Thursday, 17 November 2016

अखंड जयां तुझी प्रीती । मज दे बा तयांची संगति ।

#संत #श्री #ज्ञानेश्वर #महाराज #समाधी #सोहळा #कार्तिक #वारी

|| ज्ञानेशो भगवान विष्णु :||
अखंड जयां तुझी प्रीती । मज दे बा तयांची संगति ।
मग मी कमळापति तुज बा नाणीं कंटाळा ॥ १ ॥
पडून राहेन तये ठायीं । उगीच संतांचिये पायीं ।
न मागे न करी कांहीं । तुझी आण गा बिठोबा॥ २॥
तुम्ही आम्ही पीडॊं जेणें । दोन्ही वारतीं एकाने ।
बैसलों धरणें । हाका देत दाराशीं ॥ ३ ॥
तुका म्हणें या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ।
न पाहिजे केला । अवघा माझा आव्हेर ॥ ४॥
शब्दार्थ :- हे कमळापती ( लक्ष्मीपति) भगवंता , तुझ्याविषयी ज्यांच्या मनामधे प्रीती आहे , अशांची संगत मला द्यावी , मग मी आणखी कांही मागून तुम्हाला माझा कंटाळा येईल असे वागणार नाही ॥ १ ॥
मी अशा संतांच्या पायाजवळ पडून राहेन , दुसरे कांही मागणार नाही, हे तुमची शपथ घेऊन सांगतो. ॥ २॥
हे विठठला मी तुझ्याजवळ नेहमी मागत राहतो व तुला असे वागून पीडा देतो . असे करण्याने मला पण पीडाहोते व तुला पण पीडा ( त्रास) होतो. माझे वर म्हटल्याप्रमाणे जे एकच मागणे आहे ते जर तू दिलेस तर दोघांना होणारा त्रास संपेल. म्हणूनच ते मिळावे ह्यासाठी मी तुझा दाराशी धरणे देत तुला हांका मारीत आहे ॥ ३॥
तुकाराम महाराज म्हणतात ,हे विठ्ठला माझ्या ह्या बोलण्याकडे तू लक्ष दे व माझा त्याग करू नकोस॥ ४॥
अभंगाच्या अर्थस्पष्टीकरणासाठी असणारी पार्श्वभूमी :-
अध्यात्मामधे सत्संगतीला अत्यंत महत्व दिलेले आहे. ह्याचे कारण कदाचित हे असेल की अध्यात्माचे ध्येय (म्हणजे परब्रह्माशी एकरूपता साधणे, आत्मज्ञान अर्थात मोक्ष ) साधायचे असेल तर ज्याला ते साधले आहे त्याचेच मार्गदर्शन घेणे सर्वांत उत्तम होय हा विचार
आपण व्यवहारात सुद्धा अशाच कारणामुळे योग्य त्या गुरुंकडून मार्गदर्शन घेत असतो. जसे Phd साठी त्याच योग्यतेची व्यक्ती मार्गदर्शक म्हणुन लागते.
अध्यात्म शास्त्र तर अव्यक्त परब्रह्माचा शोध घेण्याचे शास्त्र आहे . त्यासाठीपण ज्याला असा शोध करणे जमले आहे तोच योग्य असणार हे सहज समजू शकते. असे आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीलाच संत म्हणतात. आत्मज्ञान होणे हे करोडो मधे एकालाच झालेले असते व अशी व्यक्ती शोधणे महाकठीण काम असते.
परंतु संतानी त्यांची वाङ्मयमूर्ती ते जरी ब्रह्मरूप होऊन गेले असले तरी आपल्यासाठी मागे ठेवली आहे. ह्याबद्दल समर्थ रामदासांच्या चरीत्रामधला प्रसंग पुष्टी देणारा आहे.
समर्थांनी समाधी घेण्याच्या आधी शिष्यांना सांगितले की
माझी काया गेली खरे, परि मी आहे जगदाकारे ॥ ऐका स्वहित उत्तरे सांगेन ती ॥
नका करू खटपट । पहा माझा ग्रंथ नीट । तेणे सायुज्याची वाट ठायी पडे ॥
आत्माराम दासबोध । माझे स्वरूप प्रसिद्ध । असता न कराव खेद । भक्तजनी ॥.
हेच बाकीच्या संतांच्या साठी पण खरेच आहे.
असे ग्रंथ वाचणे व त्यात लिहिलेले समजून त्याप्रमाणे आचरण करणे ही सत्संगतच होय.
