Wednesday, 16 March 2016

शांतीब्रह्म श्री एकनाथमहाराज यांची गुरूपरंपरा

|| ज्ञानेशो भगवान विष्णु : ||
आपण आज पाहणार आहोत संत श्री एकनाथ महाराज यांची गुरुपरंपरा 

आदीनारायण हे एकनाथांच्या गुरुपरंपरेचं मूळ. आदीनारायण - ब्रह्मदेव- अत्रि - दत्तात्रेय- जनार्दन - एकनाथ अशी नाथांची गुरुपरंपरा होय.
आदीनारायण - जे निर्गुण निराभास असून शबलब्रह्माची उत्पत्ती ज्यापासून झाली ते आदीनारायण प्रस्तुत परंपरेचे आद्यगुरु.
नाथ म्हणतात - जो निर्गुण निराभास । जेथुनि उद्भव शबल ब्रह्मास ।
आदीनारायण म्हणती ज्यांस । तो सर्वांसी आदीगुरु

ब्रम्हदेव (विधी) - सृष्टीची उत्पत्ती करणाऱ्या ब्रह्मदेवास ब्रह्मज्ञान न झाल्यानं तो नारायणास शरण गेला. नारायणाने त्यांस उपदेश दिला.
नाथ म्हणतात - नकळे नकळे ब्रम्हज्ञान । म्हणोनि धरितसे चरण ।
नारायण परिपूर्ण । उपदेशी ब्रह्मा ॥ अ.क्र.१८९९

अत्री - दत्तात्रेयांचे पिता अत्रिऋषींना ब्रह्मदेवाकडून ते ज्ञान प्राप्त झालं.
नाथ म्हणतात - ब्रह्मा अत्रीते सांगत । ब्रह्मज्ञान हृदयी भरीत ।

दत्तात्रेय - अत्रीऋषींकडुन भगवान दत्तात्रेयांस त्या ज्ञानाची प्राप्ती झाली.
नाथ म्हणतात - ब्रह्मयाने बोध अत्रीसी पै केला ।
तो शेष लाभला दत्तात्रय ॥

जनार्दनस्वामी - जन्म फाल्गून व.६ शके १४२४ तथा इ.स. १५०२ निर्याण-फाल्गून व ६ शके १४९७ तथा इ.स.१५७५
जनार्दनस्वामी हे चाळीसगांवचे देशपांडे. ते दौलताबाद (देवगिरी) किल्ल्याचे किल्लेदार होते. मुस्लिम राजवटीत शुक्रवार हा सुट्टीचा दिवस असताना स्वामींच्या प्रभावाने गुरुवार हा सुट्टीचा दिवस म्हणून पाळत. भगवान दत्तात्रेयांनी तीन शिष्य केले, पहिला सहस्त्रार्जुन, दुसरा यदु आणि तिसरा जनार्दन.
नाथ म्हणतात - दत्तात्रेय कृपे पूर्ण । जनार्दनी पूर्ण ज्ञान ॥
जनार्दनाचा गुरु । स्वामी दत्तात्रेय दातारु ॥
दत्तात्रय कृपा । केली जनार्दनी ॥
दत्तात्रय परंपरा । सहस्त्रार्जुन यदु दुसरा ।
जनार्दन शिष्य तिसरा । केला खरा कलियुगी ॥
नाथकृत व इतर उल्लेखांवरुन, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या एकनाथी परंपरेवरुन भगवान दत्तात्रय हेच जनार्दन स्वामींचे गुरु आहेत असे सिद्ध होते.

एकनाथमहाराज - फाल्गुन वद्य ६ ह्या दिवशी नाथानां स्वामींचा अनुग्रह प्राप्त झाला. ६ वर्षे नाथांचे वास्तव्य जनार्दन स्वामींकडे दौलताबादी होते. स्वामींनी नाथानां शुलिभंजन पर्वताच्या परिसरात दत्तात्रेयांचे दर्शन घडविले.
स्वामी नाथानां उपदेश करतांना म्हणतात -
सर्वांभूती भाव नको ठेऊ दुजा । तेणे गरुडध्वजा समाधान ॥१॥
संतांसी नमन आलिया अन्नदान । यापरते कारण आणिक नाही ॥२॥
सर्वभावे वारी पंढरीची करी । आणिक व्यापारी गुंतु नको ॥३॥
म्हणे जनार्दन घेई हाचि बोध । सांडोनि सर्वदा द्वेष भेद ॥४॥

