Thursday 30 June 2016

वै.सद्गुरु मामासाहेब दांडेकर स्मृती पुरस्कार ने पूज्य गुरुवर्य .मारोतीबाबा कुरेकर यांचा स.प.महाविद्यालया तर्फे गौरव !

श्री संत ज्ञानेश्वर माऊली पुण्यनगरीत .....!

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

श्री संत ज्ञानेश्वर माऊली पुण्यनगरीत .....!
संपूर्ण पुणे उतरले रस्त्यावर फक्त माऊली नामाचा गजर .. "श्री माऊलीं" चे उदया सकाळी ६ वाजता
सासवड कडे प्रस्थान...!!
पुणे येथील मुक्काम : भवानी पेठ , पुणे

(आळंदी ते पुणे प्रवास दरम्यान वारकरी भाविकांच्या भजनाचा भोजनाचा व साराच आनंद अभूतपूर्व त्यातील काही निवडक प्रसंग )
श्रीगुरु पु. प्रमोदमहाराज जगताप यांनी या साऱ्या प्रसंगाचे संतांच्या एकाच वचनात वर्णन केले ते असे की , वैष्णवांचे घरी मांडीला पाहुणचार । नामाचा ओगर रात्रंदिवस ।।

फोटो साभार : 

*वारकरी संप्रदाय युवा मंच - पुणे टीम*

उच्च शिक्षित व अभ्यासक अर्थात वारकरी संप्रदाय युवा मंच अध्यात्म आणि विज्ञान यांचा अद्भुत संगम

Photo by *मा.श्री रमाकांत गायकवाड जी M.Sc. & सवाई गधंर्व महोत्सव , पुणे गायक*
मा. मेघा तांगडे , BE Computer
मा. गायत्री गायकवाड Phd. विद्यार्थी संगीत
मा. शशी काटे - उद्योजक
विशेष सहकार्य : संस्थान कमिटी व मा. चोपदार .
- Varkariyuva.blogspot.in

विशेष नोंद कृपया ( 👏🏻,👌🏻,👍🏻,💐 धन्यवाद !  ECt पोस्ट पाहिल्यावर  अस काहीच पाठवू नका विनंती !  )

Sunday 26 June 2016

श्री क्षेत्र देहू प्रवेश द्वार

गतगुरू श्री संत तुकाराम  महाराजांना पंढरपूर वारी करता निरोप देणार  !

वारीच्या अपडेट्स बद्दल "दैनिक - महाराष्ट्र टाईम्स" ने घेतलेली दखल !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

महाराष्ट्र टाईम्स आपण दखल घेतल्या वारीच्या अपडेट्सच्या माध्यमातून आजच काही तासांत ५०० हुन अधिक लोक या सेवेचा लाभ घेत आहेत . धन्यवाद .
- Varkariyuva.blogspot.in

श्री जगतगुरू संत तुकाराममहाराज श्रीक्षेत्र देहू येथून भूवैकुंठ पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवणार !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु:।।

श्री तुकोबाराय चैतन्य

आज श्री जगतगुरू संत तुकाराममहाराज श्रीक्षेत्र देहू येथून भूवैकुंठ पंढरीच्या दिशेने लाखो भाविकांच्या भजनानंदात प्रस्थान ठेवणार !

आपल्या सद्गुरूंच अर्थात श्री संत तुकाराम महाराज यांचं सार्थ वर्णन केलेली संत निळोबारायांद्वारे लिखित आरती -
प्रपंच रचना सर्वही भोगुनि त्यागिली ।
अनुतापाची ज्वाला देह बुद्धी हरविली ।
वैराग्याची निष्ठा प्रगटूनि दाखविली ।
अहंता ममता दवडूनि निजशांती वरीली ॥१॥
जय जयाजी सद्गुरू तुकया दातारा ।
तारक तू सकाळांचा जिवलग सोयरा ॥धृ ॥
हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला ।
विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडूंनि दाखविला ।
जगदोद्धरालागी उपाय सुचविला ।
निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला ॥ जय ॥२॥
तेरा दिवस वह्या रक्षूनिया उदकी ।
कोरड्याची काढूनि दाखविल्या शेखी ।
अपार कविता शक्ति मिरवूनि इहलोकी ।
कीर्तनश्रवणे तुमच्या उद्धरती जन लोकी ॥ जय ॥३॥
बाळवेष घेउनि श्रीहरी भेटला ।
विधिता जनिता तोचि आठवा हा दिधला ।
तेणे ब्रम्हानंदे प्रेमा डोलविला ।
न तुके म्हणोंनि तुका नामी गौरविला ॥ जय ॥४॥
प्रयाणकाळी देवे विमान पाठवविले ।
कलीच्या काळामाजी अद्भुत वर्तवविले ।
मानव देह घेऊनि निजधामा गेले ।
निळा म्हणे सकळ संता तोषविले ।
जय जयाजी सद्गुरू तुकया दातारा ॥ तारक ॥५॥

- Varkariyuva.blogspot.in

नियम थोडा करावा, पण तो शाश्वताचा असावा ! - श्री महाराज

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते, त्या झाडाला आपण पाणी घालतो, त्याची मशागत करतो, त्या झाडाकडे लक्ष पुरवितो. परंतु जे झाड वाढू नये असे वाटते, किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही, त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो. तसे, जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल, त्याची जोपासना करावी. देहाकडे, विचारांकडे, विषयांकडे दुर्लक्ष करावे, म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना, त्याला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्याभोवती कुंपण घालावे लागते, त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा; तो जितका गुप्त राहील तितका चांगला. त्याचे प्रदर्शन झाले तर त्याला दृष्ट लागते. म्हणून परमार्थ हा कोणाच्या न कळत, परंतु अत्यंत आवडीने करावा. झाड लावल्यावर ते किती वाढले आहे हे कुणी रोज उकरून पाहात नाही, त्याप्रमाणे अनुभवाच्या, प्रचीतीच्या मागे लागू नका; त्यामुळे प्रगती खुंटेल.

