Friday 30 September 2016

नवरात्र महोत्सव , श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर - पंढरपूर

अवश्य श्रवण सुखाचा लाभ घ्यावा .

ब्रह्मचित्कला श्रीसंत मुक्ताबाईंची जयंती तथा श्रीसंत तुकाराममहाराजांच्या शिष्या श्रीसंत बहेणाबाई शिऊरकर यांची पुण्यतिथी - अश्विन शुद्ध प्रतिपदा !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू : ||
आज घटस्थापना. शारदीय नवरात्राचा प्रथम दिन.

अश्विन शुद्ध प्रतिपदा ही शरद ऋतूची सुरुवात म्हणून या नवरात्राला " शारदीय नवरात्र " म्हणतात. शार म्हणजे ज्ञान. ते देणारी ती शारदा. त्या भगवती जगदंबा शारदेचे नवरात्र म्हणूनही हे शारदीय नवरात्र होय.
       भगवती जगदंबा ही आमची माता आहे. माता हीच बाळाचे सर्वस्व असते. जगाचे मातृवत् भरण पोषण करणारी, विकास करणारी, ज्ञान देणारी, सर्व आपत्तींमधून सांभाळ करणारी, आमच्या सुख-दु:खांमध्ये सहभागी होणारी, आनंदाच्या प्रसंगी पाठीवर कौतुकाची थाप मारणारी व चुकल्यास आमच्या शाश्वत हिताचा विचार करून शिक्षाही करणारी, आम्हाला लौकिक व पारमार्थिक वैभव प्रदान करणारी, अशी अनंत रूपे धारण करणारी ही आमची जगदंबाआई खूप विलक्षणच आहे. तिच्या विषयी विनम्रभावाने कृतज्ञता व्यक्त करण्याचा व तिच्या प्रेमाचा अधिक गहिरा आस्वाद घेण्याचा हक्काचा काळ म्हणजेच शारदीय नवरात्र होय.
     अश्विन शुद्ध प्रतिपदा श्रीज्ञानेश्वर-भगिनी ब्रह्मचित्कला श्रीसंत मुक्ताबाईंची जयंती, तशीच श्रीसंत तुकाराममहाराजांच्या शिष्या श्रीसंत बहेणाबाई शिऊरकर यांची पुण्यतिथी .
      श्रीसंत मुक्ताबाई यांचा अवतार शके १२०१ प्रमाथीनाम संवत्सर , अशीव्न शुद्ध प्रतिपदा ( दोन प्रहरी ) सायंकाळी शुक्रवारी झाला . चित्रानक्षत्र तिसरा चरण ता.१२ ऑक्टोंबर १२७९ .ज्या शक्तीचा अवतार मुक्ताबाई रूपाने झाला , तिचे वर्णन श्रीमद्भागवतात दहाव्या स्कंदात योग मायेच्या रूपाने केले आहे . जिला दुर्गा , भद्रकाली , विजया , वैष्णवी , कुमुदा , चंडिका , कृष्णा , माधवी ,  कन्यका , माया , नारायणी , इशानी , शारदा व अंबिका अशी महाविष्णुने चौदा नावे दिली आहेत .त्या योग मायेचा अवतरा ' श्रीसंत मुक्ताबाई ' . संत मुक्ताई ह्या तिन्ही देवांच्या जननी आहेत असे संत निळोबाराय म्हणतात -
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी | आद्यत्रय जननी देवाचिये ||
संत जनाबाई असे निर्देशित करतात -
आदि शक्ती मुक्ताबाई | दासी जनी लागे पायी ||
निरंजन माधव असे म्हणतात -
शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेवो पाही |
सोपान तो ब्रह्मा मूळमाया मुक्ताई ||
हे चित्कळाचि अमुते दिसते कुमारी |
जिच्या प्रभेसी तुळणा न पवे तमारी ||

" मुक्ताख्या ब्रह्म चित्कला " याप्रमाणे मूळमाया म्हणा , आदिशक्ती म्हणा , किंवा सद्रूप , चिद्रूप , आनंदरूप जे ब्रह्म त्यांपैकी चिद्रूप म्हणजे चित्कला  तोच मुक्ताईचा 'अवतार' आहे . सत्पद ते ब्रह्म 'चित्पद ते माया' | आनंद पदी जया म्हणती हरी ||

व दुसरे महत्त्वपूर्ण असे कि  श्रीसंत तुकाराममहाराजांच्या शिष्या श्रीसंत बहेणाबाई शिऊरकर यांची आज पुण्यतिथी
            प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराज आवर्जून म्हणत की, " प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी बहेणाबाईंचा गाथा वाचावा, अभ्यासावा, इतका तो महत्त्वपूर्ण आहे !"
श्रीसंत बहेणाबाईंनी आपल्या अभंगांमधून त्यांचे पूर्वीचे तेरा जन्म स्पष्ट करून सांगितलेले आहेत. तसेच फार गूढ व अलौकिक अनुभूतीही त्या अगदी सहज सांगून जातात. प्रपंच परमार्थ चालवी समान | तिनेच गगन झेलियेले || या अभंगात त्यांनी यशस्वी स्त्रीची लक्षण नेमक्या शब्दात सांगितल आहे .

- ज्ञानदा
varkariyuva.blogspot.in

Tuesday 27 September 2016

प.पू.श्रीगुरू श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या अमृतमय वाणीतून श्रीक्षेत्र वृंदावन येथे श्रीमद्भागवत भाव - कथा !

बर्हापीडं नटवरवपु: कर्णयो: कर्णिकारं. बिभ्रद्वास: कनकपिशं वैजयन्तीं च मालाम् |. रन्ध्रान्वेणोरधरसुधया पूरयन्गोपवृन्दै-. वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद् गीतिकीर्ति: ||.
श्रीसद्गुरू सेवा समिती , श्री क्षेत्र पंढरपूर द्वारा आयोजित  श्रीमद्भागवत भाव - कथा निरुपण   प्रवक्ते : प.पू.श्रीगुरू श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर , पंढरपूर द्वारा श्री  क्षेत्र वृंदावन धाम येथे दिनांक १३ मे २०१७ ते १९ मे २०१७स्थळ : फोगला आश्रम , श्रीक्षेत्र वृंदावन
 

युवकांसाठी स्टीव्ह जॉब्सचे प्रेरणादायी भाषण मराठीत..!!

