स्टीव्ह जॉब्सने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात केलेले भाषण प्रचंड गाजले. हे भाषण म्हणजे त्यांच्या प्रेरणादायी आयुष्याचा गोषवारा आहे... त्याचा केलेला मराठी अनुवाद...
..............................................
जगातल्या सर्वोत्तम गणल्या जाणा-या महाविद्यालयांपैकी एक अशा महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात तुमच्यासोबत बोलायची संधी मला मिळते आहे, हा मी माझा बहुमान समजतो. मी महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण करू शकलो नाही. आता सत्य सांगायला हरकत नाही, पण महाविद्यालयीन दीक्षांत समारंभ इतक्या जवळून मी पहिल्यांदा पाहतो आहे.
आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी सांगणार आहे. बस्स.. काही प्रचंड कहाणी नाही. फक्त तीन छोटय़ा गोष्टी..
पहिली गोष्ट आहे ठिपके जुळवण्याच्या संदर्भातली... मी रीड कॉलेजमधून सहा महिन्यांतच बाहेर पडलो होतो, पण त्या आधी मी जवळपास १८ महिने कॉलेजमध्येच ड्रॉप इन म्हणून घुटमळत होतो. मग मी बाहेर पडलो तरी का?
याची सुरुवात खरं तर माझ्या जन्माच्या आधीपासूनची आहे. माझी आई ही एक तरुण, अविवाहित महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती, आणि तिने मला दत्तक द्यायचे ठरवले. तिची फार इच्छा की मी पदवीधर पालकांकडे दत्तक म्हणून जावे, त्यामुळे अखेर एका वकील दाम्पत्याची त्याकरिता निवड झाली. सारे कसे सुरळीत चालू होते आणि अचानक माझ्या जन्माच्या वेळी त्या दोघांनी ठरवले की त्यांना मुलगी हवी आहे.. त्यामुळे वेटिंग लिस्टवर असलेल्या माझ्या आई-बाबांना रात्री अचानक फोन गेला की, ‘‘मुलगा झालाय.. तुमची अजूनही त्याला स्वीकारण्याची तयारी आहे का?’’ ते म्हणाले, ‘‘अर्थातच..’’ अर्थात, नंतर माझ्या आईला कळले की माझ्या दत्तक आईने पदवी पूर्ण केली नव्हती आणि वडिलांनी तर शाळेच्या पुढेही मजल मारली नव्हती. तिने मग दत्तक कागदपत्रे साईन करायला नकार दिला. मग मला ‘महाविद्यालयीन शिक्षणापासून दूर ठेवले जाणार नाही’ या आश्वासनावरच तिने कागदांवर सह्या केल्या.
१७ वर्षांनंतर मी खरंच कॉलेजला गेलो. मूर्खासारखे मी स्टॅन्फोर्डसारखे महागडे कॉलेज निवडले आणि माझ्या दत्तक पालकांची मध्यमवर्गीय कमाई माझ्या शिक्षणावरच खर्च होऊ लागली. सहा महिन्यांतच त्याची किंमत मला उमगेनाशी झाली. मला माझ्या अयुष्यात मला काय करायचे आहे याची सुतराम कल्पना नव्हती आणि कॉलेजचे शिक्षण मला याचे उत्तर शोधण्यात मदत करत नव्हते आणि मी इथे आईबाबांची आयुष्यभराची कमाई उडवण्यात गुंतलो होतो. म्हणून मी कॉलेजमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि सुस्कारा सोडला.. अर्थात, त्या वेळी हा छातीत धडकी भरवणारा निर्णय होता.. पण आता वाटते की कदाचित हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय असेल.. हा निर्णय पक्का झाल्याक्षणीच मी ज्या वर्गाबाबतीत उत्साही नव्हतो तिथे जाणे बंद करून टाकले आणि ज्या वर्गामध्ये मला जाण्यात रस होता त्या वर्गाना नियमितपणे जाऊ लागलो.
