Saturday 30 January 2016

भूतकाळाचे स्मरण , वर्तमानाची जाणीव अणि भविष्याचे चिंतन यालाच विचार म्हणतात. - ह.भ.प. श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर

।। ज्ञानेशो भगवान विष्णु ।।

विचार

एका मानसशास्त्रज्ञाने असे म्हटले आहे की माणसाने
दोन गोष्टींचा विचार नेहमी करावा, आपल्याला
काय करायचे आहे; अणि आपण काय करतो आहोत. यातून
आपल्या उद्दिष्टांचा विचार माणसाच्या मनात
कायम राहतो. त्याचा विसर पडत नाही. दुसरे, आपण
वर्तमानातही जगतो, वर्तमानाचाही विचार केला
जातो.व्याकरणाच्या दृष्टीने काळ तीन प्रकारचा
आहे.अणि या तीनही काळाचा मानवी जीवनाशी
संबंध आहे. माणूस केवळ एका काळात जगू शकत नाही. केवळ
भूतकाळात तो रमला तर त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल
होणार नाही. पण त्याचबरोबर तो भूतकाळ संपूर्णत:
विसरुही शकत नाही. केवळ वर्तमानातही तो जगू शकत
नाही. जरी कोणी वर्तमानात जगा म्हणून सांगत असेल
तरई विचारी माणूस नेहमीच वर्तमानात जगणार नाही.
त्याला भविष्यावर दृष्टी ठेवावीच लागेल. कारण
वर्तमानकाळातील परिणाम भविष्यकाळातच
आकाराला येतील अणि विचारी मनुष्य परिणामाचा
विचार नक्कीच करेल.केवळ भविष्यकाळाच्या चिंतनात
तो रमणार नाही. केवळ भविष्याचा विचार म्हणजे ते
कदाचित स्वप्न ठरेल. विचारी माणसाच्या बाबतीत हे
संभवणारच नाही.विचारवान मनुष्य तीनही काळाचा
विचार करीत असतो. किंबहुना तीनही काळाचा
विचार करतो त्यालाच विचारी म्हणतात. भूतकाळाचे
स्मरण , वर्तमानाची जाणीव अणि भविष्याचे चिंतन
यालाच विचार म्हणतात. अणि तसे झालेच तरच आपले
उद्दिष्ट आपणास प्राप्त होईल. भूतकाळाच्या स्मरणाने
वर्तमान निश्चित होईल अणि वर्तमानाच्या जाणिवेने
भविष्य उज्ज्वल होईल. हा विचारच मानवाला
समाधान देईल. म्हणून विचारवंतांनी किंवा
संतमहात्म्यांनी विचार करा म्हणून सांगितले आहे. श्री
तुकाराम महाराज म्हणतात -
विचारावाचुन । न पाविजे समाधान ।।

- ह.भ.प.श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर,पंढरपूर