स्टीव्ह जॉब्सने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात केलेले भाषण प्रचंड गाजले. हे भाषण म्हणजे त्यांच्या प्रेरणादायी आयुष्याचा गोषवारा आहे...  त्याचा केलेला मराठी अनुवाद...
..............................................

जगातल्या सर्वोत्तम गणल्या जाणा-या महाविद्यालयांपैकी एक अशा महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात तुमच्यासोबत बोलायची संधी मला मिळते आहे, हा मी माझा बहुमान समजतो. मी महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण करू शकलो नाही. आता सत्य सांगायला हरकत नाही, पण महाविद्यालयीन दीक्षांत समारंभ इतक्या जवळून मी पहिल्यांदा पाहतो आहे.

आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी सांगणार आहे. बस्स.. काही प्रचंड कहाणी नाही. फक्त तीन छोटय़ा गोष्टी..

पहिली गोष्ट आहे ठिपके जुळवण्याच्या संदर्भातली... मी रीड कॉलेजमधून सहा महिन्यांतच बाहेर पडलो होतो, पण त्या आधी मी जवळपास १८ महिने कॉलेजमध्येच ड्रॉप इन म्हणून घुटमळत होतो. मग मी बाहेर पडलो तरी का?

याची सुरुवात खरं तर माझ्या जन्माच्या आधीपासूनची आहे. माझी आई ही एक तरुण, अविवाहित महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती, आणि तिने मला दत्तक द्यायचे ठरवले. तिची फार इच्छा की मी पदवीधर पालकांकडे दत्तक म्हणून जावे, त्यामुळे अखेर एका वकील दाम्पत्याची त्याकरिता निवड झाली. सारे कसे सुरळीत चालू होते आणि अचानक माझ्या जन्माच्या वेळी त्या दोघांनी ठरवले की त्यांना मुलगी हवी आहे.. त्यामुळे वेटिंग लिस्टवर असलेल्या माझ्या आई-बाबांना रात्री अचानक फोन गेला की, ‘‘मुलगा झालाय.. तुमची अजूनही त्याला स्वीकारण्याची तयारी आहे का?’’ ते म्हणाले, ‘‘अर्थातच..’’ अर्थात, नंतर माझ्या आईला कळले की माझ्या दत्तक आईने पदवी पूर्ण केली नव्हती आणि वडिलांनी तर शाळेच्या पुढेही मजल मारली नव्हती. तिने मग दत्तक कागदपत्रे साईन करायला नकार दिला. मग मला ‘महाविद्यालयीन शिक्षणापासून दूर ठेवले जाणार नाही’ या आश्वासनावरच तिने कागदांवर सह्या केल्या.

१७ वर्षांनंतर मी खरंच कॉलेजला गेलो. मूर्खासारखे मी स्टॅन्फोर्डसारखे महागडे कॉलेज निवडले आणि माझ्या दत्तक पालकांची मध्यमवर्गीय कमाई माझ्या शिक्षणावरच खर्च होऊ लागली. सहा महिन्यांतच त्याची किंमत मला उमगेनाशी झाली. मला माझ्या अयुष्यात मला काय करायचे आहे याची सुतराम कल्पना नव्हती आणि कॉलेजचे शिक्षण मला याचे उत्तर शोधण्यात मदत करत नव्हते आणि मी इथे आईबाबांची आयुष्यभराची कमाई उडवण्यात गुंतलो होतो. म्हणून मी कॉलेजमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि सुस्कारा सोडला.. अर्थात, त्या वेळी हा छातीत धडकी भरवणारा निर्णय होता.. पण आता वाटते की कदाचित हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय असेल.. हा निर्णय पक्का झाल्याक्षणीच मी ज्या वर्गाबाबतीत उत्साही नव्हतो तिथे जाणे बंद करून टाकले आणि ज्या वर्गामध्ये मला जाण्यात रस होता त्या वर्गाना नियमितपणे जाऊ लागलो.

हे सगळेच काही स्वप्नवत नव्हते.. डोर्म मिळायची नाही, म्हणून मित्रांच्या रूम्सवर जमिनीवर झोपावे लागे.. कोकच्या रिकाम्या बाटल्या देऊन मी ५ सेंट्स जमा करत असे.. आणि त्यातून जेवणाची तजवीज करत असे.. दर रविवारी ७ मैल चालत जात असे, ‘हरे राम हरे कृष्ण’चे व्यवस्थित जेवण खायला मिळावे म्हणून.. पण मला ते आवडत होते.. माझी अंत:प्रेरणा आणि माझे कुतूहल यांनी मला जे काही सापडले, ते पुढे आयुष्यात अनमोल ठरले. आता हेच पाहा ना...रीड कॉलेजमध्ये त्यावेळेला बहुधा सर्वोत्तम असे कॅलिग्राफीचे (सुलेखन) वर्ग चालत. संपूर्ण परिसरात प्रत्येक भित्तीपत्रकावर, इतकेच काय अगदी खणांवरदेखील सुंदर कॅलिग्राफी केलेली आढळे. मी तसाही ड्रॉप आऊट होतो आणि मला हे कसे करतात हे जाणून घ्यायचे होते, त्यातच मला माझे नियमित वर्ग करणे जरूरीचे राहिले नव्हते. कॅलिग्राफीच्या वर्गात मी सेरिफ आणि सान्स सेरिफ फॉण्ट्सविषयी मी शिकलो. त्याच्याच बरोबर दोन अक्षरांमध्ये कीती जागा असावी, अक्षरे सुशोभित कशी करावी याचेही ज्ञान मिळत होते. ते सारेच फार सुंदर, ऐतिहासिक आणि कलात्मकरीत्या हळुवार होते.. कदाचित शास्त्राच्या चिमटीत पकडण्यापलीकडले... मी त्याने भारावून गेलो...

