Friday 24 April 2015

"नाईट लाईफ"मुळे व्याभिचार वाढेल! - अक्षय भोसले

मुंबईतील night life या विषया वरील दैनिक सकाळ वृत्तपत्र यांनी घेतलेली मुलाखत !

०१ मार्च २०१५

"नाईट लाईफ"मुळे व्याभिचार वाढेल!

"सिटी नेव्हर स्लिप्स' अशी मुंबईची ओळख.. पोटाची खळगी भरण्यासाठी मायमातीसोबतची नाळ तोडून या मायानगरीत हरवलेला प्रत्येक जण इथं लढत असतो... अस्तित्व टिकवायचं आव्हान असल्यानं सहाजिकच वेळेचे बंधन नसतं. युवा सेनाप्रमुख आदित्य
ठाकरे यांनी हातावर पोट असलेल्या अशाच शेकडो नागरिकांसाठी "नाईट लाईफ'ची संकल्पना मांडली, की यात बड्या उद्योजकांचे हित आहे हा संशोधनाचा, पर्यायानं वादाचा विषय... परंतु या "चाकोरीबाह्य' संस्कृतीला काही घटकांनी विरोध दर्शवला आहे. वारकरी संप्रदायाची याबाबत भूमिका मांडलीय वारकरी संप्रदाय युवा मंचचे अध्यक्ष कीर्तनकार अक्षय भोसले यांनी...
--------------------

¤ शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या "नाईट लाईफ'बद्दल वारकरी संप्रदायाची भूमिका काय?
- आपली संस्कृती अत्यंत पवित्र आणि परिपूर्ण आहे. तिला बाधा पोहोचेल असं कोणतंही पाऊल उचलता कामा नये. आमचा कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध नाही. शिवसेनेने तर मराठी माणसाच्या हितासाठी अनेक प्रकल्प राबवले आहेत. परंतु "नाईट लाईफ' ही संकल्पना तितकीशी रुचणारी नाही. यामुळे गैरव्यवहारांना अधिक चालना मिळेल.

¤ "नाईट लाईफ'मुळे रोजगारनिर्मिती होईल, असा ठाकरेंचा दावा आहे.
- खरं तर "नाईट लाईफ' ही संकल्पनाच मुळी मुंबईसाठी नवी नाही. गिरण्या बंद झाल्या असल्या तरी हे शहर आजही रात्रभर जागेच असते. दूधवाल्यांपासून मच्छीचा व्यवसाय करणाऱ्यांचा दिवस तर इतर सगळे झोपल्यानंतर मध्यरात्री सुरू होतो. कीर्तनकार असल्यानं माझा बऱ्याचदा रात्रीचा प्रवास होतो. त्या वेळी पावभाजी, बुर्जीपाव, वडापाव ते सायकलवर चाय विकणारे सर्रास दिसतात. हे सर्वसामान्य मुंबईकर आहेत. "नाईट लाईफ'ची नवी संकल्पना त्यांच्या हितापेक्षा बडे उद्योजक, राजकारण्यांचे हित जपणारी आहे. पब, डिस्को सुरू ठेवून त्यांना काय रोजगार मिळणार? यात 70 टक्के राजकारण आणि केवळ 30 टक्के समाजकारण आहे, असं प्रथमदर्शनी वाटतं.

¤ यामुळं पर्यटनाला चालना मिळून सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर पडेल, असं समीकरण मांडण्यात आलंय. तसं झालं तर नागरिकांचाच फायदा नाही का?
- पर्यटनवाढीसाठी "नाईट लाईफ' हा पर्याय नव्हे. उलटपक्षी या संस्कृतीमुळे व्यभिचाराला चालना मिळेल आणि स्त्री-संरक्षणाचा प्रश्‍न अधिक गंभीर बनेल. सरकारला याद्वारे फायदा होईल असं वाटत असेल, तर याअगोदर ही संकल्पना का राबवली गेली नाही? सरकारला काही करायचंच असेल तर रात्रशाळा, रात्रमहाविद्यालये सुरू करावीत.

¤ प्रश्‍न गैरव्यवहारांचा असेल, तर "नाईट लाईफ'मुळे रहदारी वाढेल आणि पोलिसांवरील ताण कमी होईल, असं पोलिस आयुक्तांचं म्हणणं आहे?
- पोलिस यंत्रणेची निर्मिती नागरिकांच्या संरक्षणासाठीच झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील ताण कमी करण्यासाठी अशा संस्कृतीला प्रोत्साहन देणं केव्हाही चुकीचंच आहे. खरं तर रात्रीचा व्यवसाय करू पाहणाऱ्यांना पोलिसांचाच जास्त त्रास होतो, हे आता जगजाहीर आहे.

¤ पोलिस आयुक्तांसह भाजपच्या शायना एन. सी. यांनी या संकल्पनेला संमती दर्शवली आहे. मुख्यमंत्र्यांनीही अर्थसंकल्पी अधिवेशनात यासंबंधी कायद्यातील बदलांसाठी प्रयत्नांचे आश्‍वासन दिले आहे.
- आमचा याला पूर्णपणे विरोध आहे. तरीही "नाईट लाईफ' अस्तित्वात आलंच तर आमच्या काही मागण्या असतील. त्या आम्ही संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचवू.

¤ त्यावेळी तुम्ही रात्रभर भजन-कीर्तनासाठी परवानगी मागणार का?
- नाही. तसं केल्यास येथे धर्माचं राजकारण जन्माला येईल. प्रत्येक धर्मातील बांधव तशा प्रकारची मागणी करतील व यातून सामाजिक तेढ निर्माण होईल.

¤ तुम्ही विरोध केलात तर "प्रतिगामी संप्रदाय' असा शिक्का बसणार नाही का?
- अध्यात्मावर भर असला तरी अंधश्रद्धेला आमच्याकडे थारा नाही. किंबहुना डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर आम्ही प्रबोधनात्मक कीर्तनेही केली. कॉ. पानसरेंच्या हत्येचाही आम्ही तीव्र निषेध करतो. परंतु पाश्‍चात्य संस्कृतीचं डोळे झाकून अनुकरण केलं जात असेल आणि त्यामुळे आमच्या संस्कृतीला धोका निर्माण होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही.

पत्रकार - लहूजी सरफरे
लिंक :

epaper.esakal.com/sakal/2Mar2015/Normal/Mumbai/page6.htm