Wednesday 17 August 2016

परमार्थ केव्हा करावा ? - पू.श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

माणसाने परमार्थ कधी करावा ? वयाच्या कितव्या वर्षापासून पारमार्थिक चिंतन करावे? याबद्दल मतभेद असू शकतात.कोणी म्हणेल की आयुष्याच्या शेवटच्या काऴामध्ये परमार्थ केला पाहिजे.आयुष्यभर संसार,व्यवहार करावा आणि उत्तरार्धात परमार्थ करावा.म्हणून कोणी तारूण्यातच देवधर्माच्या गप्पा मारू लागला तर त्याला त्याचे सहकारी 'म्हातारा' म्हणून संबोधतात.म्हणजे देवधर्म फक्त म्हातारपणातच करावयाचा असतो.तारूण्य हे केवऴ विषयांच्या उपभोगासाठी असते.कारण तारूण्यातच इंद्रिये सक्षम असतात.म्हातारपणामध्ये इंद्रिय विषयांचा उपभोग घेऊ शकत नाही.त्यामुऴे देवधर्म हा म्हातारपणात करायचा असतो.जगामध्ये असा विचार करणारे लोकच अधिक आहेत.त्यामुऴे प्रवचन-कीर्तनांना वयोवृद्ध लोकांची अधिक गर्दी असते.परमार्थ हा रिटायर्ड झाल्यानंतर करायचा असतो,हीच अनेकांची भावना असते.
पण ही भावना योग्य नाही. परमार्थाचे चिंतन बालवयातही होऊ शकते.संतांची चरित्रे पाहिली तर बालपणीच त्यांना परमार्थाची आवड होती असे आढऴते.समर्थ श्रीरामदासस्वामी बालपणी विश्वाची चिंता करीत असत.श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी वयाच्या सोऴाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगितला.त्यांना परमार्थात वयाची अडचण आली नाही.त्यांनी सोऴाव्या वर्षी लिहिलेले आपणांस वाचायला एकसष्ठावे वर्ष का ? असा प्रश्न नेहमीच पडतो.वास्तविक परमार्थाला वयाचे बंधन नसते.श्रीशुकाचार्यांनी तर गर्भातच संसाराचे स्वरूप ओऴखले होते.परमार्थ कधी करावा ? याचे उत्तर आहे की, ज्या क्षणी हा प्रश्न निर्माण होईल त्याच क्षणी प्रारंभ करावा ! कारण हा प्रश्न संसाराचे दु:ख कऴल्याशिवाय निर्माण होणार नाही.परमार्थ त्याच क्षणी  करावा.योगवसिष्ठांत प्रभू श्रीरामचंद्रांना उपदेश करताना वसिष्ठ म्हणतात,
'अद्यैव कुरू यच्छ्रेयो वृद्ध : सन् किं करिष्यसि ।
स्वगात्राण्यपि भाराय भवन्ति हि विपर्यये ।।'
आजच आपले कल्याण करून घे.वृद्धापकाऴी काय होणार? म्हातारपणी आपल्या इंद्रियांचेच ओझे होते ! ज्याला आनंदाची प्राप्ती लवकर व्हावी असे वाटते तो तेवढ्या लवकर परमार्थाचे चिंतन करतो.म्हणून परमार्थ कधीही करता येतो.त्याला वयाचा विचार करण्याचे कारण नाही.परमार्थ कधी करावा ? उत्तर एकच - आत्ता !

© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.
Fb.com/chaitanyamaharajdeglurkar