Wednesday 28 June 2017

धडपड

 

आपली सगऴी धडपड ही आपल्या उपजीविकेसाठी चालू असते.पोट भरावे यासाठी सर्वांचे प्रयत्न चालू असतात.मग तो श्रीमंत असो अथवा गरीब.गरीब भाकरीसाठी प्रयत्न करेल आणि श्रीमंत पंचपक्वान्नासाठी करेल.गरीबाचे थोडक्यात समाधान होईल किंवा त्याला थोडेच मिऴेल आणि श्रीमंताला भरपूर मिऴेल पण समाधान होणार नाही.पण कसेही असले तरी प्रत्येक जण आपल्या पोटासाठी प्रयत्न करतोच.
थोडासा विचार केला तर जन्माला येऊन केवऴ पोट भरण्यासाठी,उपजीविकेसाठीच आपली शक्ती खर्च करावी हे योग्य आहे का ? की जन्माला येऊन जन्मोजन्मीचे श्रम नष्ट करण्यासाठी सुखरूप असणारा परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ? कारण उपजीविका सर्वांचीच होते.पण परमात्मा सर्वांना कळतोच असे नाही.पोट भरण्यासाठी आपले सामर्थ्य पणाला लावण्याची गरज नसते.कारण पोट सर्वांचेच भरते.प्रयत्न करणाऱ्याचेही आणि न करणाऱ्याचेही ! पैसा कोणीही मिऴवतो.किडामुंग्यांना नोकरी करावी लागत नाही,तरीही त्यांचे उदरभरण होते.अशी अनेक उदाहरणे सापडतील.जन्मलेले बालक जन्मल्याबरोबर अनाथ झाले तरी भरणपोषण होतेच.

वृत्त्यर्थ नातिचेष्टेत,साहि धोत्रैव निर्मिता ।
गर्भादुप्ततिते जन्तौ मातु: प्रसवत: स्तनौ  ।।

आपल्या उपजीविकेसाठी फार धडपड करू नये.ती ब्रम्हदेवाने निर्माण करून ठेवलेली असते.प्राणी मातेच्या उदरातून बाहेर पडतो तेव्हा आईच्या स्तनांना पान्हा फुटत असतो.आपले पोट तसेही भरते.त्या प्रयत्नात आपले मूऴ उद्दिष्ट विसरू नये. कबीरमहाराजांनी म्हटले आहे,

मुरदे को हरि देत है कपडो लकडी आग ।
जीवित नर चिन्ता करे उनका बडा अभाग ।।

मेलेल्यालाही देव कपडा,लाकूड ,अग्नि हे सगऴे देतोच.मग जिवंत माणसाला चिंता करण्याचे कारण काय ? अभागी मनुष्यच त्याची चिंता करतो.त्यासाठी सर्व सामर्थ्य खर्च करण्यात अर्थ नाही.देव मिऴविण्यात सर्व सामर्थ्य खर्च करावे.तो भेटला की सुखरूपातच आहे.

।। रामकृष्णहरि ।।

संदर्भ - संतसंग

© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.

#chaitanyadeglurkar #vari #alandi #pune