Tuesday 28 March 2017

नांदे तया घरी दैवत पंढरीचे - श्रीविठ्ठल रुक्मिणी माता दर्शन श्रीक्षेत्र देहू

श्रीविठ्ठल दर्शन थेट श्रीक्षेत्र पंढरपूरहुन ...!

श्रीगणेश रुपात माऊलींचे दर्शन ...!

सद्गुरू श्रीजोगमहाराज यांच्या प्रतिमेचे भव्य मिरवणूक व श्रीक्षेत्र आळंदी नगर प्रदक्षिणा ....!

ना भूतो ना भविष्यती असा सोहळा ..!

ह.भ.प.वै. सीताराम महाराज जगताप (सचिव)


ह.भ.प.वै. सीताराम महाराज जगताप यांनी वारकरी शिक्षण संस्थेत १९६४ ते १९६८ या काळात संस्थेचा चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तसेच संस्थेत आजीवन राहून सेवा करण्याचा निश्चय करून त्यांनी संस्थेला आपले जीवन सर्वस्व अर्पण केले. ते दि. २९ नोव्हेंबर १९८६ ते ३० मार्च १९९५ असे ९ वर्ष ४ महिने संस्थेचे सचिव होते. संस्थेच्या त्यागपरंपरेला अनुसरून निस्पृह असे शुद्ध जीवन जगले. कोणताही स्वतंत्र असा परिग्रह त्यांनी निर्माण केला नाही. त्यांनी महाराष्ट्रभर कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून संप्रदायाची सेवा केली.
प.पू. जगताप महाराज शिस्तप्रिय, करारी स्वभावाचे होते. ते याच परिसरातील असल्यामुळे संस्थेला अडचणीच्या काळात वेगवेगळ्या माध्यमाने मदत करीत असत.जेव्हा जेव्हा संस्थेला अपप्रवृत्ती अपाय करू पहात तेव्हा ते त्यांच्या विरुद्ध निर्धाराने ठाम उभे रहात असत.त्यांनी दिनांक २५ जून २०११ च्या सर्वसाधारण सभेत भाग घेऊन अनेक विषयांवर चर्चा करून सर्वांना प्रेमाने निरोप दिला व दि.२६ जून २०११ रोजी इहलोकाचा व आपणा सर्वांचा निरोप घेऊन वैकुठवासी झाले.त्यांची स्मृती संस्थेस सदैव प्रेरणा देत राहील. त्यांची चरणी साष्टांग दंडवत.

साभार - वारकरी शिक्षण संस्था

ह.भ.प.वै. मधुकर महाराज शिंपी (सचिव)


ह.भ.प.वै. मधुकर महाराज शिंपी यांनी वारकरी शिक्षण संस्थेत १९५९ ते १९५६ या काळात संस्थेचा चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. ते दि.२० नोव्हेंबर १९८४ ते २३ नोव्हेंबर १९८६ असे दोन वर्षे संस्थेचे सचिव होते. ते शिक्षक होते. त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत.
साभार - वारकरी शिक्षण संस्था

ह.भ.प.वै. नथूसिंग डोंगरसिंग राजपूत (सचिव)


ह.भ.प.वै. नथूसिंग डोंगरसिंग राजपूत तथा नाथूबुवा हे वारकरी शिक्षण संस्थेत सन १९३९ पासून विद्यार्थी म्हणून प्रविष्ट झाले व त्यांना संस्थेत १९८५ पासून विश्वस्त म्हणून घेण्यात आले. त्यांची ग्रंथ संपदा संत तुकाराम महाराजांची सार्थ गाथा, ह.भ.प.मारुती बाबा गुरव चरित्र, मीराबाई चरित्र, कीर्तन मालिका हरिपाठ नामचिंतन अशी आहे. त्यांनी संप्रदायाच्या प्रचाराकरिता सन १९५७ पासून दौरा परंपरा सुरु केली.त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत.
साभार - वारकरी शिक्षण संस्था

ह.भ.प.वै. विठ्ठल महाराज घुले (सचिव)


