Wednesday, 31 August 2016

प.पू. श्रीगुरु ह.भ.प.श्रीप्रमोदमहाराज जगताप यांचा आज जन्मदिन !

स्वामी वरदानंद भारती पुण्यतिथी - एक चिॅतन !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु :।।

आमच्या पंढरीतलेच आदरणीय अप्पा उपाख्य पूर्वाश्रमीचे अनंतराव दामोदरराव आठवले जे पुढे संन्यासोत्तर स्वामी वरदानंद भारती झाले ! अप्पांचा, काल पुण्यस्मरणाचा दिवस होता ! योगशास्त्रात ज्या निर्विकल्प व सविकल्प समाधी अवस्थेचे वर्णन केलंय, त्या निर्विकल्प समाधी अवस्थेस प्राप्त झालेला एक महापुरुष म्हणजे आदरणीय अप्पा !

एथ वडील जे आचरिती
तया नाम धर्म ठेविती
येर तेंचि अनुष्ठिती
सामान्य सकळ !

कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबारायांच्या ह्या सिद्धांताप्रमाणे अप्पांचे पूर्ण जीवनच आपल्या सद्गुरुंच्या अर्थात संतकवी दासगणु महाराजांच्या मार्गदर्शनातच व्यतीत झालं ! दासगणुमहाराजांसारखा विद्वान व संतकवी सद्गुरु लाभलेल्या मनुष्यांस बालपणीच कृष्णभक्तीचा लळा लागला व वयाच्या तेवीस-चोविसाव्या वर्षीच अप्पांनी "श्रीकृष्ण कथामृत" हा पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या चरित्रावरचा ओवीबद्ध ग्रंथ रचला ! २००७ ह्या वर्षात हा ग्रंथ सिंबायोसिस महाविद्यालयात असताना माझ्या वाचण्यांत आला. ह्या ग्रंथातून त्या वयात अप्पांची प्रतिभा ही किती संपन्न होती हे दिसून येते ! अर्थात योग्यतेला वयाची मर्यादा नसतेच तरीपण हा ग्रंथ श्रीकृष्णभक्तांसाठी अनुपम आहे. उपमालंकाराने नटलेला हा ग्रंथ कधीकधी डोळ्यात चटकन पाणी आणतो.

हा ग्रंथ ऐकायचा तर आमचे गुरुवर्य भागवताचार्य श्री. वा ना उत्पातांच्या श्रीमुखातून श्रीमद्भागवत आख्यानात ! अर्थात वा. ना. महाराज त्यांचे एक प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्या मुखातून श्रीकृष्ण कथामृत ऐकणं हा एक वेगळाच अनुभव आहे. अप्पांच्या ग्रंथसंपदेची ओळख आम्हांस आदरणीय वा. ना. महाराजांमुळेच झाली, हे वेगळं सांगायला नको.

अप्पांची विलक्षण ग्रंथसंपदा
श्रीकृष्ण कथामृत, भगवद्गीतेवरच्या प्रत्येक अध्यायावरचं अप्पांचे भाष्य, प्रस्थानत्रयी अशा ब्रह्मसूत्रांवरचं व उपनिषदांवरचंही अप्पांचं भाष्य ही त्यांच्या अलौकिक व प्रखर बुद्धिमत्तेचा व विद्वत्तेचा कळस आहे.

मनुस्मृतीवरचं अप्पांचे भाष्य
ज्यांना मनुस्मृती हा ग्रंथ व्यवस्थित समजून घ्यायचा असेल त्यांनी अप्पांचे सार्थ मनुस्मृती भाष्य वाचायलाच हवे ! अप्पांच्या प्रत्युत्पन्न मतीचा आविष्कार ह्या ग्रंथात आपणांस पहावयाला मिळतो. जिज्ञासूंनी हा ग्रंथ अवश्य वाचावा ही विनंती ! ग्रंथाचा विस्तार मोठा असली तरी ग्रंथ निश्चितच वाचनीय व चिंतनीय !

