Friday 12 August 2016

इतिहास - श्री विठ्ठल रुखुमाई मंदिर ओवे गाव , ता.पनवेल , जि.रायगड

श्री विठ्ठल रुखुमाई मंदिर ओवे गाव - खारघर सेक्टर ३० , नवी मुंबई
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर , ओवे ,ता.पनवेल , जि.रायगड ( नवी मुंबई ) या मंदिराचा यंदा १०४ वे वर्ष सोहळा मोठ्या उत्साहने दि.८ ऑगस्ट २०१६ ते १५ ऑगस्ट २०१६ या कालावधीत संपन्न होत आहे
सन १९१२ साली श्रावण शुद्ध एकादशीस या मंदिराची स्थापना झाली आणि या मंदिराने वारकरी संप्रदायात एक इतिहास घडविला . नुकतच चार वर्षांपूर्वी जुने मंदिर जीर्ण झाल्याने शतक महोत्सवा दरम्यान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला . या मंदिराचा इतिहास फारच उद्बोधक असल्यामुळे त्याचा परिचय सर्वाना होणे आवश्यक म्हणून हा पंक्ती प्रपंच !
ओवे गावातील संत विभूती श्री शंकर मास्तर हि आगरी समाजाला लाभलेली एक विभूती होती .शंकर मास्तर उर्फ मास्तर काका हे व्यक्तीमत्त्व पाहिलं कि , त्यांचे जीवन या विशिष्ट कार्यासाठीच होते असे म्हणावे वाटते .मास्तर काकांनी प्रपंच यथासांग केला , उच्च कोटीचा परमार्थ व सामाजिक बांधिलकी ठेऊन अनेक रंजलेल्यांची अखंड सेवा केली . विठ्ठल मंदिराची स्थापना करून काकांनी समाजाला परमार्थाचा आदर्श घालून दिला आहे .
१०४ वर्षापूर्वी ओवे हे लहानसे खेडे होते आणि अशा गावात काका हे सधन शेतकरी म्हणून राहत होते .भातशेती बरोबर काका कशी मळ्याची लागवड करत असे . आंब्याच्या मोठ्या बागा होत्या . काका रोज सकाळी शेतावरून जाऊन येत व दुपारी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांच्या सामाजिक कार्यात मग्न असत .के.इ.एम. हॉस्पिटल मध्ये काकांची चांगलीच ओळख होती . त्या ओळखीमुळे अनेकांना हॉस्पिटलमधून विनामुल्य उपचार काका करून देत असत . प्रपंचाबरोबर विठ्ठल मंदिराच्या सेवेत काका सदैव दंग असायचे . काकांचा परमार्थिक अभ्यास , वाचन ,चिंतन मोठे होते . अनेक साधूंच्या सानिध्यात ते राहिले . सदैव सेवा परायण , विनम्र , हात जोडून पायाला हात जोडून वाकून नमस्कार करून पायाला हात लावून अभिवादन करणे हा काकांचा स्वभाव होता . मुखात सतत हरी हरी या भगवंत नामाचा जप तर विहिरीचे गार पाणी न गुळाचा खडा त्याच्या हातावर ठेवणार . आलेला पाहुणा जेवल्याशिवाय कधीच गेला नाही , हे काकांच्या गृहस्थाश्रमाचे वैशिष्ट्य होते . काकांच्या घरी अखंड अन्नदान हे यज्ञाप्रमाणे चालू असयाचे . अशा विभूतीचे कार्य पाहू .
|| श्री विठ्ठल मंदिराची स्थापना ||