ह.भ.प.वै. विठ्ठल आश्रुबा घुले महाराज यांनी वारकरी शिक्षण संस्थेत १९४७ ते १९५१ या काळात संस्थेचा चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तसेच संस्थेत आजीवन सेवा करण्याचा निश्चय करून त्यांनी संस्थेत विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून शिकविण्यास प्रारंभ केला. ते दि. ४ डिसेंबर १९८० ते २० नोव्हेंबर १९८४ असे ३ वर्ष ११ महिने संस्थेचे सचिव होते. त्यांचे जीवन सुचीर्भूत पवित्र व त्यागी होते. त्यांनी संस्थेलाच आपले सर्वस्व मानून स्वतःसाठी वेगळे असे मठ, धर्मशाळा , आश्रमाच्या रूपाने काहीही निर्माण केले नाही. ते निष्कांचन, अनिकेत आयुष्य जगले. ते ह.भ.प.वै. शांताराम गुरुजींचे पट्टशिष्य होते. ते अत्यंत स्पष्टवक्ते व अन्याय, अनाचार, भ्रष्टाचार या विरुद्ध संघर्ष करत व परिणामाची तमा न बाळगता खंबीरपणे उभे राहत असत. विद्यार्थ्यांना शिस्त लावतानाही सवंग लोकप्रियता ते टाळत. त्यांनी सन १९९३ नंतर संस्थेतील मनमानी कारभाराला आळा घालुन संबंधित व्यक्तींचे राजीनामे घेई पर्यंत त्यांचा पाठ पुरावा केला. त्यांना फडकरी वारकरी व संस्थेतील आजी माजी विद्यार्थ्यामध्ये फार मानाचे स्थान होते.
त्यांनी उठविलेल्या प्रश्नासाठी हजारो लोक त्यांच्या पाठीशी उभे राहत . ते सतत विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांबाबत व वारकरी शिक्षण संस्थेचे लोकशाही , सार्वजनिक स्वरूप टिकून राहावे म्हणून जागरूक असत. आज संस्थेचे जे सार्वजनिक स्वरूप आहे, कारभारातील पारदर्शकता, स्थावर जंगम मालमत्ता व अन्य गुणवत्ता टिकून आहे हे त्याचे श्रेय वै. विठ्ठल बाबा घुले यांनी उपेक्षा, अपमान सहन करून केलेल्या संघर्षाला आहे. अशा सत्यनिष्ठ महापुरुषाला त्यांचा आजीमाजी विद्यार्थी वर्ग कधीहि विसरू शकणार नाही. त्यांच्या योगदाना बद्दल संस्था त्यांची ऋणी आहे. त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत.

साभार - वारकरी शिक्षण संस्था

ह.भ.प.वै. नारायण हिरोजी वरोलीकर महाराज (सचिव)


ह.भ.प.वै. नारायण हिरोजी वरोलीकर महाराज तथा प.पु. नारायण मास्तर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी संस्थेत १९३९ ते १९४३ या काळात संस्थेचा चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. संस्थेत आजीवन सेवा करण्याचा निश्चय करून संस्थेत शिक्षक म्हणून विद्यार्थींना शिकविण्यास प्रारंभ केला. ते दि. ११ डिसेंबर १९४७ ते ७ डिसेंबर १९५० असे एकूण तीन वर्ष सहा महिने तसेच २९ नोव्हेंबर १९५६ ते २३ नोव्हेंबर १९६२ असे सहा वर्ष ते संस्थेचे सचिव होते. ते उत्तम कीर्तनकार, प्रवचनकार होते व त्यांनी संपूर्ण विदर्भात प्रचार केला. त्याच्या चरणी साष्टांग दंडवत.
साभार - वारकरी शिक्षण संस्था

ह.भ.प.वै. शांताराम गुरुजी (सचिव)


ह.भ.प.वै. शांताराम महादेव कामळी गुरुजी रा. मुळगाव दाभोसवाडा, वेंगुर्ला हे संस्थेत प.पू. शांताराम गुरुजी म्हणून प्रसिद्ध होते. शांताराम गुरुजींनी सन १९३० ते १९३४ संस्थेतील चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला व आजीवन आळंदी क्षेत्री वारकरी शिक्षण संस्थेत राहून ज्ञानदानाचे कार्य केले.ते दि. १६ जून १९४४ ते ८ जून १९४७ पर्यंत तीन वर्षे संस्थेचे सचिव होते. प्रत्येक चातुर्मासात सत्संगासाठी पंढरपूर क्षेत्री रहात असत आणि या अतिरिक्त वेळेत ते संस्थेत अध्यापनाचे कार्य करीत.ते विद्यार्थ्यांचे प्रिय गुरुजी होते म्हणून त्यांना शांताराम गुरुजी असे म्हंटले जात असे त्यांनी संस्थेत ३२ वर्ष अध्यापनाचे कार्य केले. ते परमपूज्य मारुती बाबांचे प्रिय शिष्य होते. ते उत्तम कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्धी होते. त्यांनी १९६६ साली भूवैकुंठ पंढरपूर क्षेत्री परीनिर्वाण प्राप्त केले. यांच्या चरणी साष्टांग दंडवत

साभार - वारकरी शिक्षण संस्था

ह.भ.प.वै.मारोती विठोबा गुरव तथा गुरुवर्य मारोतीबाबा गुरव (सचिव)