महाभारताचे वास्तव दर्शन - आक्षेपांच्या संदर्भात
अप्पांच्या एकुणच व्यक्तिमत्वावर कळस चढविणारा ग्रंथ म्हणजे महाभारताचे वास्तव दर्शन - आक्षेपांच्या संदर्भात ! ह्या ग्रंथात अप्पांनी महाभारतावरच्या आक्षेपांस जे सप्रमाण व साधार उत्तर दिलंय ते पाहिलं की मन थक्क होते ! इरावती बाई कर्वेंपासून ते आनंद साधले व इतर अनेक आक्षेपकांचे नाव घेऊन सप्रमाण व साधार खंडण करणारे अप्पा हे विद्वत्तेचा कळस होते ! त्यांनी कर्णाच्या उदात्तीकरणाला केलेला विरोध, जो त्यांनी सोबत नावाच्या तत्कालीन मासिकातही लेखरुपाने प्रकाशित केला होता तोही वाचनीय आहे. सोबत मध्ये कर्णावर अप्पांचा लेख आलेला आम्ही वाचलाय. सोबत हे सत्तर व ऐंशीच्या दशकातलं ग. वा. बेहरेंचे एक अभ्यासपूर्ण प्रकाशन होते ! ह्या सोबत मध्ये तत्कालीन अनेक विद्वानांचे अतिशय अभ्यासपूर्ण व रोखठोक भूमिका मांडणारे लेख आपणांस वाचावयांस मिळतील. ते अवश्य वाचावेत.

ज्ञानेश्वरीवर समश्लोकी औवीबद्ध भाष्य करणारे अप्पा !
ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्याचा एक मेरुमणी आहे. गेली सात दशके ह्या ग्रंथराजाने मराठी मनांस जी भूरळ घातलीय ती काही केल्या कमी तर होणार नाहीच नाही. ह्या ज्ञानेश्वरीवर प्रत्येक ओवीवर ओवीरुपातच भाष्य करणारे अप्पा हे काय प्रतिभा संपन्न होते हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. तत्कालीन ज्ञानेश्वरीवरील एक आदरणीय भाष्यकार गुरुवर्य धुंडा महाराज देगलुरकरांची त्यांस प्रस्तावना आहे. देगलुरकर हे नाव ज्ञानेश्वरीशी इतकं जोडलं गेलंय की विचारायांसच नको. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीवर तशाच ओव्या रचणं हे येरागबाळाचे काम नोव्हे !

आणखी काही ग्रंथाचा परिचय
अप्पांची ग्रंथसंपदा ही विपुल आहे. *यक्षप्रश्न* ह्या ग्रंथात त्यांनी महाभारतातल्या यक्ष-युधिष्ठिर संवादावर केलेलं भाष्य हे निश्चितच चिॅतनीय आहे.

वाटा आपल्या हिताच्या - अप्पांचा एक महत्वपूर्ण ग्रंथ
हिंदुधर्मावरच्या आक्षेपांचं निवारण करणारा हा प्रश्नोत्तररुपी ग्रंथ ज्यात अनेक विषयांवरचे प्रश्न व त्यांस अप्पांनी दिलेलं समर्पक उत्तरे असा हा ग्रंथ ! सकाळचे संस्थापक नानासाहेब परुळेकरांच्या एका मासिकांत हा ग्रंथसंवाद छापून आलेला आम्ही वाचलाय. अनेक शंकाकुशंकाचे निवारण करणारा हा ग्रंथ प्रत्येक हिॅदुमात्रांस आवश्यक आहे.

श्रीकृष्ण चरित्र
ह्या ग्रंथात अप्पांनी भगवान श्रीकृष्णावरच्या अनेक आक्षेपांचे साधार नि सप्रमाण खंडण केलंय. श्रीकृष्णावर अनेकांनी अनेक आक्षेप अकारण घेतले आहेत. अप्पांनी ह्या ग्रंथात मांडलेले कृष्ण चरित्र हे निश्चितच अभ्यसनीय आहे.

समर्थ चरित्र प्रवचन !
अप्पांची अनेक प्रवचने व कीर्तने आज ध्वनिमुद्रित स्वरुपात व चलतचित्र स्वरुपात उपलब्ध आहेत. Samarth ramdas संकेतस्थळांवर त्यांचे समर्थ चरित्रावरचे अडीच तासाचे जे प्रवचन उपलब्ध आहे, ते पुन्हा पुन्हा ऐकण्याचा मोह मनुष्यांस झाल्याशिवाय राहत नाही.