अर्थात सर्वांच्या ठिकाणी समदृष्टी ठेव. कोणी उच्च नाही व कोणी नीच नाही अशी भावना ठेवल्याने भगवंतास समाधान प्राप्त होणार आहे. संतांच्या चरणी नम्र रहा, घरी येणाऱ्या प्रत्येकास अन्नदान कर, इतर गोष्टींमध्ये न अडकता अंत:करणपुर्वक पंढरीचीवारी करीत जा, सर्वप्रकारचा द्वेषभेद यांचा तु त्याग कर हाच बोध माझ्याकडून तु घे असे जनार्दन स्वामींनीं सांगितले. नाथांनी नेटकेपणानं या उपदेशाचं पालन करुन आपल्या अनेक शिष्यांना आचरणाद्वारे उपदेशित करुन उपकृत केले. जनार्दनी कॄपेस्तव जाण। समूळ निरसले भवबधंन एकाजनार्दनी शरण। झाली संपूर्ण परंपरा ॥

शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथमहाराजांचा ४१७ वा जलसमाधी महोत्सव, श्रीक्षेत्र पैठण घर बसल्या अनुभवा फेसबुक द्वारे

#PaithanWari #SelfiWithPaithanchaWarkari #EknathShashthi या HashTag चा वापर करा.

निळाम्हणे जया घडे तेथिल वारी |
तया पुण्यासही न वर्णवे ||
कृष्णकमला तीर्थी चरण नाथांचे |
उद्धरी जगाचे कलिदोष ||

आजच आणि  आताच लिंक ला भेट द्या आणि JOIN व्हा .
https://www.facebook.com/events/532991070208748/

नियमित वाचा संत श्री एकनाथ महाराज यांच्या जीवनाशी तथा वाड्मयाशी निगडीत अनेक मार्मिक आणि अभ्यासपूर्वक लेख
विशेष सहकार्य :
ह.भ.प.योगीराजमहाराज गोसावी , पैठण
शांतीब्रह्म संत एकनाथमहाराज मिशन

आपले नम्र ,
संत एकनाथमहाराज भक्त परिवार 
Varkariyuva.blogspot.in

साध्य - श्रीगुरू ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर

 एखादे साध्य प्राप्त करून घेण्यासाठी जे नियत साधन प्राप्त झालेले असते, त्या साधनाने ते साध्य प्राप्त करून घेणेच इष्ट होय.अन्यथा त्या साधनांचा दुरूपयोग केल्यासारखे होईल.कारण ब-याच वेऴा माणूस साधनांकडून प्राप्त होणा-या क्षणिक आणि सामान्य सुखांमध्ये इतका गुंतून जातो,की मूऴ साध्याचा त्याला विसर पडतो.आपल्या इंद्रियांचेही असेच आहे. श्रीतुकाराम महाराजांनी आपणास त्याची जाणीव करून दिली आहे.
दिली इंद्रिये हात पाय कान । डोऴे मुख बोलाय वचन । जेणे तू जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ।
वास्तविक आपणांस इंद्रिये दिली ती परमार्थ करण्यासाठी, पण आपण त्यांचा उपयोग विषयांच्या उपभोगासाठी करतो.कारण त्या विषयांपासून इंद्रिये क्षणिक सुखाची प्राप्ती करून देतात श्रीज्ञानेश्वर महाराजांनी या इंद्रियांचा स्वभाव सांगताना म्हटले आहे,
या विषयावाचोनि कांही । सर्वथा आणिक रम्य नाही । ऐसा स्वभावोचि पाही । इंद्रियांचा ।।
त्या इंद्रियांना परमार्थाकडे वऴवावे लागते.तेही सोपे नाही.त्यासाठी अभ्यास,वैराग्य, वगैरेंची आवश्यकता मानली आहे.पण मुऴात आपले साध्य,आपली इंद्रिये यांचा आपण विचार केला पाहिजे.
भर्तृहरींनी नीतिशतकात हेच स्पष्ट केले आहे,
श्रोत्रं श्रुतेनैव न कुण्डलेन दानेन पाणिर्न तु कंकणेन । विभाती काय: खलु सज्जनानां परोपकारैर्न तु चंदनेन ।।
कानाची शोभा श्रवणात आहे; कुंडले घालण्यात नाही,हाताची शोभा दान करण्यात आहे ; कंकणात नाही,सज्जनांचे सर्व शरीर परोपकारासाठी आहे;भोगासाठी नाही.म्हणजे आपल्या इंद्रियांच्या कार्याची योग्य जाणीव आपणास हवी.इंद्रिये परमार्थाकडे प्रवृत्त करून परोपकार करणे हाच पुरूषार्थ आणि सज्जनतेचे लक्षणही !
***
।।राम कृष्ण हरी ।।
संदर्भ - संतसंग
© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.

