Friday, 18 September 2015

" समाजप्रबोधनपर कार्यक्रमांना सार्वजनिक गणेश मंडळांचा फाटा "

।। श्री गुरु ।।

पूर्वी सार्वजनिक गणेश मंडळांकडे समाज प्रबोधनपर
कार्यक्रमाची रेलचेल असायची. मात्र, गेल्या काही
वर्षांत जनजागृतीच्या कार्यक्रमांवर भर न देता लाखो
रुपये खर्च करून वेगवेगळ्या मंदिराच्या व राजवाडय़ांच्या
प्रतिकृती आणि देखावे तयार केले जात आहेत. शिवाय
सजावट, रोषणाईवर जास्त भर दिला जात आहे. देखावे
आणि सजावटीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात
कोटय़वधी रुपये खर्च होत आहे.
गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हटले की सार्वजनिक गणेश
मंडळात नकला, नाटक, वाद्यवृदांचा कार्यक्रम, कीर्तन,
भजन, वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन,
चित्रपट आदी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक
कार्यक्रमांची रेलचेल असायची आणि त्याचा आनंद
वस्तीतील लोक घेत होते. राष्ट्रहितास्तव लोकमान्य
टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि
केसरीच्या माध्यमातून या उत्सवाला आकार देण्याचा
प्रयत्न केला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक,
वैचारिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून
समाजातील विविध पातळीवरील माणसे एकत्र आली
आणि काही विशिष्ट विचार रुजविण्याचा प्रयत्न
करण्यात आला. १८९३ मध्ये सुरू झालेल्या गणेशोत्सवाचे
स्वरूप करमणूक आणि उत्सव प्रधान झाले होते.
गणेशोत्सवात कुठले कार्यक्रम आहेत हे जाणून घेण्यासाठी
अनेक लोक गणेशोत्सव मंडळाच्या निमंत्रण पत्रिकांची
वाट पाहात होते. आज मात्र पत्रिका असल्या तरी
त्याचा उपयोग केवळ विविध कंपन्याच्या
जाहिरातीसाठी केला जातो आणि कार्यक्रमांचा
मात्र त्यात लवलेश नसतो. विविध देखावे तयार
करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात असून त्यासाठी
मुंबई आणि कोलकाताच्या कारागिरांना बोलविले
जाते. त्यांची किमान पंधरा दिवस राहण्याची,
खाण्याची व्यवस्था मंडळातर्फे केली जाते आणि
त्यांना लाखो रुपये दिले जातात. दहा दिवस देखावे
पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असली तरी
लोकमान्य टिळकांचा जो उद्देश होता त्या उद्देशाचे
काय हा प्रश्न अनुत्तरीत आहे. थोडा विचार करा आणि आपणच पहा उत्तर काय येत ते ?

- अक्षय भोसले
०८४५१८२२७७२
varkariyuva.blogspot.in

तुका म्हणे शोधून पाहे । विठ्ठल गणपती दुजा नोहे ।।

|| श्रीगुरू || 

सध्या सबंध महाराष्ट्र भक्तीमय  वातावरणात आहे जिकडे तिकडे ढोल ताशे गुलालाची उधळण ! 


आपणास तर माहीतच आहे कि सकल संतानी भगवंताविषयी त्याच्या रूपाविषयी अनेक ग्रंथात वर्णन केले आहे . जो मूळ आदी आहे असा ओमकार हा गणेशाचे रूप आहे हे सांगताना तुकराम महाराज म्हणतात " ॐकार प्रधान रूप गणेशाचे " . ज्या प्रमाणे आपणा सर्वांस अस वर्षभर वाटत असत कि कधी आपले बप्पा पुन्हा घरी येणार रोज रात्रीची आरती मग सारे एकत्र आलेले पाहुणे आणि एकंदर कुटुंबासमवेतचे आनंदाचे १० दिवस आणि सारीच ती आतुरता अगदी अशी आतुरता श्री संत तुकाराम महाराजां आदि संताना हि होती मात्र  श्री संत तुकाराम महाराजां  करिता विठ्ठल जळी स्थळी पाषाणी मग गणरायात विठुरायाच रूप पाहिलं तर नवल नसावे अगदी गणराया तू लवकर ये सगळ्यांना भेट दे तू विघ्नहर्ता आहेस , तू नाचत ये आमच्या घरी आणि अस बरच काही सांगणारा हा अभंग  - 
गणराया लवकर येई भेटी सकलासी देई ।।
अंगी शेंदुराची उटी केशर कस्तुरी लल्लाटी ।।
पायी घागु-या वाजती नाचत आले गणपती ।।
अवघ्या गणांचा गणपती हाती मोदकाची वाटी ।।
तुका म्हणे शोधून पाहे  विठ्ठल गणपती दुजा नोहे ।।

