Friday 30 September 2016

नवरात्र महोत्सव , श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर - पंढरपूर

अवश्य श्रवण सुखाचा लाभ घ्यावा .

ब्रह्मचित्कला श्रीसंत मुक्ताबाईंची जयंती तथा श्रीसंत तुकाराममहाराजांच्या शिष्या श्रीसंत बहेणाबाई शिऊरकर यांची पुण्यतिथी - अश्विन शुद्ध प्रतिपदा !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू : ||
आज घटस्थापना. शारदीय नवरात्राचा प्रथम दिन.

अश्विन शुद्ध प्रतिपदा ही शरद ऋतूची सुरुवात म्हणून या नवरात्राला " शारदीय नवरात्र " म्हणतात. शार म्हणजे ज्ञान. ते देणारी ती शारदा. त्या भगवती जगदंबा शारदेचे नवरात्र म्हणूनही हे शारदीय नवरात्र होय.
       भगवती जगदंबा ही आमची माता आहे. माता हीच बाळाचे सर्वस्व असते. जगाचे मातृवत् भरण पोषण करणारी, विकास करणारी, ज्ञान देणारी, सर्व आपत्तींमधून सांभाळ करणारी, आमच्या सुख-दु:खांमध्ये सहभागी होणारी, आनंदाच्या प्रसंगी पाठीवर कौतुकाची थाप मारणारी व चुकल्यास आमच्या शाश्वत हिताचा विचार करून शिक्षाही करणारी, आम्हाला लौकिक व पारमार्थिक वैभव प्रदान करणारी, अशी अनंत रूपे धारण करणारी ही आमची जगदंबाआई खूप विलक्षणच आहे. तिच्या विषयी विनम्रभावाने कृतज्ञता व्यक्त करण्याचा व तिच्या प्रेमाचा अधिक गहिरा आस्वाद घेण्याचा हक्काचा काळ म्हणजेच शारदीय नवरात्र होय.
     अश्विन शुद्ध प्रतिपदा श्रीज्ञानेश्वर-भगिनी ब्रह्मचित्कला श्रीसंत मुक्ताबाईंची जयंती, तशीच श्रीसंत तुकाराममहाराजांच्या शिष्या श्रीसंत बहेणाबाई शिऊरकर यांची पुण्यतिथी .
      श्रीसंत मुक्ताबाई यांचा अवतार शके १२०१ प्रमाथीनाम संवत्सर , अशीव्न शुद्ध प्रतिपदा ( दोन प्रहरी ) सायंकाळी शुक्रवारी झाला . चित्रानक्षत्र तिसरा चरण ता.१२ ऑक्टोंबर १२७९ .ज्या शक्तीचा अवतार मुक्ताबाई रूपाने झाला , तिचे वर्णन श्रीमद्भागवतात दहाव्या स्कंदात योग मायेच्या रूपाने केले आहे . जिला दुर्गा , भद्रकाली , विजया , वैष्णवी , कुमुदा , चंडिका , कृष्णा , माधवी ,  कन्यका , माया , नारायणी , इशानी , शारदा व अंबिका अशी महाविष्णुने चौदा नावे दिली आहेत .त्या योग मायेचा अवतरा ' श्रीसंत मुक्ताबाई ' . संत मुक्ताई ह्या तिन्ही देवांच्या जननी आहेत असे संत निळोबाराय म्हणतात -
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी | आद्यत्रय जननी देवाचिये ||
संत जनाबाई असे निर्देशित करतात -
आदि शक्ती मुक्ताबाई | दासी जनी लागे पायी ||
निरंजन माधव असे म्हणतात -
शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेवो पाही |
सोपान तो ब्रह्मा मूळमाया मुक्ताई ||
हे चित्कळाचि अमुते दिसते कुमारी |
जिच्या प्रभेसी तुळणा न पवे तमारी ||

" मुक्ताख्या ब्रह्म चित्कला " याप्रमाणे मूळमाया म्हणा , आदिशक्ती म्हणा , किंवा सद्रूप , चिद्रूप , आनंदरूप जे ब्रह्म त्यांपैकी चिद्रूप म्हणजे चित्कला  तोच मुक्ताईचा 'अवतार' आहे . सत्पद ते ब्रह्म 'चित्पद ते माया' | आनंद पदी जया म्हणती हरी ||

व दुसरे महत्त्वपूर्ण असे कि  श्रीसंत तुकाराममहाराजांच्या शिष्या श्रीसंत बहेणाबाई शिऊरकर यांची आज पुण्यतिथी
            प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराज आवर्जून म्हणत की, " प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी बहेणाबाईंचा गाथा वाचावा, अभ्यासावा, इतका तो महत्त्वपूर्ण आहे !"
श्रीसंत बहेणाबाईंनी आपल्या अभंगांमधून त्यांचे पूर्वीचे तेरा जन्म स्पष्ट करून सांगितलेले आहेत. तसेच फार गूढ व अलौकिक अनुभूतीही त्या अगदी सहज सांगून जातात. प्रपंच परमार्थ चालवी समान | तिनेच गगन झेलियेले || या अभंगात त्यांनी यशस्वी स्त्रीची लक्षण नेमक्या शब्दात सांगितल आहे .

- ज्ञानदा
varkariyuva.blogspot.in