Saturday 12 September 2015

महान कार्यात खारुताईनेही लावला हातभार- ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले


 || श्रीगुरू ||
सीता शोधाचा निरोप घेऊन हनुमान रामाकडे आल्यानंतर राम हनुमानाची स्तुती करतात, परंतु हनुमान म्हणतात की, तुझ्या रामनामामुळेच हे शक्य झाले. सीता लंकेत असल्यामुळे सर्व वानरसेना सुग्रीवासह समुद्राच्या काठावर येऊन थांबते. त्यावेळी सेतू उभारणीसाठी प्रभू रामाच्या या महान कार्यात आपलाही सहभाग असावा, यासाठी खारुताई देखील वाळू टाकण्याचे काम करते व तेव्हापासून 'खारीचा वाटा' हा शब्द प्रचलित झाला, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
ते श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या 'अध्यात्म रामायण' या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होते.
बोधले महाराज म्हणाले, वानरसेना समुद्र काठावर थांबलेली असताना तिकडे लंकेत रावण व बिभीषणात संवाद होऊन बिभीषण रावणाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, मात्र रावण न ऐकता बिभीषणाचा अपमान करतो. शेवटी बिभीषण आपल्या सहकार्‍यांसह रामाला शरण जातात. बिभीषण शरण आल्यानंतर प्रभू राम त्याचा स्वीकार करायचा की नाही, याचा विचार करतात मात्र हनुमान त्याचा स्वीकार करावा, असे रामाला सांगतात. पुढे सेतू बांधण्यासाठी समुद्राची पूजा करुनही समुद्र शांत होत नाही म्हटल्यावर रामाने धनुष्यबाण काढल्यावर समुद्रदेव रामाच्या पायाशी येतात. त्यानंतर सेतू बांधण्याचे काम सुरु होते. वानर मोठमोठे दगड पाण्यात टाकण्यास सुरुवात करतात, मात्र 'राम' हे शब्द लिहिल्यानंतरच दगड पाण्यावर तरंगण्यास सुरुवात होते. त्यावेळी एक खारुताई पाण्यात जाऊन परत वर येते, वाळूत मिसळून दगडाच्या खाचेत वाळू टाकण्याचे काम करते, राम तिला विचारतात तेव्हा तुमच्या या महान कार्यात माझाही सहभाग असावा म्हणून हे काम करीत आहे. सेतू बांधून झाल्यावर राम समुद्रकिनारी रामेश्‍वराची स्थापना करतात. सर्व सैन्यानिशी राम लंकेत दाखल झाले. ही बातमी रावणाला कळताच त्याचे दोन हस्तक पाहणीसाठी येतात त्यांनाही राम काही न करता जाऊ देतात. राम हे सुग्रीव, हनुमंत, लक्ष्मण यांना हे युद्ध होऊ नये म्हणून शिष्टाईसाठी कोणाला तरी पाठवा, असे म्हणतात व त्यानंतर अंगदाला रावणाकडे शिष्टाईसाठी पाठविले जाते, असे महाराजांनी सांगितले.
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२