Tuesday 22 November 2016

माझ्या माउलींची विरहीणी


पडलें दूर देशी मज आठवे मानसीं ।
नको नको हा वियोग, कष्ट होताति जिवासी ॥ १ ॥
दिनु तैसी रजनी जालिगे माये ।
अवस्था लावूनी गेला, अझुनी का न ये ॥ २ ॥
गरुडवाहना गुणगंभिरा, येईगा दातारा ।
बापरखुमादेविवरा, श्रीविठ्ठला ॥ ३ ॥

वरील अभंगामध्ये माउलींनी आपल्या आयुष्यातील अशाच एका नाजूक क्षणाचे वर्णन केले आहे. ते म्हणत आहेत: ‘तुझ्यापासून दूर गेल्याने तुझी आठवण मनात प्रकर्षाने येत आहे. हा वियोग अतिशय कष्टदायक असून मनापासून नकोसा वाटत आहे (१). हे करुणासागर माते, मला आता दिवस रात्रीसारखा वाटत आहे (माझे सर्व जिवन उध्वस्त झाले आहे), ही अवस्था झालेली असतानासुध्दा तू अजून का येत नाहीस? (भक्‍ताच्या आर्त हाकेला तात्काळ धावून येण्याच्या ब्रीदाची आठवण ठेवून माउली भगवंतांना अशी हाक देत आहे!) (२). अरे सर्वगुणसंपन्न असलेल्या गरुडा, तू भगवंतांचे वाहन आहेस तर आता तू तरी उदार हो आणि माझ्यापाशी श्रीविठ्ठलांना घेऊन ये (३).’

बघा, माउलींचे मन विरहवेदनेने किती वेडेपिसे झालेले आहे! जो गरुड भगवंतांच्या आज्ञेशिवाय आपले पाय पुढे ठेवित नाही अशा सेवकाला जबरदस्तीने भगवंताला आपणाजवळ आण अशी विनवणी करण्यास ते तयार झाले आहेत. जेव्हा मनाची अवस्था केविलवाणी झालेली असते तेव्हा ‘बुडत्याला काडीचा आधार’ या न्यायाने आपण कितीही अशक्य असलेल्या गोष्टींचा आधार घेतो तशीच अवस्था प्रत्यक्ष माउलींची झालेली आहे. श्रीसंत तुकाराम महाराजसुध्दा आपल्या ‘गरुडाचे पायी, ठेवी वेळोवेळां डोई’ या अभंगामध्ये गरुडाला, लक्ष्मीला आणि शेषाला विनवणी करतात की तुम्ही तरी भगवंताला माझ्याजवळ आणा. संतांच्या या सकृतदर्शनी विरोधाभासी वर्तनावरुन ते किती व्याकुळ झाले असतील याची थोडीफार कल्पना करण्याचा प्रयत्‍न आपण करु शकतो. आपल्या हातात एवढेच आहे कारण त्यांच्या मनःस्थितीची आपणास जाणीव होणे निव्वळ अशक्य आहे!

शेवटी या अभंगाकडे बघताना एक गोष्ट लक्षात घ्या की माउलींना झालेली विरहवेदना आपल्या दृष्टीने एक क्षणभरही टिकलेली नसणार. परंतु त्यांच्या मनाच्या पराकोटीच्या संवेदनशीलतेमुळे तो अत्यल्पकाळसुध्दा त्यांना नकोसा वाटतो. दुःखाचे मोजमाप ते कितीकाळ टिकले यावर करायचे नसते, तर त्याने मनात किती खोल जखम झाली आहे यावर करायचे असते हे आपण नजरेआड करु नये.


वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र 

Varkariyuva.blogspot.in

समाधी सोहळ्याच्या प्रत्येक दिवसाचे वर्णन व महत्त्व पुढील प्रमाणे ...!

