Saturday 9 July 2016

आज माऊली नातेपुतें मुक्कामी !

शंभू वसला शिंगणापूरी
शिखर शिंगणापूर अर्थात 'दक्षिण कैलास' रूसून बसलेल्या भगवान शंभू महादेवांचा शोध घेतल्यानंतर माता पार्वतीनी भगवान शंकराशी दुसरा विवाह केला अशी कथा आहे.वारीच्या वाटेवर नातेपुते  पासून आवघ्या अठरा किलोमीटर असणारे हे तीर्थक्षेत्र. मनुष्य जीव हा शिवाच्या भेटीला चालत जात  असतानाच दुरूनच  शिखर शिंगणापूरचा  डोंगर आणि कळस दिसून येतो. वारकऱ्यांचे,हात,साहजिकच जोडले जात  होते.
संत जनाबाई म्हणतात,शिवा राम नाही भेद।तिही देव,ऐसे सिद्ध।
किंवा संत कान्होपात्रा म्हणतात त्याप्रमाणे शिव तो निवृत्ती।विष्णू ज्ञानदेव पाही। सोपान तो ब्रम्हा।मूळ माया मुक्ताई।
संत निवृत्तीनाथ हा भगवान शिवाचा अवतार तर माऊली ज्ञानोबाराय हे भगवान विष्णूचा अवतार संत सोपानदेव हे भगवान ब्रम्हदेवांचा अवतार.
जसे रूक्मिणी मातेच्या शोधार्थ भगवान श्रीकृष्ण परमात्मा पंढरपूरात आले.तसेच भगवान शिवजी माऊली ज्ञानोबारांयाचा पालखी सोहळा पाहण्यासाठी तर शिखरावर येऊन राहिले नसतील ?
असो...
भजन करी महादेव।राम पुजी सदाशिव।
माऊलींचा आजचा मुक्काम हा शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या  जवळ असणाऱ्या नातेपुतेत...