या सगळ्याचा माझ्या आयुष्यात दुरान्वयानेही मला काही प्रत्यक्ष लाभ होईल असं मला स्वप्नातही वाटलं नसतं. पण दहा वर्षांनंतर जेव्हा आम्ही पहिला मॅकीन्टोश कम्प्युटर बनवत होतो, हा सगळा काळ माझ्या मदतीला आला. आम्ही त्या सगळ्याचा वापर मॅकीन्टोशमध्ये केला. सुंदर टायपोग्राफी असलेला तो पहिला कम्प्युटर होता. जर मी महाविद्यालयातून त्या विषयांच्या जंजाळातून बाहेर पडलो नसतो, तर मॅकीन्टोशमध्ये विविध टाईप फेसेस आणि प्रमाणबद्ध फोण्टस दिसले नसते आणि विंडोजवाल्यांनी जर मॅकीन्टोश जसाच्या तसा कॉपी केला नसता, तर आज जगातल्या कुठल्याच पीसीवर ते दिसले नसते. मी महाविद्यालयातून बाहेर पडलो नसतो तर या कॅलिग्राफीच्या वर्गात कसा पोहोचलो असतो; आणि अर्थात, आज पीसीवर जे सुंदर टाइप फॉण्ट्स दिसतात ते कसे दिसले असते.. अर्थात हे ठिपके जोडणे.. आज १० वर्षांनंतर मागे वळून बघताना सोप्पे जाते.. तेव्हा हे कळत नव्हते..

पुन्हा.. हे ठिपके तुम्ही भविष्यात बघून नाही जोडू शकत.. ते फक्त मागे वळून बघताना जोडलेले दिसतात. म्हणूनच ते पुढे जाऊन जोडले जातील, यावर विश्वास ठेवावा लागतो. तुम्हाला कशावर तरी विश्वास ठेवावाच लागतो.. तुमचे मन, आतला आवाज, भाग्य, नशीब, कर्म.. काहीतरी.. या विचार पद्धतीने मला कधीच दगा दिलेला नाही आणि त्यामुळेच माझ्या आयुष्यात बराच बदल घडलेला आहे.

माझी दुसरी गोष्ट आहे प्रेम आणि तोटय़ाविषयी..

मी फार नशीबवान आहे. मला काय करायला आवडते हे मला फार आधीच उमगले होते. मी २० वर्षांचा असतानाच मी आणि वोझने मिळून घरच्या गॅरेजमध्ये अॅपल कम्प्युटर्सची सुरुवात केली. आम्ही खूप मेहनत केली. दहा वर्षांत गॅरेजमधल्या आम्हा दोघांपासून सुरू झालेली अॅपल २ बिलियन डॉलर्स आणि ४००० कामगारांची कंपनी झाली होती. आम्ही वर्षभरापूर्वीच आमचे सर्वोत्तम काम बाजारात आणले होते.. मॅकीन्टोश कम्प्युटर! मी तेव्हा फक्त ३० वर्षांचा होतो. आणि अचानक मी माझ्या कंपनीतून हाकलला गेलो. तुम्ही स्वत: स्थापन केलेल्या कंपनीतून तुम्ही स्वत: हाकलले कसे जाऊ शकता? खरं सांगायचं झालं तर जसं अॅपल वाढत होतं, त्याच्याबरोबर मला गुणी वाटणा-या काही मंडळींना मी नोकरीवर ठेवले. काही वर्षे ठीक गेली, पण नंतर आमच्या दृष्टिकोनात फरक पडू लागले. अखेर भांडणे झालीच.. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी पण त्यांचीच पाठराखण केली. साहिजकच वयाच्या तिसाव्या वर्षी मी अक्षरश: हाकलला गेलो.. आणि तेही अतिशय सार्वजनिक पद्धतीने.. माझ्या आयुष्याचा जो केंद्रबिंदू होता, तोच गायब झाला. मी उद्ध्वस्त झालो..

काही महिने.. नक्की काय करावे हेच सुचेना.. मला जणू माझ्या आधीच्या कार्यकुशल उद्योजकांचा विश्वासघात केल्यासारखे वाटत राही.. जणू आधी धावणा-याने माझ्या हातात दिलेले निशाण मी पाडून बसलो होतो. मी डेव्हिड पेकार्ड, बोब नोईस यांना भेटलो.. आणि अशा पद्धतीने घोळ घातल्याबद्दल त्यांची माफी मागितली. मी एक मोठे सार्वजनिक अपयश बनलो होतो आणि सिलिकॉन व्हॅलीतून पळून जाण्याचे विचार मनात घोळू लागले होते. पण हळूहळू एक गोष्ट जाणवायला लागली.. माझे अजूनही माझ्या कामावर प्रेम होते.. अॅपलमधल्या घटनांनी त्यात तीळभरही फरक पडला नव्हता. मला नाकारण्यात आले होते.. पण माझे प्रेम संपले नव्हते.. म्हणूनच.. मी पुन्हा सुरुवात करण्याचा निश्चय केला.

तेव्हा तसे वाटले नसेल कदाचित, पण अॅपलमधून हाकलले जाणे ही माझ्या आयुष्यातली सर्वाधिक चांगली घटना ठरली. यशस्वी असण्याचे सगळे दडपण गळून पडले. त्याची जागा एखाद्या नवोदिताच्या खांद्यावर असलेल्या हलकेपणाने घेतली. कशाचीही खात्री नव्हती.. याच स्थितीमुळे मी माझ्या आयुष्यातल्या सर्वाधिक सृजनात्मक कालखंडात प्रवेश केला..

त्यानंतरच्या ५ वर्षांत मी ‘नेक्स्ट’ नावाची कंपनी स्थापन केली, ‘पिक्सार’ नावाची दुसरी कंपनीही उभारली आणि एका अशा भन्नाट स्त्रीच्या मी प्रेमात पडलो जिच्याशी मी लग्न केले. ‘पिक्सार’ने जगातली पहिली अॅनिमेटेड फिल्म ‘टॉय स्टोरी’ बनवली आणि आज ती जगातली पहिल्या क्रमांकाची अॅनिमेशन कंपनी आहे.. गंमत म्हणजे, पुढे ‘नेक्स्ट’पण ‘अॅपल’ने विकत घेतली.. आणि आम्ही ‘नेक्स्ट’मध्ये बनवलेले तंत्रज्ञान आज ‘अॅपल’च्या कामाला येते आहे.. आणि ‘अॅपल’च्या यशाला ते कारणीभूत ठरते आहे..

