Wednesday 1 June 2016

आनंदाचं साकार स्वरूप म्हणजे पांडुरंग ! - सद्गुरू ह.भ.प.बाबा महाराज सातारकर

|| ज्ञानेशो भगवान विष्णु :||
पंढरीरायाच्या उराउरी भेटीचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी...ऊन, वारा, पाऊस यांची तसूभरही पर्वा न करता वारकऱ्यांची पावलं पंढरीची वाट चालत राहतात...वारीचा तीनेक आठवड्यांचा काळ आणि आषाढीच्या दिवशी विठुरायाच्या दर्शनाचा कळसाध्याय! हा भारलेला काळ वर्षभरासाठी वारकऱ्याला अनामिक ऊर्जा देऊन जातो. वारीच्या काळात वारकऱ्याचा अहंकार विरतो... थोरा-मोठ्यांना आपल्या पद-प्रतिष्ठा-समाजातल्या स्थानाचा विसर पाडते ही वारी... वारीत प्रत्येक जण बनतो केवळ ‘माउली’! पंढरीला नेणारी भक्तीची ही वाट अनोखी आहे.
अध्यात्म म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय, हे प्रथम समजून घेणं गरजेचं आहे. मुळाशी वाढतं ते ज्ञान आणि जे वर वाढते ते विज्ञान. मुळं जमिनीखाली वाढतात. जेवढी मुळं खोल तेवढं ते झाड अधिक भक्कम. विज्ञानाची वाढ ही ज्ञानाच्या आधारावर आहे. विज्ञानात वाढणाऱ्यात बदल होऊ शकतो; पण ज्ञानात कोणताही बदल होत नाही. विज्ञानयुगात गाडी आली, मग विमान आलं, मग जेट विमान आलं, अनेक बदल झाले. कॉम्प्युटर आज घेतला की काही दिवसांत तो जुना, म्हणजे आउटडेटेड होतो. लगेच त्याच्यात नवं व्हर्जन येतं. म्हणजे ज्याच्यात सतत बदल होतो ते विज्ञान. ज्यात कधीही बदल होत नाही ते ज्ञान! याच धर्तीवर सांगायचं झाल्यास, ज्याच्यात कधीही बदल होत नाही, तो पांडुरंग आहे. त्यामुळं ज्ञान आणि विज्ञान असे दोन भाग होत नाहीत. कीर्तन जरी मी ज्ञानाच्या आधारानं करत असलो, तरी ते हजारो लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्याला माईक लागतोच ना? पण यातही महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की नुसतं विज्ञानसुद्धा काहीच करू शकत नाही. म्हणजे चार लाख रुपयांचा माईक माझ्यासमोर ठेवला आणि मी काहीच बोललो नाही, तर काही होऊ शकत नाही! त्यामुळं ज्ञानावर विज्ञान आधारित आहे, हे सिद्ध होतं. काही माणसं म्हणतात ः ‘‘आम्ही विज्ञानाधिष्ठित आहोत.’’ पण विज्ञान हेच ज्ञानावर अधिष्ठित आहे. विज्ञान हे विज्ञानातून नव्हे; तर ज्ञानातून प्रकट झालं आहे. गेल्या काही वर्षांपासून वारीमध्ये विज्ञानाधिष्ठित माणसंही येऊ लागली आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आईनस्टाईननंही ‘फोर्स’ मान्य केला आहे. त्यानं मान्य केलेल्या ‘फोर्स’ला आपण काय म्हणावं, हा प्रत्येकाचा प्रश्‍न आहे. आम्ही त्या ‘फोर्स’ला विठ्ठल म्हणतो! मराठीत देव, ईश्‍वर, परमात्मा म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला ‘गॉड’ म्हणतात. पंजाबीत ‘रब’ म्हणतात... पण काहीही म्हटलं तरी सर्व जण देवाच्या ठिकाणी किंवा एखाद्या शक्तीच्या ठिकाणी नतमस्तक होतातच ना? त्यामुळं अधिष्ठानात फरक होत नाही. मात्र, ज्यामध्ये फरक होतो, त्याला विज्ञान म्हणावं.

विज्ञानामुळं अनेक सुखसोई आल्या. गेल्या काही वर्षांत वारीत मोठ्या प्रमाणात वाहनं वाढली. या सुखसोईंनी  वारकऱ्यांची सोयच झाली. जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत विज्ञानाचा संबंध येऊ लागला आहे; पण ते केवळ विज्ञान नाही. तेही ज्ञानाच्या आधारावरच तयार झालेलं आहे. गॉड या शब्दात जनरेशन (G), ऑपरेशन (O) आणि डिस्ट्रक्‍शन (D) आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय. यालाच देव म्हणावं! आम्ही त्याला ‘पांडुरंग’ म्हणतो. सर्वांचं अधिष्ठान त्याच्यात एकरूप झालेलं असतं. त्यामुळं विज्ञान आणि ज्ञान यांच्यात फरक करण्याची गरज नाही. काही दिवसांपूर्वी ‘गॉड पार्टिकल’चा शोध लागला. मग देव मानता म्हणूनच त्याचं नाव ‘गॉड पार्टिकल’ असं दिलं ना? त्याला ‘गॉड पार्टिकल’ म्हणण्यामागचा उद्देशच असा आहे, की तो आहे; पण दिसत नाही! आहे हे कळतं; पण दिसत नाही! ज्याच्यामुळं ते दिसतं, तो देव आहे. एखादी वस्तू नुसती समोर असून उपयोग नाही, तिचं ज्ञान होणं महत्त्वाचं आहे. सध्याच्या संगणकीय युगाचा आपण उल्लेख करतो. पण ‘ह्यूमन कॉम्प्युटर’ किती महान आहे, याचा कधी विचार केला आहे काय? संगणकाचा शोध या ‘ह्यूमन कॉम्प्युटर’नंच लावला ना? म्हणून ह्यूमन ब्रेन इज ह्यूमन ब्रेन. इट इज ग्रेटेस्ट कॉम्प्युटर’. 