स्तुती - श्रीगुरू ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर


माणसाला स्वत:चे वर्णन ऐकायला आवडते.देहभान विसरून माणूस स्वत:चे वर्णन ऐकत असतो.वर्णन करणारेही पुष्कऴ असतात.आपणांस एखाद्याकडून काही प्राप्ती होणार आहे असे कऴले,की माणूस त्यांचे वर्णन करतोच.पण त्या वर्णनात यथार्थता असतेच असे नाही.वर्णन दोन प्रकारचे असते.एक यथार्थ आणि दुसरे अयथार्थ ! यथार्थ वर्णन ज्ञानातून होते आणि अयथार्थ वर्णन गरजेतून ! वर्णन करणे हा जरी अनेकांचा स्वभाव असला,तरी ते वर्णन योग्य असेलच असे नाही.पूर्वीच्या काऴात राजेमहाराजे आपल्यासाठी स्तुतीपाठक ठेवत असत.राजाचे वर्णन करण्यासाठीच त्यांना पैसे मिऴत असत.पण ते वर्णन वस्तुस्थितीला धरून केलेले असेलच असे नाही.आजही पैसे देऊन स्वत:चे वर्णन करवून घेणारे लोक आहेतच.
वर्णणाचे मूल्य कोणाचे वर्णन केले जाते,वर्णन करणारा कोण आणि वर्णनाचा विषय यावर ठरत असते.काही तरी गुण असल्याशिवाय वर्णन होत नाही.ज्याचे वर्णन करायचे,तो खरोखरच गुणवान आहे का,याचा विचार केला पाहिजे.दुसरे वर्णन करणारा कोण आहे याचेही चिंतन केले पाहिजे.कारण एखादा भिकारी रूपया भीक देणा-याचे 'कर्णाचा अवतार' म्हणून वर्णन करतो.भिकारी एखाद्याचे वर्णन करतो याला मूल्य नाही.एखादा श्रीमंत श्रीमंताचे वर्णन करतो याला मूल्य आहे.कारण ते ओऴखून जाणीवपूर्वक केलेले वर्णन असते.आपण ज्ञानेश्वर महाराजांचे वर्णन करतो यातून त्यांचे मोठेपण सिद्ध होत नाही.नामदेवमहाराज,तुकाराममहाराज त्यांचे जे वर्णन करतात,यातून त्यांचा मोठेपणा कऴतो. म्हणून वर्णन करणारा कोण आहे हे पाहिले पाहिजे आणि तिसरे,वर्णनाचा विषय काय यावरूनही त्याचे मूल्य ठरते.सद्गुणांचे वर्णन झाले तर योग्य अन्यथा 'अमुक अमुक चोरी फार सफाईन करतात ' असे वर्णन योग्य नाही ! वर्णन सद्गुणांचे असावे. तर ते महत्वाचे ठरते.पण सध्याची स्थिती वेगऴीच आहे. वर्णनासाठी आवश्यक या तीनही गोष्टींचा विचार सध्या होत नाही.सुभाषितात गमतीने म्हटले आहे,
उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभा : ।
परस्परं प्रशंसन्ति अहॊ रूपं अहॊ ध्वनि: ।।
उंटाच्या लग्नात गाढवाने गायन केले.दोघांनी एकमेकांच्या रूपाची व आवाजाची प्रशंसा केली. उंटाचे रूप , गाढवाचा आवाज ! सध्या असेच नाही का ?
।।राम कृष्ण हरी ।।
संदर्भ - संतसंग
© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.

