Wednesday 31 August 2016

सज्जन -प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।
जगामध्ये सज्जनांना नावे ठेवणे नवे नाही.अनादिकालापासून हे चालू आहे.  श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या काऴामध्ये त्यांचा महिमा ओऴखणा-यांपेक्षा त्यांना नावे ठेवणारेच अधिक होते.संतांना नावे ठेवणारे तेव्हाच होते असे नाही,तर आजही त्यांना नावे ठेवणारे आहेत.मर्यादापुरुषोत्तम प्रभूरामचंद्रांनाही लोकांनी नावे ठेवली. गुणवानाला फार मोठ्या परिक्षेतून जावे लागते.ते कसेही वागले तरी समाज त्यांना नावे ठेवतोच.पण समाज कसाही वागला तरी संत मात्र समाजाच्या हिताचेच चिंतन करतात.कारण समाज किंवा समाजातील दुष्ट लोक वाईट वागतात म्हणून संतही वाईट वागू लागले,तर दुर्जनांत आणि यांच्यात अंतरच राहणार नाही.दुर्जन कसाही वागला तर सज्जनांची दृष्टी नेहमीच चांगली असते,तर दुष्टांची वाईट!! मंबाजींनी श्रीतुकाराम महाराजांना काठीने मारले तरी तुकोबाराय,मारून मंबाजीचे हात दुखले असतील म्हणून त्याचे हात दाबण्यासाठी त्याच्या घरी गेले.संतांचा असा स्वभाव असतो.सुभाषितकार म्हणतात,

गुणायन्ते दोषा: सुजनवदने दुर्जनमुखे
गुणा: दोषायन्ते तदिदमपि नो विस्मयपदम् ।।
महामेघ: क्षारं पिबति,करुते वारि मधुरं
फणी क्षीरं पीत्वा वमति गरलं दु:सहतरम् ।।

सज्जनाच्या बोलण्यामध्ये इतरांचे दोषही गुण म्हणून येतात तर दूर्जनाच्या मुखी इतरांचे गुणसुद्धा दोष होतात,यात आश्चर्य असे काहीच नाही.मेघ समुद्रातील क्षारयुक्त खारट पाणी पितात आणि जगाला गोड पाणी देतात आणि साप दूध पितो आणि असह्य विष ओकतो.मेघ सज्जन आहेत. श्रीज्ञानेश्वर महाराजांनासुद्धा पसायदानामध्ये 'खल' म्हणजे दुष्ट नष्ट व्हावेत असे मागता आले असते.पण त्यांनी  मागितले नाही.त्यांनी तसे मागितले असते तर त्यांना कोणी संत म्हटले नसते.त्यांची सज्जनता शब्दांतून प्रगट झाली- ' जे खऴांची व्यंकटी सांडो ।' दुर्जनाबद्दलही ते चांगल्याच भावनेतून विचार करतात.आपण मेघ आहोत की साप, ते आपण तपासून पाहिले पाहिजे.

संदर्भ - संतसंग

© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.
https://m.facebook.com/chaitanyamaharajdeglurkar/