हे सगळेच काही स्वप्नवत नव्हते.. डोर्म मिळायची नाही, म्हणून मित्रांच्या रूम्सवर जमिनीवर झोपावे लागे.. कोकच्या रिकाम्या बाटल्या देऊन मी ५ सेंट्स जमा करत असे.. आणि त्यातून जेवणाची तजवीज करत असे.. दर रविवारी ७ मैल चालत जात असे, ‘हरे राम हरे कृष्ण’चे व्यवस्थित जेवण खायला मिळावे म्हणून.. पण मला ते आवडत होते.. माझी अंत:प्रेरणा आणि माझे कुतूहल यांनी मला जे काही सापडले, ते पुढे आयुष्यात अनमोल ठरले. आता हेच पाहा ना...रीड कॉलेजमध्ये त्यावेळेला बहुधा सर्वोत्तम असे कॅलिग्राफीचे (सुलेखन) वर्ग चालत. संपूर्ण परिसरात प्रत्येक भित्तीपत्रकावर, इतकेच काय अगदी खणांवरदेखील सुंदर कॅलिग्राफी केलेली आढळे. मी तसाही ड्रॉप आऊट होतो आणि मला हे कसे करतात हे जाणून घ्यायचे होते, त्यातच मला माझे नियमित वर्ग करणे जरूरीचे राहिले नव्हते. कॅलिग्राफीच्या वर्गात मी सेरिफ आणि सान्स सेरिफ फॉण्ट्सविषयी मी शिकलो. त्याच्याच बरोबर दोन अक्षरांमध्ये कीती जागा असावी, अक्षरे सुशोभित कशी करावी याचेही ज्ञान मिळत होते. ते सारेच फार सुंदर, ऐतिहासिक आणि कलात्मकरीत्या हळुवार होते.. कदाचित शास्त्राच्या चिमटीत पकडण्यापलीकडले... मी त्याने भारावून गेलो...
या सगळ्याचा माझ्या आयुष्यात दुरान्वयानेही मला काही प्रत्यक्ष लाभ होईल असं मला स्वप्नातही वाटलं नसतं. पण दहा वर्षांनंतर जेव्हा आम्ही पहिला मॅकीन्टोश कम्प्युटर बनवत होतो, हा सगळा काळ माझ्या मदतीला आला. आम्ही त्या सगळ्याचा वापर मॅकीन्टोशमध्ये केला. सुंदर टायपोग्राफी असलेला तो पहिला कम्प्युटर होता. जर मी महाविद्यालयातून त्या विषयांच्या जंजाळातून बाहेर पडलो नसतो, तर मॅकीन्टोशमध्ये विविध टाईप फेसेस आणि प्रमाणबद्ध फोण्टस दिसले नसते आणि विंडोजवाल्यांनी जर मॅकीन्टोश जसाच्या तसा कॉपी केला नसता, तर आज जगातल्या कुठल्याच पीसीवर ते दिसले नसते. मी महाविद्यालयातून बाहेर पडलो नसतो तर या कॅलिग्राफीच्या वर्गात कसा पोहोचलो असतो; आणि अर्थात, आज पीसीवर जे सुंदर टाइप फॉण्ट्स दिसतात ते कसे दिसले असते.. अर्थात हे ठिपके जोडणे.. आज १० वर्षांनंतर मागे वळून बघताना सोप्पे जाते.. तेव्हा हे कळत नव्हते..
पुन्हा.. हे ठिपके तुम्ही भविष्यात बघून नाही जोडू शकत.. ते फक्त मागे वळून बघताना जोडलेले दिसतात. म्हणूनच ते पुढे जाऊन जोडले जातील, यावर विश्वास ठेवावा लागतो. तुम्हाला कशावर तरी विश्वास ठेवावाच लागतो.. तुमचे मन, आतला आवाज, भाग्य, नशीब, कर्म.. काहीतरी.. या विचार पद्धतीने मला कधीच दगा दिलेला नाही आणि त्यामुळेच माझ्या आयुष्यात बराच बदल घडलेला आहे.
माझी दुसरी गोष्ट आहे प्रेम आणि तोटय़ाविषयी..
