Monday 30 January 2017

'आंधळीने तुला सांगितले तेच मी करीत होतो.' - श्रीमहाराज


श्री महाराजांचे दुसरे कुटुंब आईसाहेब, या जन्माधं होत्या.त्या श्वासावर नाम घेत व त्यांना अंतर्दृष्टि होती.त्यांच्या सेवेला दोन बायका असत.श्रीमहाराज हर्दा येथे गेले होते.आईसाहेब गोंदवल्यास होत्या.एके दिवशी सकाळी नऊ वाजता एक सेवेकरी बाईने आई साहेबांना विचारले ,' महाराज आता काय करीत असतील.? ' आई साहेबांनी चटकन उत्तर दिले, 'स्वारी तुझ्या मुलाला (जो त्याच्या बरोबर गेला होता ) अनुग्रह देत आहेत.' आठ-दहा दिवसानी श्रीमहाराज गोंदवल्यास परत आले.त्याच वेळी आईसाहेबांच्या माहेरचे कोणी बरेच आजारी असल्यामुळे त्या आटपाडीस गेल्या होत्या.सेवेकरी बाईने वेळात वेळ काढुन श्री महाराजांना विचारले.'महाराज ,त्या दिवशी सकाळी नऊ वाजता हर्धास आपण काय करीत होता? त्यावर किंचित हसून श्री महाराज येवढेच बोलले ,' आंधळीने जे तुला आगाऊ सांगितले तेच मी करीत होतो.'                  

-पू. महाराजांचे चरित्र अभ्यास असताना त्यातील काही अद्भुत घटना

Sunday 29 January 2017

प.पू. श्रीमहाराजांची संगीत चरित्र कथा ..!




ईश्वर आनंद देतो. सत्पुरुषाजवळ काय असते? हे समजणार नाही आज. प्रत्येक माणसाभोवती त्याची स्पंदने असतात. तुम्ही जेथे जाता तेथे आपल्या मनाची स्पंदने बरोबर घेऊन जाता. काही माणसांचे प्रेम कसे जमून जाते! आणि काही माणसांचे नाही जमत. दोघेही चांगली असतात पण नाही जमत. प्रत्येक माणसाची त्याच्या त्याच्या वासनेप्रमाणे स्पंदने असतात. सत्पुरुषाजवळ आनंदाची अनंत स्पंदने असतात. त्याच्याजवळ शक्ति असते फार! आणि म्हणूनच तो शक्तिपात करू शकतो. तर त्याच्याजवळ आनंदाची अनंत - कधी न संपणारी स्पंदने असतात. आपण जर थोडेसे सूचना ग्रहण करायला शिकलो व त्याच्याजवळ गेलो तर ती आनंदाची स्पंदने आपल्यात शिरतात व आपण जोपर्यंत त्याच्याजवळ आहोत, तोपर्यंत काही काळ तरी काहीही साधन न करता समाधानात राहतो. पवित्र स्थानाला जायचे कारण हे आहे. संतानी ईश्वराला सगुणात आणला. ईश्वर आपल्याला सेव्य झाला. नाहीतर आपल्याला तिथपर्यंत पोहोचणे शक्य नाही.

Saturday 28 January 2017

महाराष्ट्रात प्रथमच होणार बिजवडी येथे प.पू. श्रीमहाराजांची संगीत चरित्र कथा ..!

वारकरी संप्रदायचे पाईक असणारे डॉ. विजय भटकर नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्त ..!

वारकरी संप्रदायचे पाईक असणारे डॉ. विजय भटकर यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती ..!

मनपूर्वक अभिनंदन सर 😊

सरांच्या विषयी थोडं -
डॉ. विजय भटकर यांना आयटी लीडर म्हणून ओळखलं जातं.
भारताचा पहिलावहिल्या सुपर कॉम्प्यूटरचं डिझाईन भटकरांनी बनवलं आहे.
डॉ भटकर C-DAC चे संस्थापक कार्यकारी संचालक राहिले आहेत.
त्यांनी C-DAC, ER&DC, IITM-K, I2IT, ETH Research Lab, MKCL आणि India International Multiversity मध्ये भरीव योगदान दिलं आहे.
केंद्र सरकारच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे डॉ भटकर सदस्य राहिले आहेत.
महाराष्ट्र आणि गोवा सरकारच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्यपदी डॉ. भटकरांनी भरीव योगदान दिलं आहे.

- वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र
Varkariyuva.blogspot.in

Friday 27 January 2017

आत्मस्तुती - प.पू.श्रीगुरु श्रीचैतन्य महाराज देगलूरकर


माणसाच्या विद्यार्जनामध्ये आणखी एक शत्रु आहे ती म्हणजे स्तुती !
ही स्तुती माणसाला विद्यार्जनापासून दूर नेते.कारण स्तुती माणसाच्या मनात अहंकार निर्माण करते आणि अहंकार आला की विद्या येत नाही.
ही स्तुती दोन प्रकारची असते.एक आत्मस्तुती आणि दुसरी इतरांनी केलेली.काही लोकांना स्वत:चीच स्तुती स्वत: करून घेणे फार आवडते.एखादा विद्यार्थी खुप पाठांतर,अभ्यास करेल .ती चांगलीच गोष्ट आहे.त्याचा त्याच्या जीवनावर चांगला परिणाम होईल,पण आपण केलेले कष्ट,त्याला प्राप्त झालेले फऴ,याची तो स्वत:च स्तुती करू लागला तर ते योग्य नाही.माझ्याएवढी अभ्यास कोणी करत नाही,माझ्याएवढे पाठांतर कोणालाच नाही वगैरे तो स्वत:चीच स्तुती करू लागला तर ते त्याच्या पुढच्या जीवनाच्या दृष्टीने चांगले नाही.कारण त्या स्तुतीने अहंकार निर्माण होतो आणि ' आपणास सर्व कऴते ' या अहंभावाने त्याचे शिक्षण थांबते.म्हणून महाभारतामध्ये म्हंटले आहे,
आर्येण हि न वक्तव्या कदाचित्स्तुतिरात्मन: ।
आर्य मनुष्याने कधीही आत्मस्तुती करू नये आणि विद्यार्थ्याने तर मुऴीच करू नये. आणि स्तुतीचा दुसरा प्रकार म्हणजे इतरांकडून होणारी स्तुती ! पुष्कऴ वेऴा विद्यार्थ्याचे पालकच त्याची इतकी स्तुती करतात,की तो विद्यार्थी स्वत:स शहाणा समजू लागतो.आपणांस आपल्या मुलाचे कौतुक वाटणे ( जर तो हुशार असेल तर ) स्वाभाविक आहे,पण लगेच त्याची स्तुती करू नये.एखाद्या यशानंतर आपले कौतुक होते,पण विद्यार्थ्याने ती स्तुती मनावर घेऊ नये.ती गोड वाटते,पण घातक असते. ' स्तुती परविया मुखे रूचिकर । '
असे श्रीतुकाराम महाराज सांगतात.पण ती घातक असते म्हणून श्रीज्ञानेश्वर महाराजांनी ' पूज्यता डोऴा न देखावी । स्वकीर्ति कानी नायकावी ।' म्हणून उपदेश केला आहे.म्हणून दुसऱ्यांनी केलेली स्तुती हीदेखील विद्येची शत्रूच आहे.त्यामुऴे माज निर्माण होतो.श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ' तैसा माजे स्त्रिया धने। विद्या स्तुती बहुने माने ।' आणि विद्येसाठी ही स्तुती घातक आहे.स्तुतीने संकोच निर्माण व्हावा.अहंकार नव्हे ! म्हणून विद्यार्थ्याने या शत्रूपासून सावध राहावे.माणूस अनंत काऴाचा विद्यार्थी आहे !

।। रामकृष्णहरि ।।

संदर्भ - संतसंग

ह.भ.प.प.पू.श्रीगुरु श्रीचैतन्य महाराज देगलूरकर
Fb.com/chaitanyamaharajdeglurkar

गुरूबंधू म्हणजे काय ?