सत्संग, सत्कर्म व स्वधर्मपालन ही बहिरंग म्हणजे देहाचे आचरंण ; ह्याबरोबरच साधना करणे, सद्वासना व सदुपासना ह्या अंतरंग साधना करण्याने अर्थात अशा जीवनपद्धतीने राहूनच आत्मज्ञान होण्यास माणूस पात्र होतो.
ह्या पार्श्वभूमीवरून अभंगाचा अर्थ स्पष्ट होतो तो पुढे लिहित आहे.
अभंगाचे अर्थस्पष्टीकरण :-
तुकाराम महाराजांना पण हे माहीत आहे की सत्संगत लाभणे कठीणच व म्हणूनच ते पहिल्याच कडव्यामधे ;भगवंताकडे हेच मागणे करताहेत की मला सत्संगत घडो. म्हणजे मग माझ्या कडून नि:ष्काम भक्ती घडेल.
येथे महाराजांनी भगवंताला कमलापती म्हणजे विष्णू संबोधले आहे. सर्व सॄष्टीचे लालन पालन करणारे विष्णुभगवानच आहेत. म्हणजेच ते अखिल विश्वाचे राजे आहेत. त्यांच्या मनाप्रमाणे च सर्व होत असते. म्हणून महाराजांनी भगवंताच्या ह्या रूपाला उद्देशून अभंगाच पहिला चरण सांगितला आहे.
साधारणत: माणसे भगवंताकडेव सुख , संपत्ती, दीर्घायुष्य, आरोग्य , व सर्व मला हवे तसेच होऊ दे हीच मागणी करत असतात. त्यासाठीच व्रतेवैकल्ये, पूजा ईत्यादी करत असतात. हे मागणे म्हणजे कल्पवृक्षाकडे कवड्या मागण्यासारखे आहे.
तसेच जर कोणी आपल्याकडे सतत कांहितरी मागत असेल तर आपण सुद्धा अशा माणसाचा कंटाळा करतो व त्याला टाळतो. खरा भक्त हे समजून असतो की भगवंताकडे असे मागंणे अयोग्य आहे.
म्हणुनच महाराज पुढे म्हणतात की मी असे मागून तुला माझा कंटाळा येईल असे करणार नाही.
अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामधे महाराज देवाकडे मागतात की मला अशा संताची भेट घडू दे मग मी त्यांच्या पायाशी आनंदाने राहीन. सत्संगतच किती महत्वाची हे येथे पुन: एकदा स्पष्ट झाले.
अशी संगत मिळाली की मी ईतर कांहीही मागण्या करणार नाही हि शपथ पण महाराजांनी घेतली आहे.
तिसऱ्या कडव्यांत व्यवहारातल्या दृष्टांताचा आहे. महाराजांची हा अभंग लिहितानाची अवस्था तीव्र मुमुक्षूची आहे. अ्सा मुमुक्षू फक्त भगवंताचीच कामना करत असतो. पण कामना अजून पूर्ण झालेली नसते. त्यामुळे ह्या भावनेनेच सर्भव भक्ती होत असते.
व्यवहारात आपण पहातच असतो की जर एखादी व्यक्ती सारखे कांही मागत असेल , पिच्छा सोडत नसेल तर अशामुळे ज्याच्याकडे मागणे केले जाते तो माणुस त्रासतो. मागणारा व देऊ शकणारा दोघांना त्रास पीडा होत असते. ही पीडा तेंव्हाच संपते जेंव्हा मागणी पूर्ण होते.
महाराजांना हे माहीत आहे व आपण भगवंतला सतत मागण्या करून त्रासच देतो आहे असे त्यांना मनापासून वाटल्याने त्वायाचे वाईट पण वाटते आहे. म्हणून ते येथे भगवंताला म्हणताहेत की देवा एकदाची माझी सत्संगतीची मागणी पुरी करा. मग आपला दोघांना होणारा त्रास संपेल.
अभंगाच्या चौथ्या कडव्यामधे भगवंताची प्रार्थनावजा जणू क्षमायाचनाच आहे. येथे महाराज म्हणतात की देवा माझे वर लिहिले ते म्हणणे ऐकावे व मला दूर लोटू नये.
अभंगाची शिकवण : -
शिकवण हीच आहे की माणसाने सत्संगत धरावी व स्वत:चे भले करून घ्यावे.
- ज्ञानदा

Varkariyuva.blogspot.in

कार्तिक वारी निम्मित - ।। ते विवेकाचे गाव ।। - प्रवचनमाला प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर

निमंत्रक -
श्रद्धेय पुरुषोत्तममहाराज पाटील
श्रीअमृतनाथ महाराज संस्थान , आळंदी दे.