हट्टी आणि व्यसनी माणसे एका दृष्टीने मला आवडतात; कारण त्यांचा हट्ट भगवंताच्या मार्गाला लावला की झाले. परमार्थात नियम थोडाच करावा, पण तो शाश्वताचा असावा; म्हणजे, जेणेकरून भगवंताचे प्रेम लागेल याबद्दलचा असावा, आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा. जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यानमार्ग साधतो. हा मार्ग फार थोरांचा आहे. ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो; त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण वर्षेसुद्धा जातील, पण त्याच्या देहाला काही होणार नाही. आपल्यासारख्याला साधनांत साधन म्हणजे भगवंताचे नाम; दानांत दान म्हणजे अन्नदान; आणि उपासनांत उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय; या तिन्हींमुळे देहाचा विसर पडतो. म्हणून शक्य तो या तीन गोष्टींची कास धरा. मनुष्याची साहजिक प्रवृत्ती व्याप वाढविण्याकडे असते. द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असतो हेही खरे. साधे मधमाश्यांचे उदाहरण घ्या. त्या अनेक झाडांवरून मध गोळा करतात आणि नंतर पोवळ्यात एकत्र करतात. असा एकत्र केलेल्या मधाचा केवढा गोड साठा होऊ शकतो बरे ! अशा रीतीने सर्व द्वैतामध्ये एक अद्वैत, म्हणजे एक राम, पहायला शिकावे; आणि ज्याला सर्वत्र राम पाहणे असेल त्याने स्वतःमध्येच राम पाहून, प्रत्येक कृती ही रामाची समजावी. स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही. तेव्हा स्वतःचा म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही, आणि हा देहाचा विसर राममय झाल्यानेच होईल. म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहा. परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते .
-Varkariyuva.blogspot.in

पूज्य सद्गुरु ह.भ.प.श्रीभानुदासमहाराज देगलूरकर यांचा प्रथम पुण्यतिथी महोत्सव !

पूज्य सद्गुरु ह.भ.प.श्रीभानुदासमहाराज देगलूरकर यांचा प्रथम पुण्यतिथी महोत्सव श्री क्षेत्र पंढरपूर येथे ...!

२६ जुलै २०१६ ते ०२ ऑगस्ट २०१६

मुख्य मार्गदर्शन
श्रीगुरु श्रीप्रसादमहाराज अमळनेरकर  व श्रीगुरु श्रीचंद्रशेखरमहाराज देगलूरकर
कीर्तन भजन मार्गदर्शन - ह.भ.प.श्री रामचंद्रबाबा बोधे .
ज्ञानेश्वरी व्यासपीठ - ह.भ.प.एकनाथमहाराज कोष्टी .

सर्व मुख्य फड परंपरेतील सर्वच मान्यवरांची ३ सत्रांमध्ये ज्ञानदानात सहभाग .
प्रथम सत्र - सकाळचे कीर्तन सेवा
द्वितीय सत्र - सायं.प्रवचने
तृतीय सत्र - रात्रीची कीर्तन सेवा

दि.१ ऑगस्ट २०१६ - गौरवग्रंथ व स्मरणिका प्रकाशन
काल्याचे / समारोपचे कीर्तन - पु.श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर .

स्थळ : संत श्री गजाननमहाराज मंदिर प्राकार , पंढरपूर

भगवंत कृपेने मिळालेल्या आयुष्यातले हे ८ महत्त्व पूर्ण दिवस चुकवू नका. आजच सुट्टयांच नियोजन करा व आमच्या पूज्य सद्गुरु दादांच्या प्रथम पुण्यस्मरण महोत्सवास उपस्थित रहा नम्र विनंती !
- अक्षय चंद्रकांत भोसले
पाईक -  पूज्य देगलूरकर परंपरा

Saturday 25 June 2016

वारीला येताय मग या वस्तू घेतल्यात का ?

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

१) टाळ - प्रत्येकाकडे वैयक्तिक टाळ आवश्यक
२)वारकरी सांप्रदायिक भजनी मालिका
३) किट १
   (१)आपली औषधें (मधुमेह इत्यादी)
   (२) अंगदुखी , डोकेदुःखी
   (३) ताप सर्दी इत्यादी
   (४) वळकुटी - मिनी सतरंजी, त्याच आकाराचा प्लास्टिकचा कागद
   (५)कपड्यांची बॅग
   (६)ताट तांब्या चमचा ect
   (७) मोबाईल चार्जिंगसाठी एखादं एक्स्टेंन्शन बोर्ड असेल तर आपल्या सोबत इतर वारकऱ्यांचीही मोबाईल चार्जिंग सोय होते .
   (८) पुरुषांनी विशेष करून सांप्रदायिक पोषक वापरावा (शुभ्र सदरा धोतर व टोपी)
  (९)कैची , सुई , धागा इत्यादी वेळी प्रसंगी अचानक लागतात .
  ४) जे वारीला प्रथम येत  आहेत त्यांनी शुद्ध पाणीच प्यावं वारीदरम्यान पाण्याची बाटली ५ ते १० रु. उपलब्ध असते .
५)शबनम पिशवी किंवा बॅग - दिवसभराच्या प्रवासादरम्यान सामानाची बॅग अर्थात वळकुटी  ट्रक मध्ये ठेवलेली असते तिची गाठ ही रात्रीच्या मुक्कामवरच होत असते म्हणून शबनम अर्थात लहान बॅग आपल्या सोबत असावी जेणेकरून त्यात भजनी मालिका, टाळ, काही औषधे , पाण्याची बाटली त्यात ठेवता येतील.
६) मुक्कामाच्या ठिकाणी पाणी उपलब्ध झालं तर कपडे धुण्याकरिता लागणारी सामुग्री .
(पाण्याची काटकसर करावी ही विनंती)
७) लहान प्लास्टिकचा कागद .सहसा माऊली विसाव्याला थांबली असता त्यावर आराम करण्याकरिता  बसताही येतं व झोपताही येतं .
८)छत्री किंवा कोट पावसापासून संरक्षण करण्यासाठी .
९) एक मोठी गोण त्यावर ठळक अक्षराने आपले नाव व क्रमांक पत्ता  लिहीलेले असावे त्यात सामानाची बॅग बसेल इतकी मोठी गोण असावी. ती बांधून सामनाच्या ट्रक मध्ये टाकता येते व नंतर शेकडोंच्या सामानातून शोधताना सहज मिळते .
१०) आपल्या नावाच आयकार्ड (ओळखपत्र) आपल्या खिशात ठेवावे दिंडीत गेल्यावर सहसा दिंडी सोडू नये पण कदाचित चुकामूक झाली असता भेट घडावी म्हणून  पहिल्याच दिवशी सहकारी वर्गाचा क्रमांक व दिंडीची पत्रिका सोबत ठेवावी .
११)मौल्यवान वस्तू सोबत आणणे कृपया टाळावे.
१२) एक छान तुळशीची जपमाळ - निवांत वेळी नाम जप करण्यास उपयुक्त
१३) पूजेचे देव व ग्रंथ
१४) हरिपाठाचं पुस्तक सुरुवातीला असावे ज्यांचा पाठ नाही त्यांच्या करिता
वारी पंढरपूरला पोहचेपर्यंत तोही पाठ झालेला असतो .