मला खात्री आहे की मी जर ‘अॅपल’मधून हाकलला गेलो नसतो तर हे कधीच घडले नसते. औषधाची चव घेणे कठीण असते, पण रुग्णाला त्याचीच गरज असते. कधी आयुष्याने डोक्यात दगड घातलाच, तर निराश होऊ नका. मला खात्री आहे की जर माझे माझ्या कामावर प्रेम नसते तर मी अशा पद्धतीने काम करत राहू शकलो नसतो. आपले प्रेम कशावर आहे याचा शोध घेत राहा. हे केवळ तुमच्या व्यक्तीगत आयुष्यात जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते तुमच्या कार्यक्षेत्रातही. तुमच्या आयुष्यातला एक मोठा भाग तुम्ही काम करण्यात व्यतीत करणार आहात, आणि उत्तम काम करण्याकरिता तुम्ही जे करताय त्यावर तुमचे प्रेम असणे आवश्यक आहे. जर ते तुम्हाला अजून सापडले नसेल तर मग शोधात राहा.. स्वत:ची समजूत घालून नका घेऊ. हृदयाच्या इतर गोष्टीप्रमाणेच जेव्हा तुम्हाला ते सापडेल, तेव्हा ते तुम्हाला आपोआप जाणवेल आणि एखाद्या सुंदर नात्याप्रमाणे वर्षे जशी सरकत जातील, तसतसा तुमचा त्यातला रस वाढतच राहील. म्हणून म्हणतो.. शोधत राहा.. स्वत:ची समजूत घालून नका घेऊ.

माझी तिसरी गोष्ट मृत्यूविषयी आहे..

मी १७ वर्षांचा होतो तेव्हा एक वाक्य वाचले होते.. ‘जर तुम्ही रोज आपले आयुष्य आजचा दिवस शेवटचा असं समजून घालवलात तर कमीत कमी एक दिवस तुमची समजूत खरी ठरेल.’ या वाक्याने माझ्यावर खूप परिणाम केला होता. तेव्हापासून जवळपास ३३ वर्षे मी रोज सकाळी उठतो आणि आरशात पाहून स्वत:ला विचारतो- ‘‘जर आज मला मरण यायचे असेल, तर आज जे मी करतो आहे तेच मला करायला आवडेल का?’ जर माझे उत्तर बरेच दिवस ‘नाही’ असेल, तर मला कळते की काहीतरी बदल करायची गरज आहे.

मला लवकरात लवकर कधीही मृत्यू येऊ शकतो ही कल्पना मला माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेताना खूप कामाला येते. कारण आपल्या बाह्य अपेक्षा, सारा अहंकार, लाज किंवा अपयशाची भीती हे सारं सारं मरणाच्या भीतीमध्ये नष्ट होतं.. आणि जे महत्त्वाचं आहे, तेवढंच उरतं. तुम्ही मरणार आहात हे लक्षात ठेवणे म्हणजे तुम्ही काहीतरी गमावू शकता या भीतीपासून मुक्ती असं मी समजतो. तुम्ही आधीच इतके नागवे झालेले असता की हृदयाचं सोडून दुस-या कुणाचं ऐकण्याचं तुम्हाला कारणच रहात नाही.

साधारण वर्षांपूर्वी मला कॅन्सर असल्याचे निदान झाले. सकाळी ७.३० वाजता माझा स्कॅन झाला आणि स्वादुपिंडापाशी मला भला मोठा टय़ुमर असल्याचे स्पष्ट झाले. मला स्वादुपिंड शरीरात कुठे असते हेही ठाऊक नव्हते. डॉक्टर म्हणाले हा जवळपास असाध्य अशा स्वरूपाचा कॅन्सर आहे आणि मी काही सहा महिन्यांपेक्षा जास्त जगणार नाही. डॉक्टरने मला घरी जाऊन सा-या गोष्टींची आवराआवर करायला सांगितले, म्हणजे दुस-या शब्दात तो मला मृत्यूसाठी तयार राहायला फर्मावत होता. याचाच दुसरा अर्थ म्हणजे पुढच्या दहा वर्षांत तुम्ही आपल्या मुलांना ज्या चार युक्तीच्या गोष्टी सांगणार होता, त्या सांगायला आता तुमच्याकडे फक्त सहा महिने आहेत. याचाच दुसरा अर्थ म्हणजे सगळी बटणं लावून तयार राहा.. निरोप घ्यायची वेळ आलेली आहे..
त्या निदानासोबत मी एक दिवस घालवला.. त्या दिवशी संध्याकाळी माझी बायोप्सी झाली. त्यांनी माझ्या घशावाटे आणि पोटातून आतडय़ात एन्डोस्कोप घुसवला, माझ्या स्वादुपिंडात सुई खुपसून त्यांनी तिथल्या पेशी काढल्या. मला अर्थात भूल दिली होती, पण माझी पत्नी म्हणाली की, जेव्हा डॉक्टर्सनी त्या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्या, तेव्हा ते आनंदाने रडू लागले. माझा कॅन्सर अतिशय दुर्मिळ असला तरी शस्त्रक्रियेने तो बरा करता येण्यासारखा होता.. माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि मी आता ठणठणीत बरा आहे.

ही माझी मृत्यूशी झालेली सर्वात जवळची आणि बहुधा अजून दोन दशक तरी टिकेल अशी ओळख. आत्ता मी याविषयी एवढय़ा अधिकारवाणीने बोलतो आहे, त्याचं कारण या एका उपयुक्त कल्पनेचं या अशा ओळखीत झालेलं रूपांतर.

मरण कुणालाच नको असतं. अगदी ज्यांना स्वर्ग हवा असतो त्यांचीही त्याकरिता मरण्याची तयारी नसते. तरीही मरण हे आपल्या सगळ्यांना एकत्र करणारच आहे. कोणालाही ते चुकलेले नाही. आणि हे खरंच अगदी बरोबर आहे, कारण मरण हा जीवनाचा सर्वात छान शोध आहे. तो जीवनातल्या बदलाचा शिल्पकार आहे. तोच जुन्याला दूर करून नव्याची वाट मोकळी करतो. आज, कदाचित तुम्ही चर्चेत आहात, पण उद्या तुम्ही हळूहळू म्हातारे व्हाल आणि दूर सारले जाल. जास्त नाटय़मय वाटले, तरी हेच सत्य आहे..

तुमच्याकडे अगदी मर्यादित वेळ आहे, म्हणूनच दुस-या कोणाचं आयुष्य जगत तो फुकट घालवू नका. दुसऱ्यांच्या विचारावर आधारलेल्या निष्कर्षांचं जोखड आपल्या आयुष्यावर मिरवू नका. दुसऱ्यांच्या मतांच्या गलबल्यात आपला आतला आवाज दबून जाऊ नये याची काळजी घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे, आपले हृदय आणि अंत:प्रेरणा यांचं ऐकायचं धाडस सदैव दाखवा. त्यांना जवळपास नेहमीच तुम्हाला काय बनायचे आहे, याची कल्पना असते. बाकी सगळे दुय्यम आहे.

