Saturday 25 July 2015

ते या पंढरीसी घडे ।। - श्रीगुरु महंत प्रमोदमहाराज जगताप

।। श्री गुरु ।।

ते या पंढरीसी घडे  ।।

वारीमध्ये वार आठवत नाहीत,
त्यामुळं अनेकांचे आठवड्याचे
उपवासही विसरल्याची उदाहरणं
आढळतात. न्याहारी झाल्यावर
लक्षात येतं, की आज सोमवारचा
उपवास होता! या विसरण्यातही
एक आगळावेगळा आनंद दडला आहे.
दिनांक आठवत नाही. हातातल्या
घड्याळाकडं लक्ष जात नाही.
परिणामी, वेळही कळत नाही. एवढंच
काय, या भक्तिसुखात तहान-
भूकदेखील हरपून जाते.
आषाढी एकादशीच्या दिवशी
विठुरायाला भेटण्यासाठी वारकरी शेकडो मैलांचं अंतर
पायी कापतात. या वारीतून त्यांना काय मिळतं?
भजनानंदात ‘स्व’चंही विस्मरण होतं आणि वारकरी
हरिरूप होतो, असंच उत्तर द्यावं लागेल.खरंतर पंढरीच्या
वाटेवर पहिलं पाऊल घराबाहेर टाकलं की प्रतिकूलतेला
सुरवात होते; पण वारकरी या प्रतिकूलतेलाच अनुकूलता
मानतो आणि वाटचाल करतो. व्यावहारिक
जीवनातली प्रतिकूलता ही आध्यात्मिक जीवनातली
अनुकूलता ठरत असते! त्यामुळं वारीतल्या कोणत्याही
परिस्थितीला तोंड देण्याची वारकऱ्याची तयारी
असते.
अनेकांना पायी चालण्याची सवय नसते; त्यामुळं चालून
चालून त्यांच्या पायाला फोड येतात. पायाच्या
या जखमांकडं दुर्लक्ष करीत वारकरी हरिरंगात नाचतात,
तेव्हा...
‘देवा आता ऐसा करी उपकार।
देहाचा विसर पाडी मज।।
तरीच हा जीव सुख पावे माझा।
बरवे केशीराजा कळो आले।।’
या संतवचनाची अनुभूती येते.
वारीतलं स्नान ही एक मजेशीर घटना म्हणावी लागेल.
घरी अत्याधुनिक साधनांनी युक्त असणाऱ्या
स्नानगृहात स्नान करणारा
वारकरी वारीत जेव्हा टॅंकरखाली थंड पाण्यानं स्नान
करताना दिसतो, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटतं. ते
स्नान तरी कसलं? चार-दोन तांबे अंगावर पाणी पडतं न
पडतं तोच दुसरा माणूस वरच्या बाजूला नळाला तांब्या
लावतो. तेव्हा स्नान करणारा त्याला म्हणतो, ‘‘अहो
माउली, थोडं पाणी पडू द्या ना माझ्या अंगावर.’’
अशी घटना समजा घरी किंवा सार्वजनिक नळावर
घडली तर? एखाद्या बाईनं हंडा भरायला लावला असेल
आणि दुसऱ्या बाईनं त्यावर आपली कळशी भरायला
लावली तर...? तर ती पहिली बाई दुसऱ्या बाईला
‘माउली’ म्हणेल? म्हणेल असं वाटत नाही. वारीतच हे
चित्र पाहायला मिळतं. या ठिकाणी अहंतेचं विस्मरण
घडतं!
वारीच्या वाटेवर प्राप्त परिस्थितीनुसार
भोजनव्यवस्था असते, तरी वारीतलं जेवण रुचकर लागतं.
कारण, त्यात भक्तिरस असतो! घरी जेवणाचा
साग्रसंगीत बेत असला आणि जेवताना दाताला खडा
लागला, तर मुद्रा त्रासिक होते. बडबड केली जाते.
वारीत दुपारच्या जेवणाला बहुधा माळावर,
झाडाखाली बसावं लागते. पत्रावळीवर भात वाढला
गेला आणि समजा त्याच वेळी सोसाट्याचा वारा
सुटला तर धुळीनं भाताचा रंगच बदलतो. तरी ‘माउली’
असा घोष करत जेवण आनंदानं पार पडतं. या ठिकाणी एक
अनुभव टिपण्यासारखा आहे. भजनानंदात वारकरी
जेवणाची ‘चव’ विसरलेला असतो.
‘काय खातो आम्ही कासाया सांगाते।
नेणो हे लागते मुखी कैसे।।’
रसनेवर विजय मिळवणं सोपं नाही. वारीत हे सहज शक्य
होतं. पंढरीच्या वारीतला सर्वांत मोठा विधी
कोणता असेल? तर तो म्हणजे एकमेकांच्या पाया पडणं हा
होय.
‘पंढरीसी लोकां नाही अभिमान।
पाया पडे जन एकमेका।।’
वारीत चालणारा प्रथम वर्ग अधिकारी जेव्हा
त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या