दि  २२ नोव्हेंबर ते  २९ नोव्हेंबर २०१६
जो नवमीचा उत्सव करेल तो विष्णुरूप होईल
जो दशमीचा उत्सव करेल तो सत्वर निजधामला जाईल
जो एकादशीचा उत्सव करेल तो सर्व जनांचा उद्धार करेल
जो द्वादशीचा उत्सव करेल तो संत ज्ञानेश्वरांच्या पदाला जाईल
जो त्रयोदशीचा उत्सव करेल तो भजनाच्या द्वारा आपला उद्धार करेल .
जो चतुर्दशीचा उत्सव करेल व अमावस्येला काला करेल त्याचा नक्कीच उद्धार झाला असा निश्चय करावा. पुढे भगवंत म्हणतात , " नामदेवा , या आळंदीचा महिमा शैव शास्त्रात ( स्कँद पुराणात) आला आहे ." हे ऐकून सर्व संतांस आनंद होऊन त्यांनी जयजयकार केला .

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र
Varkariyuva.blogspot.in

श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा वर्णन ...!


विठोजी म्हणे ज्ञानदेवा। तुझी विश्रांती मज ठेवा।
ते मुराली आमचीया भावा। निःसंदेह॥
कैसे समाधान ज्ञानदेवा। अलंकापूरी समाधी ठेवा।
विठ्ठल वोळला वोल्हावा। नित्यरुप समाधी॥
संत करिती महा खेद। म्हणती ज्ञानांजन सिध्द।
मग चालले विद्वद। अलंकापुरी॥
महावल्ली वृक्ष अजान। तो निक्षेपिला पूर्णघन।
मग विठोजी म्हणे आपण। ज्ञानदेवांसी॥
धन्य धन्य ज्ञानेश्वरा। पुण्यभूमी समाधी स्थिरा।
कृष्ण पक्षी तुज निर्धारा। भेट देत जाईन॥
कार्तिक शुध्द एकादशी। पंढरियात्रा होईल सरिशी।
दुसरी कृष्णपक्षी निर्धारेसी। तुज दिधली असे॥
हे ऐकोनी संतजनी। जयजयकार केला ध्वनी।
दिंडी पताका मेळ गगनी। सुमने वर्षताती॥
नामा म्हणे आले वैष्णव। अलंकापुरी मिळाले देव।
समाधीसुखे ज्ञानदेव। बैसते जाहले॥

(संत नामदेव महाराज गाथा क्र - ९७६)

-----------------------------------------------------

मंगळमूर्ति सुखधामा । भक्तांचिया कल्पद्रुमा ।
निवृत्तीचिया पुरुषोत्तमा । नमो तुज ॥१॥
विद्यासागरा वैरागरा । संकटीं माउली ज्ञानेश्वरा ।
भरित दाटलें अंबरा । तो तूं योगेश्वरा मोक्षदायी ॥२॥
मति चालविली रसाळ । संत श्रोतिया केला सुकाळ ।
दिधलें पुरुषार्थाचें बळ । तें तूं केवळ संजीवन ॥३॥
अमृतानुभव आनंदलहरी । ग्रंथ सिद्ध केला ज्ञानेश्वरी ।
संस्कृत प्राकृत वैखरी । वदविली माझी ॥४॥
आतां मोक्षाचिया वाटा । पाहिला षड्रचक्र चोहटा ।
आज्ञा द्यावी वैकुंठा । ज्ञानदेव म्हणे ॥५॥

