, वंशावळ त्यातील ६0 वे वंशज राजा दशरथ, त्यांच्या कौशल्या, सुमित्रा आणि कैकयी या तीन राण्या. त्यांच्या पोटी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचा जन्म, रामायणातील रामभक्त हनुमान, रावण, बिभीषण, कुंभकर्ण, मंडोदरी, शूर्पणखा आदी इतर पात्रांचा त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांसह परस्पर पण आध्यात्मिक संबंध, परमात्मा अवतार घेतो म्हणजे नेमके काय ? परमात्मा इतका व्यापक असताना संकुचित असा अवतार घेऊन स्वत: येण्याची गरज काय? तो मानवीय देहात अवतारीत झाला तर त्याला कर्मबंधनं आहेत काय आदी प्रश्न उपस्थित करून दृष्टांत दाखल्यासह विविध प्रसंगावर विस्तारानं भाष्य केल्याचे महाराजांनी सांगितले. 
भगवंतांच्या दशावताराचे अंश, अशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णतम असे सहा प्रकार आहेत. सामन्यांचा जन्म वैषयिक तर परमात्म्यांचा अवतारिक असतो, असे महाराजांनी सांगितले. याप्रसंगी बहुसंख्य रसिक श्रोते उपस्थित होते. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 

रामनामासाठी काळ-वेळेचे बंधन नाही- ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले


|| श्रीगुरू ||
निगरुण रूपात असलेला परमात्मा हा इंद्रियांना गोचर होत नाही म्हणजे कळत नाही, आणि तो परमात्मा इंद्रियांना कळणे म्हणजेच अवतार होय. असा आह परमात्मा सर्वव्यापक आहे, मात्र तो अवताराला आल्यानंतरच प्रगट होतो, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले. 

श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या अध्यात्म रामायण या विषयावरील प्रवचनमालेत ते बोलत होते. पुढे बोलताना बोधले महाराज म्हणाले की, परमात्मा हा आकाराला आल्यामुळे र्मयादित झाला आहे म्हणजे तो व्यापक आहे हे कसे सिद्ध होणार याविषयी बोलताना महाराज म्हणाले की, अग्नी ही सर्वव्यापक आहे मात्र तिला आगकाडीचा संबंध आल्यावरच तो प्रगट होतो त्याप्रमाणे परमात्मा हा देखील सर्वव्यापक आहे, परंतु अवताराला आल्यावरच तो प्रगट होतो. ज्यावेळी सीतामाता अशोक वनात होती तेव्हा मंदोदरीने सीतेला प्रश्न विचारला होता की तुझा राम सर्वव्यापक आहे की संकुचित आहे. तेव्हा सीतेने तो सर्वव्यापक असल्याचे सांगितले, त्यावर मंदोदरीने तो सर्वव्यापक असेल तर रावणात देखील आहे मग तू रावणातील रामाला का वश होत नाही. तेव्हा सीतामाता म्हणाली की, राम व्यापक आहे मात्र रावणात काम आहे त्यामुळे तिथे राम नाही. हे सांगताना महाराज म्हणाले की, जिथे काम आहे तिथे राम नाही. तसेच अशोक वनात जेव्हा मंदोदरीला सीतेचे दर्शन झाले तेव्हा तिच्या सर्वांगात राम संचारलेला होता. म्हणून सीतेचे हे उत्तर ऐकून मंदोदरीला देखील विदेह अवस्था प्राप्त झाली होती व तीही राम भजनात तल्लीन झाली होती. म्हणून जो आवडीने रामनाम घेतो त्याला पाहणाराही रामनामात मग्न होतो. रामनाम हे अत्यंत सोपे असून ते घेण्यासाठी काळ-वेळेचे देखील बंधन नाही. जीवाच्या ठिकाणचे संसारबंधन घालविण्यासाठी रामनाम गरजेचे आहे. 
या प्रवचनासाठी बावी येथील ह. भ. प. अंबऋषी महाराज वारकरी शिक्षण संस्था व बाश्रीतील भास्कर मांजरे महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील बाल वारकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 