जेव्हा मी तरुण होतो त्या वेळी होल अर्थ कॅटलॉग नावाचे मासिक प्रसिद्ध होत असे- जणू आमच्या पिढीचे बायबलच.. इथून जवळच मेन्लो पार्क इथे राहणारा स्टेवर्ट ब्रांड नावाचा इसम ते काढत असे आणि त्याने आपल्या कवीप्रवृत्तीने ते मासिक सजवले होते. ही गोष्ट १९६० ची, पर्सनल कम्प्युटर किंवा डेस्कटॉप पब्लिशिंगच्या खूप आधीची. साहजिकच, हे मासिक पूर्णपणे टाईपरायटर, कात्री आणि पॉलोराईड कॅम-याने बनवले जाई..जणू पेपरबॅक फॉर्ममधले गुगल.. आणि तेही गुगल येण्याच्या ३५ वर्षे आधी. खूप आदर्शवादी, नेटके आणि नव्या कल्पनांनी भारलेले.

स्टेवर्ट आणि त्याचे सहकारी भरपूर वर्षे त्या मासिकाचे अंक काढत राहिले.. आणि जेव्हा त्याचा प्रवास संपला तेव्हा त्यांनी त्याचा शेवटचा अंक काढला. सत्तरीची मध्यान्ह चालू होती आणि मी तुमच्याच वयाचा होतो.. त्या शेवटच्या अंकात शेवटच्या पृष्ठावर एक गर्द रानातल्या रस्त्याचे चित्र होते. त्याच्या खाली लिहिले होते.
‘भुकेलेले राहा... वेडे राहा...’

हा त्यांचा शेवटचा संदेश होता... भुकेलेले राहा... वेडे राहा... मी सतत स्वत:साठी तेच मागतो. आणि आत्ता जेव्हा तुम्ही पदवीधर होऊन बाहेर पडताय.. तेव्हा तुमच्यासाठी पण हीच इच्छा करतो आहे..
भुकेलेले राहा... वेडे राहा!!!

(मूळ भाषणाची तारीख- १२ जून २००५)

Sunday 25 September 2016

यज्ञ महोत्सव २०१६ श्रीक्षेत्र आळंदी येथे संपन्न !

यज्ञ महोत्सव २०१६
२४  सप्टेंबर  रोजी आळंदी येथे परम सुखदम् या जगातील सर्वप्रथम
वैदिक सिम्फनी ला घेऊन परमोच्च उत्साहात जगप्रसिद्ध पखवाजवादक  मा.श्रीसुखद जी मुंडे यांच्या कुशल नेतृत्वाचा आदर्श घेऊन ५० वादकांच्या कला दर्शनाने संपन्न...!

मा.श्री.माणिकजी महाराज मुंडे उर्फ गुरुजी यांचा कृतज्ञता व्यक्त करणे  अर्थात महागुरुपुजन सोहळा .

Saturday 24 September 2016

प.पू.गुरुवर्य ह.भ.प. विठ्ठलमहाराज घुले पुण्यस्मरण त्यानिम्मिताने त्यांच्या जीवनातील आपणा सर्वांस शिकवण देणारा एक प्रसंग !

|| ज्ञानेशो भगवान विष्णु : ||
वारकरी सप्रंदायीक शिक्षण देणारी आळंदीतील एकमेव वारकरी शिक्षण संस्था -सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था
जगातील एकमेव अध्यात्मिक ज्ञान देणारी संस्था जिथे शिक्षकांनाही वेतन नाही आणि
विद्यार्थ्यांकड़ून शिक्षणाचे शुल्क आकारले जात नाही . याच वारकरी शिक्षण संस्थेतील एक श्रीगुरूतुल्य व्यक्तीमत्व
प.पू. गुरूवर्य विठ्ठलमहाराज घुले .अतिशय शिस्तप्रिय जीवनअसणारे पूज्य महाराज .
पूज्य महाराजांनी हजारो वारकरी नर  रत्न घडवले. पूज्य 
महाराजांबद्दल एका किर्तनात  श्रवण केलेला प्रसंग
बाबांचा पाठ वारकरी शिक्षण संस्थेत  असायचा , वेळेच्या बाबतीत बाबा अतिशय काटेकोर
एक दिवस कुणी एक विद्यार्थी संस्थेत पाठाला थोड़ा उशिरा  आला , त्यांनी बघितले तर गुरूवर्य घुले बाबा  आत जाताना दरवाजा बाहेर असलेल्या विद्यार्थ्यांच्या चप्पलाचं दर्शन घेऊन संस्थेत प्रवेश करायचे .
शेवटी विद्यार्थ्यांनी घुले बाबांना विचारलेच  , बाबा आपण  विद्यार्थ्यांच्या चप्पलांचे  दर्शन घेऊन संस्थेत प्रवेश करता ?
तेव्हा घुले बाबा म्हणाले , बाबांनो मी तुमच्या चप्पलांच दर्शन घेऊनच संस्थेत प्रवेश करतो
कारण न जाणो तुमच्यात एखादा अज्ञात साधु व संत असेल??? म्हणून अगोदरच नतमस्तक होऊन तुम्हाला पाठ शिकवतो . यावरून अंदाज आलाच असेल आपणास  काय जीवन असेल सदगुरू घुले बाबांच अशा महात्मांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ! नामदेव  महाराज अशा  महात्माचं वर्णन करताना म्हणतात कि ,
ऐसियांचे जो चरित्र आवडी ऐके।
तो या भक्तांबरोबरी तुके।
भोगी वैकुंठ निजसुखे।
स्वयंमुखे बोलिले॥


आज प.पू.गुरुवर्य ह.भ.प. विठ्ठलमहाराज घुले यांचे पुण्यस्मरण पूज्य महाराजंच्या चरणी साष्टांग दंडवत  !

- ज्ञानदा 




ब्रम्हीभूत प. पू. स्वामी वरदानंद भारती चरित्र ...!