कार्य - श्रीगुरू ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर


माणूस डोऴ्यांसमोर काही उद्दिष्ट ठेवून एखादे कार्य हाती घेत असतो.पण प्रत्येकाचे प्रत्येक कार्य पूर्णत्वाला जाईलच असे नाही.त्यात अनेक प्रतिबंध निर्माण होतात.त्या अडचणींना तोंड देतच माणसाला पुढे जावे लागते.काही वेऴा हे प्रतिबंध इतके तीव्र स्वरूपाचे असतात, की माणसाला स्वीकारलेले काम अर्ध्यावरच सोडून द्यावे लागते.माणसाचा निश्चय आणि प्रतिबंधाची तीव्रता यावर कार्याची परिपूर्णता अवलंबून असते.म्हणजे या दोन्हीपैकी जे प्रबल असते,त्यावरून कार्य पूर्ण होते अथवा अपूर्ण राहते.माणसाचा निश्चय किती दृढ आहे यावरून कार्य पूर्णतेला जाते.जर तो निश्चय प्रतिबंधासमोर टिकला नाही तर कार्य पूर्ण होणार नाही. यावरून भर्तृहरीने माणसाचे तीन प्रकार केले आहेत.नीतिशतकामध्ये ते म्हणतात,
प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचै: ।
प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्या: ।
विघ्नै: पुन: पुनरपि प्रतिहन्यमाना:। प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति ।।
विघ्न येतील म्हणून कार्याचा प्रारंभच न करणारे कनिष्ठ प्रतीचे लोक असतात. हे विघ्नाच्या किंवा संकटाच्या भयाने कार्याकडेच प्रवृत्त होत नाही.पक्षी धान्य खातील म्हणून ते न पेरण्याचा हा वेडेपणा होय.दुसरा वर्ग मध्यम प्रतीच्या लोकांचा,की जे कार्याचा प्रारंभ करतात पण प्रतिबंध आला की खचून जातात आणि कार्य अर्ध्यावरच सोडून देतात.हे निश्चयावर न टिकणारे लोक असतात.एक वर्ग असा आहे , की वाटेल त्या अडचणी आल्या तरी ते आपले कार्य पूर्ण करतातच.कारण त्यांचा निश्चय इतका दृढ असतो, की कोणताही प्रतिबंध त्यांना अडवू शकत नाही.श्रीतुकोबाराय देवालाच सांगतात,
मजवरी घाल घण ।
परि मी न सोडी चरण ।
यातून त्यांचा निश्चय प्रगट होतो.एकदा कार्य हातात घेतले की पूर्ण करणे हा त्यांचा स्वभाव. हे उत्तम प्रतीचे लोक होत. मुद्राराक्षसातही अनेक उदाहरणे देऊन ' निर्वाहःप्रतिपन्नवस्तुषु' असे म्हटले आहे पंचतंत्रातही, 'अनारंभेहि कार्याणां प्रथम बुद्धिलक्षण '. आणि सुरू केलेले कार्य पूर्ण करणे हे दुसरे बुद्धिलक्षण म्हटले आहे.हाती घेतलेले तडीस नेणारे तेच उत्तम जन.
।।राम कृष्ण हरी ।।
संदर्भ - संतसंग
© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.