-----------------------------------------------------

आतां पदपदांतराची सेवा । संपादिली स्वामी केशवा ।
धन्य आमुचिया दैवा । जोडिलां तुम्ही ॥१॥
आत्मविद्या बोलावया कारणें । सुख पावले श्रोते सज्जन ।
आतां जें आरंभिलें मनें । तें आपण सिद्धि न्यावें ॥२॥
भूवैकुंठ एक पंढरी । ल्याहूनि आगळी आळंकापुरी ।
सिद्धेश्वरा शेजारीं । इंद्रायणी ॥३॥
त्रिपुटी पश्चिम मोक्षाची वाट । प्रत्यक्ष कैलास सिद्धपेठ ।
गोपाळपुरीं केलीं गोष्ट । चौघीजणी ॥४॥
नलगे कलियुगींचा वारा । जें जें बोलिलों जगदोद्वारा ।
मागितला थारा । पदीं तुझ्या ॥५॥
आतां वैराग्याचें बळ । सिद्धि प्राप्तीचें फळ ।
ज्ञानदेवें घेतली आळ । जाणा स्थळ आवडीचें ॥६॥
अष्टोत्तरशें तीर्थें सारीं । ओघें आलीं आळंकापुरीं ।
वाद्यें वाजताती गजरीं । कीर्तन लहरी अमृताची ॥१॥
जैसा कस्तुरीचा सुगंधु । अनुभवी न म्हणतीच बद्धु ।
तैसा औटपिठाचा नादु । आठवी गोविंदु आवडीनें ॥२॥
बौद्ध अवतार चक्रपाणि । सत्रावी कळा माय रुक्मिणी ।
जाणत असे अंतःकरणीं । भक्त इच्छा ॥३॥
भावें विठठलें केली गोष्टी । ज्ञानदेवें अपूर्व इच्छिलें पोटीं ।
जावें उठाउठीं । समुदायेंसी ॥४॥

-----------------------------------------------------

विठठल रुक्मिणीसहित गरुड हनुमंत । आणिक संत महंत जमा जाले ॥१॥
परिसा भागवत नामा पुंडलिक । पताकासहित उठावले ॥२॥
गंधर्व आणि देव आले सुरगण । चाललीं विमानें आळंकापुरीं ॥३॥
लहान थोर सारे आले ऋषीश्वर । उतरले भार वैष्णवांचे ॥४॥
नामा म्हणे देवा दिसती तांतडी । जाती मज घडी युगा ऐसी ॥५॥

-----------------------------------------------------
हरिहरविधाता आले आळंकापुरीं । इंद्रायणी तीरीं एक थाटी ॥१॥
योगियांचा सखा कोठें ज्ञानेश्वर । जाती ऋषीश्वर भेटावया ॥२॥
शून्याचिया पोटीं निरंजन गुंफा । ज्ञानयज्ञ सोपा सिद्ध केला ॥३॥
उन्मनीं निद्रा लागलीसे फार । स्वरुपीं ज्ञानेश्वर जागा जाला ॥४॥
नामा म्हणे देवा भली देली बुद्धी । लागली समाधि ज्ञानदेवा ॥५॥

-----------------------------------------------------

लागली उन्मनी वैराग्याचे धुणी । जागा निरंजनीं निरंतर ॥१॥
भूचरी खेचरी चाचरीच्या छंदें । अगोचरीच्या नादें सहस्त्र दळीं ॥२॥
औटहातध्वनी चित्तवृत्ती जेथें । उजळली ज्योत चैतन्याची ॥३॥
नामा म्हणे देवा करा सावधान । नाहीं देहभान ज्ञानदेवा ॥४॥
धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार । धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥१॥
धन्य भागिरथी मनकर्णिका वोघा । आणिक हो गंगा त्रिवेणी त्या ॥२॥
धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग । मिळाले ते सांग आळंकापुरीं ॥३॥
नामा म्हणे धन्य भाग्याचे हे संत । जाला पहा एकांत ज्ञानोबाचा ॥४॥

-----------------------------------------------------
पंढरीचा पोहा आला आलंकापुरीं । पंच कोसावरी साधुजन ॥१॥
पांडुरंगा संगें वैष्णवांचे भार । दिंड्या ते बाहेर निघाल्यस ॥२॥
पताकांचे भार निघाले बाहेर । भेटती ऋषीश्वर पांडुरंगा ॥३॥
अवघिया भेटी जाल्या त्या बाहेरी । मग आळंकापुरी येते जाले ॥४॥
सोपानानें मग केला नमस्कार । उतरिले पार पांडुरंगा ॥५॥