प.पू.वै. मारोती बाबा गुरव हे जोग महाराजांच्या चार शिष्यांपैकी एक होते.ते वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य होते. ते २ फेब्रुवारी १९२३ ते ८ जुलै १९४३ असे एकूण २० वर्ष ५ महिने सचिव होते. त्याच बरोबर आजीवन शिक्षकही होते.त्यांनी आपल्या गुरुपदाचा निर्वाह करताना (निभवताना) " शिष्याची जो न घे सेवा | मानी देवा सारिखे || " या संत तुकोबारायांच्या वचनाला अनुसरून शिष्यांकडून सेवा न घेता शिष्य निवासाच्या पायरीची पूजा ते करायचे.
प.पू.वै. मारोती बाबा आपल्या शास्त्र अध्ययन जिज्ञासेपोटी अनेक ठिकाणी गेले असता त्यांना वैदिक, दार्शनिक, पुराणिक व हरिदासांकडून उपेक्षा व वंचना मिळाली .
स्मार्त सनातन धर्ममतानुसार देववाणी संस्कृत भाषा व श्रुती स्मृती पुराणोक्त धर्मग्रंथ अध्यायनाचा व अध्यापनाचा अधिकार सर्वांना नाही हे त्यांना अनुभवावे लागले. त्यानंतर काही वारकरी नसलेले पण वारकरी संत तत्वज्ञानाचे विवेचन, प्रवचन, प्रकाशन करणारे भेटले पण ते आपले स्मार्त दार्शनिक मत वारकरी लोकांच्या गळीं उतरविण्यासाठी संतवचनांना तोडूनमोडून शिकवयाचे हे शुद्ध अंतकरणाच्या निष्ठावान वारकरी परमपूज्य मारुती बाबांच्या लक्षात आले. त्यावेळी संतांच्या ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, संत तुकाराम महाराजांची गाथा, ही वारकरी प्रस्थानत्रयी गौण असून वेदांत दर्शनाचे हिंदी गाईड्स, विचारसागर इत्यादी पुस्तके हे वारकरी प्रस्थानत्रयी पेक्षा कसे अभ्यसनीय आहेत असा चाललेला प्रचार मारुती बाबांना दु:खी करत होता. परमपूज्य मारुती बाबांच्या योग्य गुरूच्या शोधात असताना माउलीच्या कृपेने त्यांना जोग महाराजांच्या रूपाने योग्य सद्गुरूची प्राप्ती झाली. जोग महाराज म्हणजे वारकरी संत संप्रदायाचे शुद्ध मूर्तिमंत स्वरूप होते. त्यांनी पुढेही आपला स्वतंत्र जोग संप्रदाय सुरु न करता ते स्वतःला वारकरी संतांचा अंकित मानत. हीच ज्ञानोबा तुकोबारायांची परंपरा समाजात सर्वत्र प्रचारित व्हावी. सगुण प्रेमभक्ती, भजन,कीर्तन, प्रवचन, संतप्रस्थानत्रयी पारायण, नामसप्ताह, दिंडीने पायी वारी इत्यादि वैष्णव परंपरा सहजपणे लोकांना अंगीकारता याव्यात यासाठी एक संस्था असावी म्हणून परमपूज्य मारुती बाबांनी आपले दैवत ज्ञानेश्वर माउली व सद्गुरू जोग महाराज यांच्या चरणी हट्ट धारला व तो वारकरी शिक्षण संस्थेच्या रूपाने पूर्णही झाला अशा परमश्रेष्ठ वारकरी वैष्णवाच्या चरणी "ठेविता हा पायी जीवी थोडा " हेच खरे आहे. आज जो महाराष्ट्राच्या सर्व थरांमध्ये भजन कीर्तन, प्रवचनाचा प्रसार दिसून येत आहे त्या पाठीमागे परमपूज्य मारुती बाबासारख्या भगीरथाचे प्रयत्न समाज कधीही विसरणार नाही. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

साभार - वारकरी शिक्षण संस्था

ह.भ.प.वै. पांडुरंग ज्ञानेश्वर कुलकर्णी तथा पांडुरंग शास्त्री शर्मा चऱ्होलीकर (सचिव)