जन्माला येणारा प्रत्येकाला एक दिवस जावेच लागते. म्हणून जन्माला येणार्‍या व्यक्तीला जातक असे संबोधले जाते. आत्मा जन्म घेत नाही तर शरीर जन्म घेते. म्हणजे जन्माला आलेले ते शरीर केव्हा तरी मरणारच. खरी गंमत येथेच आहे. कारण  आत्मदेव तर ब्रम्हज्ञानी आहे. तरी पण देहातून मृत्यु समयी बाहेर पडलेला आत्मा पुन्हा एखाद्या गर्भातुन प्रसुत होई पर्यंत ब्रम्हज्ञानी असतो. आणि सतत चिंतन करित असतो. हे ज्ञान असून सुध्दा मी पुनरपि जन्म  पुनरपी मरणम चक्रात का अडकतो ? तरी या जन्मात मी माझ्या जवळील ज्ञानाचा उपयोग करून याच्यातून मुक्त होईल आणी ब्रम्हपदाची  प्राप्ती करून घेईल. असे विचार स्थिर होत असताना ती दिव्य प्रसुतिची वेळ समोर येते त्या आत्मदेवाला ही  मोठी संधी वाटते परंतु प्रसुति नंतर त्या जातकाच्या टाळूला मृत्यु लोकीचा वायु स्पर्श करतो आणि जवळ असलेले ज्ञान विस्मृतीत जाते. आणि जातक रडायला लागते.

आता पुन्हा शुन्यापासून जीवन प्रवास सुरू झाला. तरी पण त्याची कुंडलीनी जागृत अवस्थेत वयाच्या ८व्या वर्षपर्यंत असते.याच वेळेला किंवा येथून पूढील प्रवासासाठी
सद्गुरुंकडून मिळालेला अनुग्रह जसे मंत्रदीक्षा, स्पर्शदीक्षा, ध्यानयोगदीक्षा,  शांभवि दीक्षा हा त्या व्यक्तीचा नूतन जन्म मानला आहे. आणी  सद्गुरु म्हणजे "त्वमेव माताच पितात्वमेव" या न्यायाने आपले सद्गुरू आपले माता पिता बंधु सखा होतात आणि आपला अध्यात्मिक परिवार तयार होतो. आपल्या सद्गुरुंनी दिलेले सर्व अनुग्रहित हे आपले बंधू भगिनी होत. कारण प्रत्येकची गुरूमाउली एकच आहे आणि त्या माउलीला प्रत्येकाला बोटला धरून ब्रम्हज्ञानाच्या अवस्थेकडे आपल्या या लेकराला न्यायचे असते किंबहुना याचसाठी हे सर्व घडत असते.
गुरूबंधु म्हणजे सद्गुरुंच्या तत्वांपाशी जो आबध्द होतो किंवा सद्गुरुंच्या दर्शित मार्गामधे जो बांधला जातो म्हणजेच स्वतःला विसरून जातो आणि गुरुमय होण्याची ज्याची धडपड आहे. गुरूपरिवाराला काहितरी वेगळे देण्याची ज्याची तयारी असते. त्यांना गुरुबंधु असे एकमेकात
संबोधले जाते. बंधु किंवा भगिनी या शब्दांच्या मुळाशी परम सात्वीक भाव उत्पन्न होतात. आदरणीय विवेकानंदांनी या दोन शब्दावर शिकागो परिषद जिंकली होती म्हणून एकाच गुरूंच्या अनेक शिष्यामधे जे अदृश्य सत्व भाव भावनांचे जाळे विणले जाते सत्व वृत्तीकडे धावायला लागते त्यां नात्याला गुरुबंधु असे समजतात.

Tuesday 24 January 2017

अनाथ कोण ? - श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर

     सहसा एखाद्या व्यक्तीचे , बालकाचे माता-पीतांचे छत्र संपले कीं तो ' अनाथ ' झाला असे म्हणले जाते व ते योग्यच आहे .
  पण शास्त्रात या बद्यल अधीक विस्तृत तपशील दिलेला आहे ,
  १ ) कोणा एकाचे फक्त पीत्र छत्र हरवले व आई आहे तर त्यास शास्त्र अनाथ मानत नाही , तो सनाथच मानला जातो
  २ ) या उलट आई गेली व वडील आहेत तर मात्र तो अनाथ झाला अशी शास्त्र मान्यता आहे '
     याचे कारण आईचे स्थान सर्व श्रेष्ठ आहे व ती पीत्याची उणीव भरून काढू शकते पण तेच आईची उणीव पीता दुसरी आई आणुन भरून काढण्याने करू पाहतो !
    आपल्या मुलांच्या हिताचा कळवळा पराकोटीचा आईलाच तीच्या शेवटच्या श्वासा पर्यंत असतो !
याच साठी अनेक थोर संतांना , पूर्ण पूरूषांना देखील आई व्हावे वाटते ! माऊली, ज्ञानेश्वर माऊली , विठूमाउली असे अनेक दाखले देता येतील !
       काल शेळगांव , ता. चाकूर येथील किर्तनात श्रीगुरू मुखातून श्रवण केलेले अमृत कण !!

