Friday 29 January 2016

खरे- खोटे जाणून खऱ्याचा स्वीकार अणि खोट्याचा त्याग याचे नाव विवेक ! - श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर


।। ज्ञानेशो भगवान विष्णु  ।।

विवेक

विवेक हा माणसाला अपेक्षित पण दुर्लभ असा गुण आहे.
माणसाचे सर्व म्हणजे सांसारिक अणि पारमार्थिक
जीवनाचा विवेक म्हणजे पाया आहे. मानवाचे लौकिक
जीवनही यावरच आधारित आहे. विवेक म्हणजे चांगल्या-
वाईटाचा निवाडा! खऱ्या-खोट्याचा निवाडा करणे
कठीण असते, व ती नित्याच्या जीवनातील आवश्यक
गोष्ट आहे.जग खऱ्याखोट्याचे मिश्रण आहे.
श्रीशंकराचार्यांनी अध्यासभाष्यामध्ये ‘सत्यानृते
मिथुनीकृत्य’ असे म्हटले आहे. खरे अणि खोटे नेहमीच
साध्या दृष्टीने कळतेच असे नाही. बऱ्याच वेळा खोटे हे
खऱ्याचे रुप घेऊन येते. त्यासाठी सामन्य दृष्टी
उपयोगाला येत नाही. तेथे विचात, ज्ञान आवश्यक असते.
सूक्ष्म दृष्टीलाच खऱ्या-खोट्याचा भेद कळतो. ती दृष्टी
म्हणजेच विवेक !तो विवेक सर्वांकडे असतोच असे नाही.
ती दृष्टी प्राप्त झाली की पुन्हा दु:खाचा प्रसंग प्राप्त
होत नाही. विवेकाने मनुष्य काम, क्रोध , लोभात अडकत
नाही. योगवसिष्ठात म्हटले आहे,न तदस्ति विमोहाय
यव्दिविक्तस्य चेतस: ।कारण खऱ्याखोट्याचे,
नित्यनित्याचे, योग्य-अयोग्य ज्ञान झाल्यानंतर
खोट्याकडे, अनित्याकडे, अयोग्याकडे मनुष्य प्रवृत्त होत
नाही. पण एवढ्यावरच विवेकाचा विचार संपत नाही.
कारण केवळ खरे-खोटे तथा अर्थाने सर्वच जाणतात. खरे-
खोटे जाणून खऱ्याचा स्वीकार अणि खोट्याचा त्याग
याचे नाव विवेक !हे सर्वांना जमत नाही. दूध पातळ असले
म्हणजे दूधात पाणी आहे हे सर्वजण ओळखतात पण दूध अणि
पाणी वेगळे करुन केवळ दूध ग्रहण मात्र फक्त राजहंसच
असतो. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलयं,
सलिली पय जैसे । एक होऊनि मिनले असे ।परी निवडुनी राजहंसे । वेगळे किजे ।।


 -  श्रीगुरू चैतन्यमहाराज देगलूरकर , पंढरपूर