Tuesday 5 July 2016

आपल्याला सद्‍गुरूचा आधार वाटावा. - श्री महाराज

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।
  
वेळप्रसंग येईल तसे वागणे उचित आहे, आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये. परमात्म्याच्या चिंतनात मन गुंतले असताना अवांतर गोष्टींचा परिणाम त्यावर होत नाही. जेवढे झेपेल तेवढेच करावे. अभ्यास करावा पण काळजी न करता. सर्वस्वी भार भगवंतावर ठेवून निवांत असावे. आपल्या मनाचे स्वास्थ्य बिघडू न देता आनंदात रहावे. वृत्ती आवरून आवरत नाही; ती परमात्म्याकडे लावली म्हणजे आवरते. राम‍इच्छेने सर्व चालते असे लक्षात ठेवावे. संकट, आनंद, दोन्ही भगवंताला सांगावीत. ज्या स्थितीत भगवंताने ठेवले त्या स्थितीत समाधान मानावे.

अंतःकरणात सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागते. तीर्थयात्रा आणि साधुसंतांची भेट हेच ते निमित्त होय. श्रीरामचंद्रही तीर्थयात्रेला जाऊन अनेक संतांची दर्शने घेऊन आले. संतांच्या अहंकाराला जिवंत राहताच येणार नाही. कारण 'परोपकार' करायला लावणार 'पर'च ठिकाणावर नाही, तर मग 'दुसर्‍याकरिता मी काही केले' ही भावना व्हायला आधारच कुठे राहिला ? विषयाच्या लालसेने सत्समागम करणे हा खरा सत्समागम नव्हे. संत कधीकधी आपल्याला विषय देतात खरे, पण एकंदरीत आपल्याला विषयाचा वीट आणण्याचाच त्यांचा प्रयत्‍न असतो. संताच्या घरी नुसते पडून राहिल्यानेही शुद्ध भाव येईल. भगवंताच्या नामातच संतसंगती आहे, कारण नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे. विषयाची ऊर्मी हे मायेचे स्मरण होय, आणि नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय. तपश्चर्येचे सर्वांत शेवटचे फळ काही असेल तर परमेश्वराच्या ठिकाणी अनन्यभावाने शरण जाण्याची बुद्धी होय. ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे. एकदा शरण गेल्यावर आपण उरूच शकत नाही; त्यालाच शरणागती म्हणतात; आणि हीच परमार्थातली अत्यंत श्रेष्ठ गती आहे. आपण आपल्या सद्‍गुरूचे आहोत असे छातीठोकपणे सांगत चला. काही नाही केलेत तरी चालेल, पण आपले सद्‍गुरू आपल्या मागेपुढे आहेत अशी दृढ भावना असावी. मला सुखदुःख दोन्ही नाहीत. पण तुम्ही दुःखी झालात तर मला दुःख होते. तेव्हा तुम्ही मनाला दुःखच होऊ नये असे वागा. प्रपंची माणसाच्या दुःखाची मला पूर्ण जाणीव आहे. ती जाणीव ठेवूनच 'भगवंताचे नाम घ्या' असे मी सांगतो. जे मी सुरुवातीला सांगितले तेच शेवटी सांगतो; तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका.
तुम्ही नुसते नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो.

- varkariyuva.blogspot.in

आपली सुखदुःखे श्रीरामाला (विठ्ठलाला) सांगा.- श्री महाराज

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।
   
तुम्ही सर्वजण छान सेवा करता आहात याबद्दल शंका नाही. अशीच सेवा अखंड चालू ठेवा, त्यातच कल्याण आहे. त्यानेच आपण तरून जाऊ. जरी कुणी काहीही सांगितले, 'ह्यात काय आहे, त्यात काय आहे, ह्याने काय होणार आहे,' असे म्हटले, तरी तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढी थोडीच आहे. तो फार मोठा आहे, अमर्याद आहे, त्याला पहायला तशीच सेवाही फार मोठी करायला पाहिजे. त्याला पाहण्यासाठी तशी मोठी शक्तीही आपल्याला लागेल. अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने दिव्य दृष्टी देऊन दर्शन घडविले. ती दिव्य दृष्टी आपल्याजवळ नाही, पण ती मिळविण्याची शक्ती आपल्याजवळ आहे. भक्तीची प्रगती ही खरी शक्ति; आणि त्याकरिता अखंड नामस्मरण हेच खरे साधन. श्रीरामप्रभू आपल्या घरातला कुणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा. त्याला तुम्ही आपली सुख-दुःखे सांगा. दिवसाकाठी एकदा तरी रामापुढे उभे राहून त्याला अनन्यभावाने शरण जा; दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख दूर होईल. आपले ज्ञान, शक्ति, वैभव, सत्ता, त्याच्यापुढे काहीच नाहीत. तेव्हा या सर्वांचा विसर पाडून, त्याला शरण जा, आणि त्याच्याजवळ प्रेम मागा. "देवा ! आम्ही जे तुझे दर्शन घेतो ते सर्व बाह्य स्वरूपाचे; तुझे आम्हाला खरे दर्शन घडव. आम्ही अवगुणसंपन्न असू, तुझे दर्शन व्हावे एवढी सेवा आमच्याजवळ नाही, परंतु तू आता आम्हाला क्षमा कर. यापुढे देवा, कितीही संकटे येवोत, आमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही तुझ्या नामात आनंदाने भोगू. जे काही व्हायचे असेल ते होऊ दे, आमचे समाधान टिकून तुझ्या नामात आमचे प्रेम राहील एवढी तुझी कृपा असू दे."

खरोखर, परमेश्वर भक्ताचे मन पाहतो, त्याचा भाव पाहतो; एरव्ही तो त्याच्याजवळच असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला, परमेश्वर जवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते. आपल्याला दोन मार्ग आहेत; एक श्रद्धेचा, आणि दुसरा अनुभवाचा. एका गावी पायवाटेने गेले तर फक्त तीन मैलांचे अंतर, आणि मोटारच्या रस्त्याने गेले तर दहाबारा मैलांचे अंतर. श्रद्धा ही त्या पायवाटेसारखी आहे. तिने चालले तर अंतर कमी पडेल. मोटारीचा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग. मोटार कुठे रस्त्यात बिघडली, किंवा वाटेत कुठे अडथळा आला, की प्रगती थांबते; त्याप्रमाणे अनुभवात काही चुकले की प्रगती खुंटते. तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करावा. सद्‍गुरूच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने आणि प्रेमाने नाम घ्यावे.भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वांत मोठा उपकार होय.

- varkariyuva.blohspot.in