- श्री.सुरेशजी दिवाण सर
( सद्गुरू सेवा समिती , पंढरपूर )

अवश्य पहा - वारी निवृत्तीनाथांची साम टीव्ही वर ...!

जास्तीत जास्त शेयर करा व अवश्य पहा - वारी निवृत्तीनाथांची आपल्या साम टीव्ही मराठी वर ।।

Tuesday 17 January 2017

प.पू.श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांचे विचारधन ...!

शेठ जाधवजी जेठाभाई ट्रस्ट   यांद्वारे प्रकाशित कालदर्शिकेतील पूज्य श्रीमहाराजांचे विचार धन ..!

कालदर्शिका वैष्णव दर्शन प्रकाशन सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संपन्न !

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र निर्मित  कालदर्शिका वैष्णव दर्शन

          प्रकाशन सोहळा
प.पू. श्री.वा.ना.उत्पात शास्त्री , पंढरपुर
प.पू.श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर , पंढरपूर
प.पू. श्रीगुरु श्रीप्रमोदमहाराज जगताप , सुपे - बारामती

यांच्या हस्ते प.पू. सद्गुरू धुंडामहाराज देगलूरकर मठ , श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संपन्न ...!

- varkariyuva.blogspot.in

स्वा.सु.जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था शताब्दी महोत्सव , श्रीक्षेत्र आळंदी - २०१७

राम कृष्ण हरी ..!
केवळ संत वाड़मयाचा प्रचार व प्रसार हा उद्देश समोर ठेवुन आज पासुन १०० वर्षांपूर्वी  स्वा.सु.जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज पर्यंत या संस्थेने महाराष्ट्राला अनेक रत्न (महनीय वक्ते) दिले ज्यांच्या कीर्तन प्रवचनातुन असंख्य जीवांना आनंदाचा मार्ग मिळाला.
आज ही संस्था शताब्दी महोत्सवी वर्ष साजरा करत आहे या संस्थेचा मुख्य शताब्दीर्वष पूर्ती महोत्सव
श्री क्षेत्र आळंदी येथे भव्य प्रमाणात संपन्न होत आहे
तरि आपण या अद्भुत भव्य दिव्य नाम संकीर्तन पर्वाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावे.
प्रारंभ - दि. २२ - मार्च २०१७
सांगता - दि. २९ - मार्च २०१७  

असे असेल नियोजन -

🔸०३ एकर मधे कीर्तन/प्रवचन/भजन मंडप
🔸१०० × ८००  चा भोजन मंडप.
🔸दररोज साधारण 1 लाख  लोकांना महाप्रसाद
🔸महाराष्ट्र तथा भारतातील नामवंत वक्त्यांची कीर्तन प्रवचने

🔸दररोज १५०० टाळकर्यांच्या उपस्थितित हरिपाठ व कीर्तन    -   श्री  राम कथा     - ️  संगीत भजन

स्थळ -  वारकरी शिक्षण संस्था नवीन इमारते जवळील भव्य प्रांगण - श्रीक्षेत्र आळंदी देवाची.

- varkariyuva.blogspot.in

Saturday 14 January 2017

करा श्रीविठ्ठल स्मरण ...!