८४५१८२२७७२ 

शबरीची भक्ती कळण्यासाठी श्रीराम अवतार - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरू ||


      परमात्मा हा भक्ताला दर्शन देण्यासाठी निगरुणातून सगुण रुपात आला, असे सांगताना निगरुण परमात्मा हा आनंदी, शांत, निर्मल, निर्विकार, निरंजन, सर्वव्यापक, स्वप्रकाशी, अकल्मश आदी लक्षणांनी युक्त असा तो निगरुण परमात्मा अवताराच्या रुपातून सगुण झाल्याचे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले. ते श्री भगवंत मंदिरात श्रावणमासानिमित्त बोधराज भक्त मंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या अध्यात्म रामायण या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होते.
 पुढे बोलताना बोधले महाराज म्हणाले की, आनंद हा निगरुण परमात्म्याचा गुण असून, या आनंदाचे विषयानंद व ब्रह्मनंद हे दोन प्रकार असून, क्षणिक सुखापासून मिळालेला जो आनंद असतो तो विषयानंद असतो तर निगरुण परमात्म्याची प्राप्ती झालेली ब्रह्मनुभूती म्हणजे ब्रह्मनंद होय. अशा या ब्रह्मनंदात गरोदर असलेली कौशल्या माता होती. या आनंदात असलेल्या कौशल्येला पाहिल्यानंतर पाहणार्‍याला देखील ब्रह्मनंदाची अनुभूती येत होती.अव्यक्त असलेला परमात्मा व्यक्त झाला म्हणजेच अवतार घेतला असे आपण म्हणतो, मनुष्याची सहजवृत्ती अशी असते की, त्याला कापसाचा गोळा दिसला अन् कापड दिसले तर तो कापसाच्या गोळ्याऐवजी कापडाकडे प्रवृत्त होतो तसेच भक्त हा भगवंताच्या निगरुणातील रुपापेक्षा सगुणातील रुपाकडे प्रवृत्त होतो.
परमात्मा हा सर्वशक्तिमान असला तरी त्याला निगरुणात राहून देखील पृथ्वीतलावर कार्य करता आले असते, मात्र तरीसुध्दा तो शबरीसारख्या भक्ताला दर्शन देण्यासाठी अवतार धारण करुन सगुण रुपात येतो हे सांगताना महाराज म्हणाले की, शबरीची निरपेक्ष भक्ती ही जगाला कळावी म्हणूनच भगवंताने श्रीरामाचा अवतार घेऊन निगरुणातून सगुण रुपात आला.
या प्रवचनासाठी प्रा. तुकाराम मस्के, मुंबईचे उद्योजक मनोहर कडू, उद्योजक एन. .के. कापसे, भगवंत देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब बुडूख, बाजार समितीचे संचालक कुंडलिकराव गायकवाड ,ह.भ.प. रंगनाथ काकडे गुरुजी उपस्थित होते.
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 

सूर्यवंश हा गोमातेचा सेवा करणारा - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरू ||
          पृथ्वीतलावर रावणाचे साम्राज्य असताना अत्याचार वाढला होता. ज्यावेळी पापी माणसांतील हे षडविकारांचे ओझे म्हणजेच काम, क्रोध, लोभ वाढल्याने गायीच्या रुपात पृथ्वीमातेने ब्रह्मदेवाकडे विनंती केली तेव्हा भगवंताने भूतलावर अवतार घेतला, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले. 