शिपायाच्या पायाला हात लावतो, तेव्हा त्या
अधिकाऱ्याला आपल्या पदाचा विसर पडलेला असतो.
वारीत चालत असणारी सासू नकळत सुनेच्या पाया
पडताना दिसते, तेव्हा त्या सासूला आपल्या
‘सासूपणा’चे आणि खाष्ट स्वभावाचे विस्मरण होतं!
‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म।
भेदाभेद भ्रम अमंगळ।।’
या तत्त्वप्रणालीनुसार वारकरी जेव्हा एकमेकांच्या
पाया पडतात, तेव्हा त्यातून जी सुंदर फलश्रुती बाहेर येते,
तिचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं आहे.
‘निर्मळ चित्ते झाली नवनीते।
पाषाणा पाझर फुटती रे।।
वर्ण-अभिमान विसरली याती।
एक एका लागतील पायी रे।।’
या ठिकाणी वारीतली समता पाहायला मिळते.
वारीतली निवासव्यवस्था तंबूत असते. आलिशान
बंगल्यात कदाचित शांत झोप लागणार नाही; मात्र
एरवी गादीवर झोपणारी माणसं तंबूत साध्या
बारदानावर शांत झोपी जातात, तेव्हा मानसिक
शांतीचा साक्षात्कार वारीतच प्राप्त होतो. आज
एखाद्या कर्मचाऱ्यानं एखादं घर विकत घेतलं, तर बॅंकेचे हप्ते
सेवानिवृत्तीपर्यंत भरावे लागतात. वारीत रोज नवा
‘बंगला’! सायंकाळी तंबू ठोकायचा आणि सकाळी
झोपेतून उठल्यावर पाडायचा आणि पुढच्या
वाटचालीला प्रारंभ करायचा. यातून...
‘वस्तीकर वस्ती आला।
प्रातःकाली उठोनि गेला।
तैसे असावे संसारी।
जोवरी प्राचीनाची दोरी।।’
अशी संतबोधाची अनुभूती येते.
वारीमध्ये वार आठवत नाहीत, त्यामुळं अनेकांचे
आठवड्याचे उपवासही विसरल्याची उदाहरणं आढळतात.
न्याहारी झाल्यावर लक्षात येतं, की आज सोमवारचा
उपवास होता! या विसरण्यातही एक आगळावेगळा आनंद
दडला आहे. दिनांक आठवत नाही. हातातल्या
घड्याळाकडं लक्ष जात नाही. परिणामी, वेळही कळत
नाही. एवढंच काय, या भक्तिसुखात तहान-भूकदेखील
हरपून जाते.
‘तुका म्हणे जीवा
थोर जाले सुख।
नाठवे हे भूक
तहान काही।।’
सर्वांत मोठं दुःख क्षुधा आणि तृषेचं आहे. या आनंदवारीत
या दुःखाचं विस्मरण होतं. पंढरीच्या वारीमधे
अशक्यप्राय असणाऱ्या गोष्टी सहजच घडून जातात.
तेव्हा...
‘ते या पंढरीसी घडे’
असंच म्हणावं लागतं.
एकवेळ मनुष्य (माझं) विसरतो मात्र ‘मी’ विसरणं अतिशय
अवघड असतं. वारीच्या या आनंदकल्लोळात वारकऱ्यांचा
‘मी’ हरवून जातो. अशा अवस्थेचं वर्णन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर
महाराजांच्या शब्दांत सांगायचं झालं, तर...
‘मी, माझी ऐसी आठवण।
विसरले जयाचे अंतःकरण।
पार्था तो संन्यासी जाण।
निरंतर।।’
काषायवस्त्र परिधान न करताही वारकरी संन्यासी
होतो. तो पांढऱ्या वस्त्रातला संन्यासी म्हणावा
लागेल.
पंढरीच्या पायी वारीची सांगता श्रीविठ्ठलदर्शनानं
होते. आपल्या घरातून निघालेला वारकरी शेकडो मैल
चालत येतो. दमतो, भागतो मात्र भक्तितेजानं उजळतो.
चंद्रभागेत स्नान करतो. भक्त पुंडलिकरायाचं दर्शन घेतो.
पंढरी क्षेत्राची नगरप्रदक्षणा करतो. पाच-पंचवीस तास
बारीत उभा राहून ‘श्री’च्या राउळात प्रवेश करतो
आणि समोर ‘श्रीविठ्ठला’ची निळीसावळी मूर्ती
दिसते.
‘श्रीहरी’दर्शनानं त्याच्या जीवनाचे सार्थक होतं.
भागशीण निघून जातो. डोळ्यांतले आनंदाश्रू गालावर
ओघळतात. ओघळलेल्या अश्रूतून त्याचा ‘स्व’
श्रीविठ्ठलचरणी समर्पित होतो!

- श्रीगुरु महंत प्रमोदमहाराज जगताप , सुपे -बारामती

दै सकाळ , सप्तरंग पुरवणी पृष्ठ क्र ०४,१२

(संपूर्ण महाराष्ट्र आवृत्ती )