माणसानं तयार केलेला कॉम्प्युटर आणि माणसाची बुद्धी यांची तुलना करता येत नाही. इंग्लिशमध्ये ‘कॅटॅलिटिक एजंट’ असा शब्दप्रयोग आहे. त्याचा अर्थच असा आहे की, ‘त्या’च्या असण्यानं सर्व काही होतं. त्याच्या नुसत्या असण्यातच सर्व काही असते. ‘तो’ काढून टाकला तर पंचज्ञानेंद्रियं, कर्मेंद्रियं आहे, मन, बुद्धी हे क्षणात नाहीसं होतं. त्याच्या असण्यानं हे सर्व प्रकट होते. त्यालाच ‘देव’ म्हणावं! 

वारीत मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षित वर्ग सहभागी होऊ लागला आहे. कारण, वारीत समाधान मिळते, हेच त्यामागचं एकमेव कारण आहे. जीवनातली प्रत्येक कृती समाधानासाठी असते. काही वेळा एखाद्यानं एखाद्याला अपशब्द वापरले, तरी तसे शब्द वापरणाऱ्याला त्याचं समाधान वाटतं! एखादा वैरी भेटला आणि त्याला काही तरी बोललं, तर बोलणाऱ्याला मोकळं झाल्याची भावना होते. त्यातून तो समाधानी होतो. वाईट कर्मसुद्धा अनेकदा समाधानाचं कारण ठरतं असतं, ते असं ! मात्र, वारी हे तर पुण्यकर्म आहे. अशा या पुण्यकर्माकडं सर्व जण प्रवृत्त होणार यात नवल काहीच नाही. सात्त्विक कर्म हे नेहमीच आनंद देत असते. शेवटी सर्व जण समाधान, सुख, आनंद मिळवण्यासाठी तर धडपडत असतात. भगवंताचं मूळ स्वरूपच आनंदस्वरूप आहे. हात-पाय फुटलेल्या आनंदालाच पांडुरंग म्हणावं! आनंदासाठी मनुष्य आयुष्यभर झुरतो, आनंद मिळवणं हाच प्रत्येकाचा उद्देश असतो. ज्याला आनंद मिळत नाही, तो आत्महत्या करतो. या सगळ्याचं केंद्र एकच आहे. 

त्यामुळं वारीत चालणारे आनंद मिळवण्यासाठीच येतात. आनंद मिळतो, हे पटल्यानंतर मग ते कालांतरानं वारीला नेहमी येत राहतात. नेहमी वारीला येणारे माळ घालतात. वारीतल्या भजनाची सवय ते घरी घेऊन जातात. मुलांना घेऊन घरी हरिपाठ म्हणतात. नामस्मरण करतात. त्यांच्या जीवनात घडलेलं हे परिवर्तन त्यांच्या आनंदाचं, समाधानाचं कारण ठरतं. विज्ञान कितीही श्रेष्ठ असलं, तरी ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञानात बदल होत नाही, विज्ञानात बदल होतो. वारीच्या बाह्यांगाचं स्वरूप पालटलं असेल; पण अंतरंग पालटलेलं नाही. आता जुने रस्ते राहिलेले नाहीत. बैलगाड्या गेल्या; ट्रक आले. हे पालटलेलं रूप आहे. सत्तर वर्षांपूर्वी मी बघितलेल्या वारीत अवघे पाच ते सहा हजार वारकरी असत. आता वारीतली माणसं मोजता येत नाहीत. 

चालणाऱ्या वारीची लांबी १८-२० किलोमीटर असते. विज्ञानाला प्राधान्य दिलं असतं, तर वारकरी गाडीतूनच वारीला गेले असते. नाही का? सध्या गाडीतून जाणाऱ्या वयस्कर, अपंग माणसांचा अपवाद सोडून द्या. मनुष्य निष्ठेवर जगत असतो. देव नाही तर भाव नाही. विठ्ठलाच्या निष्ठेवर आम्ही वारकरी जगत आहोत. चांगल्या-वाईट प्रसंगी देवावरच्या निष्ठेनंच आम्हाला बाहेर काढलं आहे. वारी चांगली की वाईट, हे कुणाला विचारायची गरज नाही. माझा वारीतला अनुभव अत्यंत चांगला आहे. अत्यंत आनंदी आहे. त्यामुळं विज्ञान आणि ज्ञान हे एकमेकांना मारक नव्हेत; तर पूरकच आहेत. मात्र, जर कुणी एखादा म्हणेल की विज्ञानच श्रेष्ठ आणि अध्यात्म कनिष्ठ, तर ते कुठलाही वारकरी मान्य करणार नाही!

(शब्दांकन - शंकर टेमघरे)

साभार - दै.सकाळ