Tuesday 6 September 2016

सुंदर पवईचे आराध्य दैवत ! - श्रीगणेशनगर , पवई , मुंबई - ७६

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश उत्सव , पुणे - हरिजागर

आज दगडुशेठ गणपती येथे हरीजागर चालु क्षण
सर्व वारकरीभक्त गणरायाच्या भजनी दंग
जय गणेश.
सुमारे १२०० वारकरी उपस्थित होते .

-वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

श्रीगणेशोत्सवानिम्मित व्यख्यानमाला - श्रीक्षेत्र पंढरपूर



श्रीगणेशोत्सवानिम्मित वारकरी संप्रदाय पाईक संघ आयोजित व्याख्यान माला

उदघाटक : पूज्य श्रीगुरु श्रीप्रसदमहाराज अमळनेरकर 
भाद्रपद शु. ८ शुक्रवार ०९/०९/२०१६
ह.भ.प.श्री.रामभाऊमहाराज राऊत 
विषय : संतांना अपेक्षित पुरोगामी विचार 

भाद्रपद शु. ०९ शनिवार १०/०९/२०१६
पू.श्री.संभाजीराव भिडे गुरुजी 
विषय : भगवान श्री छत्रपती श्री शिवराय व आपण 

भाद्रपद शु. १० शुक्रवार ११/०९/२०१६
परमपूज्य श्रीगुरु ह.भ.प.श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर 
विषय : 'अध्यताम'मानवी संघर्षातील तणाव दूर करते काय ?

दररोज सायं ०५.०० वाजता स्थळ : राजपूत मंगल कार्यालय , सहकार चौक , प्रदक्षणा रोड , पंढरपूर .



पूज्य कलावती आई यांचा जीवनपट उलगडणार लेख - परमपूज्य कलावती आई जयंती विशेष

।।  परमपूज्य कलावती आई ।।

परमपूज्य कलावती आईंची आज जयंती आहे त्यानिमित्त त्यांच्या चरणी कोटी-कोटी प्रणाम आणि त्यानिमित्त परमपूज्य कलावती आई यांची महती सांगणारा हा विशेष लेख ....

कुळीं कन्या पुत्र, होती जे सात्विक |
तयाचा हरिख, वाटे देवा |
पहाताती वाट, स्वर्गीचे पूर्वज|
वंशी भक्तराज, व्हावा कोणी ||
पुत्र नसलिया, कन्या तरी व्हावी |
हरीगुण गाई सर्वकाळ |
तुका म्हणे पितरे, आशिर्वाद देती |
कल्याण इच्छिती, निरंतर ||

सुसंस्कृत व सात्त्विक गुणांनी युक्त असे कल्याणपूरकरांचे घराणे. 
या घराण्यात श्रीमत् परमहंस शिवरामस्वामी या नांवाचे एक थोर सत्पुरुष होवून गेले. ते बालसंन्यासी असून गोकर्णानजिक असलेल्या बंकीकोड्ल
या गांवचे मठाधिकारी होते.स्वामींचे चुलत बंधू दोघे असून थोरल्याचे नांव शामराव व धाकट्याचे
नांव शांतमूर्ती. शामरावांना बाबुराव हे एकुलते एक. बाबुराव वयात आल्यावर त्यांचे वडील निवर्तले. शांतमूर्तींना संतती नसल्याने ते बाबुरावांना पुत्रवत मानीत. बाबुरावांचा स्वभाव अगदी साधा
मनमिळाऊ व गोड होता. बाबुरावांचे लग्न शांतमूर्तींनी केले.त्यांच्या पत्नीचे नांव सीताबाई. या पण सत्यनिष्ठ, परोपकारी,मेहनती, गुणी व पतिनिष्ठ होत्या. लग्नानंतर आठ वर्षे त्यांना संतती झाली नसल्याने इ.स. १९०७ मधील श्रावण मासात सुपुत्र प्राप्तीच्या अपेक्षेने बाबुरावांनी सहस्त्रलिंगार्चनास आरंभ केला. त्याची
समाप्ती दुर्गाष्टमीच्या दिवशी झाली. त्याच रात्री "मी तुझ्या वंशात जन्म घेणार आहे" असा देवीने बाबुरावांना दृष्टांत दिला. पुढे त्यांना लवकरच याची प्रचिती आली.