श्री भगवंत मंदिरात श्रावणमासानिमित्त बोधराज भक्त मंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या अध्यात्म रामायण या विषयावरील प्रवचनमालेत ते बोलत होते. पुढे बोलताना बोधले महाराज म्हणाले की, माणसांतील कामविकाराने व्याभिचार वाढतो, क्रोधाने हिंसाचार वाढतो तर लोभाने भ्रष्टाचार वाढतो. त्याकाळात हे तिन्ही कामविकार वाढल्याने पृथ्वी गायीच्या रुपात ब्रह्मदेवाकडे गेली. पृथ्वीने गायीचेच रुप का घेतले हे सांगताना महाराज म्हणाले की, गाय ही सहनशीलता, सहनशक्ती, पुण्याचे प्रतीक आहे. कारण गायीच्या पोटात ३३ कोटी देवांचे वास्तव्य आहे असे मानले जाते. संत तुकारामांनीदेखील संतांना गायीची उपमा दिली आहे. गाय ही वासरावर तर संत हे समाजावर प्रेम करीत असतात. सूर्यवंशातील राजा दिलीप याने गोमातेच्या सेवेकरिता प्राणाची आहुती देण्याची तयारी दर्शविली होती. या गोमातेचे पूजन करणारा सूर्यवंश असल्यामुळेच पृथ्वी गायीचे रुप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली. तिने भगवंताकडे प्रार्थना केली. या प्रार्थनेचे चार प्रकार सांगताना महाराज म्हणाले की, दिनता विज्ञापना म्हणजे प्रार्थना करताना स्वत:ची दिनता प्रकट करावी, नंतर भगवंताची स्तुती करावी, त्यानंतर भगवंताकडे आपली अभिलाषा प्रकट करावी, नंतर शांत बसावे हे प्रार्थनेचे प्रकार आहेत. भगवंत अवताराची मिमांसा करताना ते म्हणाले की, निगरुणातून सगुणात येणे म्हणजेच देवाने भक्ताकरिता सोपे होणे होय. या अवतारावर तीन प्रश्न उपस्थित झाले ते म्हणजे देवाला निगरुणात राहून पृथ्वीतलावर कार्य करता येत नव्हते काय? परमात्मा अवताराला आला तर तो संकुचित होता का? आणि भगवंताचा अवतार हा सामान्यांच्या जन्मासारखाच आहे का? हे तीन प्रश्न उपस्थित केले.
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला 
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 
  

पतिव्रताधर्म हेच स्त्रियांचे सौंदर्य - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरू || 

   दशरथ राजाला असलेल्या तिन्ही पत्नींमध्ये कैकयी ही सुंदर आहे तर कौशल्या ही पतिव्रता आहे, जो कुरुप मनुष्य असतो त्याच्या ठिकाणी विद्वता असणे हे त्याचे सौंदर्य असते, कुरुप पण विद्वान असलेल्या माणसाची क्षमा हे सौंदर्य आहे तर कोकिळा ही दिसायला काळी असली तरी तिचा स्वर तिचे सौंदर्य आहे, त्याप्रमाणे कोणत्याही स्त्रीच्या अंगी पतिव्रताधर्म असणे हेच खरे तिचे सौंदर्य असते, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
श्री भगवंत मंदिरात श्रावणमासानिमित्त बोधराज भक्त मंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या अध्यात्म रामायण या विषयावरील प्रवचनमालेत ते बोलत होते. पुढे बोलताना बोधले महाराज म्हणाले की, अशी ही पतिव्रता असलेल्या कौशल्येला गरोदरपणात एकांतात राहावे वाटायचे. ही तिची निरपेक्ष भावना होती. म्हणजेच विध्येय स्थिती होती. ती स्वत:च्या आनंदात मग्न होती. कौशल्या ही नवृत्ती धर्मात मग्न होती तर दशरथ हा प्रवृत्ती धर्मात होता असे सांगताना महाराज म्हणाले की, कौशल्येला पुत्रप्राप्तीची इच्छा होती. तिला परमात्मा आपल्या पोटात असल्याने कशाचीच इच्छा नव्हती. ज्यावेळेस दशरथ राजा डोहाळे विचारण्यास गेला तेव्हा ती काहीच बोलत नव्हती, मात्र दशरथने आपल्या दोघांच्या लग्नात रावणाने आणलेल्या विघ्नाची आठवण काढली तेव्हा तिला संपूर्ण रामायण आठवले व रामाची काय इच्छा आहे ती तिने बोलून दाखवली. हे सर्व ऐकून जेव्हा राजा दशरथने वसिष्ट ऋषींना बोलावले तेव्हा कौशल्येची ही अवस्था पाहून ते देखील बेशुध्द पडले. तेव्हाच अवतार संकल्पना सुरु होते. अवतार म्हणजे वरुन खाली येणे याचा अर्थ सांगताना महाराज म्हणाले की, वरुन खाली येणे म्हणजे निगरुणातून सगुणात येणे होय. कोणताही अवतार हा साधूंचे रक्षण करणे, दुष्टांचा नाश करणे, धर्माची संस्थापना करणे यासाठी होत असतो. मात्र सध्या पृथ्वीतलावर साधूच राहिलेला नसल्यामुळे देवाने अवतार कशाला घ्यायचा असे चित्र निर्माण झाले आहे. आता साधू नव्हे तर संधिसाधू तयार झाले आहेत, असे महाराजांनी स्पष्ट केले. या प्रवचनासाठी गुरुवर्य ह.भ.प. प्रभाकरदादा बोधले महाराज, भागवत महाराज कबीर, भास्कर महाराज बोधले, यशवंत महाराज बोधले उपस्थित होते. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला 
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 

