Friday 18 September 2015

" समाजप्रबोधनपर कार्यक्रमांना सार्वजनिक गणेश मंडळांचा फाटा "

।। श्री गुरु ।।

पूर्वी सार्वजनिक गणेश मंडळांकडे समाज प्रबोधनपर
कार्यक्रमाची रेलचेल असायची. मात्र, गेल्या काही
वर्षांत जनजागृतीच्या कार्यक्रमांवर भर न देता लाखो
रुपये खर्च करून वेगवेगळ्या मंदिराच्या व राजवाडय़ांच्या
प्रतिकृती आणि देखावे तयार केले जात आहेत. शिवाय
सजावट, रोषणाईवर जास्त भर दिला जात आहे. देखावे
आणि सजावटीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात
कोटय़वधी रुपये खर्च होत आहे.
गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हटले की सार्वजनिक गणेश
मंडळात नकला, नाटक, वाद्यवृदांचा कार्यक्रम, कीर्तन,
भजन, वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन,
चित्रपट आदी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक
कार्यक्रमांची रेलचेल असायची आणि त्याचा आनंद
वस्तीतील लोक घेत होते. राष्ट्रहितास्तव लोकमान्य
टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि
केसरीच्या माध्यमातून या उत्सवाला आकार देण्याचा
प्रयत्न केला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक,
वैचारिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून
समाजातील विविध पातळीवरील माणसे एकत्र आली
आणि काही विशिष्ट विचार रुजविण्याचा प्रयत्न
करण्यात आला. १८९३ मध्ये सुरू झालेल्या गणेशोत्सवाचे
स्वरूप करमणूक आणि उत्सव प्रधान झाले होते.
गणेशोत्सवात कुठले कार्यक्रम आहेत हे जाणून घेण्यासाठी
अनेक लोक गणेशोत्सव मंडळाच्या निमंत्रण पत्रिकांची
वाट पाहात होते. आज मात्र पत्रिका असल्या तरी
त्याचा उपयोग केवळ विविध कंपन्याच्या
जाहिरातीसाठी केला जातो आणि कार्यक्रमांचा
मात्र त्यात लवलेश नसतो. विविध देखावे तयार
करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात असून त्यासाठी
मुंबई आणि कोलकाताच्या कारागिरांना बोलविले
जाते. त्यांची किमान पंधरा दिवस राहण्याची,
खाण्याची व्यवस्था मंडळातर्फे केली जाते आणि
त्यांना लाखो रुपये दिले जातात. दहा दिवस देखावे
पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असली तरी
लोकमान्य टिळकांचा जो उद्देश होता त्या उद्देशाचे
काय हा प्रश्न अनुत्तरीत आहे. थोडा विचार करा आणि आपणच पहा उत्तर काय येत ते ?

- अक्षय भोसले
०८४५१८२२७७२
varkariyuva.blogspot.in