Sunday 26 June 2016

नियम थोडा करावा, पण तो शाश्वताचा असावा ! - श्री महाराज

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते, त्या झाडाला आपण पाणी घालतो, त्याची मशागत करतो, त्या झाडाकडे लक्ष पुरवितो. परंतु जे झाड वाढू नये असे वाटते, किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही, त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो. तसे, जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल, त्याची जोपासना करावी. देहाकडे, विचारांकडे, विषयांकडे दुर्लक्ष करावे, म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना, त्याला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्याभोवती कुंपण घालावे लागते, त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा; तो जितका गुप्त राहील तितका चांगला. त्याचे प्रदर्शन झाले तर त्याला दृष्ट लागते. म्हणून परमार्थ हा कोणाच्या न कळत, परंतु अत्यंत आवडीने करावा. झाड लावल्यावर ते किती वाढले आहे हे कुणी रोज उकरून पाहात नाही, त्याप्रमाणे अनुभवाच्या, प्रचीतीच्या मागे लागू नका; त्यामुळे प्रगती खुंटेल.

हट्टी आणि व्यसनी माणसे एका दृष्टीने मला आवडतात; कारण त्यांचा हट्ट भगवंताच्या मार्गाला लावला की झाले. परमार्थात नियम थोडाच करावा, पण तो शाश्वताचा असावा; म्हणजे, जेणेकरून भगवंताचे प्रेम लागेल याबद्दलचा असावा, आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा. जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यानमार्ग साधतो. हा मार्ग फार थोरांचा आहे. ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो; त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण वर्षेसुद्धा जातील, पण त्याच्या देहाला काही होणार नाही. आपल्यासारख्याला साधनांत साधन म्हणजे भगवंताचे नाम; दानांत दान म्हणजे अन्नदान; आणि उपासनांत उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय; या तिन्हींमुळे देहाचा विसर पडतो. म्हणून शक्य तो या तीन गोष्टींची कास धरा. मनुष्याची साहजिक प्रवृत्ती व्याप वाढविण्याकडे असते. द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असतो हेही खरे. साधे मधमाश्यांचे उदाहरण घ्या. त्या अनेक झाडांवरून मध गोळा करतात आणि नंतर पोवळ्यात एकत्र करतात. असा एकत्र केलेल्या मधाचा केवढा गोड साठा होऊ शकतो बरे ! अशा रीतीने सर्व द्वैतामध्ये एक अद्वैत, म्हणजे एक राम, पहायला शिकावे; आणि ज्याला सर्वत्र राम पाहणे असेल त्याने स्वतःमध्येच राम पाहून, प्रत्येक कृती ही रामाची समजावी. स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही. तेव्हा स्वतःचा म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही, आणि हा देहाचा विसर राममय झाल्यानेच होईल. म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहा. परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते .
-Varkariyuva.blogspot.in