वारकरी सम्प्रदाय के विशेष अधिकारी पुरुष पू. श्री धुंडा महाराज देगलुरकर के 61 वें जन्मदिवस पर पंढरपुर में आयोजित समारोह में प्रकट उद्गार - पू. गोळवलकर गुरुजी

वारकरी सम्प्रदाय के विशेष अधिकारी पुरुष पू. श्री धुंडा महाराज देगलुरकर के 61 वें जन्मदिवस पर पंढरपुर में आयोजित समारोह में प्रकट उद्गार :-
बहुत पुरानी बात है। वारकरियों के सम्बन्ध में मेरे कुछ पूर्वाग्रह थे। ..यह झाँझ -मृदंग बजाने वाला साधारण व्यक्ति है। इससे अधिक कोई अर्थ नहीं है। मुख से भिन्न-भिन्न अभंग (छंद) वह अवश्य कहता है, परन्तु उसका वास्तविक अर्थ वह जानता नहीं। ..परन्तु मैंने (नागपुर में धुंडा महाराज का) जो प्रवचन सुना, उससे मुझे स्पष्ट अनुभव हुआ कि मेरा यह भ्रम निरर्थक है। धुंडा महाराज के उस प्रवचन में भक्ति तो थी ही, उसके अतिरिक्त अपने जीवन के भिन्न-भिन्न राजनैतिक एवं सामाजिक प्रश्नों का भी विवेचन किया गया था। 'ज्ञानेश्वरी' साहित्य की दृष्टि से मराठी भाषा का सर्वश्रेष्ठ ग्रंथ है। इसी कारण अपने सारे लोग उसका गुणगान करते हैं। श्रध्देय धुंडा महाराज भी अपनी विद्वतापूर्ण आकर्षक शैली से सतत् प्रवचन करते हुए उसी ग्रंथ को समझाते हैं। साहित्य की दृष्टि से तो वह ग्रंथ उत्तम है ही, परन्तु उसमें प्रतिपाद्य विषय के बारे में जानने की मुझे लालसा हुई। इस हेतु महान पुरुषों के पास बैठकर जो कुछ अध्ययन कर समझ सका उससे यह ध्यान में आया कि आजतक वारकरियों पर 'बुवाबाजी' अर्थात ढोंगीपन का जो आरोप करते हैं, वह निराधार है। वस्तुत: यह संप्रदाय अद्वैत सिध्दांत पर अधिष्ठित तथा अति श्रेष्ठ भक्ति द्वारा व्यक्ति को परम श्रेष्ठ सुख प्राप्त करा देने वाला है, यह मेरी अनुभूति है और उसमें अभी तक किसी प्रकार की भूल तो प्रतीत नहीं हुई, अपितु वह अधिकाधिक दृढ़ ही होती जा रही है। - श्री. माधव सदाशिव गोळवलकर ( गुरुजी ) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक

Friday 13 January 2017

मकर संक्रांत संताच्या अभंगातुन ..!

#मकर_संक्रांत
#संताच्या_अभंगातुन

सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते तो पर्वकाळ म्हणजे मकर संक्रमण अर्थात मकर संक्रांत हा सण. या दिवशी आपण एकमेकाला तिळगूळ देतो आणि म्हणतो, "तिळगूळ घ्या आणि गोड बोला." एकमेकात सौख्य, स्नेह वाढविणारा हा गोड सण.
आता तुकाराम महाराज या सणाचे वर्णन कसे करतात...

देव तिळीं आला । गोडें गोड जीव धाला ॥१॥
साधला हा पर्वकाळ । गेला अंतरीचा मळ ॥२॥
पापपुण्य गेलें । एका स्नानेंचि खुंटले ॥३॥
तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दन जनीं ॥४॥

       तिळ हे स्नेहाचे, प्रेमाचे, भक्तिचे प्रतिक मानले आहे. तो स्निग्ध आहे.
’देव तिळीं आला’ म्हणजे देव आमच्या प्रेमात आला. आमच्या भक्तिच्या अधिन झाला. याचा परिणाम काय झाला? ’गोडें गोड जीव धाला.’ यामुळे मुळचाच गोड-सुखरुप असलेला जीव देवाच्या गोडीने-सुखाने
तॄप्त झाला.
आपण गोड खातो तसे गोड बोलावेही. कारण शब्द गोड असतात तसे कटूही असतात. शब्द मॄदु असतात तसे कठीणही असतात. ज्ञानेश्वरीतील शब्द कसे आहेत - ’शब्द जैसे कल्लोळ अमॄताचे’
अमॄतासारखे गोड शब्द.
आपण असेही म्हणतो ’आजचा दिवस मोठा गोड झाला.’
किंवा असेही म्हणतो ’थोडे भांडण झाले खरे पण शेवट अखेर
गोड झाला.
देवाचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात-
गोड तुझे रुप गोड तुझे नाम ।
नामदेवराय देवाच्या नामाचे वर्णन करतात-
अमॄताहूनी गोड नाम तुझे देवा ।