तळोजे गाव त्याकाळी सर्व खेड्यांची बाजारपेठ होती . तळोज्याला अप्पा , आबा अमृते हे सधन सुवर्णकार कुटुंब सुवर्ण व्यवसायाबरोबर परमार्थाची आवड असल्यामुळे त्यांच्या माडीच्या ओटीवर भजन , पूजन होत असे . संत साधू नेहमीच येत जात असे . अमृते कुटुंबीय व्यवसाया बरोबर शेतीही करत असत . त्यांची शेते ओवे , पापडीचा पाडा , इनामपुरी या भागात असल्यामुळे त्यांचा आणि मास्तर काकांचा परिचय होऊन ते एका परिवारासारखे राहिले . काका सात्विक आणि देवभक्त , साधू संतांची आवड त्यामुळे काका नेहमी आबा अप्पांच्या सानिध्यात असत . आळंदी पंढरपुरच्या वारीला जात . काकांचे दुसरे घर म्हणजे तळोज्याचे अमृते यांचे घर होते .
आबा , अप्पा अमृते यांचे गुरु सद्गुरू श्री.विश्वनाथमहाराज उर्फ वामनमूर्ती नेहमी तळोज्यास यायचे . तळोज्याला आल्यानंतर ज्ञानेश्वरी , भागवत , भजन , पुजन चाले . त्यावेळी शंकर मास्तरही येत असत .काकांची यातून संगत व सत्संगाची आवड वाढत गेली व त्यांनीही सद्गुरू श्री.विश्वनाथमहाराज यांच्याकडून वारकरी पंथाची दीक्षा व अनुग्रह घेतला . पुढे काकांना असे वाटले कि , आपल्या हातून श्री विठ्ठलाची अखंड सेवा व्हावी म्हणून ओवे गाव येथे विठ्ठल मंदिर बांधण्याचा विचार केला . ओवे गावात त्या काळी कोणतेही मंदिर नव्हते . आबा , अप्पा , सद्गुरू विश्वनाथमहाराज आणि काकांचे इष्ट मित्र परिवार या सर्वांच्या सहमताने विठ्ठल मंदिर बांधण्याचे ठरले आणि श्राव्न्न शुद्ध एकादशी सन १९१२ मध्ये श्री विठ्ठल रखुमाई मंदिराची स्थापना झाली आणि ओवे परिसरात पंढरीचे वैभव प्राप्त झाले . दिवसेंदिवस मंदिराची महती वाढत गेली व ओवे गावचा उत्सव हा फार मोठ्या प्रमाणात होऊ लागला .
|| विठ्ठल मंदिराचे वैभव आणि कार्य ||