-----------------------------------------------------
कैलासासा वास अधिक सिद्धबेट । विष्णूचें वैकुंठ पुरातन ॥१॥
भूमीवरी पंढरी तैसी आळंकापुरी । पंच कोशावरी पुण्यभूमी ॥२॥
सुखाची हे मूर्ति नीलकंठलिंग । चक्रतीर्थ सांग मोक्ष भेटे ॥३॥
परमार्थ सुअर्थ देखतांची संत । सांगितली मात अनुभवाची ॥४॥
नामा म्हणे देवा हें स्थळ चांगलें । चित्त मन रंगलें ज्ञानोबाचें ॥५॥

-----------------------------------------------------


वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र 

Varkariyuva.blogspot.in

श्रीक्षेत्र पंढरपूर येथील कार्तिक वारी वृत्त ...!

शके १२१८ कार्तिकवारीचे संत ज्ञानेश्वरांच्या दिंडीचे वर्णन एका अभंगात आले आहे .

कार्तिक एकादशी । पोहा मिळाला पंढरीसी ।।
येथील महिमा वर्णू कैसी । ब्रह्मादिका न वर्णवे ।। ०१
दिंड्या गरुडटक्यांचे भार । मृदूंग वाजती अपार ।।
वैष्णव नाचती जय जय कार । नादे अंबर गर्जतसे ।।०२
बरवे समतुल्य वाळुवंट । वरी वैष्णव मिळाले घनदाट ।।
करिती हरिनामाचे बोभाट । वीर उदभट विठ्ठलाचे ।।२३

संत नामदेव गाथा अभंग क्र ४२६ व ४१९ (श्रीसकलसंतगाथा)

संत ज्ञानेश्वर आता लवकरच समाधी घेणार असल्याने सर्वच देशातून त्यांचे शेवटचे दर्शन व कीर्तन ऐकण्यास जिकडून तिकडून लोक आले होते व सर्व संत ही कार्तिकीच्या वारीला आले होते. असे सर्व संत वाळवंटात गोळा झाले असता संत नामदेवाना वाटले , आपण या संतांच्या भेटीस जाऊन आलिंगन द्यावे .
धाऊनिया मिठी घालीन संत चरणी । सांगेन वचनी मनिचे गुज ।। १।।

एकादशीचे कीर्तन संत ज्ञानेश्वरांनी केले . हे त्यांचे शेवटचे कीर्तन होते . त्यांच्या किर्तनास लाखो लोक जमले होते . द्वादशीचे क्षिरापतीचे कीर्तन संत नामदेवांनी केले.या यात्रेस कबीरही आले होते . नामदेवमहाराज असले म्हणजे ज्ञानेश्वरमहाराज त्यांनाच किर्तनास उभे करीत असत. तसेच याही वेळी संत नामदेव किर्तनास उभे राहिले व ज्ञानेश्वर स्वतः टाळ घेऊन उभे राहिले.सर्व संत मंडळीही टाळ घेऊन उभी राहिली . सर्व श्रोते व भक्तगण बसून कीर्तन ऐकू लागले. टाळ मृदूंग एका तालात वाजत होते . त्यामुळे कीर्तनाला खूपच रंग आला जनाबाई म्हणतात ' ज्ञानदेवा ! आता तुम्ही एक अभंग म्हणा .' जनाबाईंच्या म्हणण्यावरून ज्ञानेश्वरमहाराजांनी अभंग म्हटला तेव्हा खूपच रंग भरला . त्यामुळे देव देहभान विसरून प्रेमाच्या भरात नाचू लागले , त्यात त्यांचा पितांबर गळून पडला . तेव्हा कबीर महाराज म्हणतात , देवा सावध व्हा.'

एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी । माझा ज्ञानराज गोपाळाशीं लाह्या वाटीं ॥१॥
नामदेव कीर्तन करी पुढें नाचे पांडुरंग । जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग ॥२॥
अभंग बोलतां रंग कीर्तनीं भरिला । प्रेमाचेनि छंदें विठ्ठल नाचु लागला ॥३॥
नाचतां नाचतां देवाचा गळाला पितांबर । सावध होई देवा ऐसा बोले कबीर ॥४॥
साधु या संतांनीं देवाला धरिला मनगटीं । काय झालें म्हणुनी दचकले जगजेठी ॥५॥
ऐसा कीर्तन महिमा सर्वांमाजीं वरिष्ठ । जडमूढ भाविका सोपी केली पायवाट ॥६॥
नामयाची जनी लोळे संताच्या पायीं । कीर्तन प्रेमरस अखंड देईगे विठाई ॥७॥
(संत जनाबाई गाथा अभंग क्र  २६५)

तेव्हा ज्ञानोबांनी देवाचे मनगट धरले व पितांबर नेसा असे सांगितले . नंतर ज्ञानेश्वरांनी काल्याचा अभंग म्हणून सर्व संत मंडळीस काला वाटला.
काला करिती संतजन । सवे त्यांच्या नारायण।।
वाटी अपुल्या निजहस्ते। भाग्याचा तो पावे येथे ।।
लाही सित लागे हाती । दोष देखोनिया त्या पळती ।।
निळा म्हणे क्षीराचा बुंद । लागता पावे ब्रह्मानंद ।।

हा पंढरपूरला शेवटचा काला वाटून ज्ञानेश्वर समाधी मागण्यास पांडुरंगाच्या मंदिरात जातात.

संत ज्ञानेश्वरांच्या जीवनात भक्तीचे खूप सोहळे झाले . भक्तिज्ञानाचा आनंद त्यांनी पूर्ण घेतला व हजारो लोकांस कृतार्थही केले. तसेच भावी पिढीकरिता श्री ज्ञानेश्वरी , गाथा , हरीपाठादी १९ ग्रँथ व पंढरीची वारी , भजन , कीर्तन , दिंडी , हरिजागर , काला इत्यादी साधने करून ठेवली . शहाणे लोक काम संपल्यावर राहत नाहीत . संत ज्ञानेश्वरमहाराज व मुक्ताबाई आदी भावंडे कृतकार्य झाली होती . त्यामुळे त्यांनी आपली शरीरयात्रा संपवावी , अशी इच्छा झाली व समाधी मागण्याकरिता पांडुरंगाच्या मंदिरात आले व दर्शन करून म्हणाले -

ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी । समाधानी तूंचि होसी ।
परी समाधी हे तुझपाशी । घेईन देवा ।।१।।
नलगे मज भुक्ती । नलगे मज मुक्ती ।
तुझ्या चरणीं आर्ती । थोर आथी ।।२।।
या प्रमाणे प्रार्थना केल्यावर देव - भक्तांचा बराच संवाद झाला. ज्ञानेश्वर महाराज समाधी मागतात , हे ऐकून नामदेवास फार दुःख झाले.

नामा उभा असे सन्मुख । एकता थोर खेद दुःख ।
म्हणे ज्ञानांजन महासुख । समाधी मागतसे ।। ८।।

(नामदेव महाराज गाथा ९७४)
पांडुरंगाने संत ज्ञानेश्वरांचे म्हणणे ऐकून घेतले व सांगितले की , तुम्ही आता लवकर अलंकापुरी जावे व येत्या वद्य त्रयोदशीस समाधी घ्यावी . याप्रमाणे पांडुरंगाची आज्ञा घेऊन ही भावंडे ताबडतोब आळंदीला गेले.

श्रीक्षेत्र पंढरपूर हुन संत श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान झाले आता पाहू आळंदी येथील वर्णन ..

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र
Varkariyuva.blogspot.in

हुतात्मांच्या परिवारासह कृतज्ञता सोहळा ...!