शुद्ध बीजा पोटी | फळे रसाळ गोमटी | 
या तुकारामोक्ती प्रमाणे इ.स. १९०८ मधल्या
ऋषिपंचमीच्या शुभदिवशी ब्राम्ही मुहूर्तावर या जोडप्याला एक कन्यारत्न झाले. तिचे बाराव्या दिवशी "रुक्माबाई" असे नांव ठेविले. बाबुराव लाडिकतेने तिला "बाळ" म्हणून हाक मारीत. बाळ हे बाबुरावांचे पहिलेच अपत्य असल्याने मुलगा व्हावा या त्यांच्या इच्छेला धक्काच बसला, त्यामुळे ती उभयता प्रथम नाराज झाली. पण पुढे बाळचे एकेक अलौकिक गुण जस जसे प्रगट होवू लागले तसेच तिची बुद्धिमत्ता, आहार, विहार व इतर वागणे जेव्हा सर्वांपेक्षा निराळे दिसू लागले तेव्हा मात्र देवीने दिलेल्या दृष्टांताची त्यांना सत्यता पटली आणि त्यांची पूर्वीची दृष्टी साफ बदलून गेली. त्यावर अशा बाळाला जन्म देण्याचे भाग्य आपणास लाभले याबद्दल त्यांनी देवाचे आभार मानले तसेच आत्तापर्यंत आपण केलेल्या तपश्चर्येला संतुष्ट होवून देवाने आपणास असले दुर्लभ फळ दिले.
आपण खरोखरच मोठे भाग्यवान आहोत असे त्यांना वाटले. बाबुरावांच्या घरी रोज संध्याकाळी भजनाचा परिपाठ होता. त्यामुळे लहानपणापासूनच बाळचे सहज हरिभजनाकडे चित्त वेधले होते. तिची नेहमी उदास वृत्ति होती. तिची खेळण्याची तर्हाम वेगळीच
होती. तिला राम, कृष्ण, दत्त, गणपती, मारुती या मूर्ती आवडत. कृष्णाची मूर्त तिला अत्यंत आवडे. त्यामुळे मध्यभागी कृष्णाची मूर्त ठेवून दोन्ही बाजूस इतर मूर्ती ठेवी. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच बाळ मराठी, कानडी व गुजराथी भाषेतील भजने म्हणे. तिची स्थिर
बसण्याची पद्धत, आवाजातील मधुरता आणि शांतवृत्तीने भजन म्हणण्याची पद्धत पाहून श्रोतेमंडळी तिचे कौतुक करीत. ज्या ज्या दिवशी बाबुराव बाळला समुद्रकिनार्यानवर घेवून जात त्या त्या वेळी ती एकेक पिंडी तयार करून त्यांना मुर्डेश्वर, योगेश्वर अशी नांवे
ठेवी आणि बरोबर नेलेला खावू, पिंडीला नैवेद्य दाखवून लोकांना व वडिलांना देवून आपण सेवन करी.