प्रती पंढरपूर म्हणून हा ओवे गावचा उत्सव त्या काळात खूप गाजला होता . पावसाला असूनही ओवे येथे एकादशीला भाविकांची खूप गर्दी असायची .बेलापूर पट्टी , उरण , खोपटे , तळोजे पंचक्रोशी , डोंबिवली , ठाणे , नाशिक , आळंदी , पंढरपूर , देहू येथून संत महात्मे , कीर्तनकार , प्रवचनकार येत . त्यांचे कीर्तन , प्रवचन ऐकण्यासाठी भाविकांची रीघ लागायची .सद्गुरू श्री राजाराम महाराज उर्फ देव प्रवचन सेवेसाठी बेलापूरहून मुद्दाम या उत्सवासाठी अखंड ५० वर्षे येते होते .रात्री सद्गुरू विश्वनाथमहाराज यांचे सुश्राव्य कीर्तन होई . त्या काळात एवढे चांगले श्रवण फक्त या मंदिरातून मिळत असे .
|| संगीत भजन महोत्सव ||
या ओवे गावातील उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील संगीत भन कलावंत भजनासाठी आवर्जून यायचे . त्या काळात अत्यंत लोकप्रिय असलेले श्री.तुळशीरामबुवा , साटमबुवा , शिवरामबाबा , भाटकरबुवा , स्वमिबुवा , जनार्दनबुवा , नामदेवबुवा असे दिग्गज कलावंत एकादशीच्या सेवेत हजेरी लावत असत . त्यांची भजने ऐकायला तुडूंब गर्दी होत असे . विठ्ठल मंदिर नाम गजराने दुमदुमत असे . एका वेळेला तीन तीन ठिकाणी भजने होत असे . असा भजनाचा आनंद कुठे हि पहावयास मिळणार नाही .
|| श्री विठ्ठल मंदिराच्या सेवेतील परिवार ||
वै.शिवराम बगल्या म्हात्रे : शिवराम दादा म्हणजे काकांचा पुतण्या , पण काकांचा पुत्र शोभत होता . काकांच्या तालमीत शिवराम दादा परिपूर्ण तयार झाले . रोज सकाळी देवळात काकडा , संध्याकाळी हरिपाठ - भजन हि सेवा शिवराम दादांनी केली होती . व्यवहार , पाहुणा , साधू संतांचे आदरातिथ्य अशी सर्व सेवा दादाने अत्यंत निष्ठेने व आदराने केली . काकांच्या आज्ञेत राहून शिवराम दादा यांनी प्रपंच व परमार्थ दोन्ही साधले . काकांची परंपरा अतिशय उज्ज्वल अशी पुढे चालवली .
वै.सीताबाई शंकर म्हात्रे : काकांच्या सेवेत अखंड राहून - आप्त इष्ट , पाहुण्यांना सामोरे जावून सीता काकीनी प्रपंचात उणीव भासू न देता परमार्थिक भक्तांचीही फार सेवा केली . शेतीची कामे करताना त्यांनी विठ्ठलाच्या भक्तांची अपार सेवा केली .
वै.सीताबाई शिवराम म्हात्रे : शिवराम दादांची अर्धांगिनी म्हणून जन्मभर कुटुंबाची व मंदिराच्या सेवेत रमल्या . सासूबाई सीता काकींच्या बरोबर अखंड सेवेत त्यांनी जीवन धन्य केले . रामकृष्णाला सांभाळून त्याला प्रपंचात सुखी ठेवले . रामकृष्ण यांचा परिवार आज हि मंदिराच्या सेवेत आहे .
श्रीमती इंदुबाई शिवराम म्हात्रे : या श्री.मोहनजी यांच्या मातोश्री सीताकाकींच्या दुसऱ्या सुनबाई यांनी त्यांच्यानंतर सर प्रपंचाचा भार आपल्यावर घेतला . सर्व मुला बाळांना मोठे करून मंदिराची सेवा त्या मनोभावे करत आहेत .हि भावी पिढी सुना , नातवंड , अखंड विठ्ठल मंदिराच्या सेवेत रमलेली आहेत .
अमृते परिवार : काकांची सर्वस्वी आधारस्तंभ व अंतकरण पूर्वक संबंध होते , ते अमृते परिवाराशी अप्पा , आबा व मथुरा अक्का ( कारेकर ) यांच्याशी रोजच काहीना काही कारणानी गाठ भेट होत . सिताकाकी आणि त्या महिला यांना मथुरा अक्कांचा फार मोठा आधार वाटे . काकांच्या प्रापंचिक तथा परमार्थिक उत्कर्षामध्ये अमृते मंडळी फार मोलाची आहेत . हीच परंपरा पुढे त्यांच्या पिढीने म्हणजे अरुण कारेकर , जगदीश अमृते , आबा अप्पांची मुल मुली सर्वानीच प्रेमाने जपली व विठ्ठल मंदिराची सेवा केली , करीत आहेत .
|| ओवे परिसरातील समाज श्रेष्ठींचे मंदिराशी योगदान ||
त्या काळात मुरबीचे काशिनाथ शेठ , खारघरचे तुकाराम पाटील रांजणपाड्याचे चौधरी , रोहिंजनचे हाल्या पाटील , जोमा पाटील , खुटूक बंधन , इनामपुरी , पापडीचा पाडा या बरोबर तळोजे मजकूरचे दादू पाटील , रामदासबुवा , पेठालीचे नामदेव शेठ किरवलीचे नारायणशेठ आदी समाजातील श्रीमंत व मान्यवर मंडळीं काकांशी घनिष्ठ संबंध होते .
||याजसाठी केला होता अट्टाहास | शेवटचा दिवस गोड व्हावा ||