चला तर मग साऱ्या वस्तू अगदी व्यवस्थित भरून घ्या आणि आता घरी बसुन काय करता? चला पाऊले चालती पंढरीची वाट.

प्रस्थान :
मंगळवार - २८ जून २०१६
श्री संत ज्ञानेश्वरमहाराज समाधी मंदिर , श्री क्षेत्र आळंदी देवाची  येथुन .

- Varkariyuva.blogspot.in

वक्रदृष्टी - श्रीगुरू पु. ह.भ.प.चैतन्यमहाराज देगलूरकर

|| ज्ञानेशो भगवान विष्णु  : ||

असे म्हणतात की देवाने माणसाची निर्मिती केली आणि देवालाच समाधान झाले.माणूस परिपूर्ण नाही, पण परिपूर्ण होण्याचे सामर्थ्य देवाने केवऴ माणसालाच दिले आहे.माणूस गुणसंपन्न होऊ शकतो.याचा अर्थ केवऴ माणसाकडेच गुण असतात,इतर प्राण्यांकडे काहीच नसतात असे नाही.जगाकडे सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर माणसाने ज्यांच्याकडून काही गुण घ्यावेत असे अनेक प्राणी आहेत.जे चांगले ते कोठून घ्यावे . ' बालदपि सुभाषितं ग्राह्यम् ' असे म्हटलेले आहे. केवऴ प्राण्यापासून नव्हे तर पृथ्वी , वृक्षादिकांच्या ठिकाणीही चांगले गुण आहेत. 


' जो खांडावया घावो घाली । का लावणी जयाने केली । दोघा एकचि सावली । वृक्ष दे जैसा ।।' 
हा क्षमा नावाचा गुण वृक्षात श्रीज्ञानदेवांना मिऴाला. कोणत्या प्राण्या-पक्ष्यांपासून कोणते गुण घ्यावेत याचा कौटिल्यांनी व चाणक्यांनी फार सुरेख विचार केला आहे.प्रभूतमल्प कार्यं वा याे नर : कर्तुमिच्छति । सर्वारंभेण तत्कार्यं सिंहादेकं प्रचक्षते ।।

कार्य लहान असो वा मोठे , ते पूर्ण सर्व सामर्थ्याने करावे हे सिंहाकडून शिकावे.

इंद्रियाणिच संयम्य बकवत् पंडितोनर : । देशकाल बलं ज्ञात्वा सर्वकार्याणि साधयेत् ।।
बुद्धिमान माणसाने बगऴ्यापासून इंद्रियांचे संयमन,देश,काल,बलाचा विचार करून कार्यसिद्धी करणे हे गुण जाणावे.

सुश्रांतॊऽपि वहेद्भारं शितोष्णं न च पश्यति । ससंतोषस्तथा नित्यं त्रीणि शिक्षेच्च गर्दभात् ।।
अतिशय श्रांत असूनही ओझे वाहणे,काम करताना शितोष्णाची पर्वा न करणे आणि सर्वदा संतुष्ट असणे हे गुण गाढवापासून घ्यावेत.

प्रत्युत्थानं च युद्धं च संविभागं च बंधुषु । स्वयमाक्रम्य मुक्तं च शिक्षेच्चत्वारि कुक्कुटात् ।।

योग्य वेऴी जागे होणे, युद्धासाठी नेहमी तयार असणे,सर्वांनी मिऴून खाणे- सर्वांना समान भाग देणे,प्रसंगी आक्रमक होणे हे गुण कोंबड्यापासून घ्यावेत.

गूढ मैथूनचारित्वं काले काले च संग्रहम् । अप्रमत्तविश्वासं पन्च शिक्षेच्च वासयात् ।।
गुढ मैथुन, भविष्याकडे दृष्टी ठेवून संग्रहीवृत्ती ,आऴसाचा त्याग,सावधानता आणि कोणावरही विश्वास न ठेवणे हे कावऴ्याचे गुण आहेत.आणि 'बव्हाशी
स्वल्पसंतुष्ट : सुनिद्रो लघुचेतन : । स्वामिभक्तश्च शूरश्च षडेते श्वानतो गुणा : ।।'
अधिक अन्नाची गरज पण अल्पसंतुष्टता, गाढ झोप पण लवकर जाग येणे, स्वामिभक्ती, आणि शौर्य हे गुण कुत्र्याचे घ्यावेत.जगात गुण पुष्कऴ आहेत. दृष्टी गुणग्राहक असावी.सगऴीकडून चांगले घ्यावे !