स्वार्थ - श्रीगुरू ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर


आपण ठरविलेले उद्दिष्ट प्राप्त व्हावे म्हणून प्रत्येक जण धडपडतो आहे.वाटेल ते करावे; पण आपले साधून घ्यावे , ही प्रवृत्ती वाढते आहे.सरऴ मार्गाने काम होणार नसेल तर कोणताही मार्ग आचरण्याची तयारी असते.असे वागण्यामध्ये केवऴ स्वार्थाचा विचार असतो.माणसाने एखादे कार्य करताना इतरांचाही विचार केला पाहिजे. भर्तृहरींनी नीतिशतकामध्ये याच विचाराला अनुसरून मानवी वृत्तीचे चार प्रकार केले आहेत.
एते सत्पुरूषा :परार्थघटकाः स्वार्थं परित्यज्य ये ।
सामान्यास्तु परार्थमुद्यमभृत : स्वार्थाऽविरोधेन ये ।।
तेऽमी मानवराक्षसा : परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये ।
ये तु घ्नन्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे ।।
इतरांचे भले व्हावे म्हणून जे स्वत : चाही विचार न करता धडपडतात, ते मानवी देह धारण करणारे सत्पुरूष , संत आहेत. ते जगाच्या कल्याणासाठीच अवतरलेले असतात. दुसरा वर्ग माणसातील सामान्य माणसाचा आहे. आपला स्वार्थ साधल्यानंतर ते इतरांचा विचार करतात.इतरांचे चांगले व्हावे , अशी इच्छा ते व्यक्त करतात; पण स्वत:चे चांगले साधल्यानंतर ! सध्याच्या काऴात बहुतांश लोक या वर्गात मोडणारे आहेत. ' शिवाजी महाराज जन्माला यावेत ; पण इतरांच्या घरात ! ' अशी ही वृत्ती आहे.
तिसरा वर्ग हा मानवातील राक्षसांचा आहे.म्हणजे हे मानव म्हणून जन्माला येतात; पण वृत्ती मात्र राक्षसाची असते. हे लोक स्वार्थासाठी इतरांच्या हिताचाही नाश करतात.इतरांचे काय वाटेल ते होवो; पण मला हवे ते प्राप्त झालेच पाहिजे, असा यांचा स्वभाव आहे. हे लोक स्वार्थाने अंध झालेले असतात.असेही लोक जगात कमी आहेत असे समजण्याचे कारण नाही; पण भर्तृहरींनी याच्याही पुढचा एक वर्ग सांगीतला आहे; पण त्या वर्गाला काय म्हणावे हेच कऴत नाही.या वर्गात विनाकारणच इतरांचे अकल्याण करणारे लोक असतात. स्वार्थ नसताना , आपला संबंध नसताना विनाकारणच लोकांच्या कल्याणाच्या आड उभा राहण्याचा यांचा स्वभाव असतो. यांना दुस-यांचे चांगले बघवतच नाही.या वर्गाला माणसातले कोण म्हणावे ? हे मानवी जन्माला येणे म्हणजे या जन्माचा अपमान होय ! यांना काय म्हणावे ? हे माणसांतले नाही , राक्षसांतीलही राक्षस असतात.
*****
।।राम कृष्ण हरी ।।
संदर्भ - संतसंग
© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.

कर्म - श्रीगुरू ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर


माणूस कर्माशिवाय राहू शकत नाही.त्याला कर्म करावीच लागतात.जोपर्यंत शरीर आणि प्राणसंबंध आहे, तोपर्यंत त्याला कर्म आहेतच.ते कर्म तो टाऴू शकत नाही. ' नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ' असे स्वत : भगवानच सांगतात.या श्लोकावरील भाष्यात श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
म्हणऊनि संगजव प्रकृतीचा । त्याग न घडे कर्माचा । ऐसियाहि करू म्हणती तयांचा । आग्रहोचि उरे ।।
म्हणजे कर्म हे जिवाला करावेच लागते. कर्म म्हटले की त्याचे फऴ आहे.ते कर्माला अनुसरूनच येते.जर कर्म चांगले असेल तर फऴ चांगलेच असणार.
कर्म आणि कर्म फऴाचा संबंध तोडणे शक्य नाही.
' यादृशं करूते कर्म तादृशं फलमश्नुते ।'
असे रामायणात म्हटले आहे. कर्म करावेच लागते आहे आणि त्याप्रमाणे जर फऴ मिऴतेच आहे, तर माणसाने चांगले कर्म का करू नये? शहाणा मनुष्य कृती करताना परिणामाचा विचार करून करतो.फऴ काय,त्याची आवश्यकता काय, त्याची शक्यता किती, ते योग्य का , वगैरे अनेक गोष्टींचा विचार त्याला करावा लागतो. कारण कर्म आणि कर्मफऴ यातील अंतर जसे वाढत जाते, तशी कर्मफऴाची तीव्रता वाढत जाते.म्हणूनच माणसाने असे कर्म करावे, की ज्यामुऴे त्याला समाधान होईल, कल्याण होईल.श्रीतुकाराम महाराज म्हणूनच सांगतात,
ऐसे का हो न करा कांही ।
पुढे नाही नाश ज्या ।।
असे माणसाने करावे की ज्याला पुढे नाश नाही.जे स्वत:ही नष्ट होत नाही आणि इतरही कोणी त्याला नष्ट करू शकत नाही. महाभारत म्हणते ;
यदन्येशां हितं न स्यादात्मन: कर्म पौरूषम ।
अपत्रपेत वा येन न तत्कुर्यात्कथंचन ।।
आपली जी कृती एकचशद् आहे होणार नाही किंवा जे केल्याने आपली आपल्यालाच लाज वाटेल असे वागू नये.म्हणजे स्वार्थासाठी वाट्टेल ते करू नये.उलट परोपकाराने जगण्याचे सार्थक झाले,असेच वाटले पाहिजे.थोडक्यात , त्याप्रमाणे तो नष्ट होणाराही परहिताचाही विचार आहे आणि त्याने लाजही वाटत नाही.त्याप्रमाणे तो नष्ट होणाराही नाही. म्हणून तेच करणे योग्य आहे.
।।राम कृष्ण हरी ।।
संदर्भ - संतसंग
© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.