काका ( ओवे ) गावाच्या स्मशानात २ दिवस जात होते व स्मशानातील काटे - कुटे काढत . गवत साफ केले . काकांना विचारले हे काय करता ? " अरे बाबा कुणी गेला तर लोकांना यायला रस्ता तरी पाहिजे ना !" बांधावर गवत वाढल आहे . स्मशानात केवढे गवत - चिखल . म्हणून हे सगळ करतोय ." काकांनी वाढलेल्या तुळशीच्या कुडांच्या जुड्या बांधून ठेवल्या . पताकांना ध्वजा लावल्या . ताल - पखवाज व्यवस्थित केले . आणी ३ दिवसांनी काकांनी निर्वाण केले . स्वताचे निर्वाण त्यांना कळले होते . त्यांनी स्वताच सर्वाना त्रास नको म्हणून सर्व जय्यत तयारी करून ठेवली होती .ताल दिंड्यांच्या गजरात एका गुरुभक्ताची , समाज श्रेष्ठीची , गोर गरीबांचा कैवारी , विठ्ठल भगवंताचा परमभक्त निजधामाला गेला . तो दिवस भाद्रपद शु. चतुर्थी गणपतीचा पहिला दिवस . प्रत्येक वर्षी गणपतीच्या दिवशी काकांचे सहज सहज स्मरण होते .
' गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी ' काकांनी समाजाला खूप काही दिले . त्यांचे हे कार्य परत यांच्या माध्यमातून शेठ म्हात्रे व त्यांचे बंधू नवीन मंदिराच्या रूपाने उभे राहिले आहे . त्या पुण्यपुरुषाच्या चरणी साष्टांग दंडवत ! यंदा महारष्ट्रातील अनेक नामांकित कीर्तनकार प्रभूती या उत्सवात ज्ञानदान करणार आहेत त्यात प्रामुख्याने ह.भ.प.सर्वश्री सुरेशमहाराज जाधव सातारा , धर्मराजमहाराज हंडे , संजयमहाराज धोंडगे , अनिलमहाराज पाटील , माधवदासमहाराज राठी , योगीराजमहाराज गोसावी , ज्ञानेश्वरमहाराज कराळे , रविंद्रमहाराज हरणे यांचा समावेश आहे . श्री जयेंद्र म्हात्रे तथा तालमणी प्रतापजि पाटील यांचे शिष्य मंडळ कीर्तनास उपस्थित राहणार आहेत . तरी सर्व भाविकांनी या १०४ व्या वर्षातील कीर्तन महोत्सवात सहभागी व्हावे व परमार्थिक आनंद लुटावा . ओवे गावच्या श्री विठ्ठल मंदिराला पूर्वीचे भक्तीचे वैभव पुन: मिळवून द्यावे या करिता आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय !
संकलन : अक्षय चंद्रकांत भोसले
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

श्री विठ्ठल रुखुमाई मंदिर ओवे - खारघर उत्सवामधील हरिपाठ तथा संकीर्तन ( दिवस ५ वा )

|| ज्ञानेशो भगवान विष्णु: ||
















श्री विठ्ठल रुखुमाई मंदिर ओवे - खारघर
अखंड हरीनाम सप्ताह २०१६
वर्षे - १०४ वे
वसुदेव कुटुंबकम अध्यात्मपीठ नितळस व सद्गुरू वामनबाबा गोशाळा हरिपाठ मंडळ यांचा अतिशय सुंदर हरिपाठ व ह.भ.प.भागवताचार्य माधवदासमहाराज राठी, नाशिक यांची कीर्तन सेवा संपन्न !