वारकरी पंथ व रामदासी पंथांचे समन्वय साधणारे अप्पा !
जगद्गुरु तुकोबाराय व समर्थ रामदास ह्या दोन संतश्रेष्ठांच्या जीवन तत्वज्ञानाचे समन्वय साधणारे अप्पा हे तत्कालीन विद्वानांमध्ये अग्रणी होते. हा प्रयत्न त्यांनी अनेक दशकांपूर्वी केला होता. कारण वारकरी पंथ व रामदासी पंथांत हेतुपुररस्सर भेद निर्माण करणारे काही नालायक लोकही ह्या महाराष्ट्रात त्याकाळीही होते व आजही ते आहेत हे खेदांने म्हणावंसं वाटतं. अप्पांनी हा समन्वयाचा एक स्तुत्य
प्रयत्न त्यावेळी केला होता हे एक नवलपूर्ण होते.  आज तोच प्रयत्न आदरणीय स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज(पूर्वाश्रमीचे आदरणीय
किशोरजी व्यास) करताहेत हेही नसे थोडके !

स्तोत्र रचना
अप्पांचे संस्कृत भाषेवरचे असामान्य प्रभूत्व हे त्यांच्या प्रस्थानत्रयीवरच्या भाष्यात तर आपणांस दिसून येतंच. पण तरीही त्यांनी रचलेली स्तोत्रे ह्यावरून त्यांची अनुपम भक्ती व ह्या गीर्वाणवाणीवरचे प्रभूत्व दिसतं. जगत्जननी रुख्मिणी मातेवर रचलेले त्यांचे रुक्मिणी अष्टक हे आचार्यांच्या पांडुरंगाष्टकप्रमाणेच गेय व भक्तीरसाने ओथंबलेले आहे. आमच्या पंढरीत रुक्मिणी सभागृहात ते लावलेलं आहे.

अप्पांची राष्ट्रनिष्ठा
अप्पांनी रचलेले पोवाडे व फटके हे त्यांच्या राष्ट्रभक्तीचे द्योतक आहेत. अप्पा हे त्या न्यायाने एक क्रांतिकारकच होते असं म्हटल्यांस वावगं ठरणार नाही. ते हिॅदुह्रदयसम्राट तात्याराव सावरकरांवर प्रेम करणारे होते.

एक आयुर्वेदाचार्य
अप्पा हे व्यवसायाने वैद्य होते. त्यांचा जन्म व बालपण जरी पंढरीत गेलेलं असलं तरी त्यांच्या जीवनाचा बराचसा भाग हा पुण्यातच
व्यतीत झाला होता. पुण्यातल्याच एका आयुर्वेद महाविद्यालयात ते प्राचार्यपदावरही आरुढ झाले होते. आयुर्वेदाचं त्यांचं ज्ञान अफाट होते.

तेजाचं चांदणं - अप्पांचे चरित्र
अप्पांच्या समाधीनंतर त्यांच्या अधिकारी शिष्यांनी त्यांचे चरित्र प्रकाशित केलं होते. सिंबायोसिस मध्ये असताना आमच्या ते वाचण्यांत आले होते. ह्या चरित्रांत नावाप्रमाणेच अप्पांचे जीवन हे एका तेजाचे चांदणं हे सार्थ होते ह्याचा प्रत्यय येतो.

अप्पांचा शिष्यपरिवार महाराष्ट्रात सुविख्यात आहे.

ज्येष्ठ अभ्यासक,वक्ते,राष्ट्रविचार प्रसारक व ख्यातनाम लेखक डाॅ. सच्चिदानंद शेवडे, आदरणीय कल्याणी नामजोशी,भागवताचार्य वा. ना. उत्पात,त्यांचे पुत्रद्वय वैकुठंवासी चंद्रशेखर महाराज अाठवले व कंपनी सेक्रेटरी म्हणून विख्यात असे महेश आठवले हा महाराष्ट्रातला एक अधिकारी व अभ्यासु वर्ग अप्पांस शिष्य म्हणून लाभलाय.