संदर्भ - संतसंग

© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर

श्रद्धा - श्रीगुरू पु. ह.भ.प.चैतन्यमहाराज देगलूरकर

|| ज्ञानेशो भगवान विष्णु : || 
माणसाच्या भावना एका ठिकाणी स्थिर राहत नाहीत.एकाच्याच ठिकाणी श्रद्धा ठेवणे त्याला जमत नाही.माणूस एखाद्याबद्दल एके काऴी प्रेम व्यक्त करतो ,तर कालांतराने त्याच्याबद्दलच द्वेषाची भाषा करतो. कारण माणसाच्या भावना स्वार्थापोटी निर्माण होतात आणि स्वार्थ साधला की, ती भावनाही नष्ट होते.परामार्थातही माणसाची भावना एका ठिकाणी राहत नाही.अनेक देवतांवर माणसांची भावना असते.त्या त्या देवतेसंबंधाने विशिष्ट प्रसंगामध्ये तो आपल्या भावना व्यक्तही करीत असतो.श्रीज्ञानेश्वरीमध्ये भगवान हे अज्ञानाचे लक्षण मानतात.तेराव्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात,
'एकादशीच्या दिवशी । जेतुला पाडू आम्हासी । तेतुलाचि नागांसी । पंचमीच्या दिवशी ।। चौथ मोटकी पाहे । आणि गणेशाचाचि होये । चावदासी म्हणे माये । तुझाचि वो दुर्गे ।। पाठी सोमवार पावे । आणि बेलेसि लिंगा धावे । ऐसे एकलाचि आघवे । जोगावी जो ।।
माणूस प्रत्येकाच्या ठिकाणी श्रद्धा व्यक्त करतो; पण एकाच्याही ठिकाणी स्थिर नाही.
' एको देव: केशवो वा शिवो वा ।' असे म्हटले जाते.माणसाने एकाचेच चिंतन करावे.
श्रीतुकाराम महाराजांनी देवाला म्हटले आहे, ' सर्व संगे वीट आला ।
तू एकला आवडसी ।।'
उपनिषदांनीही परमात्म्याचे वर्णन ' एकमेवद्वितीयम् ' असे केले आहे.स्वगतसजातीयविजातीय भेदशून्य असा एकच परमात्मा आहे.बाकीचे देव हेही स्वरूपाने तेच आहेत.तसे तर स्वरूपाने सर्व परमात्मास्वरूपच आहे.पण माणूस अघोरी देवतांचीही उपासना करतोच.कारण माणूस प्रेमापेक्षा भीतीनेच त्यांची भक्ती करतो.श्रीतुकाराम महाराज तर स्पष्ट म्हणतात,
' शेदरी हेंदरी दैवते । कोण ती पूजी भूतखेते । आपुल्या पोटाजी रडते । मागती शिते अवदान ।।'
यांना संत देवच मानत नाही,जीवच मानतात.भागवतात म्हटले आहे,
मुमुक्षवो घोररूपान्हित्वा भूतपतीनथ । नारायणकला: शान्ता भजन्ति ह्यनसूयव:।। मुमुक्षूने अघोरी देवतांची भक्ती न करता केवऴ नारायणाचेच चिंतन करावे.एकातच समाधान असते.


संदर्भ - संतसंग
© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.

Wednesday 22 June 2016

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वरमहाराज आषाढी वारी पालखी सोहळा २०१६

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।

पायी वारीतील अंतरे :

आळंदी ते पुणे -२६.०४ कि.मी.
गांधीवाडा ते आळंदी :०० कि.मी. ते थोरल्या पादुका ०.०६ कि.मी. ते भोसरी फाटा ०५.०६ कि.मी. ते दिघी ०७.०७ कि.मी. ते म्हस्के वस्ती ११.०२ कि.मी. ते आर अँड डी फॅक्टरी ११.०८ कि.मी. ते साठे बिस्किट १२.०७ कि.मी. ते फुले नगर दत्त मंदिर १४.०२ कि.मी. ते हायवे बजाज गार्डन १७.०९ कि.मी. ते वाकडेवाडी १८.०९ कि.मी. इंजिनिअरिंग कॉलेज चौक १९.०६ कि.मी. ते म्हसोबा गेट २०.०९ कि.मी. ते ज्ञानेश्वर पादुका २१.०४ कि.मी. ते तुकाराम पादुका २१.०६ कि.मी. ते लकडी पूल २३.०६ कि.मी. ते भवानी पेठ २६.०४ कि.मी.

पुणे ते सासवड – २९.०९ कि.मी.
भवानी पेठ ते शिंदे छत्री ३.७ कि.मी. ते हडपसर ०८.२ कि.मी. ते ऊरुळी १३.०१ कि.मी. ते वडकी नाला १७.०५ कि.मी. ते झेंडेवाडी २१.०८ ते सासवड २९.०९ कि.मी.
सासवड ते जेजुरी -१८.०२ कि.मी.
सासवड ते जकात नाका ०१.०५ कि.मी. ते बोरके मळा ०४.०० कि.मी. ते यमाई शिवरी ०९.०३ कि.मी. ते साकुर्डी १३.०७ कि.मी. ते जेजुरी १८.०२ कि.मी.

जेजुरी ते वाल्हे – १३.०६ कि.मी.
जेजुरी ते दौंडज शीव ०५.०१ कि.मी. ते दौंडज ८.०९ ते वाल्हे शाळा १२.०८ कि.मी. ते गावानंतर मुख्य रस्ता १३.०० कि.मी. ते वाल्हे १३.०६ कि.मी.

वाल्हे ते लोणंद – १८.०६ कि.मी.
वाल्हे ते पिंपरी खुर्द ५.०१ कि.मी. ते नीरा १०.०८ कि.मी. ते रेल्वे फाटा १५.०८ कि.मी. ते लोणंद पूल १७.०२ कि.मी. ते लोणंद १८.०६ कि.मी.

लोणंद ते तरडगाव तळ - ०९.८० कि.मी.
लोणंद ते चांदोबाचा लिंब ते एस टी स्टँड ०८.०० कि.मी. ते तरडगाव तळ ०९.८० कि.मी.