वयाच्या सातव्या वर्षी बाळला स्वामी पूर्णानंद यांचे दर्शन घडले.बाळचे निर्भेळ प्रेम, तैलबुद्धी, उत्साही वृत्ति, उत्कट पुण्याची हाव,शिस्तीची आवड, तपश्चर्येची चिकाटी या सर्व सद्-गुणांचे स्वामींनी
निरिक्षण केलेले असल्याने परत आपल्या गांवी जातेवेळी त्यांनी बाळला गोपाळकृष्णाची मूर्ति दिली आणि काही गार्हाणे सांगावयाचे ते याच्यापुढे सांग. हाच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करील असे सांगितले आणि बाबुरावांकडे वळून,

"ही तुमची मुलगी सामान्य नसून खास लोकोद्धारार्थच अवतरली आहे. ही वयाच्या अठरा वर्षांपर्यंतच
तुमच्यामध्ये राहील. त्यानंतर विरक्त होऊन सर्वांपासून दूर जाईल.आपल्या रसाळ वाणीने सार्यार जगाला आपलेसे करील."

असे सांगितले. तेव्हापासून श्री पूर्णानंदांकडून मिळालेला तो गोपाळकृष्ण हेच रुक्माबाईंचे सर्वस्व होऊन बसले. वयाच्या सात ते चौदा वर्षापर्यंत तिला झालेला लाभ म्हणजे गोकर्णासारख्या पवित्र क्षेत्रात वास, घरातील नियमीत भजन, वरचेवर संतांचा
सहवास, सद्-बोधश्रवण, श्रीगोपाळकृष्णाच्या मूर्तीच्या व ग्रंथांच्या रुपाने मिळालेला श्री पूर्णानंद स्वामींचा आशिर्वाद, कार्तिक -माघ - वैशाख स्नाने, सद्ग्रंथांची पारायणे व अध्ययन आणि बाबुरावांचे शुद्ध प्रेम याबद्दल थोडा विचार केला तर खास जगदोद्धाराचे कार्य करवून घेण्यासाठीच परमेश्वराने ही सर्व
पूर्वतयारी तिच्या कडून करवून घेतली होती.

ईश्वरी संकेतानुसार पंधराव्या वर्षी रुक्माबाईंचा विवाह दक्षिणअर्काटांतील कडलूर जिह्यात राहणारे पोलीस इन्स्पेक्टर श्री.राजगोपाल मल्लापूर यांचे बरोबर झाला. बाबुरावांच्या सूचने प्रमाणे वर्हातडी मंडळी गोकर्णाहून आपल्या गांवी जात असता हुबळीला
उतरुन श्रीसिद्धारूढ स्वामींच्या दर्शनार्थ गेली. त्या समयी नवदांपत्यावर स्वामींचा अनुग्रह झाला. त्या क्षणापासून रुक्माबाई हरीध्यानात अधिकच निमग्न राहू लागल्या. त्यांचे सासरचे वागणे,स्त्रियांना अत्यंत आदर्शभूत असेच होते.रुक्माबाईंना वयाच्या सतराव्या वर्षी एक मुलगा झाला आणि एकोणीसाव्या वर्षी, दुसरा मुलगा आठ महिन्याचा पोटात असताना, एकाएकी ह्रदयक्रिया बंद पडून त्यांच्या पतिदेवांचे
देहावसान झाले. या महान आपत्तीचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. पतीचे धर्मराज्य संपले. तेव्हा आता आपण जगून काहीच उपयोग नाही म्हणून हताश ह्रदयाने घराजवळच्या मैदानातील
एका विहिरीत त्या आत्महत्या करायला प्रवृत्त झाल्या. त्यासमयी तेथे एक जटाधारी पुरुष प्रगट झाले व,

"माई! थांब! थांब! आत्महत्या
करण्याकरिता तू जन्माला आली नाहीस! जीव देणार्यां्ना वाचविण्यासाठी तुझा जन्म आहे. तुझ्या हातून जगदोद्धाराचे थोर कार्य व्हावयाचे आहे. लवकर हुबळीला जा. सिद्धारूढस्वामींच्या कृपेने तू सुखरूप होशील." इतके सांगून ते अदृश्य झाले.

