Wednesday 13 July 2016

नामदेव पायरी - श्री क्षेत्र पंढरपूर

नामदेव पायरी-
अशी आख्यायिका सांगतात की संत नामदेवांनी श्री पांडुरंगाला सांगितले की, " हे भगवंता! मला तुमचे वैकुंठपद नको त्यापेक्षा इथे येणार्‍या सर्व भक्तांच्या पायधुळ मला लागेल अशी जागा द्या". असे म्हणुन संत नामदेवांनी मंदिराच्या पायरीकडे बघितले तर ती भुमी एकदम दुभंगली. या वेळी भगवंत पांडुरंग संत नामदेवास म्हणाले की, " हे नामा,तुला ही भुमी दिली. माझ्या दर्शनास येणार्‍या भक्तमंडळीची पायधुळ तुला लाभेल." नंतर पांडुरंगास नामदेवांनी नमस्कार केला आणि त्या दुभंगलेल्या भुमीमध्ये उडी टाकली.त्याचवेळी तिथे असलेल्या संत नामदेवांच्या मंडळींनी उड्या घेतल्या. सर्व लोक बघत असतानाच भुमी एकदम पहिल्याप्रमाणे झाली.
         ही घटना शके १२३८ आषाढ वद्य त्रयोदशीस झाली. संत नामदेवांसह त्यांच्या परिवारातील ज्या १४ जणांनी उड्या घेतल्या त्यात त्यांची आई गोणाई,वडिल दामाशेटी,पत्नी राजाई,चार पुत्र श्रीनारायण,श्रीविठ्ठल,श्रीगोविंद,श्रीमहादेव तसेच तिघी सुना गोडाई,येसाई,मखराई,मुलगी लिंबाई, बहिण आऊबाई,संत नामदेवांच्या दासी आणि शिष्या संत जनाबाई यांचा समावेश होता. या ठिकाणी पुजेकरीता सर्व लोकांनी पायरी केली आहे या पायरीस संत नामदेव पायरी असे म्हणतात.

Varkariyuva.blogspot.in