स्त्रियांचा आदर्श म्हणजे माता कौशल्या - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरु || 

 रामायणातील मुख्य भूमिकेत असणारा रावण हा रजगुणी म्हणजे लोकांना रडविणारा होता, तर कुंभकर्ण हा तमगुणी तर बिभीषण हा सत्वगुणी होता. सत्वगुण हा शांतताप्रधान असतो, रजगुण हा क्रियाप्रधान असतो तर तमगुण हा आळसप्रधान असतो. यातील रजगुण हा सत्वगुणाबरोबर राहिल्यास धर्मकार्य घडते तर रजगुण हा तमगुणाबरोबर राहिल्यास अधर्म घडतो, रामायणामध्ये रजगुणी रावण हा तमगुणी कुंभकर्ण व शुर्पणखेबरोबर राहिल्यामुळेच अधर्म घडला असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
भगवंत मंदिरात श्रावण मासानिमीत्त बोधराज भक्त मंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या अध्यात्म रामायण यावरील प्रवचनमालेत ते बोलत होते. बोधले महाराज म्हणाले की, हाच रजगुणी रावण जर सत्वगुणी बिभीषणाबरोबर राहिला असता तर निश्‍चितच धर्मकार्य घडले असते. रावण हा रजगुणाचे प्रतीक असला तरी त्याची पत्नी मंदोदरी ही पतिव्रता होती.
संत एकनाथ महाराज भावार्थ रामायणात म्हणतात की, संकल्प विकल्प नाही उदरी, यामाजी म्हणजी मंदोदरी, मंद+उदर म्हणजे जिच्या पोटात संकल्प विकल्प नाही अशी. अशी ही पतिव्रता मंदोदरी दुर्दैवाने रावणाची पत्नी होती. अशा या रजगुणी रावणाला मारण्यासाठी प्रभुरामाचा अवतार झाला.
अयोध्येमध्ये दशरथ राजाने पुत्रप्राप्तीसाठी कामिष्ठी नावाचा यज्ञ केला. या यज्ञामध्ये मिळालेला प्रसाद त्याने आपल्या तिन्ही राण्या कौशल्या, सुमित्रा व कैकयी यांना खाण्यासाठी दिला, मात्र कैकयीने तो प्रसाद खाण्यासाठी वेळ लावल्यामुळे तिच्या हातातील प्रसाद घारीने उचलून नेला. त्यामुळे कैकयीचा प्रसादच राहिला नाही. त्यामुळे कौशल्या व सुमित्रेने आपल्यातील निम्मा प्रसाद हा कैकयीला दिला.
कौशल्या व सुमित्रा या दोघींनी दुसर्‍या स्त्रीला मदत करण्याची भूमिका त्यावेळी देखील घेत स्त्रीने दुसर्‍या स्त्रीशी कसे वागावे याचा आदर्श घालून दिला.
आज समाजामध्ये प्रभुराम हा अवतार घेण्यास तयार आहे. मात्र त्याला कौशल्यासारखी माता भेटण्यास तयार नाही, असे सांगताना आजही समाजामध्ये प्रत्येक स्त्रीने दुसर्‍या स्त्रीला त्रास न देता मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे, असे महाराजांनी स्पष्ट केले. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला 
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 