अप्पांची समाधी
अप्पांनी काल म्हणजे श्रावण कृष्ण त्रयोदशीस समाधी घेतली. योगमार्गाने टाळूतून प्राणत्याग करून ते ब्रह्नलीन झाले. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र प्रणाम !!!
भवदीय,

- श्री.तुकाराम चिंचणीकर
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

सज्जन -प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।
जगामध्ये सज्जनांना नावे ठेवणे नवे नाही.अनादिकालापासून हे चालू आहे.  श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या काऴामध्ये त्यांचा महिमा ओऴखणा-यांपेक्षा त्यांना नावे ठेवणारेच अधिक होते.संतांना नावे ठेवणारे तेव्हाच होते असे नाही,तर आजही त्यांना नावे ठेवणारे आहेत.मर्यादापुरुषोत्तम प्रभूरामचंद्रांनाही लोकांनी नावे ठेवली. गुणवानाला फार मोठ्या परिक्षेतून जावे लागते.ते कसेही वागले तरी समाज त्यांना नावे ठेवतोच.पण समाज कसाही वागला तरी संत मात्र समाजाच्या हिताचेच चिंतन करतात.कारण समाज किंवा समाजातील दुष्ट लोक वाईट वागतात म्हणून संतही वाईट वागू लागले,तर दुर्जनांत आणि यांच्यात अंतरच राहणार नाही.दुर्जन कसाही वागला तर सज्जनांची दृष्टी नेहमीच चांगली असते,तर दुष्टांची वाईट!! मंबाजींनी श्रीतुकाराम महाराजांना काठीने मारले तरी तुकोबाराय,मारून मंबाजीचे हात दुखले असतील म्हणून त्याचे हात दाबण्यासाठी त्याच्या घरी गेले.संतांचा असा स्वभाव असतो.सुभाषितकार म्हणतात,

गुणायन्ते दोषा: सुजनवदने दुर्जनमुखे
गुणा: दोषायन्ते तदिदमपि नो विस्मयपदम् ।।
महामेघ: क्षारं पिबति,करुते वारि मधुरं
फणी क्षीरं पीत्वा वमति गरलं दु:सहतरम् ।।

सज्जनाच्या बोलण्यामध्ये इतरांचे दोषही गुण म्हणून येतात तर दूर्जनाच्या मुखी इतरांचे गुणसुद्धा दोष होतात,यात आश्चर्य असे काहीच नाही.मेघ समुद्रातील क्षारयुक्त खारट पाणी पितात आणि जगाला गोड पाणी देतात आणि साप दूध पितो आणि असह्य विष ओकतो.मेघ सज्जन आहेत. श्रीज्ञानेश्वर महाराजांनासुद्धा पसायदानामध्ये 'खल' म्हणजे दुष्ट नष्ट व्हावेत असे मागता आले असते.पण त्यांनी  मागितले नाही.त्यांनी तसे मागितले असते तर त्यांना कोणी संत म्हटले नसते.त्यांची सज्जनता शब्दांतून प्रगट झाली- ' जे खऴांची व्यंकटी सांडो ।' दुर्जनाबद्दलही ते चांगल्याच भावनेतून विचार करतात.आपण मेघ आहोत की साप, ते आपण तपासून पाहिले पाहिजे.

संदर्भ - संतसंग

© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.
https://m.facebook.com/chaitanyamaharajdeglurkar/

Tuesday, 30 August 2016

ह.भ.प.प्रा.सरलाताई बाबर (बारामती ) यांना संत साहित्य सेवा संघ सोलापूर यांचा पुरुषोत्तम संत सेवा पुरस्कार .....!

परमश्रद्धेय ह.भ.प.प्रा.सरलाताई बाबर (बारामती ) यांना संत साहित्य सेवा संघ सोलापूर यांचा पुरुषोत्तम संत सेवा पुरस्कार जाहीर !

