Monday 22 February 2016

इंद्रिय - ह.भ.प. पु.श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर

।। ज्ञानेशो भगवान विष्णु ।।

मनुष्य हा इंद्रियाचा स्वामी असूनही दास होतो,ही त्याची पहिली चूक आहे.या चुकीमुऴे दुसरी पारमार्थिक चूक त्याच्याकडून होते.इंद्रियांचा दास झाल्यामुऴे सर्व जगाचा , जीवांचा स्वामी जो परमात्मा,त्याचा त्याला विसर पडतो आणि परमार्थ संपतो. माणसाचा हा स्वभाव असा आहे,की त्याला सुखाच्या काऴात परमात्म्याचे स्मरण होत नाही.पण संसारातील दु:खाला सामोरे जावे लागते,त्यावेऴी मात्र परमात्म्याची आठवण होते.कारण सर्व दु:खाचे निवारण केवऴ त्याच्या प्राप्तीनेच होते.परमात्मा सर्व जगाचा स्वामी आहे.तो जन्मदाता आहे,पालनकर्ता आहे,रक्षक आहे, म्हणूनच तो स्वामी आहे.परमात्म्यानेच सर्व जगाची निर्मिती केली आहे. निर्मिती केली, याचा अर्थ तो स्वत:च जगद्रूपाने नटला.परमात्माच जगाचे निमित्त आणि उपादान कारण आहे.श्रीज्ञानेश्वरीमध्ये स्वत: भगवान सांगतात,

बीजचि जाहले तरू ।
भांगारचि अऴंकारू ।
तैसा मज एकाच विस्तारु ।
ते हे जग ।।

परमात्माच या जगाचे पालनही करतो.म्हणजे सांभाऴणाराही तोच आहे.जगातील प्रत्येक जीवाचे तो पालनही करतो.कारण सर्व त्याची लेकरे आहेत.सर्वांच्या अंतर्यामी तो एकच परमात्मा आहे.

' ईश्वर: सर्वभूतानां ह्रद्देशेऽर्जुन तिष्ठति  ।'

असे स्वत: भगवानच सांगतात.सर्वांचा रक्षकही तोच आहे.पण असे असूनही त्या परमात्म्याला माणूस विसरतो.वास्तविक त्याचे स्मरण नित्य राहिले पाहिजे.म्हणून श्रीतुकाराम महाराजही देवाकडे हीच मागणी करतात

हेचि दान देगा देवा  ।

तुझा विसर न व्हावा  ।।

पण आपल्यावर उपकार करण्याचे विस्मरण होणे हा तर आपला स्वभाव.त्याच्याकडून हवे मात्र सगऴेच असते.त्याला कृतघ्न म्हणतात.  कृतघ्नपणा हे मोठे पातक आहे.अनेक पापांना प्रायश्चित्त आहे पण  कृतघ्नपणाला प्रायश्चित्त नाही.लक्ष्मण सुग्रीवाला म्हणतात,

गोघ्ने चैव सुरापेच चौरे भग्नव्रते तथा ।

निष्कृतिर्विहिता सद्भि:कृतघ्ने नास्ति निष्कृति: ।।

आपली दुसरी चूक  कृतघ्नपणाची.

-  ह.भ.प.श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर , पंढरपूर