मी फार नशीबवान आहे. मला काय करायला आवडते हे मला फार आधीच उमगले होते. मी २० वर्षांचा असतानाच मी आणि वोझने मिळून घरच्या गॅरेजमध्ये अॅपल कम्प्युटर्सची सुरुवात केली. आम्ही खूप मेहनत केली. दहा वर्षांत गॅरेजमधल्या आम्हा दोघांपासून सुरू झालेली अॅपल २ बिलियन डॉलर्स आणि ४००० कामगारांची कंपनी झाली होती. आम्ही वर्षभरापूर्वीच आमचे सर्वोत्तम काम बाजारात आणले होते.. मॅकीन्टोश कम्प्युटर! मी तेव्हा फक्त ३० वर्षांचा होतो. आणि अचानक मी माझ्या कंपनीतून हाकलला गेलो. तुम्ही स्वत: स्थापन केलेल्या कंपनीतून तुम्ही स्वत: हाकलले कसे जाऊ शकता? खरं सांगायचं झालं तर जसं अॅपल वाढत होतं, त्याच्याबरोबर मला गुणी वाटणा-या काही मंडळींना मी नोकरीवर ठेवले. काही वर्षे ठीक गेली, पण नंतर आमच्या दृष्टिकोनात फरक पडू लागले. अखेर भांडणे झालीच.. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी पण त्यांचीच पाठराखण केली. साहिजकच वयाच्या तिसाव्या वर्षी मी अक्षरश: हाकलला गेलो.. आणि तेही अतिशय सार्वजनिक पद्धतीने.. माझ्या आयुष्याचा जो केंद्रबिंदू होता, तोच गायब झाला. मी उद्ध्वस्त झालो..
काही महिने.. नक्की काय करावे हेच सुचेना.. मला जणू माझ्या आधीच्या कार्यकुशल उद्योजकांचा विश्वासघात केल्यासारखे वाटत राही.. जणू आधी धावणा-याने माझ्या हातात दिलेले निशाण मी पाडून बसलो होतो. मी डेव्हिड पेकार्ड, बोब नोईस यांना भेटलो.. आणि अशा पद्धतीने घोळ घातल्याबद्दल त्यांची माफी मागितली. मी एक मोठे सार्वजनिक अपयश बनलो होतो आणि सिलिकॉन व्हॅलीतून पळून जाण्याचे विचार मनात घोळू लागले होते. पण हळूहळू एक गोष्ट जाणवायला लागली.. माझे अजूनही माझ्या कामावर प्रेम होते.. अॅपलमधल्या घटनांनी त्यात तीळभरही फरक पडला नव्हता. मला नाकारण्यात आले होते.. पण माझे प्रेम संपले नव्हते.. म्हणूनच.. मी पुन्हा सुरुवात करण्याचा निश्चय केला.
तेव्हा तसे वाटले नसेल कदाचित, पण अॅपलमधून हाकलले जाणे ही माझ्या आयुष्यातली सर्वाधिक चांगली घटना ठरली. यशस्वी असण्याचे सगळे दडपण गळून पडले. त्याची जागा एखाद्या नवोदिताच्या खांद्यावर असलेल्या हलकेपणाने घेतली. कशाचीही खात्री नव्हती.. याच स्थितीमुळे मी माझ्या आयुष्यातल्या सर्वाधिक सृजनात्मक कालखंडात प्रवेश केला..
त्यानंतरच्या ५ वर्षांत मी ‘नेक्स्ट’ नावाची कंपनी स्थापन केली, ‘पिक्सार’ नावाची दुसरी कंपनीही उभारली आणि एका अशा भन्नाट स्त्रीच्या मी प्रेमात पडलो जिच्याशी मी लग्न केले. ‘पिक्सार’ने जगातली पहिली अॅनिमेटेड फिल्म ‘टॉय स्टोरी’ बनवली आणि आज ती जगातली पहिल्या क्रमांकाची अॅनिमेशन कंपनी आहे.. गंमत म्हणजे, पुढे ‘नेक्स्ट’पण ‘अॅपल’ने विकत घेतली.. आणि आम्ही ‘नेक्स्ट’मध्ये बनवलेले तंत्रज्ञान आज ‘अॅपल’च्या कामाला येते आहे.. आणि ‘अॅपल’च्या यशाला ते कारणीभूत ठरते आहे..