वेदशास्त्रसंपन्न पांडुरंग शर्मा यांचा संस्थेच्या स्थापने मध्ये सिंहाचावाटा होता. हे संस्थेचे दि. २४ मार्च १९१७ ते दि. २ फेब्रुवारी १९२३ असे पाच वर्षे अकरा महिने संस्थेचे पहिले संस्थापक सचिव होते. पूर्वी संस्थेत एकाचवेळी दोन सचिव असत त्यात एक कार्यालयीन सचिव व दुसरा कार्यालयबाह्य लोकसंपर्क इत्यादी कार्यसचिव याच प्रमाणे संस्थेत एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष व एक खजिनदार असे सहा पदाधिकारी व पाच सभासद असे अकरा लोकांचे कार्यकारी मंडळ असे. विशेष सभेच्या आजीव सभासदानाही संख्येची मर्यादा नव्हती. अशा संस्थेच्या प्रथम घटनेच्या रचनेमध्ये पांडुरंग शास्त्री शर्मा यांची मुख्य भूमिका होती. परंतु ३१ ऑक्टोबर १९५२ साली झालेल्या घटना दुरुस्ती नुसार एक अध्यक्ष, एक सचिव व पाच विश्वस्त अशा सात लोकांच्या कार्यकारी मंडळाची रचना मंजूर करण्यात आली. या संकोचित घटनादुरुस्तीमुळे संस्थेच्या कार्याविस्तारावर व दैनंदिन कारभाराच्या पारदर्शकतेवर विपरीत परिणाम झाला तो सर्व विदित आहे.
वेदशास्त्रसंपन्न पांडुरंग शास्त्री कुलकर्णी, चऱ्होली बु. पुणे, हे वाराणसी येथे शास्त्राध्यन करून वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षक ,श्री सद्गुरू जोगमहाराज यांचे साक्षात अनुग्रहित, आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष ,श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष , जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य, लेजीस्लेतीव कौसील मुंबईचे सदस्य, सर्वशास्त्र पारंगत, चिद्विलासवादाचे विशुद्ध प्रतिपादक, चांगदेव पासष्टीवर स्वानंदजीवन नामक शास्त्रशुद्ध चिद्विलासवादाचे लेखक, प्रतिभासंपन्न संशोधक, विचारवंत प्रकांड विद्वान होते. आणि त्यांचे गुरुनिष्ठनिर्मल जीवन सदैव प्रेरणादायी होते व आहे.

साभार - वारकरी शिक्षण संस्था

ह.भ.प.श्री.मारुती लहानू कुरेकर तथा शान्तिब्रम्ह मारुतीबाबा


परमपूज्य मारुतीबाबा हे विद्यार्थी म्हणून सन १९५६ ला संस्थेत दाखल झाले व संस्थेतील अभ्यासक्रम १९६० पूर्ण केल्या नंतर मोठेबाबा प्रमाणेच आजीवन संस्थेची व संप्रदायाची सेवा करावयाची या निश्चयाने त्यांनी संस्थेलाच आपले सर्वस्व मानून “न मांडी स्वतंत्र फड | अंगी आता येईल वाड || या संस्थेच्या नियमा प्रमाणे राहून शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकविण्यास प्रारंभ केलेला आहे व तो आज पावेतो गेल्या अर्धशतकापासून ते ज्ञानदानाचे संस्थेत करत आहे. ते संस्थेचे दि. ४ डिसेंबर १९८० ते २० नोव्हेंबर १९८४ असे ३ वर्ष ११ महिने सचिव होते. मोठेबाबांच्या वैकुठ गमनानंतर मोठेबाबांच्या अंतिम इच्छे नुसार आपली वैराग्य वृत्ती व स्वभावाला मुरड घालून संस्थेच्या हिता करिता अध्यक्ष पदाच्या उर्वरित काळासाठी दि. १ जानेवारी २०११ ते दि. २७ मार्च २०११ पर्यंत ३ महिने अध्यक्ष झाले होते , परंतु आपल्या शांत साधनेला व ज्ञानदानाला बाधा येऊ नये याचा विचार करून ह.भ.प.श्री. केशव महाराज उखळीकर महाराज यांना पुढील त्रैवार्षिक काळासाठी अध्यक्षपदी नियुक्तीबाबत संकेत देवून कार्यकारी मंडळ कार्यरत केले व आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिले. आजही विश्वस्थ मंडळ, संस्थेचे हितचिंतक वर्ग, आजीमाजी विद्यार्थी नव्हे नव्हे तर संपूर्ण संप्रदायच बाबांचे गुरुपद अध्यक्ष पदा पेक्षाही श्रेष्ठ मानतात. आज बाबांच्याच छत्रछायेखाली संस्था कार्यरत आहे. अशीच त्यांची छत्रछाया लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत.