अहंकार - प.पू.श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

माणसाला जे दु:ख प्राप्त होते ते अभिमानाने ! अभिमान ही एक फार विचित्र गोष्ट आहे.ती कोणा जीवाच्या ठिकाणी नाही असे नाही.प्रत्येकाच्या ठिकाणी कशाचा ना कशाचा अहंकार आहे.कोणाला रूपाचा,कोणाला सौंदर्याचा,कोणाला धनाचा,तर कोणाला ज्ञानाचा ,पण अहंकार आहे ! जीवदशा म्हटले,की अहंकार आलाच ! अहंकार म्हणजे 'मी' पणा ! हा 'मी' कोणाला ग्रासत नाही ? तत्वज्ञानातही 'अहं ब्रह्मास्मि' मध्येही 'अहं ' आहेच ! म्हणून ज्ञानस्वरूपतेमध्ये 'अहं' रहात नाही.' मी ब्रम्हस्वरूप आहे' या ज्ञानाच्या पलीकडची ही ज्ञानस्वरूपता आहे.तेथे केवऴ 'ब्रह्म' आहे. अभिमान माणसाचा घात करतो.तो जीवाला कोणीतरी वेगऴा ठेवतो.माणूस जसाजसा मोठा होत जातो,तसातसा त्याच्या ठिकाणी अहंकार वाढत जातो.श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी याबद्दलच नवल व्यक्त केले आहे.
'नवल अहंकाराची गॊठी । विशेषे न लगे अज्ञाना पाठी ।सज्ञानाचे झॊंबे कंठी । नाना संकटी नाचवी ।'
अहंकाराचे नवलच आहे.तो अज्ञानी जीवाच्या ठिकाणी विशेषत्वाने नसतो,पण ज्ञान्याच्या ठिकाणी मात्र हा अभिमान विशेषत्वाने असतो. माणूस थोडा जरी ज्ञानी असला तरी अभिमान मात्र भरपूर असतो.म्हणून ज्ञानी कोणाचा विरोध सहन करू शकत नाही.शुकाचार्यांसारखा महात्मा, पण त्यांच्या ठिकाणीही अभिमान निर्माण झालाच ! श्रीतुकाराममहाराजांनी त्याचे वर्णन केले आहे.
'जनक भेटीसी पाठविला तेणे ।अभिमान नाणे खॊटे केले ।।'
व्यासांनी शुकाचार्यांना जनकाच्या भेटीला पाठवून त्यांचा अभिमान नष्ट करविला.असा हा अभिमान सर्वांच्या ठिकाणी आहे.आपल्या सर्व कर्तृत्वावर पाणी फिरविणारा असा हा अभिमान आहे.म्हणून श्रीज्ञानेश्वर महाराजांनी
''नाना संकटी नाचवी।' किंवा ' नाचवी चहूकडे । तॊ अहंकारू गा ।'
म्हणून त्याचे वर्णन केले आहे.
महाभारतात अहंकार सर्वस्वाचा नाश करतो हे स्पष्टपणाने दाखवून दिले आहे.
जरारूपं हरति धैर्यमाशा, मृत्यू : प्राणान्धर्मचर्
यामसूया। क्रॊध: श्रियं शीलमनार्यसेवा, ह्रियं काम: सर्वमेवाभिमान:।।
वार्धक्य रूपाचा नाश करते,आशा धैर्याचा, मृत्यू प्राणाचा,मत्सर धर्माचरणाचा,क्रोध लक्ष्मीचा,दुर्जनसेवा शीलाचा,विषयसक्ती लज्जेचा आणि अभिमान सर्वस्वाचा नाश करतो.श्रीतुकाराममहाराजांनी म्हटले आहे.

'तुका म्हणे नरकी घाली अभिमान । जरी हॊय ज्ञान गर्व ताठा ।।'

।।राम कृष्ण हरी ।।

महाराष्ट्र शासनाचा “ज्ञानोबा-तुकाराम” पुरस्कार डॉ. उषा माधव देशमुख यांना प्रदान..!