ब्रम्हीभूत प. पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंतराव आठवले) यांचे संक्षिप्त चरित्र

मराठवाडयातील सुप्रसिद्ध संतकवी श्री दासगणू महाराज (श्री गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे) स्वतः साक्षात्कारी होते.आधुनिक काळात सकल संतांचे ते उत्तराधिकारी होते असे म्हणणे उचित ठरेल. त्यांनी आपल्या भक्तीरसप्रधान अशा कीर्तनांनी व संत चरित्रात्मक वाड्मयानी मराठी साहित्यात मोलाची भर घातली, त्या संत दासगणू महाराजांचे उत्तराधिकारी, त्यांचे शिष्योत्तम, मौलिक वाड्मय निर्माते, आदर्श कीर्तनकार, तत्त्वज्ञ आणि थोर समाजहितैषी असे प्राचार्य अनंत दामोदर आठवले यांचेच संन्यासोत्तर नामकरण “वरदानंद भारती” झाले. त्यांच्या व त्यांच्या वाड्मयाचा संक्षेपात परिचय येथे देत आहोत.
श्री.अनंतरावांचे वडील श्री दामोदर वामन आठवले यांना प्रसंगविशेषाने त्यांच्या वयाच्या १२ व्या वर्षापासून पू. दादांनी(संत दासगणूंनी) सांभाळले. ते उत्तम गायक होते. संस्कृतचा व्यासंग केलेले होते. त्यांनी कीर्तनसेवाही केली. या गुणज्ञपुत्राचा विवाह संत दासगणू महाराजांनी १९१४ साली कु. कमला महाबळ हिचेशी केला. लग्नानंतर त्यांचे नाव राधा ठेवले. त्यावेळी दासगणू महाराजांच्या मार्गदर्शक गुरूंच्या श्री साईनाथांच्या (शिर्डीकर) सान्निध्यात मंगल कार्य झाले. त्यांचे सुपुत्र हे अनंतराव आठवले! त्यांचा जन्म अनंतचतुर्दशी शके १८४२ इ.स. २६.०९.१९२० पुण्यात शनिवारपेठेत झाला.
दुर्दैवाने श्री. अनंतरावांचे हे पितृछत्र ते ४-५ वर्षांचे असतानाच हरपले. “दामूचे लग्नकार्य झाले तो कीर्तनेही उत्तम करतो, आता आपलीही परंपरा तो सांभाळील या कल्पनेत श्री दासगणू महाराज असतानाच हा आघात झाला आणि राधाबाईंचा मोडलेला संसार सांभाळून तडीला लावण्याचे दायित्व श्री महाराजांनी स्वीकारले. “अंतस्त्यागी बहि:संगी लोके विहर” या न्यायाने ते वागले व अनंतराव, त्यांच्या दोन बहिणी व माता राधाबाई यांचा सांभाळ सर्वतोपरी संत दासगणू महाराजांनी केला.
वयाच्या १५-१६ वर्षापर्यंत श्री अनंतराव ब-याच वेळा विषमज्वराने आजारी पडल्याने प्रकृतीने बेताचेच होते. अशा प्रत्येक दुखण्यात त्यांचे जवळ श्री महाराज बसत व विष्णूसहस्त्रनामाचे पाठ म्हणत. श्री अनंतरावांनी पुढे एके ठिकाणी, “मी बरेचदा आजारी पडलो हे माझे भाग्यच कारण माझ्या सदगुरूंचा कोमल स्पर्श सातत्याने मला लाभला”! असे म्हटले आहे.
संत दासगणू महाराजांनीच त्यांचे लौकिक व अध्यात्मिक शिक्षण केले. श्री अनंतराव पंढरपुरातच महाराजांजवळ लहानाचे मोठे झाले.श्री अनंतरावांची बुद्धिमत्ता विलक्षण होती. पाठांतर उत्तम होते. स्मरणशक्तीही दांडगी होती.एकदा वाचलेलेही पाठ होत असे. घरचे सारे संस्कार धार्मिक होते. त्यांच्या कीर्तनांचा शुभारंभ १९३६ मध्ये वारक-यांचे अध्वर्यू श्री केशवराव देशमुखांच्या उपस्थितीत झाला. १९४० साली श्री अनंतराव ma^ट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि महाराजांच्या इच्छेलाच प्राधान्य देऊन ते आयुर्वेद महाविद्यालयात पुण्यात दाखल झाले. १९४१ च्या फेब्रुवारीत पंढरीतच चतुर्भुज झाले. सौ.इंदिराबाईंशी विवाहबद्ध झाले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सक्रीय राजकारणात सहभागी होण्याची त्यांची विशेष इच्छा महाराजांनी अमान्य केली. मात्र याचा कोणताही विपरीत परिणाम श्री. अनंतरावांच्या मनावर झाला नाही. सावरकरांच्या वाड्मयाचा- व्याख्यानांचा परिणाम म्हणता येईल व संत दासगणूंचे मन मोडणार नाही यादृष्टीने श्री अनंतरावांनी स्वातंत्र्याची प्रेरणा देणारे महाकाव्य “शालिवाहन” निर्माण केले. काही कारणांनी ते पुरे झाले नाही पण त्या १५-१६ सर्गांमधून श्री अनंतरावांच्या अफाट वाचनाची-प्रतिभेची कल्पना येते. १९४४ साली ते आयुर्वेद विशारद झाले. पुढे त्यांनी महाराजांच्या आज्ञेने आणि टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या (श्री. मामा गोखले) इच्छेने पारंगतचा पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रविण्यांकाने पूर्ण केला. १९४२ मध्येच “त्रिदोषांची तर्कशुद्धता” हा मौलिक विषय निबंधातून लिहिला जो आयुर्वेद जाणकारांनी प्रशंसिला होता. पुढे पारंगत झाल्यावर त्याच आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापक ते प्राचार्य अशी पदे त्यांनी भूषविली ! ते राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे सदस्यही होते. आणि सुमारे ४-५ हजार पृष्ठांचे आयुर्वेदीय वाड्मय निर्मिले. त्यांच्या तर्कपद्धती, कुशल अध्यापन, चिकित्साकौशल्य या गुणांची सर्वांवर छाप पडे. प्रशासकीय दायित्वही त्यांनी कौशल्याने निभावले. आयुर्वेदाशी ते एकनिष्ट होते. रसशाळा, महाविद्यालय आणि ताराचंद धर्मार्थ रुग्णालय या सर्वांचे दायित्व सांभाळिले. संस्थेच्या नियामक मंडळातील वाद पुढे विकोपाला जाऊन आयुर्वेदाशी प्रतारणा होण्याचा संभव दिसताच त्यांनी त्यागपत्र दिले. १९५० ते १९६६ असा सोळावर्षांचा काळ त्यांनी संस्थेत व्यतीत केला.