त्या क्षणापासून दु:खाने व्याकूळ झालेल्या रुक्माबाईंचे मन एकदम शांत झाले. घरी आल्यावर त्यांनी घरातील सर्व सामानसुमान शिपाई लोकांना व गोरगरीबांना वाटून दिले. देव, देव्हारा, पूजेची उपकरणी व त्यावर
एकशे आठ रुपये दक्षिणा ठेवून भटजींच्या स्वाधीन केले. पुढे बाबुरावांनी त्यांना गोकर्णाला बोलावून आणले. एका महिन्यानंतर त्यांना दुसरा मुलगा झाला. पुढे दोन महिन्यांनी बाबुरावांनाहि देवाज्ञा झाली. त्यामुळे रुक्माबाईंच्या मनाच्या औदासिन्यात
अधिकच भर पडली. पुढे एका महिन्यानंतर कोणालाहि न कळत एका वस्त्रानिशी त्या हुबळीला सिद्धारूढ स्वामींच्या मठाला गेल्या.

स्वामींचे जेव्हा प्रथम दर्शन घडले, तेव्हा ते रुक्माबाईंना उद्देशून म्हणाले, "आलीस! तुझीच मी वाट पहात होतो!"

पुढे स्वामींच्या आज्ञेनुसार त्या मठात राहून सेवा करू लागल्या.रुक्माबाईंची त्यावेळची तपश्चर्या खरोखरच असामान्य होती. त्यांचे नेसायचे एकच एक लुगडे होते. आंघोळीच्या आधी त्याचा अर्धा भाग
त्या धुवुन वाळवीत आणि आंघोळ केल्यावर तो भाग नेसून, दुसरा अर्धा भाग धुवून वाळवून तो त्या नेसीत असत. त्या पोत्यावर निजत आणि उशीला वीट घेत असत. त्यांच्या जीभेवर नेहमी 
"ॐ नमःशिवाय" हा मंत्र सारखा घोळत असावयाचा. आपण होऊन कोणाजवळहि त्या बोलत नसत. त्यांचे आहाराकडे तर मुळीच लक्ष नसे. यदृच्छेने कोणी केळी, पोहे इ. वस्तु आणून दिल्यास ते त्या खात.
नाहीतर नुसत्या पाण्यावर देखील आठ आठ दिवस त्या रहात असत.मात्र रोजच्या सेवेत त्या किंचितही कसूर होवू देत नसत. इतकेच नव्हे तर अत्यंत उत्साहाने पडेल ती इतर सेवाहि त्या करीत असत. त्यांनी निरभिमानपणाने व अत्यंत आपुलकीने केलेल्या सेवेने स्वामी सिद्धारूढ संतुष्ट झाले.