Tuesday, 23 August 2016

भगवान श्रीकृष्णजन्म उत्सव , श्रीक्षेत्र गोंदवले
|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
राम कृष्ण हरी !
माउलीच चरित्र सर्वांसाठी हि संकल्पना मनात घेऊन
माउलींच्या कृपेने काम सुरु आहे म्हणटल आज जन्माअष्टमी
आहे माउलींच्या जन्माविषयी थोड सांगाव ...म्हणून हा
छोटा प्रयत्न ..
श्री ज्ञानेशांचा जन्म
निवृतीनाथांच्या दोन वर्षांच्या अंतराने ज्ञानेश्वर
महाराजांचा जन्म शके ११९७ , युवनाम संवत्सर , श्रावण
वद्य ८ म्हणजेच अष्टमी गुरुवार , रोहिणी नक्षत्र , दोन
प्रहार रात्र निसीथकाली चंद्र उगवत असता म्हणजे
भगवान श्री कृष्णाच्या जन्मसमयीच झाला . यावरून
ज्ञानेश्वर महारा
ज हे श्रकृष्णाचा अवतार आहेत , हे सहज कळून येते .
ज्ञानेश्वर तोची कृष्णनाथ | तेणे गीतेचा केला अर्थ |
जे निंदितील यथार्थ | ते मतीमंद जाणावे ||
माउलींच्या जन्माबद्दल काही संताची प्रमाण देतो
ती खालिल प्रमाणे
श्री नामदेवरायनचा अभंग :-
अधिक सत्याण्णव शके अकराशती | श्रावण मास
तिथी कृष्णाष्टमी ||१||
वर्षाऋतू युवानाम संवत्सर | उगवे निशाकर रात्रीमाजी
||२||
पंचमहापतकी तारावया जन | आले नारायण मृत्युलोकी
||३||
नाम म्हणे पूर्ण ब्रह्म ज्ञानेश्वर | घेतसे अवतार अलंकापुरी
||४||
श्री विसोबा खेचर :-
महाविष्णूचा अवतार | श्रीगुरु माझा ज्ञानेश्वर ||१||
शके अकराशे सत्याण्णव | युवा संवत्सर नाव ||२||
वर्ष ऋतू श्रावण मास | कृष्ण पक्ष पर्व दिवस ||३||
अष्टमीच अपराति | उद्या आले निशापती ||४||
विठ्ठलराखुमाईचे कुसी | अवतरले ऋषीकेशी ||५||
विश्व तारावया आले | खेचर वंदिती पाऊले ||६||
ज्ञानेश्वर विजय , ग्रांथाचे कर्ते सच्चिदानंद बाबा हे
श्री ज्ञानेश्वर महाराजांचे जन्म शके ११९७ व मास ,
तिथी , वर , नक्षत्र वेळहि सांगतात . ते खालील प्रमाणे
श्री शालिवाहन भूपती | अकराशे सत्याण्णव मिती
||१११||
यावा नाम संवत्सरप्रती | श्रावण कृष्ण अष्टमी ||११२||
गुरुवार रोहिणी | पर्वकाळ परार्ध रजनी |
विठ्ठलराखुमाईचे पोटी | अवतरले जगजेठी ||११३||
ज्ञानदेव नामे सृष्टी | श्रीगुरू माझा मिरवतसे ||११४||
माझ्या वाचनात जे जे आल ते मी अपना सर्वान पुढे
मांडण्याचा प्रयत्न केला ..
यात जर काही कुणाला शंका असेल तथा काही चुकीच
वाटत असेल तर नक्कीच कळवा ...( मात्र अभंग सोडून )
कारण ते माझ्या संताचे आहेत आणि त्यावर माझा
संपूर्ण विश्वास आहे आणि ते सत्यच आहे नव्हे  तर संत
बोलतील तेच सत्य अस माझ मत आहे ...

एकंदरीतच माउली आणि कान्हा दोन वेगळे नसून एकाच
आहे ..यासाठीच इतका सारा पंक्ती प्रपंच ....राधे कृष्ण
|| राम कृष्ण हरी ||
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचावी
हि मनी इच्छा !
आपला ,
अक्षय भोसले
८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र 

Thursday, 18 August 2016

रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून श्री विठ्ठल भगवान व रुख्मिणी मातेला केलेला पोशाख !


रक्षाबंधन  सणाचे औचित्य साधून श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीने श्री विठ्ठल भगवान व रुख्मिणी मातेला केलेला पोशाख ..

Wednesday, 17 August 2016

रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा !

   ।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।। 

रक्षाबंधन

शुद्ध ज्याचा भाव झाला l दुरी नाही देव त्याला ll1ll
अवघी साधनें हातवटी l मोले मिळत नाही हाटी ll2ll
अहो आपण तैसे व्हावे l अवघे अनुमानुनी घ्यावे ll3ll
ऐसे केले सद्गरूनाथे l बापरखुमादेवीकांते ll4ll
तेथें कोणी शिकवावे l सार साधूनियां घ्यावे ll5ll
लडिवाळ मुक्ताबाई l बीज मुद्दल ठीयीचे ठाईं ll6ll
तुम्ही तरुनी विश्व तारा l ताटी उघडा ज्ञानेश्वरा ll7ll

या अभंगातुन वयाने लहान असून देखिल संत मुक्ताबाईंचा  ज्ञानोबारायांप्रती मातृत्वभाव व धाकट्या बहिणीची मर्यादा कळुन येते.!
  ll जय ज्ञानोबाराय जय मुक्ताबाई ll

पूज्य श्री प्रमुख स्वामीमहाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन !

स्वामी नारायण पंथाचे गुरुवर्य पूज्य श्री प्रमुख स्वामी महाराज यांचं देहावसान झाले. साधू कोणत्या हि पंथाचा असो त्यांच्या जाण्याने समाजाचे फार मोठे  कधी हि न भरून निघणारे नुकसान होते .
पूज्य स्वामी महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम ! व त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन .

- अक्षय चंद्रकांत भोसले
Varkariyuva.blogspot.in

परमार्थ केव्हा करावा ? - पू.श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

माणसाने परमार्थ कधी करावा ? वयाच्या कितव्या वर्षापासून पारमार्थिक चिंतन करावे? याबद्दल मतभेद असू शकतात.कोणी म्हणेल की आयुष्याच्या शेवटच्या काऴामध्ये परमार्थ केला पाहिजे.आयुष्यभर संसार,व्यवहार करावा आणि उत्तरार्धात परमार्थ करावा.म्हणून कोणी तारूण्यातच देवधर्माच्या गप्पा मारू लागला तर त्याला त्याचे सहकारी 'म्हातारा' म्हणून संबोधतात.म्हणजे देवधर्म फक्त म्हातारपणातच करावयाचा असतो.तारूण्य हे केवऴ विषयांच्या उपभोगासाठी असते.कारण तारूण्यातच इंद्रिये सक्षम असतात.म्हातारपणामध्ये इंद्रिय विषयांचा उपभोग घेऊ शकत नाही.त्यामुऴे देवधर्म हा म्हातारपणात करायचा असतो.जगामध्ये असा विचार करणारे लोकच अधिक आहेत.त्यामुऴे प्रवचन-कीर्तनांना वयोवृद्ध लोकांची अधिक गर्दी असते.परमार्थ हा रिटायर्ड झाल्यानंतर करायचा असतो,हीच अनेकांची भावना असते.
पण ही भावना योग्य नाही. परमार्थाचे चिंतन बालवयातही होऊ शकते.संतांची चरित्रे पाहिली तर बालपणीच त्यांना परमार्थाची आवड होती असे आढऴते.समर्थ श्रीरामदासस्वामी बालपणी विश्वाची चिंता करीत असत.श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी वयाच्या सोऴाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगितला.त्यांना परमार्थात वयाची अडचण आली नाही.त्यांनी सोऴाव्या वर्षी लिहिलेले आपणांस वाचायला एकसष्ठावे वर्ष का ? असा प्रश्न नेहमीच पडतो.वास्तविक परमार्थाला वयाचे बंधन नसते.श्रीशुकाचार्यांनी तर गर्भातच संसाराचे स्वरूप ओऴखले होते.परमार्थ कधी करावा ? याचे उत्तर आहे की, ज्या क्षणी हा प्रश्न निर्माण होईल त्याच क्षणी प्रारंभ करावा ! कारण हा प्रश्न संसाराचे दु:ख कऴल्याशिवाय निर्माण होणार नाही.परमार्थ त्याच क्षणी  करावा.योगवसिष्ठांत प्रभू श्रीरामचंद्रांना उपदेश करताना वसिष्ठ म्हणतात,
'अद्यैव कुरू यच्छ्रेयो वृद्ध : सन् किं करिष्यसि ।
स्वगात्राण्यपि भाराय भवन्ति हि विपर्यये ।।'
आजच आपले कल्याण करून घे.वृद्धापकाऴी काय होणार? म्हातारपणी आपल्या इंद्रियांचेच ओझे होते ! ज्याला आनंदाची प्राप्ती लवकर व्हावी असे वाटते तो तेवढ्या लवकर परमार्थाचे चिंतन करतो.म्हणून परमार्थ कधीही करता येतो.त्याला वयाचा विचार करण्याचे कारण नाही.परमार्थ कधी करावा ? उत्तर एकच - आत्ता !

© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.
Fb.com/chaitanyamaharajdeglurkar

Tuesday, 16 August 2016

निष्ठेचा परिणाम फार आहे - श्री महाराज


भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आम्हाला केव्हाही दु:ख करण्याची वेळ येणार नाही. आमच्याकडे आठवड्याचा बाजार असतो. एक नवरा-बायको असे बाजाराला गेले होते. संध्याकाळ झाली. त्यांचे घर फार लांब होते. ती दोघे आपसात बोलत होती की, “ आता उशीर झाला आहे, रात्रीचे जाणे नको. तेव्हा आज इथेच राहू आणि सकाळी जाऊ. ” त्यांचे बोलणे दोन लबाड माणसांनी ऐकले. ते त्यांना म्हणाले, “ तुम्ही का घाबरता ? आम्ही बरोबर आहोत ना ! आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचे आहे. आम्ही रामासाक्ष सांगतो आहो; तेव्हा आपण जाऊ या. ” या नवराबायकोला ती माणसे वाईट आहेत असे वाटले नाही. पुढे एका दरीत गेल्यावर, त्या लोकांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधले आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिने काढून घेतले. पुढे त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करून म्हणाली, “ रामा ! मी या लोकांच्या विश्वासावर आले नाही, त्यांनी तुझी साक्ष ठेवली, तुझी शपथ वाहिली, त्या शपथेच्या विश्वासावर मी आले. माझे रक्षण करणारा आता तूच आहेस !” एवढ्यात बंदुकीचे आवाज झाले, आणि दोन शिपाई तिथे धावत आले. तेव्हा चोर पळून गेले आणि त्या शिपायांनी त्यांना मुक्त केले, त्यांचे दागिने आणि सामान त्यांना दिले, आणि त्यांना घरी पोहोचवले. घरी गेल्यावर ती बाई म्हणाली, “ तसे जाऊ नका, थोडे गूळपाणी घेऊन जा. ” ते म्हणाले, “ नको, आम्हाला फार कामे आहेत. ” ती म्हणाली, “ थांबा जरा, मी आत्ता आणतेच. ” म्हणून ती आत वळली, तेवढ्यात ते गुप्त झाले. निष्ठा ही अशी पाहिजे. आजवर कितीकांच्यावर किती बिकट प्रसंग आले असतील, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले.
सगुणभक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर तो हा की, जेव्हा आपण रामाच्या पायावर डोके ठेवतो तेव्हा आपल्या भावना उचंबळून येतात. अशा वेळी आपण रामाला सांगावे, “ रामा, आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही. मला तू आपलासा करून घे. मी अवगुणी असेन, पण तू माझा अव्हेर करू नकोस, मी तुला शरण आलो आहे. ” आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धिमेपणा म्हणजे धीर पाहिजे. जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल, लोक देवालासुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान् मनुष्याला भजतात. निष्ठेचा परिणाम फार आहे.

  भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा, तो खात्रीने सुखाचा होईल.

अखंड हरीनाम सप्ताह , ओवे - खारघर संपन्न !

||ज्ञानेशो  भगवान  विष्णु :||

श्री विठ्ठल रुखुमाई मंदिर ओवे गाव - खारघर सेक्टर ३० , नवी मुंबई येथील 
अखंड हरीनाम सप्ताहात ह.भ.प.रविंद्रमहाराज हरणे , श्रीसंत मुक्ताई संस्थान , मुक्ताईनगर यांची काल्याची कीर्तनसेवा संपन्न झाली .