अयोध्या ही धर्मशील भूमी - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

 || श्रीगुरू || 





     जिथे कोणत्याही पद्धतीचे युद्ध नाही अशी अयोध्या नगरी होती. एवढेच नव्हे तर ही धर्मशील भूमी होती. सूर्यवंशातील रघुराजाने आपली सर्व संपत्ती विश्‍वजित यज्ञामध्ये दान केली होती असे सांगून अयोध्येचा राजा दशरथाचे रथ दाहीदिशांना जात होते म्हणूनच त्याचे नाव दशरथ असे ठेवले होते, असे विवेचन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
ते श्रावणमासानिमित्त भगवंत मंदिरात सुरू असलेल्या अध्यात्म रामायण या विषयावरील प्रवचनमालेत ते बोलत होते.
बोधले महाराज म्हणाले की, राजा दशरथाला कौशल्या, सुमित्रा व कैकयी या तीन राण्या होत्या. यातील कौशल्या ही कोमल मनाची होती,सुमित्रा ही सुविचारी होती तर सातत्याने कर्कश बोलणारी राणी ही कैकयी होती. दशरथ राजा हा सर्वसंपन्न असूनही त्याला पुत्रप्राप्ती नव्हती व त्याला आपल्या कुळासाठी कुलदीपक हवा होता.
या कुलदीपकाविषयी बोलताना महाराज म्हणाले की, ज्यावेळेस रात्र असते तेव्हा चंद्र हा प्रकाश देत असतो तर सकाळ झाल्यानंतर सूर्य हा प्रकाश देणारा कुलदीपक असतो. तर तिन्ही लोकामध्ये धर्माने वागणे हा दीपक असतो हा सुपुत्र जन्माला येणे हे भाग्य असते. समाजामध्ये सुपुत्र, कुपुत्र असे दोन पुत्र असतात याचा मातृवंशाबरोबरच पितृवंश व सध्याच्या समाजाचा संस्कार हे आपला मुलगा सुपुत्र की कुपुत्र हे ठरते. रावण हा कुपुत्र होता तर रावणाचा भाऊ बिभिषण हा सुपुत्र होता. याचे कारण त्याच्या जन्मामध्ये होते. रावणाची वृत्ती ही त्याची आई कैकसीची होती तर बिभिषणाची वृत्ती ही त्याचे वडील विश्रवताची होती. याउलट त्यांचा भाऊ कुंभकर्णामध्ये कोणाचेच गुण नव्हते. कुंभकर्ण हा दुर्जन होता व तो कायमस्वरुपी झोपलेला होता. असे सांगत महाराज म्हणाले की, दुर्जन माणसे ही कायम झोपलेली बरी असतात तर सज्जनाने कायम जागे रहावे लागते. अयोध्या नगरीचे धर्मकृत्यावर कायम लक्ष होते. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 

श्रीरामाचे घर म्हणजे रामायण - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले


   || श्रीगुरू ||

 'रामायण' या शब्दामध्ये 'राम : अयण' असे दोन शब्द आहेत. 'अयण' म्हणजे 'घर' म्हणून श्री प्रभू रामचंद्रांचे घर म्हणजेच 'रामायण' होय, असे ह. भ. प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी श्रावणमासानिमित्त सुरू असलेल्या प्रवचनमालेच्या दुसर्‍या दिवशीच्या निरुपणाच्या वेळी सांगितले. 