पुढे म्हणजे इ.सन १९२८ च्या दसर्याभच्या दिवशी,
स्वामींनी रुक्माबाईंच्यावर कृपावृष्टी करून, त्यांना "कलावतीदेवी"
हे नांव ठेविले आणि "थोडे निरुपण कर" असे सांगितले. तेव्हा स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून, "नाम संकीर्तन साधन पै सोपे"
या अभंगावर कलावतीदेवींनी अडीच तास निरुपण केले. त्यांच्या प्रासादिक वाणीतून निघालेले गोड निरुपण ऐकून सारी श्रोतेमंडळी मुग्ध होऊन गेली.
पुढे इ.सन १९२९ साली श्रावणातील पहिल्या सोमवारी, स्वामींनी देवींना जवळ बोलावून घेतले आणि, "मी लवकरच समाधी घेणार आहे.
त्यानंतर साधनाभ्यासात तू सहा महिने घालीव. त्यावर बारा वर्षेपर्यंत कीर्तनाच्या निमित्ताने गावोगांवी जाऊन हरीनामाचा व विश्वप्रेमाचा प्रसार कर. मी सदा सर्वकाळ तुझ्याजवळ आहेच. तू अगदी निर्भय रहा." असे सांगून साधनाभ्यासाबद्दल त्यांना काही
विशेष सूचना दिल्या. सात दिवसांनी म्हणजे श्रावण कृष्णप्रतिपदेला,पहाटे चार वाजता स्वामींनी महासमाधी घेतली. त्यानंतर गुरुआज्ञेनुसार देवींनी, हुबळीतच एके ठिकाणी खोली घेऊन
साधनाभ्यासास सुरुवात केली. दिवसातून फक्त एकदाच एक वाटीभर दूधभात आणि दोन वाट्या पाणी हा त्यांचा आहार होता! त्या झोपायला चटई आणि उशाला वीट घेत असत. थंड पाण्याची आंघोळ
करीत. तांब्याऐवजी मातीचा मोगा वापरीत. रॉकेलच्या डब्यात पाणी भरून ठेवीत आणि स्वामींनी सांगितलेल्या साधनाभ्यासाच्या व्यतिरिक्त राहिलेला वेळ, त्या नाम:स्मरणात घालवीत असत.
सहा महिन्यानंतर देवी महाशिवरात्रीच्या उत्सवाला मठात गेल्या.तेव्हा उत्सवाला आलेल्या रावबहाद्दूर एच. नारायणराव,प्रिन्सिपॉल, यांच्या पत्नीने त्यांना आपल्या घरी बेंगळूरला येण्याबद्दल अत्यंत आग्रह केला. ही सद्-गुरुंचीच प्रेरणा असे मानून देवी
त्यांच्याबरोबर बेंगळूरला गेल्या. तेथे प्रथम महिला मंडळात त्यांचे कीर्तन करण्याचे ठरले. त्यावेळी तेथील सेक्रेटरींनी देवींना इतर कीर्तनकाराप्रमाणे समजून, "तुमची बिदागी काय?" असा त्यांना प्रश्न केला.

तेव्हा, "तुम्ही प्रेमाने व एकचित्ताने बसून माझे बोबडे
बोल ऐकून घेणे आणि त्यात काही चुकले तर त्याबद्दल मला क्षमा करणे, हीच माझी बिदागी आहे!" 
असे त्यांनी उत्तर दिले. तेव्हापासून
अशाप्रकारे स्वाभाविकरित्या आलेली निमंत्रणे स्वीकारून त्यांचा कीर्तनार्थ गावोगांवी संचार सुरु झाला. परमेश्वर सर्वांचा मायबाप असून आम्हा लेकरांना त्याचे प्रेम संपादन करण्याचा सारखाच हक्क
आहे. अशी समतेची शिकवण त्यांच्याकडून सर्वांना दिली गेली.निसर्ग हाच माणसाचा महान गुरु आहे. त्याची सेवा करणे हाच श्रेष्ठ मानवी धर्म आहे, याची प्रचीति त्या वारंवार आणून देत असल्याने,
कलावतीदेवी या संसारी माणसांच्या संत बनल्या, यात नवल नाही.

ही त्यांची तपश्चर्या चालली असता अनेक नाट्यमय घटना प्रत्यहि घडून आल्या. पण सद्-गुरुंनी आश्वासन दिल्याप्रमाणे त्या त्या वेळीकधी प्रत्यक्षपणे सिद्धप्पा हुबळीकर, गुरूनाथ हुबळीकर अशा नांवाने
तर कधी अप्रत्यक्षपणे येऊन संकटातून मुक्त केल्याचा पदोपदी त्यांना अनुभव आला.
पुढे १९४२ साली, देवी रामनवमीच्या उत्सवानिमित्त बेळगांवला आल्या त्यावेळी गुरुकृपेने देवींची बारा वर्षाची किर्तन सेवेची तपश्चर्या पूर्ण झाली होती. त्याच सुमारास सांताक्रूझचे एम्.शिवराव यांना, बेळगांव येथे अनगोळ माळावर एखादी जागा घेऊन ती देवींना अर्पण करण्याबद्दल सिद्धारूढ महाराजांचा दृष्टांत
झाला. त्यावर ते बेळगांवला आले आणि दृष्टांताची वार्ता त्यांनी देवींपुढे निवेदन केली. तेव्हा, "तुमच्याप्रमाणे मलाहि दृष्टांत झाल्याशिवाय मी तुमचे म्हणणे मान्य करु शकत नाही" 
असे देवींनी त्यांना सांगितले. त्यावर त्याच रात्री, "शिवरावांनी देवू केलेली जागा तू घे आणि त्याठिकाणी राहून साधूमास्तरांना मी दिलेले वचन, तू पूर्ण कर" असा सिद्धारूढस्वामींनी कलावतीदेवींना दृष्टांत
दिला. त्यांनतर देवींनी स्वामींच्या आज्ञेप्रमाणे शिवरावांनी दिलेल्या देणगीचा स्वीकार केला. तत्पूर्वी किंवा तद्नंतर कित्येकवेळा कोणी शेत, मळा, घर, इस्टेट, देऊळ इ. देवू केले तरी देवींनी त्याचा स्वीकार केला नाही.