तरडगाव तळ ते फलटण- २१.०६ कि.मी.
तरडगाव ते काळज ०४.०२ कि.मी. ते सुरवडी ०९.०३ कि.मी. ते निंभोरे ओढा ११.०७ कि.मी. ते वडज १४.०० कि.मी. ते फलटण २१.०६ कि.मी.

फलटण ते बरड- १८.०६ कि.मी.
फलटण ते विडणी ०६.०८ कि.मी. ते पिंपरद ११.०९ कि.मी. ते निंबळक फाटा १४.०८ कि.मी. ते बरड १८.०६ कि.मी.

बरड ते नातेपुते – २०.०३ कि.मी.
बरड ते साधुबोवाचा ओढा ०५.०४ कि.मी. ते सोलापूर हद्द ०७.०८ कि.मी. ते धर्मपुरी कॅनॉल ११.०० कि.मी. ते शिंगणापूर फाटा १५.०९ कि.मी. ते नातेपुते २०.०३ कि.मी.

नातेपुते ते वेळापूर – १६.०६
नातेपुते ते खुडूस फाटा ०४.०६ कि.मी. ते विंझरी ०९.०३ कि.मी.ते धावा १५.०७ कि.मी. ते वेळापूर १६.०६ कि.मी.

वेळापूर ते भंडीशेगाव- १६.०३ कि.मी.
वेळापूर ते ठाकूरबुवा समाधी ०४.०८ कि.मी. ते तोंडले ०८.०३ कि.मी. ते धावा ११.०३ कि.मी. ते भंडीशेगाव १६.०३ कि.मी.

भंडीशेगाव ते वाखरी-०८.०० कि.मी.
भंडीशेगाव ते रिंगण ०४.०४ ते वाखरी ०८.०० कि.मी.

वाखरी ते पंढरपूर- ०६.०७ कि.मी.
वाखरी ते पादुका ०३.०५ कि.मी. ते पंढरपूर ०६.०७ कि.मी.

- Varkariyuva.blogspot.in

हेतू शुद्ध ठेवावा - श्री महाराज

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।

मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्‍न करावा. हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरुप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते. हेतू हा विहिरीत असणार्‍या झर्‍याप्रमाणे आहे. झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचे पाणी स्वाभाविकच गोड असते. म्हणुन हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी, आणि त्याकरिता रामाची प्रार्थना करावी. माणसाला देहरक्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही. 'नको दैन्यवाणे जिणे भक्ति उणे' हेच रामराया जवळ मागावे. पर्वकाळात भगवंत कामधेनूचा अवतार घेतो; जे ज्याला पाहिजे ते त्याला देतो. पर्वकाळात सज्जन तसेच दुर्जनही आपली कामे करून घेतात. जारण-मारण ही देखील पर्वकाळांतच शीघ्र साध्य होतात. आपण मात्र भगवंताचे कसे व्हावे हे पहावे. शुभेच्छा धरावी, भावना जागृत करावी. 'काहीही कर, पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस.' असे भगवंताजवळ मागावे. 'आजवर कळत नकळत जे पाप झाले असेल ते नाहीसे कर. पुढे पुनः नाही करणार,' असे म्हणावे, म्हणजे मागली पापे नष्ट होतात. ज्याला विषयाची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत. त्यांना 'मीच काय तो शहाणा, मोठा' असा अभिमान असतो. पण त्यांच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे ते जाणत नाहीत. ते खालच्या लोकांकडे पाहतात आणि त्यांच्याहून मी श्रेष्ठ आहे असे म्हणतात. माझे चुकते आहे एवढे कळले तरी चालेल. विषयी लोकांना 'मला कुठे दुःख आहे' असे वाटते. पण दारूप्रमाणे विषयाची धुंदी उतरली म्हणजे पश्चात्ताप होतो.

'देव आहे' असे खर्‍या अर्थाने वाटणारे जगामध्ये थोडेच असतात. सद्‌विचार, सच्छास्त्र आणि सद्‍बुद्धि हे प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहेत. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते. पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही, त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे, ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते, त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे. भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काही येत नाही.

खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते, तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातली माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते, त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. आपण 'मी' पणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो.
शुद्ध असावे आचरण । तसेच असावे अंतःकरण । 
त्यात भगवंताचे स्मरण । हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन ॥ 

-Varkariyuva.blogspot.in

पालखी सोहळ्यातील सर्व दिंड्याना विविध वृक्षांचे बीज वाटप !

Tuesday 21 June 2016

संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा इतिहास !

||ज्ञानेशो भगवान विष्णु ||

संतश्रेष्ठ सोपानकाका हे संत ज्ञानेश्वर माऊली,निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई यांचे बंधू .सोपानकाका आळंदी जवळच असणाऱ्या "सासवड" गावी समाधीस्थ झाले.
ह.भ.प वै धोंडोपंत दादा महाराज अत्रे १५० वर्षापुर्वी पंढरीत वास्तव्यास असणारे थोर भवगदभक्त होते.धोंडोपंत दादा महाराज हे "सदगुरु ह.भ.प वै. गंगुकाका महाराज शिरवळकर महाराज" फडपरंररेचे शिष्य होते.महाराजांची 'वारी' वर अफाट निष्ठा होती. संत तुकोबारायांचा गाथा,ज्ञानेश्वरी इ.ग्रंथ त्यांना तोंडपाठ होते. आणि अशा थोर भगवदभक्त निष्ठांवत वारकरी असणाऱ्या "वै.ह.भ.प धोंडपंत दादा महाराज अत्रे" यांनी संत सोपानकाका महाराज यांचा पालखी सोहळा अंदाजे साधारण १२५ वर्षापुर्वी संत सोपानकाकांचे त्यावेळचे पुजाधिकारी ह.भ.प वै. ज्ञानेश्वर महाराज गोसावी यांच्या सहकार्याने चालु केला.
संत सोपानकाकांचा पालखी सोहळा जेव्हा सुरु झाला तेव्हा २०० वारकरी या सोहळ्यासोबत असत.सुरुवातीचे काही दिवस खांद्यावर पालखी घेऊन सोहळा चालत असे.पण कालांतराने रथ बनवला गेला.या सोहळ्यात पहिल्यापासुन धोंडोपंत दादा महाराज अत्रे,खरवडकर महाराज,देशमुख महाराज यांच्या दिंड्या आहेत.
वै.ह.भ.प धोंडोपंत दादा महाराज यांच्या निर्वाणानंतर त्यांचेच शिष्य असणाऱ्या वै.ह.भ.प भगवान महाराज शिवणीकर यांनी हा सोहळा चालवला.तर आता भगवान महाराजांचे वंशज आमचे आदरणीय ह.भ.प माधव महाराज शिवणीकर हे ह्या सोहळ्यास चालवण्यास मोलाचे सहकार्य करतात. तर सध्या वै. ज्ञानेश्वर महाराज गोसावी यांचे नातु ह.भ.प गोपाळ महाराज गोसावी हे या पालखी सोहळ्याचे प्रमुख आहेत.
हा पालखी सोहळा सासवड-मोरगांव-अकलुज-वाखरी या मार्गे पंढरीत दाखल होतो.
आताच्या काळात जवळपास १ लाख वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी होतात.
यंदांचा संत सोपानकाका यांचा पालखी सोहळा अंदाजे १२५ वा असेल असे वाटते.
[खुप पुस्तके चाळुन,जेष्ठांच मार्गदर्शन घेऊन ही संत सोपानकाका महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा इतिहास एवढाच ज्ञात झाला. तेवढा आपल्यासमोर मांडला आहे.]