साभार - वारकरी शिक्षण संस्था 

ह.भ.प.वै. विठ्ठल भावडू चौधरी तथा मोठे बाबा

ह.भ.प.वै. विठ्ठल भावडू चौधरी तथा मोठे बाबा हे ८ जून १९४४ ते ७ डिसेंबर १९५० ( ३ वर्ष) ६ महिने व ७ डिसेंबर १९५०ते २९ नोव्हेबर १९५६ (६ वर्ष) व २३ नोव्हेबर १९६२ ते ४ डिसेंबर १९८० (१८ वर्ष ) असे सचिव होते व ४ डिसेंबर १९८० ते २३ डिसेंबर २०१०. असे (३० वर्ष १९ दिवस ) संस्थेचे अध्यक्ष होते. मोठे बाबा १९३५ साली संस्थेत विद्यार्थी म्हणून दाखल झाले. संस्थेतील अभ्यासक्रम १९३९ पूर्ण केल्या नंतर आजीवन संस्थेची व सांप्रदायाची सेवा करावयाची या निश्चयाने त्यांनी संस्थेलाच आपले सर्वस्व मानून " न मांडी स्वतंत्र फड | अंगी आता येईल वाड || या संस्थेच्या नियमा प्रमाणे राहून शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकविण्यास प्रारंभ केला. मोठे बाबा हे क्रमशः संशेचेच विद्यार्थी , शिक्षक , सचिव व विद्यार्थ्यातून झालेले पहिले अध्यक्ष होते. प.पु. मोठे बाबांचे जीवन साध्कांसाठी आदर्श होते. ८ × ८ च्या खोलीत खाली फरशीवर सतरंजी अंथरून झोपत असत. सार्वजनिक शौचालय व स्नानगृहाचा वापर करत.सर्वांसाठी केलेल्या जेवणाच्या पंगतीतच जेवत असत. त्यांनी कधीही स्वतंत्र आचारी ठेवून जेवण्याची स्वतंत्र भोजन व्यवस्था केली नाही. ते वयाच्या ८५ व्या वर्षा पर्यंत महारष्ट्रभर एस.टी. ने प्रवास करत व आपल्या कार्यक्रमातून मिळालेलं धनद्रव्य संस्थेच्या कामी आणत. त्यांनी स्वतःसाठी कोठेही एक चौ.फुट जागा विकत घेतली नाही. किंवा आश्रम मठ धर्माशाळेच्या नावाने इमारत बांधली नाही. त्यांचे जीवन अत्यंत असंग्रही होते.
परमपूज्य मोठे बाबांच्या कार्यकाळात चाकण रोड वरील स.न.२२२ मध्ये १५००० चौ फुटाची अत्यंत सुंदर सर्व सुविधा संपन्न अशी इमारत बांधली. या कामी बाबांची योजकता दिसून येते. भविष्याचा वेध घेत बाबांनी संस्थेसाठी सर्व सुविधा संपन्न अशी इमारत बांधली आज त्याच नवीन इमारतीतच संस्थेचे सर्व शैक्षणिक कार्य चालू आहे.
परमपूज्य मोठे बाबा प्रसिद्धीपासून दूर होते. त्यांचे जीवन स्वच्छ व पवित्र होते. ते स्वभावता " संतुष्ट: सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः " असे होते.त्यांचा शिष्य परिवार महारष्ट्रभर पसरलेला आहे.त्यांनी संस्थेकरिता घेतलेले कष्ट, हे त्यांच्या साधू वृत्तीचे भूषण होते. अशा या संतचरणी साष्टांग दंडवत.


साभार - वारकरी शिक्षण संस्था

ह.भ.प.वै. स.के.नेऊरगावकर


ह.भ.प.वै. सदाशिव केशव नेऊरगावकर तथा रावसाहेब हे उच्चविद्याविभूषितब स्थापत्य अभियंता (सिव्हील इंजिनीअर)होते. त्यांनी पुणे महानगर पालिकेचे प्रथम नगर अभियंता पदावर १९३१ ते १९६० साला पर्यंत काम केले. ते संत तत्वज्ञानाचे व धर्म ग्रंथाचे उत्तम अभ्यासक होते. त्यांनी चाळीस वर्ष कीर्तन प्रवचने करून धर्म प्रसार केला. ते शुद्ध एकादशीला पंढरपूर व वद्य एकादशीला आळंदीची वारी करीत ते प.पु. मामासाहेब दांडेकरांचे अनुग्रहित होते. ते सन १९५३ पासून संस्थेचे विश्वस्त होते. ते ४ सप्टेंबर १९६८ ते ३१ मे १९७८ म्हणजेच ९ वर्ष दहा महिने या कालावधीत संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या विद्वत्तेचा व शुद्ध आचरणाचा ठसा वारकरी संप्रदाय व विद्यार्थी वर्गावर उमटविला होता. त्यांची ग्रंथ संपदा आळंदी दर्शन, पालखी सोहळा, ज्ञानेश्वर महाराज चरित्र , श्रीसार्थ तुकाराम गाथा, ह.भ.प.वै मामासाहेब दांडेकर यांची प्रवचने , सार्थ दासबोध, सार्थ करुणाष्टके हि आहेत. वारकरी शिक्षण संस्थेबरोबरच ते पुणे नगर वाचन मंदिर ,चिंचवड देवस्थान, श्रीनिवडूंगा विठोबा मंदिर, नारद मंदिर, रामकृष्ण आश्रम, श्री देवदेवेश्वर पर्वती संस्थान, आनादाश्रम, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी अशा थोर प्रकांड विद्वान कृतार्थ जीवनास साष्टांग दंडवत .