देवींनी त्या जागेत एक आश्रम बांधला. त्याचेच नांव "श्रीहरिमंदीर" होय. त्या आश्रमात देवींनी प्रथम वास्तव्य केले. बारा वर्षाच्या प्रवासात संग्रहीत केलेली संतांची पदे व अभंग एकत्र करून त्याचे परमार्थ-मार्गप्रदीप या नांवाचे पुस्तक छापविले आणि त्यात
आखल्याप्रमाणे, बाळगोपाळ व मायबहिणींना भजनाचा पाठ देण्याचे काम हाती घेतले. शेकडो भगिनींना भजन शिकवून भजनाचे महत्व पटवून दिले. जेव्हा भजनापासून अवीट अशा आनंदाचा अनुभव
येवू लागला आणि दिवसेंदिवस मनाचे समाधान वाढू लागले तेव्हा,भजन म्हणजे केवळ टाळकुटणे असून हे रिकामटेकड्यांचे काम आहे, असे ज्यांना ज्यांना वाटत होते त्या सर्वांचा गैरसमज साफ दूर झाला.
त्यावर, भजन हे संसाराच्या उद्वेगाने तापलेल्या ह्रदयाला शांत करणारे सोपे, सुगम व सर्वोत्कृष्ट असे एक साधन आहे याची त्यांना खात्री पटली.

परमपूज्य कलावतीदेवींच्याकडे दु:खनिरसनार्थ येणार्याय लोकामध्ये सर्व धर्माचे व पंथाचे लोक होते. त्यात बोहारी जमातीतील लोकांचा पण भरणा होता. हे लोक अगदि मागासलेले; आठ आठ दिवस
ते आंघोळी वाचून राहत असत. त्यांना स्वच्छता, नीटनेटकेपणा व भजनाचे महत्व पटवून दिले. 
या लोकांनीच प्रथम परमपूज्य कलावतीदेवींना "आई" या नांवाने संबोधण्यास सुरवात केली.
श्रीहरिमंदिरात हरीनामाशिवाय दुसरा विषय चालत नाही. हे श्रीहरिमंदिर म्हणजे जणु आनंदभुवनच होय. याठिकाणी कितीहि त्रासलेला अगर गांजलेला मनुष्य आला, तरी त्याच्या मनातील संसाराचा उद्वेग नाहीसा होवून तो आनंदित होऊन जातो.