, आमच्या  मासिकाच्या सहकारी जयश्री पाटीलजी यांच्या घरी असणारे गणराया पाहिले  आणि अहो खरच पटल शोधा म्हणजे सापडेल , सार कुटुंब वारकरी आहे आणि अगदी गणरायाला हि पाहिलं तर साक्षात वाटत कि आज विठूराया गणेशाच रूप घेऊनच घरी आलेत , अगदी मस्तकावर धारण केलेला मुकुट , कानातली मकराकार कुंडलांपासून ते पिवळा पितांबरा गगनी झळकला पर्यंत विठूराया AS IT IS फारच आनंद वाटला हे मनमोहक रूप पाहून आणि मग चरण आठवल " तुका म्हणे शोधून पाहे  विठ्ठल गणपती दुजा नोहे ।।"  ( गणेश मूर्ती फोटो सौजन्य - जयश्री पाटील )


आणि असेच महाराजांचे श्री गणराया संदर्भातील  काही अभंग पुढे देत आहोत

धरुनिया फरश करीभक्तांची विघ्ने वारी ।।
ऐसा गजानन महाराजा त्याला नमस्कार माझा ।।
शेंदूर शमी बहु प्रिय त्याला तुरा दुर्वांचा शोभला ।।
उंदीर असे ज्याचे वाहन माथा जडित मुकुट पूर्ण ।। 
नाग यज्ञोपवीत रुळे शुभ्र वस्त्र शोभी साजरे ।।
भाव मोदक हारा भरी तुका भावे पूजा करी ।।

जगद्गुरू तुकोबारायांनी असेही लिहिले आहे.

सिध्दीकांता चिंतामणी माझी एका विनवणी ।।
घडो गणेशाचा संगमनी रंगो बुध्दारंग ।।
चराचरी गजानन माझे पाहोत नयन ।।
मायबापा सखया तुका वंदीतो मोरया ।।

विठ्ठल आणि गणेश हे दो्ही एकच आहेत असे तुकारामांनी म्हंटलेले आहेच, सर्व देव एकच आहेत असे सांगतांना संत नामदेवांनी आपल्या अभंगात असे लिहिले आहे.

गणेश म्हणू तरी तुझाची देखणा म्हणूनि नारायणा नमन तुज ।।
सारजा नमू तरी ते तुझी गायनीम्हणूनि चक्रपाणी नमन तुज ।।
वेद नमू तरी तुझाचि स्थापिता म्हणूनि लक्ष्मीकांता नमन तुज  ।।
नामा म्हणे भेटी भेटी झाली पै राया कोण गणो कोण गणो वा या सेवकासी ।।नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे ।
माथा शेंदुर पाझरे वरी वरी दुर्वांकुराचे तुरे ।
माझे चित्त हरे मनोरथ पुरे देखोनि चिंता नुरे ।
गोसावीसुत वासुदेव कवी रे या मोरयाला स्मरे ।।
आज हि नमन आमच्या पवई च्या श्री  दुर्वाप्रीय गणेश मंदिरात नियीमित आरती प्रारंभी आमचे श्रीकांत गुरुजी कायम म्हणतात एकंदरच गणेशाचे किती सुंदर वर्णन या श्लोकात अभंगात  केले आहे .हे  गणराया आमच्या महाराष्ट्रावर यंदा दुष्काळाचे सावट आहे , अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत , बप्पा तू साऱ्यांच ऐकतोस ना ? मग यंदा आम्हा वारकरी वर्गाच ऐक ना रे ! माझा बळीराजा सुखावू दे एकदाचा पाउस होऊन जाउदे , आणि महत्त्वाच  म्हणजे दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारयणा ... हे जग सुखी व्हावे इतकच रे मागण तुझ्या चरणी !   


वारकरी संप्रदाय युवा मंचच्या वतीने आपणा सर्वांस गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! 

आपला ,
अक्षय  चंद्रकांत भोसले  - ०८४५१८२२७७२  
varkariyuva.blogspot.in