अर्थात गोड म्हणजे चांगले, सुंदर, सुखकारक, आनंद देणारे.
संतांनी ’बरवा’ हा शब्दही याच अर्थाने वापरला आहे.
नामदेवरायांचा हा गोड अभंग पाहा -

नाम बरवे रुप बरवे । दरुशन बरवे कानडीयाचे ॥
नामा म्हणे तुझे अवघेची बरवे । त्याहूनी बरवे प्रेम तुझे ॥
         असा देव बरवा आहे, सुंदर आहे, गोड आहे, सुखरुप आहे, आनंदघन आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात-

सर्व सुखाचे आगर । बापरखुमादेवीवर ॥
तुकाराम महाराज तर विचारतात -
सुखरुप ऐसे दुजे कोण सांगा । माझ्या पांडुरंगावाचोनी ते ॥
परमात्मा सुखरुप आहे म्हणजेच गोड आहे. जीव हा मूळात परमात्म
स्वरुपच असल्याने गोडच आहे. जीव आणि देव मुळात भिन्न नाहितच. देवच जीवभाव धारण करुन स्वत:च भक्त झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात -

देव भक्त तूंचि झालासी दोन्ही । वाढावया सुख भक्ति हे जनीं ।
जड जीवां उद्धार व्हावया लागोनि । शरण तुका वंदीं पाउलें दोन्ही ॥
        भक्तीचा खेळ करण्यासाठी देव आणि भक्त हे काल्पनिक द्वंद्व कल्पिले. पण भक्तित अखेर देव आणि भक्त वेगळे राहत नाहित.
देव आणि भक्त । नाही दुजा विचार ॥
देव पहायला गेलेला भक्त हा देवच होतो. तुकाराम महाराज म्हणतात-
देव पहावया गेलो । तेथे देवची होवूनी ठेलो ।
अशाप्रकारे मुळच्या गोड असलेल्या जीवाला देवाची गोडी प्राप्त झाली. तो तॄप्त झाला.

      मकर संक्रांत हा पर्वकाळ म्हणजे पूण्यकाळ मानला आहे. पर्वकाळात तिर्थात स्नान करावे असा संकेत आहे. तिर्थात स्नान केल्याने पापनाश होतो असाही संकेत आहे. देव तिळी आल्याने हा पर्वकाळ साधला गेला असे        
तुकाराम महाराज पुढे वर्णन करतात.
साधला हा पर्वकाळ । गेला अंतरीचा मळ ।।
     हा पर्वकाळ साधला गेल्याने माझ्या अंत:करणातील मळ हा दोष नाहिसा झाला असे तुकाराम महाराज म्हणतात. आपल्या चित्तातील पाप वासना म्हणजेच मळ हा दोष होय. ही पाप वासना संपूर्ण नष्ट करण्याचे सामर्थ्य नामस्मरणात्मक भक्तित आहे.

ज्ञानेश्वर माऊली म्हणतात -
हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रे ॥
भक्तिमार्गात संत महात्म्यानी नाम संकीर्तनाने सर्व पाप कसे नाहिसे केले आहे याचे सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीत आले आहे ते असे -
तरी कीर्तनाचेनि नटनाचे । नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ।
जें नामचि नाहीं पापाचें । ऐसें केलें ॥
यमदमा अवकळा आणिली । तीर्थें ठायावरूनि उठविलीं ।
यमलोकींची खुंटिली । राहाटी आघवी ॥
यमु म्हणे काय यमावें । दमु म्हणे कवणातें दमावें ।
तीर्थें म्हणतीं काय खावें । दोष ओखदासि नाहीं ॥
ऐसें माझेनि नामघोषें । नाहींचि करिती विश्वाचीं दुःखें ।
अवघें जगचि महासुखें । दुमदुमित भरलें ॥
      मनातील पाप वासना पूर्ण नष्ट व्हायची असेल तर तिचे मूळाशी असलेले काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे सहा विकारही नाहिसे व्हायला हवेत. हे विकार मोठे प्रबळ आहेत.