©श्रीगुरुदास
पराग तुकाराम महाराज चातुर्मास्ये.

-varkariyuva.blogspot.in

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा इतिहास !

|| ज्ञानेशो भगवान विष्णु : ||
वै.सदगुरु शाहू महाराज बेलापुरकर....! श्रीरामपुर जवळ सध्या नगर जिल्ह्यात असणारे "बेलापूर" हे शाहु महाराजांचे मुळ गांव. शाहु महाराज म्हणजे सदगुरु सखाराम महाराज अंमळनेरकर यांचे पट्टशिष्य.शाहू महाराज बेलापुरकर एक थोर विद्वान आणि त्या काळातील एक भवदभक्त होते.महाराज दर वर्षी बेलापुर- पंढरपूर आषाढी वारी करत असत.सदगुरु
शाहू महाराज बेलापूरकर यांचे नातु वै.सदगुरु भानुदास महाराज बेलापुरकर हेही परकोटीचे विद्वान आणि पांडुरंगावर निस्सीम श्रद्धा असणारे वारकरी..शाहु महाराजांनी घालुन दिलेली पंढरीची आषाढी वारी भानुदास महाराज निष्ठेने न चुकता करत.या सगळ्याबरोबरच भानुदास महाराज म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांचे एक पट्टशिष्य होते.त्यांची निवृत्तीनाथ महाराजांवर गाढ श्रध्दा होती.
मला माहीती आहे आता सगळे वाचक संभ्रमात पडले असतील कि,हा निवृत्तीनाथ महाराजांच्या सोहळ्याबद्दल लिहतोय की बेलापुरकर महाराज फडपरंपरेवर.? मंडळी तुम्ही विचार करताय तस नाहीये.निवृत्तीनाथ महाराजांचे निस्सीम भक्त असणाऱ्या बेलापूरकर महाराज परंपरेतील तिसरे सत्पुरुष वै.सदगुरु भानुदास महाराज बेलापुरकर यांनीच निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा सुरु केलाय.चला तर मग बघुयात पालखी सोहळ्याच्या सुरुवातीचा इतिहास..
आठरव्या शतकातील पुर्वार्धाचा तो काळ होता.त्या आधी आपण पाहील्याप्रमाणे सर्व संतांचे पालखी सोहळे अख्या महाराष्ट्रातुन आषाढीला पंढरीस जायला सुरुवात झाली होती. भानुदास महाराज बेलापुरकर हे निवृत्तीनाथ महाराजांचे निस्सीम भक्त होते.महाराजांना अस मनात वाटल की,जर सर्व संतांचे पालखी सोहळे आषाढी ला पंढरीला जात असतील. तर मग निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा पंढरीस का जात नाही? पालखी सोहळा काढायचा हा विचार करुन सदगुरु भानुदास महाराज त्रंबकेश्वर ला गेले खरे पण त्या काळी त्रंबकेश्वर येथे अनेक संतांच्या समाध्या होत्या.सदगुरु भानुदास महाराजांनी हे तिथे गेल्यावर पाहीलं.त्यांना कळेचा ना की निवृत्तीनाथांची समाधी कोणती? शेवटी सदगुरु भानुदास महाराजांनी जो पर्यंत समाधी कोणती सापडत नाही .तोपर्यंत त्या असंख्य समाध्यांसमोर अन्नपाण्याविना अनुष्ठान करण्याचे ठरविले.आणि भानुदास महाराज अनुष्ठाला बसले.अनुष्ठान काही दिवस चालले.आणि एक दिवशी अचानक एक छोटी मुलगी तिथे शेळ्या घेऊन आली.तिने भानुदास महाराजांना पाहील आणि त्यांना विचारल,"बाबा इथे काय करताय?" महाराजांनी तिला काहीच सांगीतल नाही.शेवटी ती पोरं हट्टाला पेटल्यावर महाराज म्हणाले,"बाळा मी संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी शोधतोय."
ती मुलगी लगेच म्हणाली.'अहो हे काय आत्ताच मी फुलं वाहुन आलीय त्या समाधीला'