मला खात्री आहे की मी जर ‘अॅपल’मधून हाकलला गेलो नसतो तर हे कधीच घडले नसते. औषधाची चव घेणे कठीण असते, पण रुग्णाला त्याचीच गरज असते. कधी आयुष्याने डोक्यात दगड घातलाच, तर निराश होऊ नका. मला खात्री आहे की जर माझे माझ्या कामावर प्रेम नसते तर मी अशा पद्धतीने काम करत राहू शकलो नसतो. आपले प्रेम कशावर आहे याचा शोध घेत राहा. हे केवळ तुमच्या व्यक्तीगत आयुष्यात जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते तुमच्या कार्यक्षेत्रातही. तुमच्या आयुष्यातला एक मोठा भाग तुम्ही काम करण्यात व्यतीत करणार आहात, आणि उत्तम काम करण्याकरिता तुम्ही जे करताय त्यावर तुमचे प्रेम असणे आवश्यक आहे. जर ते तुम्हाला अजून सापडले नसेल तर मग शोधात राहा.. स्वत:ची समजूत घालून नका घेऊ. हृदयाच्या इतर गोष्टीप्रमाणेच जेव्हा तुम्हाला ते सापडेल, तेव्हा ते तुम्हाला आपोआप जाणवेल आणि एखाद्या सुंदर नात्याप्रमाणे वर्षे जशी सरकत जातील, तसतसा तुमचा त्यातला रस वाढतच राहील. म्हणून म्हणतो.. शोधत राहा.. स्वत:ची समजूत घालून नका घेऊ.
माझी तिसरी गोष्ट मृत्यूविषयी आहे..
मी १७ वर्षांचा होतो तेव्हा एक वाक्य वाचले होते.. ‘जर तुम्ही रोज आपले आयुष्य आजचा दिवस शेवटचा असं समजून घालवलात तर कमीत कमी एक दिवस तुमची समजूत खरी ठरेल.’ या वाक्याने माझ्यावर खूप परिणाम केला होता. तेव्हापासून जवळपास ३३ वर्षे मी रोज सकाळी उठतो आणि आरशात पाहून स्वत:ला विचारतो- ‘‘जर आज मला मरण यायचे असेल, तर आज जे मी करतो आहे तेच मला करायला आवडेल का?’ जर माझे उत्तर बरेच दिवस ‘नाही’ असेल, तर मला कळते की काहीतरी बदल करायची गरज आहे.
मला लवकरात लवकर कधीही मृत्यू येऊ शकतो ही कल्पना मला माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेताना खूप कामाला येते. कारण आपल्या बाह्य अपेक्षा, सारा अहंकार, लाज किंवा अपयशाची भीती हे सारं सारं मरणाच्या भीतीमध्ये नष्ट होतं.. आणि जे महत्त्वाचं आहे, तेवढंच उरतं. तुम्ही मरणार आहात हे लक्षात ठेवणे म्हणजे तुम्ही काहीतरी गमावू शकता या भीतीपासून मुक्ती असं मी समजतो. तुम्ही आधीच इतके नागवे झालेले असता की हृदयाचं सोडून दुस-या कुणाचं ऐकण्याचं तुम्हाला कारणच रहात नाही.
साधारण वर्षांपूर्वी मला कॅन्सर असल्याचे निदान झाले. सकाळी ७.३० वाजता माझा स्कॅन झाला आणि स्वादुपिंडापाशी मला भला मोठा टय़ुमर असल्याचे स्पष्ट झाले. मला स्वादुपिंड शरीरात कुठे असते हेही ठाऊक नव्हते. डॉक्टर म्हणाले हा जवळपास असाध्य अशा स्वरूपाचा कॅन्सर आहे आणि मी काही सहा महिन्यांपेक्षा जास्त जगणार नाही. डॉक्टरने मला घरी जाऊन सा-या गोष्टींची आवराआवर करायला सांगितले, म्हणजे दुस-या शब्दात तो मला मृत्यूसाठी तयार राहायला फर्मावत होता. याचाच दुसरा अर्थ म्हणजे पुढच्या दहा वर्षांत तुम्ही आपल्या मुलांना ज्या चार युक्तीच्या गोष्टी सांगणार होता, त्या सांगायला आता तुमच्याकडे फक्त सहा महिने आहेत. याचाच दुसरा अर्थ म्हणजे सगळी बटणं लावून तयार राहा.. निरोप घ्यायची वेळ आलेली आहे..
त्या निदानासोबत मी एक दिवस घालवला.. त्या दिवशी संध्याकाळी माझी बायोप्सी झाली. त्यांनी माझ्या घशावाटे आणि पोटातून आतडय़ात एन्डोस्कोप घुसवला, माझ्या स्वादुपिंडात सुई खुपसून त्यांनी तिथल्या पेशी काढल्या. मला अर्थात भूल दिली होती, पण माझी पत्नी म्हणाली की, जेव्हा डॉक्टर्सनी त्या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्या, तेव्हा ते आनंदाने रडू लागले. माझा कॅन्सर अतिशय दुर्मिळ असला तरी शस्त्रक्रियेने तो बरा करता येण्यासारखा होता.. माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि मी आता ठणठणीत बरा आहे.