'अध्यात्म रामायण' या विषयावरील निरूपण करताना ते म्हणाले, हे 'अध्यात्म रामायण' महादेव आणि पार्वती यांच्या संवादातून निर्माण झाले आहे. पार्वतीने महादेवाला दोन प्रश्न विचारले आहेत. त्यात पहिला प्रश्न हा रामस्वरूपाविषयी आहे व दुसरा प्रश्न हा रामचरित्राविषयी आहे. श्रीराम हे जर परमात्मा असतील तर ते सीता विरहामध्ये एवढे व्याकूळ का झाले, व्याकुळता हा सामान्य जीवाचा धर्म असून, माणूस संसारात, व्यापारात, नोकरीत, शेतात व्याकूळ झाला असेल तर तेही एक सामान्य जीवच आहेत मग त्यांचे भजन का करावयाचे, हा प्रश्न पार्वतीने महादेवाला विचारला असता या प्रश्नाचे उत्तर देताना महादेवांनी जे सांगितले तेच रामायण असल्याचे बोधले महाराजांनी सांगितले.
प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी जी व्याकुळता निर्माण होते ती रामप्रभूंची लीला आहे. रामचरित्राच्या दोन पध्दतीने अभ्यास करावयाचा आहे ते म्हणजे एक अनुभवचरित्र व दुसरे लीलाचरित्र यामध्ये या लीलाच्या पाठीमागे असलेले अध्यात्म महर्षि व्यासांनी या रामायणाच्या माध्यमातून समाजासमेार मांडले असल्याचे बोधले महाराज म्हणाले.
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला 
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२ 


ह.भ.प. जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले यांच्या अमृतमय वाणीतून " अध्यात्म रामायण " भगवंत बार्शी मंदिर , बार्शी येथे

|| श्रीगुरू ||
ह.भ.प. जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले यांच्या अमृतमय वाणीतून " अध्यात्म रामायण " बार्शी येथे

भगवंत मंदिर बार्शी येथे  प्रवचनमाला सुरू
         श्रावण मासानिमित्त बाश्रीच्या भगवंत देवस्थान समिती व बोधराज भक्तमंडळातर्फे ह. भ. प. जयवंत महाराज बोधले यांच्या १३ व्या वर्षीच्या प्रवचनमालेचा शुभांरभ भगवंत मंदिरात पश्‍चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार यांच्या हस्ते गं्रथपूजनाने करण्यात आला.
या प्रवचनमालेतील पहिल्या दिवशी अध्यात्म रामायण यावर निरूपण करताना जयवंत बोधले महाराजांनी श्रावण महिन्याचे महत्त्व सांगितले. अध्यात्म रामायणात सात कांड, ६५ अध्याय, त्यात ४३९९ श्लोक असल्याचे सांगून त्याचे चिंतन होण्यासाठी हा श्रवणसुखाचा सोहळा आहे, असे ते म्हणाले.
उल्हास पवार म्हणाले, जीवनातील आसक्ती व मृत्यूचे भय घालविण्याचे सार्मथ्य अध्यात्मात असल्याने आजच्या युवा पिढीने श्रावण मासानिमित्त सुरू झालेल्या प्रवचनमालेतील धार्मिक संस्काराचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविकात विलास जगदाळे म्हणाले, भगवंत मंदिरात गेल्या १२ वर्षांपासून विविध विषयांवर माणकोजी बोधले महाराज यांचे ११ वे वंशज जयवंत महाराज यांची ही प्रवचनमाला महिनाभर सुरू असते.
याप्रसंगी ह. भ. प. जयवंत महाराज बोधले यांचा सत्कार सरपंच दादा बुडूख यांच्या हस्ते केला. त्यानंतर देगलूरकर महाराजांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२