ती एवढी बोलली आणि क्षणार्धात गुप्त झाली. ती साक्षात योगमायाच होती हे भानुदास महाराजांनी जाणल. तिला शोधल पण ती गायबच झाली.
सदगुरु भानुदास महाराज तद्नंतर समाध्यांकडे आले.तेव्हा त्यांना एका समाधीवर फुले वाहिलेले दिसले.तीच आजची आपण दर्शन घेतो ती आजही ब्रह्मगीरीच्या पायथ्याशी असलेली निवृत्तीनाथ महाराजांची समाधी!
त्यावेळीच भानुदास महाराजांनी निवृत्तीनाथांच्या समाधीचा गाभारा "पेशव्यांच्या" आर्थिक साहय्याने बांधुन घेतला.आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका स्थापन करुन त्याच पादुका आषाढीला पंढरीस आणण्यास सुरुवात केली.ते साल म्हणजे इ.स १८४० होत. आणि ती तिथी म्हणजे आजचीच "जेष्ठ वद्य प्रतिपदा"
आता पंढरीला जायला तर हा सोहळा निघाला पण त्याकाळी पंढरीचा मार्ग तर माहीती नव्हता.तेव्हा भानुदास महाराज बेलापुरकर यांचा घोडा"लाडक्या" पुढे चालायचा आणि सोहळा त्याच्या मागेमागे चालत.जिथे लाडक्या थांबत तिथे पालखी सोहळ्याचा मुक्काम होई.खरच संतांच्या संगतीचा परिणाम किती होतो ना?
श्रीमद् भागवतात ही म्हणलच आहे-
सत्सङ्गेन हि दैतेया यातुधाना मृगा: खगा: |
गन्धर्वाप्सरसो नागा: सिध्दच्श्रारणगुह्यका ||
(स्कंद ११,अ.१२
श्लोक ३)
अजुन एक विशेषत्व इथे मला नमुद कराव वाटत ते असं की- सदगुरु शाहू महाराज बेलापुरकर यांनी बेलापुर-पंढरपूर आषाढी वारी चालु केली होती.मग ती वारीची परंपरा खंडीत होऊ नये यासाठी वै.सदगुरु भानुदास महाराज बेलापुर पर्यंत एकटे पालखी सोहळ्यात सोबत येत.तर,बेलापुर ला सोहळा आल्यावर मगच बेलापुरकर महाराजांची दिंडी बेलापुर पासुन निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याला मिळत.आजही ही परंपरा अव्यावहत पणे चालु आहे.आताचे बेलापुरकर महाराज परंपरेचे विद्यमान पिठाधीपती "ह.भ.प मोहन महाराज बेलापुरकर" हे ही परंपरा चालवतात.
पालखी सोहळ्याचे प्रमुख मानकरी-
हा पालखी सोहळा सुरु झाला,तेव्हापासुन पुजाधिकारी गोसावी महाराज, डावरे महाराज हेही बेलापुरकर महाजांसोबत आहेत.
सोहळ्यात रथाच्या पुढे बेलापुर पासुन बेलापुरकर महाराजांची दिंडी असते.बेलापुर च्या आधी त्रंबकेश्वर ते बेलापुर सिन्नर गावठाण,कुंडेवाडकर आणि निवृत्तीनाथ महाराज संस्थानची दिंडी रथाच्या पुढे असते.
हा सोहळा इ.स.१८४० साली सुरु झाला.त्याप्रमाणे ह्या वर्षीचा *संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा १७६ वा पालखी सोहळा ठरेल*.
बेलापुरकर महाराज परंपरा,पुजाधीकारी गोसावी महाराज,व डावरे महाराजांच्या सेवा काय आहेत. याचा अभ्यास केल्यावर संत तुकोंबांचे दोन प्रमाणं मला क्षणार्धात आठवले-
वंशपरंपरा दास मी
अंकित ||
आणि
ह्याचा धरिन अभिमान |
करिन आपुले जतन ||
उद्या संत सोपानकाका महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा इतिहास पाहुयात...
ह.भ.प आदरणीय मोहन महाराज बेलापुरकर.
(संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख)
ह.भ.प सागर महाराज बेलापुरकर.
यांनी ही माहीती दिल्याबद्दल त्यांचे खुप खुप आभार...
© श्रीगुरूदास
पराग तुकाराम महाराज चातुर्मास्ये.