ही माझी मृत्यूशी झालेली सर्वात जवळची आणि बहुधा अजून दोन दशक तरी टिकेल अशी ओळख. आत्ता मी याविषयी एवढय़ा अधिकारवाणीने बोलतो आहे, त्याचं कारण या एका उपयुक्त कल्पनेचं या अशा ओळखीत झालेलं रूपांतर.
मरण कुणालाच नको असतं. अगदी ज्यांना स्वर्ग हवा असतो त्यांचीही त्याकरिता मरण्याची तयारी नसते. तरीही मरण हे आपल्या सगळ्यांना एकत्र करणारच आहे. कोणालाही ते चुकलेले नाही. आणि हे खरंच अगदी बरोबर आहे, कारण मरण हा जीवनाचा सर्वात छान शोध आहे. तो जीवनातल्या बदलाचा शिल्पकार आहे. तोच जुन्याला दूर करून नव्याची वाट मोकळी करतो. आज, कदाचित तुम्ही चर्चेत आहात, पण उद्या तुम्ही हळूहळू म्हातारे व्हाल आणि दूर सारले जाल. जास्त नाटय़मय वाटले, तरी हेच सत्य आहे..
तुमच्याकडे अगदी मर्यादित वेळ आहे, म्हणूनच दुस-या कोणाचं आयुष्य जगत तो फुकट घालवू नका. दुसऱ्यांच्या विचारावर आधारलेल्या निष्कर्षांचं जोखड आपल्या आयुष्यावर मिरवू नका. दुसऱ्यांच्या मतांच्या गलबल्यात आपला आतला आवाज दबून जाऊ नये याची काळजी घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे, आपले हृदय आणि अंत:प्रेरणा यांचं ऐकायचं धाडस सदैव दाखवा. त्यांना जवळपास नेहमीच तुम्हाला काय बनायचे आहे, याची कल्पना असते. बाकी सगळे दुय्यम आहे.
जेव्हा मी तरुण होतो त्या वेळी होल अर्थ कॅटलॉग नावाचे मासिक प्रसिद्ध होत असे- जणू आमच्या पिढीचे बायबलच.. इथून जवळच मेन्लो पार्क इथे राहणारा स्टेवर्ट ब्रांड नावाचा इसम ते काढत असे आणि त्याने आपल्या कवीप्रवृत्तीने ते मासिक सजवले होते. ही गोष्ट १९६० ची, पर्सनल कम्प्युटर किंवा डेस्कटॉप पब्लिशिंगच्या खूप आधीची. साहजिकच, हे मासिक पूर्णपणे टाईपरायटर, कात्री आणि पॉलोराईड कॅम-याने बनवले जाई..जणू पेपरबॅक फॉर्ममधले गुगल.. आणि तेही गुगल येण्याच्या ३५ वर्षे आधी. खूप आदर्शवादी, नेटके आणि नव्या कल्पनांनी भारलेले.
स्टेवर्ट आणि त्याचे सहकारी भरपूर वर्षे त्या मासिकाचे अंक काढत राहिले.. आणि जेव्हा त्याचा प्रवास संपला तेव्हा त्यांनी त्याचा शेवटचा अंक काढला. सत्तरीची मध्यान्ह चालू होती आणि मी तुमच्याच वयाचा होतो.. त्या शेवटच्या अंकात शेवटच्या पृष्ठावर एक गर्द रानातल्या रस्त्याचे चित्र होते. त्याच्या खाली लिहिले होते.
‘भुकेलेले राहा... वेडे राहा...’
हा त्यांचा शेवटचा संदेश होता... भुकेलेले राहा... वेडे राहा... मी सतत स्वत:साठी तेच मागतो. आणि आत्ता जेव्हा तुम्ही पदवीधर होऊन बाहेर पडताय.. तेव्हा तुमच्यासाठी पण हीच इच्छा करतो आहे..
भुकेलेले राहा... वेडे राहा!!!
(मूळ भाषणाची तारीख- १२ जून २००५)