आळस - श्रीगुरू ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर


मनुष्य हा इंद्रियांचा स्वामी असूनही दास बनतो आणि त्यामुऴे परमात्म्याला विसरतो. कृतघ्न बनतो, या दोन चुका माणसाकडून घडतात. आणि तिसरी चूक त्याच्याकडून घडते ती विषयातून बाहेर पडण्याचे आणि इंद्रियांचा स्वामी बनण्याचे सामर्थ्य त्याच्यात असूनही तो करत नाही.
या चुकीमागे सामर्थ्याची जाणीव नसणे,जाणीव असूनही त्याकडे दुर्लक्ष करणे किंवा आऴस करणे अशी कारणे सांगता येतील.
माणसाच्या ठिकाणी अनेक गोष्टी करण्याचे सामर्थ्य आहे.ते सांसारिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही क्षेत्रांत आहे. ताजमहालासारखी कलाकृती किंवा काँम्प्युटरचा शोध माणसानेच लावला.पारमार्थिक क्षेत्रात परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचे सामर्थ्य माणसाचेच आहे.पण ब-याच वेऴा आपले सामर्थ्य त्याला कऴत नाही. इसापनीतीमध्ये एक कथा आहे , एका कोल्हिणीला सिंहाचा छावा सापडला.तिने त्याला घरी आणले.आपल्या पिलांबरोबर वाढवले.त्या पिलांबरोबर वाढविल्याने तो छावा मोठा होऊनही स्वत:ला कोल्हाच समजू लागला.एकदा एका सिंहाने त्यास जाणीव करून दिली की तू कोल्हा नाहीस, सिंह आहेस. माणसालाही त्याच्या सामर्थ्याची जाणीव होऊनही त्याकडे दुर्लक्ष होते.काही वेऴा आऴसाने मनुष्य सामर्थ्य असूनही निष्क्रिय होतो. आऴसाने काहीही प्राप्त होत नाही. भर्तृहरीने म्हटले आहे,
' आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थॊ महारिपु: ।'
आऴस हा माणसाचा सर्वात मॊठा शत्रू आहे.माणसाचे सामर्थ्य आऴसाने नष्ट होते.ज्याला मोठे व्हायचे असेल त्याने सहा दोषांचा त्याग करावा असे महाभारत सांगते. ते म्हणजे फार झोप, सुस्ती,भय,क्रोध,आऴस आणि दीर्घसुत्रीपणा.
षडदॊषा: पुरूषेणेह हातव्या भूतिमिच्छता ।
निद्रा तन्द्री भयं क्रॊध आलस्यं दीर्घसूत्रता ।।
जर आपले सामर्थ्य आपण जाणत नसू तर ती आपली चूक नव्हे काय ?
।।राम कृष्ण हरी ।।
संदर्भ - संतसंग
© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.