साभार - वारकरी शिक्षण संस्था

ह.भ.प.वै.मामासाहेब दांडेकर


ह.भ.प.वै.शंकर वामन तथा मामासाहेब दांडेकर हे जोग महाराजांचे अतिशय प्रिय शिष्य होते. ते वारकरी शिक्षण संस्थेचे २५ मार्च १९१७ ते २ फेब्रुवारी १९२३ असे ५ वर्ष ११ महिने संस्थापक सचिव होते. ५ जुलै १९५२ ते ९ जुलै १९६८ असे सोळा वर्ष अध्यक्ष होते. ह.भ.प.वै. शंकर वामन तथा मामासाहेब दांडेकर हे जोग महाराजांच्या चार पट्टशिष्यापैकी सर्वात लहान म्हणजेच संस्थेच्या स्थापनेच्या वेळी ते केवळ २० वर्ष ११ महिने वयाचे होते. ते उच्च विद्या विभूषित होते. त्यांनी तत्वज्ञानाचे आदर्श प्राध्यापक व महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नाव लौकिक प्राप्त केला होता. व पुढे वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू म्हणून सर्वत्र पूज्य भावनेने त्यांना समाजाने पूजले. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाने उच्च विध्याविभूषित उच्चभ्रू समाज वारकरी सांप्रदायाकडे आकृष्ट झाला. त्यांनी वारकरी संत तत्वज्ञान प्रसारार्थ अनेक पुस्तके लिहिली. विशेष म्हणजे त्यांनी संपादित केलेली विद्वत्तापूर्ण संशोधनात्मक,प्रस्तावनेसह सार्थ ज्ञानेश्वरी संप्रदायात सर्वमान्य आहे. हे अतुलनीय व्यक्तिमत्व वारकरी शिक्षण संस्थेला लाभल्यामुळे वारकरी शिक्षण संस्थेने अनेक डॉक्टर, वकील, प्राध्यापक,इंजिनिअर, कीर्तनकार निर्माण केले. ह.भ.प.वै. मामासाहेब दांडेकर यांच्या शिस्तबध्द त्यागमय जीवनाचा पुण्यप्रभावाच आजही संस्थेचे मार्गदर्शन करीत आहे. अशा परमपूज्य संताच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

ह.भ.प.वै.लक्ष्मणबुवा इगतपूरीकर


ह.भ.प.वै.लक्ष्मण केरोजी खेमनर तथा लक्ष्मणबुवा इगतपूरीकर हे संस्थेचे २ फेब्रुवारी १९२३ ते १४ जुन १९४४ पर्यंत उपाध्यक्ष होते. ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज यांनी संस्थेला स्थैर्य मिळावे म्हणून महाराष्ट्रभर फिरून संस्थेसाठी निधी व विद्यार्थी गोळा केले. परंतु ह.भ.प.वै.लक्ष्मणबुवा इगतपूरीकर यांनी संस्थेत राहून विद्यार्थी घडविण्याचे व दैनंदिन व्यवस्थेचे काम पाहिले हे दोन्ही स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचे पट्टशिष्य अभिन्न मनाने आपल्या गुरूंनी सोपविलेले कार्य पार पाडत होते. ते अतिशय विरक्त ज्ञानी वारकरी होते.त्यांच्या संत संगतीने अनेक साधक आपले जीवन सार्थक करून गेले.त्यांच्या पुण्यप्रभावाने प्रभावित झालेले तत्कालीन विद्यार्थीवर्ग महाराष्ट्रभर दिसून येत आहे. अशा या संतांच्या चरणी साष्टांग दंडवत.
साभार - वारकरी शिक्षण संस्था

ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज



स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांच्या वैकुंठ गमना नंतर त्यांचे शिष्य ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज हे वारकरी शिक्षण संस्थाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांनी अध्यक्ष म्हणून संस्थेचा कारभार १८ फेब्रुवारी १९२० ते १२ मे १९४४ पर्यंत म्हणजेच २४ वर्ष ३ महिने पाहिला. त्यांचाच दोन तपाच्या (२४ वर्षच्या) काळात वारकरी शिक्षण संस्था घासवाले धर्मशाळेतून संस्थेने विकत घेतलेल्या मालकीच्या जुन्या घरात सुरू झाली. ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज यांनी संस्थेला स्थैर्य मिळावे म्हणून आर्थिक वर्गणी, दान मिळतील तेथे शेतजमिनी व घरे मिळवून संस्थेला स्थैर्य प्राप्त करून दिले. याचबरोबर महाराष्ट्रभर पायपीट करुन वारकरी परंपरेचे भजन कीर्तन, नामसप्ताह सुरु केले. सर्वसामान्य कुटुंबातील खेड्यापाड्यातील मुलांना आळंदी येथे आणून त्यांना वारकरी संस्काराने सुसंस्कृत करून अभ्यासू साधक उत्तम कीर्तनकार, प्रवचनकार, गायकवादक बनविले व आपल्या शिष्यांच्या माध्यमातून दुरावस्था झालेल्या मठ मंदिरांचा जीर्णोद्धार घडवून आणला आणि त्यांचे व्यावस्थापन व्यवस्थित चालावे म्हणून आपल्या योग्य शिष्यांची नेमणूक त्या ठिकाणी केली व महाराष्ट्राच्या परमार्थिक विश्वामध्ये नवचैतन्य निर्माण केले.
ज्या कुटुंबात, गावात किंवा समाजात वारकरी संस्कार नव्हते अशा ठिकाणी अतिशय कष्ट व सायासाने त्यांनी वारकरी सांप्रदाय रुझविला. वर्तमान कीर्तन पद्धती, प्रवचन पद्धती,भजन गायन पद्धती पुनर्स्थापित करण्याचे श्रेय ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज यांनाच आहे. त्यांनी आपली मोठी शिष्य परंपरा महाराष्ट्रात निर्माण केली.आज त्या शिष्य परंपरेने संपूर्ण मराठी विश्व संप्रदायाच्या संस्काराने पुनीत केले आहे. अशा ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

- साभार - वारकरी शिक्षण संस्था 

स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज

वारकरी संप्रदायात आळंदीपंढरीची काया वाचा मने जिव्हे सर्वस्वे उदार होऊन निस्सीम भक्तिने दरमहा पायी वारी खांद्यावर पताका घेऊन करणारे वारकरी हे सर्वश्रेष्ठ परमपूज्य मानले जातात व तो संप्रदायाचा मुख्य प्रवाह आहे. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्याबरोबरच दुसरे आदरणीयस्थान फडकऱ्याचे आहे. पिढ्यानपिढ्या दिंडीने पंढरपूर व संतांच्या पवित्र क्षेत्री वारीस जाऊन दशमी ते पौर्णिमा किंवा अमावास्येला काला करून परत येणे ही फडकऱ्याची गेली सातशे वर्षांची पवित्र परंपरा आहे. वारकरी संप्रदायाच्या आचारधर्माची पताका पिढ्यानपिढ्या वहन करणारे दिंडी व फड चालविणारे वारकरी महाराज मंडळी म्हणजेच वैष्णव वारकरी म्हणून संप्रदायात अतिशय पूज्य आहेत. असे असूनही सर्वसामान्य समाजात संप्रदाय प्रचाराला मर्यादा पडत होत्या. फडकऱ्याचे पद वंश परंपरेने आरक्षित होते.ही मर्यादा मान्य करून ज्या कुटुंबात संप्रदाय परंपरा आहे व ज्या कुटुंबात ती नाही अशाही कुटुंबातील सदाचार, संपन्न, अभ्यासू अन्य लोकांनाही वारकरी होऊन कीर्तनकार, प्रवचनकार, तत्वज्ञानी, विद्वान, धर्मनिष्ठ, आचारबद्ध होण्याची संधी मिळावी . संप्रदायाचा सर्वत्र समाजात, सर्वस्थरावर विस्तार व्हावा. कीर्तन, प्रवचन, भजन परंपरा वाढावी म्हणून स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांनी आपल्या शिष्यांच्या आग्रहावरून आपली सर्वसंगपरित्यागी वैराग्याऋत्ती बाजूला ठेऊन, सर्वसामान्यांच्या पारमार्थिक हितासाठी वारकरी शिक्षण संस्थेची श्रीक्षेत्रआळंदी येथे स्थापना केली. आज महाराष्ट्राच्या सर्व भागात परमार्थाची पूर्व परंपरा असलेले व नसलेले अनेक वारकरी संप्रदायात कीर्तनकार, प्रवचनकार, तत्वज्ञानी, विद्वान, भजनगायक, वादक तयार झालेले आहेत. याचे सर्वश्रेय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणप्रसादास आहे. म्हणून अशा पवित्र चरणास साष्टांग दंडवत.

साभार - वारकरी शिक्षण संस्था 

वारकरी शिक्षण संस्था म्हणजे समाजाकडून संचालित, सक्रीय अनौपचारिक संत साहित्य विद्यापीठ.