उदाहरणार्थ- काम आणि क्रोध या प्रबळ विकारांचे वर्णन करताना माऊली म्हणतात-
हे विषय दरिचे वाघ । ज्ञाननिधीचे भुजंग ।
भजन मार्गीचे मांग । मारक जे ॥
आपआपल्या तप सामर्थ्याने भर माध्यानीचा सूर्य जो झाकू शकतो तो वेदज्ञ तपस्वी पराशर काम वासनेवर विजय मिळवू शकत नाही. ज्ञानी राजा परिक्षितीला क्रोधावर विजय मिळवता न आल्याने मॄत्यूदंडाची शिक्षा भोगावी लागते.

तुकाराम महाराज म्हणतात -
संन्यासी तापसी ब्रह्मचारी । होता दिगांबर निस्पॄही वैराग्यकारी ।
कामक्रोधें व्यापिले भारी । इच्छेकरी न सुटती ॥
या कामक्रोधादी विकारांचा नाशही नामस्मरणाने होतो.
राम म्हणता कामक्रोधांचे दहन । होय अभिमान देशधडी ॥
तुकाराम महाराजांना मंबाजीने ऊसाने बडवले तरी महाराजांना क्रोध आला नाही. महाराजांची परिक्षा पहाण्यासाठी काही कुटाळांनी एका सुंदर वेश्येला महाराजांकडे पाठविले. तीने महाराजांचे मन जिंकण्याचे
खूप प्रयत्न केले. पण तिला यश आले नाही. उलट तिला वंदन करून
महाराज म्हणाले -

जाई वो तू माये न करि सायास । आम्ही विष्णूदास तैसें नव्हे ॥
कारण तुकाराम महाराजांच्या तिळी देव आला होता.
तुका म्हणे देह भरिला विठ्ठले । कामक्रोधें केले घर रिते ॥

भक्तिगंगेतील या स्नानाचे वर्णन महाराज पुढे करतात -
पापपुण्य गेलें । एका स्नानेंचि खुंटले ॥
भक्तिगंगेतील या एकाच स्नानाने संचित पाप-पुण्ये नष्ट झाली आणि क्रियमाण पाप-पुण्ये खुंटली म्हणजे लागेनाशी झाली आहेत,
प्रारब्धाचा भोग कुणाला चुकविता येतो काय ? मग तुकाराम महाराज असे कसे म्हणतात?
प्रारब्धाचा भोग हरिकॄपेने नष्ट होतो असे एकनाथ महाराज म्हणतात.

एकाजनार्दनी भोग प्रारब्धाचा । हरिकॄपे त्याचा नाश असे ॥
भक्ती पुर्णत्वाला गेली की भक्ताला प्रारब्ध, संचित, क्रियमाण यांची काही पिडा होत नाही असे तुकाराम महाराजांनी स्पष्ट केले आहे.
प्रारब्ध क्रियमाण । भक्ता संचित नाहीं जाण ॥
आता देव अंतरी प्रकट झाल्यावर आपण स्वत: देवरुपच झाल्यावर लोकांशी आपला व्यवहार कसा राहिला आहे हे तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात...

तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दन जनीं ॥
तुकाराम महाराज म्हणतात माझी वाणी शुद्ध झाली असून "जन हे जनार्दनच आहेत" असे जाणून ती प्रेमाने गोड बोलत आहे.
नामस्मरणाने वाणी शुद्ध पवित्र पुण्यवंत होते असे तुकाराम महाराज म्हणतात.
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्वकाळ ॥
आपल्यासह सर्वत्र तो एकटा परमात्माच भरलेला आहे ही परम
अनुभुती होय. सर्व संतांना ही अनुभुती आली. ज्ञानेश्वर महाराज
म्हणतात -
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ।
नाथबाबा वर्णन करतात -
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथांचा नाथ जनार्दन ॥
तुकाराम महाराज म्हणतात -
विठ्ठल विस्तारला जनीं । सप्तही पाताळें भरुनि ।
विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मुनि मानसीं ॥
सर्वत्र परमात्मा आहे असे जाणून आपण सर्वांशी प्रेमाने वागावे
आणि प्रेमाने गोड बोलावे हीच खरी संक्रांत, हेच खरे संक्रमण होय.

- वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

varkariyuva.blogspot.in