परमपूज्य आईंनी रचलेली काही पदे पण आहेत. ती अतिशय गोड व प्रसादपूर्ण अशी आहेत. त्या पदांना कला, कलावंत, कलिमलहारी,कलिमलदहन, कलिमलहरण, रुक्मिणी, रखुमाईवर अशा मुद्रिका आहेत.आईंचे वर्तन इतके शुद्ध होते की त्यांना तपकीर, पान किंवा सुपारी नव्हे तर चहा कॉफीचे देखील व्यसन नव्हते. त्यांनी इ.स. १९३० पासून
१९४२ पर्यंत कीर्तनद्वारा व त्यानंतर भजनद्वारा विश्वप्रेमाचा प्रसार करण्यासाठी आपला देह चंदनाप्रमाणे अहोरात्र झिजविला.या आमच्या प्रेमयोगिनीने जनास केवळ उपदेशच केला असे नसून, तो प्रथम, प्रत्यक्ष आचरणात आणला. त्यांनी कोणीहि जिव्हाळ्याचे मनुष्य संरक्षणासाठी जवळ नसताना कसलीच भीति न बाळगता ऐन तारुण्यामध्ये वयाच्या वीसाव्या वर्षापासून बत्तीस वर्षापर्यंत निरनिराळ्या प्रांतात बस, नाव, आगबोट, आगगाडी, विमान
यामधून त्यांनी एकट्यांनीच कसा प्रवास केला असेल, हे एक हरीच जाणे! परमेश्वररूप सद्-गुरुंवर अढळ श्रद्धा ठेवणार्यांयचे तो पावलोपावली कसे रक्षण करतो, याचे "कलावती आई" हे एक चालते
बोलते उदाहरण आहेत.

परमपूज्य आईंनी ०८ फेब्रुवारी १९७८ म्हणजे माघ शुद्ध प्रतिपदेला महासमाधी घेतली. त्यांची समाधी बेळगांव मधील अनगोळ भागात श्रीहरिमंदीर या ठिकाणी आहे.

जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे ९ वे वंशज ह.भ.प.मधुसुदन मोरे महाराज (देहुकर) अनंतात विलीन !

जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे ९ वे वंशज मळोलीचे  ह.भ.प.मधुसुदन मोरे महाराज (देहुकर) मु.पो.मळोली ता.माळशिरस जि.सोलापूर वय ९२ यांचे दु:खद निधन झाले, ते देहु संस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प.श्री बापुसाहेब मोरे महाराज (देहुकर)मळोली यांचे वडील होते त्यांच्या वरती मळोली येथेच आज  सायं ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्यामागे  दोन मुले चार मुली सुना नातवांडे असा परिवार आहे.
वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र  च्या वतीने महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली !

ऋषी पंचमी निम्मित सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रमातील सहभाग !

दूरदर्शन केंद्र , वरळी प्रस्तुत आज झालेल्या सखी सह्याद्री कार्यक्रमांतर्गत ऋषी पंचमी निम्मित डॉ.आसावरी बापट यांच्यासमवेत चर्चेतील ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांचा  सहभाग ..!
धन्यवाद - श्री. शिवाजी फुलसुंदर( उपमहासंचालक,. दूरदर्शन केंद्र, मुंबई ) व मा.हर्षलजी गुर



शांतिब्रह्म पू. गुरुवर्य ह.भ.प.मारोतीमहाराज कुरेकर बाबा यांचा प्रगट दिन !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।
माय माऊली शांतीब्रम्ह गुरुवर्य कुरेकर बाबा

साधकांचे मायबाप अभिष्टचिंतन सोहळा

आज दिनी तेजाचा प्रकाश उदयास आला आणि सर्व वारकरी संप्रदाय प्रकाशांत न्हावुन नीघाले त्या तेजोमय प्रकाशाला कोटि कोटि प्रणाम..
          भक्त ऐसे जाणा जे देही ऊदास ।
          गेले आशापाश निवाराेनी ।।