संस्थेची स्थापना सद्गुरू जोग महाराजांच्या कृपाशीर्वादाने व ह.भ.प.वै. मारुतीबुवा गुरव ह.भ.प.वै. मारुतीबुवा ठोंबरे यांच्या प्रयत्नाने झाली, परंतु संस्थेच्या स्थापने नंतर अल्पावधीत म्हणजेच दोन वर्षे अकरा महिन्यातच सद्गुरू जोग महारांचा इहलोकवास समाप्त झाला.परंतु या अल्प काळातच सद्गुरू जोग महाराजांनी संस्थेच्या कायदेशीर आर्थिक व संघटनात्मक बाबांची प्राथमिक पूर्तता करून संस्था स्थिर केली होती. त्यानंतर या कार्याचा विस्तार ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज यांनी २४ वर्ष ३ महिन्यांच्या आपल्या अध्यक्षपदाच्या प्रदीर्घ कार्यकाळात केला. महाराष्ट्रातील खेडोपाडी शुद्ध वारकरी परंपरेचे भजन सुरु केले. भजनासाठी लागणाऱ्या मृदुंगाला बोल दिले, वीणेला स्वर दिला व टाळाला ताल दिला आणि “लावूनी मृदुंग श्रुतीटाळघोष | सेवू ब्रम्हरस आवडीने ||” हे संत तुकाराम महाराजांचे वचन सार्थ केले. प्राथमिक परमार्थ संस्काराचा माध्यम म्हणून खेडोपाडी शिस्तबध्द, शुद्ध स्वरूपात अखंड हरीनाम सप्ताहाच्या रूपाने ज्ञानसत्र परंपरा सुरु केली.महाराष्ट्रातील जीर्णशीर्ण अशा मठ, मंदिरांना आपले योग्याशिष्य पदाधिकारी देवून वारकरी संप्रदायाच्या परमार्थस्थलाच्या स्वरूपात विकसित केले. त्यांचा जीर्णोद्धार करवून घेतला. यासाठी स्वामी महाराजांनी आपल्या सर्वसंग परित्यागी संन्यास जीवनाचा विचार न करता संप्रदाय हितार्थ व लोकसंग्रहार्थ खूप परिश्रम घेतले. या कार्यात प.पु. स्वामींनी ह.भ.प.वै. लक्ष्मणबुवा इगतपुरीकर महाराज , ह.भ.प.वै. मामासाहेब दांडेकर , ह.भ.प.वै मारुतीबुवा गुरव या गुरुबंधूंचे मोठे सहकार्य लाभले.
संस्थेत कोणताही भेदभाव बाळगला जात नाही. “अठरा वर्ण याती | भेद नाही तेथे जाती ||” महाराजांच्या वचनानुसार संस्थेत याती कुळाचा विचार न करता एवढेच नव्हे तर धर्माचाही विचार न करता सर्वांसाठी मुक्त ज्ञान सत्र अव्याहत चालू ठेवले आहे. त्यामुळे गरीब-श्रीमंत ,ग्रामीन-नागरी सर्व जातीधर्मामध्ये विद्वानकीर्तनकार निर्माण झाले आहेत. संत साहित्याचे विचाराचे अभ्यासक निर्माण झाले आहेत . त्याच बरोबर भक्तीं व ज्ञान या दोन तीरांचे समन्वय साधणारे अभ्यासक निर्माण झाले आहेत. या भौतिकवादि,चंगळवादि, स्पर्धात्मक काळातही धर्ममनिष्ठ, आचारशुद्ध, विचारशुद्ध युवकांची पिढी निर्माण झाली आहे व पुढेही होत राहील.
संत ज्ञानेश्वर माऊली व संत नामदेव महाराजांनी जसे तेराव्या शतकात सर्व जाती धर्मात स्त्री पुरुष साक्षात्कारी धर्माधिकारी, देव तया जवळी वसे | पाप नाशे दारूशने || असे पात्रताप्राप्त संत कवी निर्माण केले. परमार्थ क्षेत्रातील सर्वोच्च वैष्णवी पूज्यता करुण हृदयाने यातिकुळाचा विचार न करता सर्वांसाठी मुक्त केली. वैष्णवांची मांदी (समूह) मेळवून मुक्तीची गवांदीच (अन्नसत्र) घातली. हीच सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व संत नामदेव महाराज यांनी तेराव्या शतकातच घालून दिलेली वारकरी परंपरा विसाव्या शतकात वारकरी शिक्षण संस्थेने चालविली आहे. याचा दृश्य परिणाम म्हणजे वर्तमान महाराष्ट्राच्या सर्व थरात, सर्व जाती धर्मात वारकरी सांप्रदायाचा प्रभाव दिसून येत आहे. संस्थेने अनुशासित व प्रगल्भ अशी कीर्तनकार, प्रवचनकार भजन गायक वादकांची परंपरा निर्माण केली व ती उत्तरोत्तर वाढतच चाललेली आहे.

साभार - वारकरी शिक्षण संस्था