या काळात त्यांचा प्रपंचही नेटकेपणाने झाला. त्यांना पहिला मुलगा झाला परंतु दुर्दैवाने तो अल्पायु ठरला. पुढे त्यांना ईशकृपेने तीन कन्यांची व दोन पुत्रांची प्राप्ती झाली. मुली सुस्थळी पडल्या आहेत. मुलगेही आपापल्या कार्यात कार्यमग्न आहेत.
स्वामीजींच्या निर्याणानंतर त्यांचे थोरले चिरंजीव श्री चंद्रशेखर यांचा आकस्मित मृत्यू झाला. आधी पतिनिधनाचे आणि नंतर पुत्रवियोगाचे दुखः झेलीत सौ. इंदिरा वाहिनी आपले जीवन ईशचिंतनात व्यतीत करीत आहेत.
पन्नास साठ चे दशकात त्यांचे आयुर्वेद विषय व कार्यक्षेत्रातले पितुतुल्य मार्गदर्शक वैद्य श्री मामा गोखले आणि संत दासगणू महाराज यांचा वियोग अनंतरावांना घडला. १९४९मध्ये गुरूंच्या आज्ञेने “कृष्णकथामृत” हे महाकाव्य “दोहाचौपाह” या तुलसीदासांच्या रामायणाच्या धर्तीवर निर्माण केले. सदगुरुंच्या चरित्र व वाड्मयाचा परिचय समाजाला घडविला. संत दासगणूंची अलौकिक गुणवत्ता, त्यांचे मोठेपण व त्यांचे भक्तीरस प्रधान काव्य अनंतरावांमुळेच सर्वाना समजू शकले. सदगुरूंच्या निर्याणानंतर त्यांचे समग्र वाड्मयही दहा खंडात प्रसिद्ध केले. अनंतरावांचा साक्षेप फार मोठा म्हणूनच हे शक्य झाले.
इ. स. १९६६ नंतर नोकरीचे बंधन नसल्याने संत दासगणूंच्या विशाल परिवाराच्या कामासाठी श्री अनंतरावांनी वाहून घेतले. १९६८ मध्ये संत दासगणूंची जन्मशताब्दी साजरी केली. नांदेड जवळील गोरटे या गावात विश्रांतीसाठी संत दासगणू जात. त्या गावीच त्यांची वस्त्र समाधी श्री अनंतरावांनी निर्माण केली आणि संत दासगणूंच्या अनेक थोर भक्तांच्या आग्रहाने “श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे” ही संस्था निर्माण करून ती १९७४ मध्ये पंजीकृत केली.
आता श्री अनंतरावांचे “गुरु परंपरा रक्षण” हे ध्येय ठरले आणि त्या अनुषंगाने संस्कृती संरक्षण व तीवरील आक्षेपांचे निराकरण यासाठी कीर्तन, प्रवचने, व्याख्याने, शिबिरे, परिसंवाद, भेटीगाठीही साधने ठरली आणि अनुस्यूतपणे लोकजागृती करणे हेही ध्येयच बनले. यासाठी “श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान” भाविकांचे श्रद्धाकेंद्र आणि साधना केंद्र निर्माण झाले.
गुरुपदाची धुरा वाहायची तर अध्यात्मिक अधिकार वाढविला पाहिजे म्हणून त्यांनी नोकरीत असल्यापासूनच अध्यात्मिक साधना केली. त्यांनीच एकेठिकाणी व्यक्त केल्याप्रमाणे विष्णूसहस्त्रनामाची साधना त्यांनी केली. श्री महाराज गेल्यानंतर ते नियमाने हिमालयात जाऊ लागले त्यांचे ते एकान्तसेवन या दृष्टीने फार महत्वाचे आहे. १९७१ मध्ये त्यांना श्री नारायणाचा साक्षात्कार झाला. त्यांचा तो अनुभव त्यांनी रूपकात्मकतेने कवितेतून व्यक्त केला आहे. त्यांच्या लहानमोठया अनेक कविता आहेत. सुरुवातीला “भावार्चना” या छोटया पुस्तकात त्या प्रकाशित झाल्या आहेत. ते स्वतः कमालीचे प्रसिद्धी पराड्मुख असल्याने फार उशिरा “भावार्चाने” ची द्वितीयावृत्ती १९९४मध्ये प्रकाशित झाली.नारायणाच्या साक्षात्कारा नंतर ते संन्यस्त वृत्तीने प्रपंचात राहिले. प्रपंच नेटका केला पण त्यात कुठे आसक्त झाले नाहीत.१९९० मध्ये त्यांच्या मातोश्रींच्या निर्याणानंतर त्यांनी उत्तरकाशी येथे स्वामी विद्यानंदगिरी यांच्या कडून १९९१ मध्ये विधिवत न्यास दीक्षा घेतली! आता ते स्वामी वरदानंद भारती झाले!संत दासगणूंची संन्यास घेण्याची इच्छा त्यांच्या या शिष्योत्तमाने अशी पूर्ण केली !!
“ब्राह्मणु हिंडता बरा” या समर्थ वचनाप्रमाणे समर्थाप्रमाणे, स्वामीजींनी तीन वेळा भारत भ्रमण केले. ध्येयासवक्त जीवनाला पूरक ठरेल असे वाड्मय निर्माण केले. काही ज्येष्ठ भक्तांनी वाड्मयाचे प्रकाशन नीटपणे होण्यासाठी १९८२ मध्ये “श्री राधा दामोदर प्रतिष्ठान” ही संस्था निर्माण केली आणि त्या संस्थेकडून स्वामीजींचे सर्व ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.