गंगा आली आम्हावरी । संत पाऊले साजीरी ।।
तेथे करीन अंघोळी । ऊडे चरणरज धुळी ।।

      वारकरी संप्रदाय हा एक विशाल वटवृक्ष आहे. त्याच्या छायेत बसले असता तो आपल्याला सुख, शांती आणि उत्तम जीवनाची दिशा दाखवतो. परंतु त्याकरिता योग्य मार्गदर्शक असणे आवश्यक आहे. मग वारकरी संत हेच मार्गदर्शक झालेत आणि त्यांनी प्रत्येकाला सन्मार्ग दाखवला. समानतेची शिकवण दिली, बाटाबाट समूळ नष्ट करून सर्वांना ईश्वर तत्व एकच आहे याची जाणीव करून दिली. या महाराष्ट्रात हि भागवत धर्म पताका अखंड तेवत राहावी म्हणून स्वानंदसुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांचा अवतार झाला. सद्गुरु जोग महाराजांनी आपल्या शिष्यांच्या आग्रहावरून आळंदी देवाची येथे १९१७ साली चैत्र शु.१ या दिवशी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली.
     
      याच सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेत एक महान तपस्वी, साधकांचे मायबाप आणि संपूर्ण वारकरी सांप्रदायाचा जिव्हाळा म्हणजे सद्गुरू मारोती बाबा कुर्हेकर. गुरुवर्य बाबा हे विद्यार्थी म्हणून १९५६ साली संस्थेत बसले आणि ४ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून सद्गुरु जोग महाराज चरणीच सेवा समर्पित करावी या हेतूने अखंड संस्थेच्या विद्यार्थ्यांकरिता पूर्ण वेळ मार्गदर्शन आणि त्याचं चारित्र्य घडविण्यासाठी दिला.
     आज या वयातही गुरुवर्य बाबा हे विद्यार्थ्यांना ज्ञानदान देत आहेत. गुरुवर्य मोठे बाबा गेल्यानंतर आलेली अध्यक्ष पदाची जबाबदारी आपण स्वतः श्रेष्ठ असून न घेता केवळ ज्ञानदान हाच दृष्टीक्षेप त्यांनी बाळगला. गुरुवर्य बाबांचं जीवन म्हणजे सोज्वळ अंतकरण, प्रत्येकाशी प्रेमाने वार्तालाप आणि चेहर्यावरची अप्रतिम शांती आणि तेज. गुरुवर्य बाबांचं दर्शन घेतल्यावर जणू साक्षात माऊलीच भेटली अस वाटते.

     गुरुवर्य बाबांचं जीवन म्हणजे साक्षात नाथ महाराज आणि म्हणूनच बाबाला सर्व सांप्रदाय हे शांतीब्रम्ह म्हणून ओळखते. नेहमी बाबांची हास्यमुद्रा, साधकां बद्दलच नाही तर, कोणीही दर्शनाला आल तर त्याच्या विषयी असणारा प्रेमभाव आणि त्याची आस्थेने चौकशी करणे, काही अडचण असल्यास त्याच निराकरण करणे आणि अगदी सोप्या साध्या भाषेत हितोपदेश करून जाणे हेच गुरुवर्य बाबांचं विशेषत्व. कीर्तनात बाबा बोलायला लागले की जणू अमृताची वाणी बाहेर पडते. प्रसन्न भावमुद्रा, तेजपुंज भाव, वैराग्य आणि त्यागाची मूर्ती, आणि चेहऱ्यावर असणारी अप्रतिम शांती पाहून जणू साक्षात माऊलीच बोलत असते.
  
   गुरुवर्य बाबांचं जीवन म्हणजे अथांग शांतीचा सागर त्या सागरातील एक थेंब जरी आपल्या जीवनात आला तरी आपल जीवन आदर्शमय व्हाव अस त्यांच सामर्थ्य...
आमच्याकरिता गुरुवर्य बाबाच म्हणजे माऊली आणि गुरुवर्य बाबाच म्हणजे सद्गुरु जोग महाराज.. ऋषीपंचमीला (६ सप्टेंबर)  बाबा ८५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत..
          बाबांना उदंड आयु आरोग्य लाभो हीच माय माऊली चरणी प्रार्थना.....!

"तुमचिये दासीचा दास करुनी ठेवा ।
   आशीर्वाद द्यावा हाचि मज ।।"

- वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र