Monday 1 February 2016

सर्व विश्वाच्या कल्याण्यासाठी संतांचा अवतार असतो. - ह.भ.प.श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर


।। ज्ञानेशो भगवान विष्णु ।।

साध्य

जगात तीन प्रकारचे लोक जन्माला येतात. एक, जन्माला
येतात अणि काही विशिष्ठ साध्य प्राप्त न घेता तसेच
मरतात. दोन, जन्माला येऊन काही साध्य ठरवितात
अणि प्रयत्नपूर्वक त्याची प्राप्ती करुन घेतात. तीन,
साध्य ठरवूनच जन्माला येतात.
पहिला प्रकार हा अज्ञानी जीवांचा आहे. हे केवळ कर्म
आहे म्हणून जन्माला येतात. त्यांना काही ज्ञान
उद्दिष्ट साध्य ठरवता येत नाहीत. केवळ आयुष्य आहे म्हणून
जिवंत राहतात. किड्या मुंग्यांचे , गाढव वगैरे
प्राण्यांना जसे जीवन तसेच यांचे जीवन. दुसरा प्रकार
हा साधकाचा आहे. जन्माला आल्यानंतर बुध्दीच्या
मर्यादेमध्ये जे साध्य त्यांना योग्य वाटते, ते
डोळ्यासमोर ठेवतात अणि प्रयत्नपूर्वक ते प्राप्तही करुन
घेतात. प्रत्येकाची आवड, क्षमता, मर्यादा , संस्कार,
यावर प्रत्येकाचे साध्य अवलंबून असले. ते आपापल्या परीने
ते प्राप्त करुन घेण्याचा प्रयत्न करीत असतात. अनि हा
तिसरा वर्ग संतांचा आहे. ते साध्य ठरवूनच येत असतात.
एखादा सरकारी अधिकारी एखाद्या ठिकाणी
बदली हो ऊन आला तर त्याला नोकरी, घर वगैरेची
चिंता नसते. त्याचे सर्व तयार असते. त्याप्रमाणे संतांचे
सर्व तयार असते. कोठे जन्माला यायचे, काय व कसे
करायचे हा सर्व विचार ठरलेला असतो. त्यांना सर्व
प्राप्त झालेले असते. यावर कोणी म्हणेल, जर त्यांचे सर्व
तयार असते तर, तर जन्माला येण्याची गरज काय? कारण
ते स्वत:साठी जन्माला येतच नसतात, त्यांचा जन्म
आपल्यासाठी असतो.सर्व विश्वाच्या
कल्याण्यासाठी संतांचा अवतार असतो. आपले साध्य
कसे असावे , आपले जीवन इतरांसाठी खर्च कसे करावे
याचा आदर्श लोकांसमोर निर्माण व्हावा म्हणून ते
साध्य-साधनाचा विचार सांगतात. तसे साध्य आपण
डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. ते मोठेपणाचे !

अयं निज: परोवित गणना लघुचेतसाम।
उदार चरितणांतु वसुधैव कुटुम्बकम॥

- ह.भ.प.श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर , पंढरपूर

स्वार्थ म्हणजे नेमकं काय ? - श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर

।। ज्ञानेशो भगवान विष्णु ।।

स्वार्थ

माणसाला स्वत:चे वर्णन ऐकायला फार आवडते. देहभान
विसरुन माणुस स्वत:चे वर्णन ऐकत असतो. वर्णन करणारेही
पुष्कळ असतात. आपणास एखाद्याकडून काही प्राप्ती
होणार आहे असे कळले, की माणूस त्यांचे वर्णन करतोच. पण
त्या वर्णनात यथार्थता असतेच असे नाही. वर्णन दोन
प्रकारचे असते , एक यथार्थ अणि दुसरे अयथार्थ! यथार्थ
वर्णन ज्ञानातुन होते अणि अयथार्थ वर्णन गरजेतून ! वर्नन
करणे हा जरी अनेकांचा स्वभाव असला, तरी ते वर्णन
योग्य असेलच असे नाही. पूर्वीच्याकाळी राजेमहाराजे
आपल्या दरबारी स्तुतीपाठक ठेवत असेत. राजाचे वर्णन
वस्तुस्थितीला धरुन केलेले असेलच असे नाही. आजही पैसे
देऊन स्वत:चे वर्णन करवून घेणारे लोक आहेतच.
वर्णनाचे मूल्य; कोणाचे वर्णन केले जाते, वर्णन करणारा
कोण अणि वर्णनाचा विषय यावर ठरत असते. काही तरी
गुण असल्याशिवाय वर्णन होत नाही. ज्याचे वर्णन
करायचे, तो खरोखरच गुणवान आहे का? याचा विचार
केला पाहिजे. दुसरे वर्णन करणारा कोण आहे याचेही
चिंतन केले पाहिजे. कारण एखादा भिकारी रुपया भीक
देणार्याचे "कर्णाचा अवतार" म्हणून वर्ण करतो.
भिकारी एखाद्याचे वर्णन करतो याला मूल्य नाही.
एखादा श्रीमंत श्रीमंताचे वर्णन दानशुर असे करतो
याला मुल्य आहे. कारण ते ओळखुन जाणीवपुर्वक केलेले आहे.
आपण ज्ञानेश्वरमहाराजांचे वर्णन करतो यातुन त्यांचे
मोठेपण सिध्द होत नाही. नामदेवमहाराज,
तुकाराममहाराज त्यांचे जे वर्णन करतात, त्यातून
त्यांचा मोठेपणा कळतो... म्हणुन वर्णन करणारा कोण
आहे हे पाहिले पाहिजे अणि तिसरे, वर्णनाचा विषय
काय, यावरुनही त्याचे मूल्य ठरते. सदगुणांचे वर्णन झाले तर
योग्य अन्यथा ‘अमुक अमुक चोरी फार सफाईने करतो...’
असे वर्णन योग्य नाही! वर्णन सदगुणाचेच असावे. तरते
महत्वाचे ठरते. पण सध्याची स्थिती वेगळीच आहे.
वर्णनासाठी आवश्यक या तीनही गोष्टींचा विचार
सध्या होत नाही. सुभाषिताने गमतीने म्हटले आहे.
उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गदर्भा: ।
परस्परं प्रशंसन्ति अहो रुपं अहो ध्वनि: ॥
( उंटाच्या लग्नात गाढवाने गायन केले. दोघांनी
एकमेकांच्या रुपाची व आवाजाची प्रशंसा केली. उंटाचे
रुप , गाढवाचा आवाज...!! सध्या असेच नाही का? )

- ह.भ.प.श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर , पंढरपूर

Varkariyuva.blogspot.in