- varkariyuva.blogspot.in

शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा इतिहास !

शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा -
देखोनिया पंढरपूर | जीवा आनंद अपार||१||
टाळ मृदुंग वाजती |रामकृष्ण उच्चारिती ||२||
दिंड्यापताकांचा मेळ |नाचती हरुषे गोपाळ ||३||
चंद्रभागा उत्तम| स्थानस्नाने पतीतपावन ||४||
पुंडलिका लागता पायां | चुकें येरझार वांयां ||५||
पाहता विठ्ठलमूर्ती | भानुदासासी विश्रांती ||६||
(संत श्रेष्ठ भानुदास म.)
वरील अभंग हा शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचे पंजोबा संत भानूदास महाराज(आमचे पुर्वज दादा महाराज चातुर्मास्ये यांचा अवतार भानुदास महाराजांच कीर्तन पुरश्चरण पुर्ण करण्याकरिता झाला.)यांचा आहे. या सारख्या अनेक अभंगात भानुदास महाराजांनी पंढरीच महात्म्य वर्णन केले आहे. त्यावरुन आपल्याला असं म्हणता येईल कि, ‌ज्ञानोबा माऊली यांच्या घराण्याप्रमाणे संत एकनाथ महाराजांच्या घराण्यात सुद्धा पंढरीस जाण्याची,वारी करण्याची परंपरा होती.ही परंपरा पुढेही अव्याहत पणे चालु राहीली. नाथ महाराजांच्या सुद्धा अनेक अभंगात पंढरीचं वर्णन आलय.त्यामुळे पंढरीची वारी ही नाथ महाराजांच्या काळात ही त्यांच्या घराण्यात होती.
शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी त्यांच ६६ वर्षांच अवतार कार्य संपवल. आणि इसवी सनाप्रमाणे १५९९ साली पैठण नगरीत गोदावरीतीरी समाधी घेतली.नाथ महाराजांनी समाधी फाल्गुन महिन्यात घेतली आणि जेष्ठ महिन्यात त्याच वर्षी काही तज्ञ अभ्यासकांच्या मताप्रमाणे नाथमहाराजांचे चिरंचीव "हरीपंडीत महाराज" यांनी नाथ महाराजांच्या पादुका मस्तकावर ठेऊन पंढरीस जाण्यास सुरुवात केली.(नाथांचा पालखी सोहळा हा मानाचा तिसर्या क्रमांकाचा पालखी सोहळा आहे.) तर काही जाणकार तज्ञांप्रमाणे हरिपंडीत महाराज यांचे चिरंजीव नाथ महाराजांचे नातु "राघोबा महाराज" यांनी पादुका घेऊन पंढरीस जण्यास सुरुवात केली.भरपुर अभ्यास करुनही दोन्ही मते बरोबर आहेत.असंच सार समोर आल म्हणुन आपण याचा विचार जास्त न करता हरिपंडीत महाराज/राघोबा महाराज यांनी पादुका डोक्यावर घेऊन पंढरीस आषाढीस वारीला जाण्याची सुरुवात केली असे म्हणुयात.ज्यावेळेला पादुका घेऊन महाराज जात तेव्हा हा सोहळा अगदी छोटा होता. तरीही भरपुर वारकरी पादुकेसोबत असत.कालांतराने पुढील पिढीतील नाथवंशज "जानकीबाई" यांनी या वारीला पालखी सोहळ्याच स्वरुप दिलं.जानकीबाईं पासुनच नाथांचा पालखी सोहळा विशाल झाला अनेक दिंड्या या पालखी सोहळ्यास जोडल्या गेल्या.
जानकीबाईंनी तर या वारीला सोहळ्याच रुप दिलच.यानंतरही नाथांचे अकरावे वंशज श्री ह.भ.प.वै नारायण महाराज गोसावी यांनी तर हा सोहळा खुपच मोठा केला.नारायण महाराजांच्याच काळातच नाथ महाराजांचा सोहळा महाराष्ट्राला परिचीत झाला.एक सत्तर ते एेंशी वर्षापुर्वी वारकरी साम्प्रदायाचे थोर विभुती वै मामासाहेब दांडेकर यांच्या "वारकरी साम्प्रदायाचा इतिहास" या पुस्तकात मामासाहेबांनी सात संतांच्या पालखी सोहळयाचा उल्लेख केला आहे. त्यात संत ज्ञानोबा माऊली,तुकाराम महाराज व नाथ महाराज यांच्या सोहळ्या संबधीचा उल्लेख मला इथे करावासा वाटतो तो असा-
"ज्ञानोबांच्या सोहळ्यात ५-६ हजार वारकरी असत. तर तुकोबांच्या सोहळ्यात ७००-८०० वारकरी असत" पुढे माासाहेब नाथांच्या सोहळयासंबधी लिहतात-
"नाथांचा पालखी सोहळा तर खुपच वैभवशाली आणि मोठ्या दिमाखात पार पडतो.या सोहळ्यात सुमारे ५-६ हजार वारकरी सामील होत.सोहळयात हत्ती,घोडे,शिंगवाले,तसेच विविध मानकरी मोठ्या दिमाखात निष्ठेने चालत.
हे इथे नमुद करायचा उद्देश असा कि सुमारे ७० वर्षापुर्वी लिहल्या गेलेल्या पुस्तकात मामासाहेबांनी नाथांच्या सोहळ्याच्या पुर्वीच्या वैभवाच वर्णन खुप यथार्थ रित्या केल आहे.म्हणजे पुर्वी ज्ञानोबांप्रमाणेच शांतीब्रह्म नाथ महाराजांचा पालखी सोहळा ही विशाल व बहुपरिचीत होता.
अजुन एक विशेषत्व मला नाथांच्या सोहळ्याबद्दल सांगायला आवडेल ते अस कि,सर्व संतांच्या वारीच्या काल्याच कीर्तन आपल्याला माहीती असल्याप्रमाणे गोपाळपुरास होते.मात्र नाथ महाराज परंपरेच्या काल्याचं भजन पुर्वापार चालत असलेल्या परंपरेप्रमाणे पांडुरंगाच्या देवळातील लाकडी सभामंडपात होते.
पालखी सोहळ्याचे मानकरी-
रथाच्या पुढे पहिली दिंडी पालखी सोहळ्याचे मालक
"नाथवंशज गोसावी महाराज" यांची असते. तर नंतर वऱ्हाड प्रांतातील तिन दिंड्यांचा मान असतो.या तिन दिंड्या सोहळा सुरु झाला तेव्हा पासुन आपली सेवा अव्याहत पणे देत आहेत.तसेच तिन पिढ्यांपासुन नाथांचा रथ ओढण्याचा मान 'डॅा.मंत्री' यांच्या बैलजोडीस आहे..
अशाप्रमाणे नाथांच्या अतिप्राचिन असणाऱ्या सोहळयाच स्वरुप असतं.
नाथ महाराजांच्या पालखी सोहळा नाथांनी समाधी घेतली त्याच वर्षी सुरु झाला त्याप्रमाणे यंदाच पालखी सोहळ्याचं हे ४१७ वर्ष आहे.कालच आपण पाहील की तुकोबांच्या पालखी सोहळ्यास ३३१ तर माऊलींच्या सोहळ्यास १८६ वर्षे पुर्ण होतील.म्हणजे नाथ महाराज यांचा पालखी सोहळा हा संत ज्ञानोबा माऊली आणि संत तुकोबां माऊलीं पेक्षाही प्राचिन आहे..
खरचं या पालखी सोहळ्यात सर्वांनी जरुर जरुर एकदा तरी जा..ज्ञानोबा-तुकाराम प्रमाणे भानुदास- एकनाथ जयजयकार करा..आपल जीवन सार्थक होईल.
एकनाथ महाराजांनी म्हणलचं आहे-
"अनुपम्य जाती पंढरीये |
अनुपम्य वस्ती होय
पंढरीये ||"

चला तर मग निघुयात...

©श्रीगुरूदास संतचरणरज
पराग तुकाराम महाराज चातुर्मास्ये.

- varkariyuva.blogspot.in/