महर्षी व्यास निर्मित “ब्रह्मसूत्रे” प्रस्थान त्रयातील मुख्य ग्रंथ! स्वामीजींनी ७-८ हजार ओव्या रचून ‘ब्रह्मसूत्रार्थदर्शिनी’ ग्रंथ सिद्ध केला. उपनिषदर्थ कौमुदी नावाने सर्व प्रधान १० उपनिषदांवर भाष्य केले.विशेष म्हणजे श्री नारायण व श्वेताश्वेतर उपनिषदांवरही लेखन केले. हे उपनिषद वाड्मय ५ खंडात प्रसिद्ध असून या पाचव्या खंडात उपनिषद वाड्मयावरील जाणकारांच्या सुमारे ५०-६० प्रश्नांची उत्तरे ग्रथित केली आहेत. गीतेच्या प्रत्येक अध्यायावर स्वामीजींनी विवरण केले आहेच व ते प्रसिध्दही आहे.
“महाभारताचे वास्तव दर्शन” हा ग्रंथ आणि पू. अप्पांची (श्री अनंतरावांची) त्यावरील व्याख्याने ही महाराष्ट्रात सर्वदूर गाजली. मोठमोठया विद्वानांनी महाभारतातील कथेची आणि चरित्रांची जी अवहेलना विकृती करून ग्रंथ छापले होते त्यांचे साधार खंडन व्याख्यानातून व या ग्रंथातून त्यांनी केले. असाच दुसरा आधुनिकांच्या शंका-प्रश्नांना दिलेली उत्तरे म्हणून प्रश्नोत्तररूप असलेला “वाटा आपल्या हिताच्या” हा ग्रंथ. यातले प्रश्न पहिले म्हणजेच ग्रंथाचा दर्जा लक्षात येतो. “मनाचे श्लोक” हे समर्थांचे एक छोटेसे प्रकरण. मात्र समर्थांचे सर्व सामर्थ्य जणू त्यात प्रकटले आहे. त्या ग्रंथांवरील प्रवचने पू. अप्पांनी केली होती. त्या प्रवचनांचे ग्रंथरूप म्हणजे त्यांचा “मनोबोध” हा ग्रंथ! आज या ग्रंथांची नववी आवृत्ती निघाली आहे, इतका तो लोकप्रिय ग्रंथ आहे.
तत्वज्ञानाचा व्यवहार विशद करणारा “साधक- साधना” ग्रंथ असाच मौलिक आहे. “भगवान श्रीकृष्ण एक दर्शन” मध्ये कृष्णाची राजनीती व धर्म संस्थापने साठी त्यांचे प्रयत्न हाच विषय आहे. “कर्मयोग” (गीता अध्याय ३), आत्मसंयमयोग (गीता अध्याय ६) व जीवन साधना (गीता अध्याय १८) ही त्यांची गीतेवरील लोकप्रिय पुस्तके. त्यांच्या एका चाहत्याने “ज्ञानेश्वरी”कळत नाही, तुम्ही काहीतरी सोपी करून सांगा असा फार आग्रह केला. पू. अप्पांनी ते मनावर घेतले नि ४-५ महिन्यात समओवी-अनुवाद ज्ञानेश्वरी सिद्ध केली. मूळ ९०३३ ओव्यांचे रुपांतर अवघ्या दहा हजार प्रचलित मराठी भाषेतील ओव्यात केले. म्हणून तो समओवी अनुवाद !
याशिवाय लहानमोठे प्रकरण ग्रंथ आहेतच. निर्याणापूर्वी त्यांनी ११०० पृष्ठांचा ” सार्थ- सभाष्य मनुस्मृती” हा ग्रंथ सिद्ध केला. अधुनिकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणून मनुस्मृतीची “भूमिका” लिहिली ती १०० पृष्ठांची.नंतर आजच्या अपेक्षांच्या संदर्भात मनुस्मृतीचा प्रत्येक श्लोक सार्थ लिहिला आणि आपल्या खंडन-मंडना प्रीत्यर्थ उपयुक्त असे पुरावे शेवटी २५०-२७५ पृष्ठांत “परिशिष्टे” म्हणून मांडलेत. प्रामाणिक अभ्यासक, तो विरोधक असला तरी या ग्रंथाबाबत असे म्हणेल की came to scoff but remained to pray ! असा हा मौलिक ग्रंथ आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे स्वामीजींचे सुमारे ५० तरी ग्रंथ प्रकाशित आहेत. या सा-या वाड्मयात त्यांचे राष्ट्रचिंतनही उत्कटपणे व्यक्त झालेले आहे.
सततोद्योगी असे हे व्यक्तिमत्व मनुस्मृतीलिखाणा नंतर उत्तरकाशीला गेले. निर्याणाचा दिवस नक्की केला.दोन दिवस आधी कैलासाश्रमाचे व्यवस्थापक श्रीउमानंद स्वामीजींना थोडी कल्पना दिली होती. ३ सप्टेंबरला स्वामीजी गंगास्नानार्थ गेले. परत आल्यावर परिवारातील व्यक्तींना म्हणाले, आता मी बंद केलेले दार ४ तासांनी उघडा. आत गेल्यावर काही आन्हिके केली व सिध्दासन घालून आसनस्थ झाले. ४ तासानंतर परिवारातल्या व्यक्ती आत गेल्या तो त्यांना दिसले स्वामीजी उजव्या हाताने नारायणाचे पाय धरून आहेत, मस्तक विनम्र आहे व डावा हात कमंडलू वर स्थित आहे.
ते पाहताच कल्पना आली. प्रमुख संन्याशांना बोलावून त्यांच्या सहायाने त्यांना भिंतीपाशी बसवले. पु. स्वामीजी त्यानंतर ४४-४५ तास श्वसन करीत होते. मात्र अन्य कोणतीही प्रतिक्रिया- प्रतिसाद नव्हता. ५ सप्टेंबर २००२ रोजी सकाळी साडेपाच वाजता त्यांनी अंतिम श्वास घेतला.
समाधीला बसण्यापूर्वी पत्रे-संदेश इ. लेखन केलेले कागद तेथे होते. त्यातील संदेशात ते म्हणतात :
मी म्हणजे ना शरीर | मी मद ग्रंथांचा संभार ||
त्यांचे वाचन चिंतन | यथा शक्ती आचरण |
हीच गुरुपूजा खरी | नीट धरावे अंतरी ||
या शिवाय अन्यही वर्णन त्या अंतिम कवितेत आहे. ही त्यांची संजीवन समाधी जनमानसाला थक्क करणारी होती. त्यांच्या इच्छेप्रमाणेच त्यांचे पार्थिव ०६.०९.०२ रोजी गंगार्पण करण्यात आले.
मन, वाणी, बुद्धी ही श्रमली देश हितार्थासी |
संस्कृती संरक्षणार्थ बनले योध्दा संन्यासी ||
धर्माचरणी निरपवाद जणू गांगेयची सार्थ |
यथार्थ आचरणे जिंकियले चारही पुरुषार्थ ||

- varkariyuva.blogspot.in