Sunday 11 September 2016

परमपूज्य के.वि. बेलसरे काका यांचा जीवन परिचय ...!

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

|| श्री के. वि. (प.पू. बाबा) बेलसरे  ||

श्रीमहाराजांचे अधिकारी शिष्य
श्री के. वि. (प.पू. बाबा) बेलसरे यांचे संक्षिप्तरूपात परिचय.

आपल्या हजारो प्रवचनातून, पुस्तकातून आणि स्वत:च्या खडतर साधनाने व आचरणाने श्री महाराजांना व त्यांच्या शिकवणीला समाजापुढे आणण्याचे काम पू. बाबा बेलसरे यांनी केले व ‘शिष्यच आपल्या गुरूला जिवंत ठेवतो.‘ हे वचन सर्वार्थाने सार्थ केले. हे करत असताना सद्गुरूंच्या अनुसंधानात व नामसाधनेत स्वत:ला कसे विरघळवून टाकावे याचा वस्तुपाठ म्हणजे त्यांचे चरित्र होय.

के. वि. बेलसरे (पू बाबा) यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९०९ रोजी सिकंदराबाद येथे झाला. पूर्वायुष्यात स्वभावत: क्षात्र वृत्तीमुळे क्रांतिकार्यात सहभागी झाले. त्यातून बाहेर पडल्यावर, मनाच्या अत्यंत घालमेलीच्या अवस्थेत एकांतात बसले असताना तत्त्वज्ञान हा विषय घ्यावा अशी तीव्र अंत:प्रेरणा झाली. पुढे शिक्षणासाठी मुंबईत आल्यावर थोड्याच दिवसात त्यांना श्री महाराजांचे वाणी रूपाने प्रत्यक्ष मार्गदर्शन सुरु झाले. श्रीमहाराजांचे अलौकिक ज्ञान व अकृत्रिम प्रेमळ वाणी याने ते पहिल्या भेटीतच भारावून गेले व त्यावेळी श्रीमहाराजांचा त्यांच्या जीवनात प्रवेश झाला तो कायमचाच!

सिद्धार्थ कॉलेजमधील प्राध्यापकाची नोकरी सांभाळून बाबांचा सर्व वेळ लेखन व नामस्मरण यामध्ये जात असे. तत्त्वज्ञानाचे शिक्षण व पुढे अध्यापन यासाठी त्यांनी पाश्चात्य व भारतीय तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला. तसेच श्री महाराजांच्या सांगण्यावरून भारतीय व पाश्चात्य संतांच्या वांङ्मयाचाही सखोल अभ्यास व चिंतन झाले. जन्मत: तीव्र स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, परमार्थाकडे स्वाभाविक ओढा व सत्संगती या अभूतपूर्व संगमाने तत्त्वचिंतनाची बैठक पक्की झाली. तत्त्वज्ञान हे केवळ पुस्तकी न राहता ते प्रत्यक्ष जीवनात उतरले तरच माणसाला समाधान मिळू शकते हे श्रीमहाराजांचे म्हणणे अक्षरश: पटल्याने अथाऽतो जीवन जिज्ञासा’ हे त्यांच्या जीवनाचे सूत्र झाले. जवळपास ३७ वर्षे श्रीमहाराजांचे मार्गदर्शन, श्री भाऊसाहेब, श्री तात्यासाहेब या सत्शिष्यांचा निकट सहवास व अत्यंत प्रखर साधना, यांनी त्यांचे पारमार्थिक जीवन उजळून गेले.

श्री महाराजांच्या कार्याचा, तत्त्वज्ञानाचा व शिकवणीचा प्रसार करण्यासाठी त्यांची वाणी व लेखणी अखंड कार्यरत राहिली. त्यांनी लिहिलेले श्रीमहाराजांचे चरित्र म्हणजे तर त्यांच्या ग्रंथसंपदेचा मुकुटमणी म्हणावा लागेल. इतके अप्रतिम चरित्र कोणत्याही संतावर लिहिलेले आढळून येत नाही, त्यांनी हे चरित्र लिहिताना इतक्या सूक्ष्म गोष्टी रसाळपणे लिहिल्या आहेत की, ते वाचताना आपण श्रींच्याच काळात वावरत आहोत असे वाटते. ३ ऑक्टोबर १९५७ (विजयादशमी) या दिवशी हे चरित्र प्रसिद्ध झाले. त्यानंतर ४० वर्षे बाबांनी आपले लेखनकार्य सतत चालू ठेवले. श्रीमहाराजांच्या आज्ञेने लिहिलेले त्यांचे आत्मचरित्र- ’आनंदसाधना’ हे साधकांसाठी आजही आदर्शवत् आहे. भक्तिमार्गातील साधनात येणारे विविध टप्पे, अडचणी व अनुभव यांबद्दल एवढे सुस्पष्ट मार्गदर्शन आधुनिक मराठी वाङ्मयामध्ये क्वचितच सापडेल.

श्री महाराजांची भेट झाल्यावर त्यांच्याच आज्ञेने प.पु. बाबांचे निरूपण सुरु झाले ते अक्षरश: शेवटच्या श्वासापर्यंत! अमोघ वक्तृत्व, विद्वत्ता, स्वानुभवाचे तेज, व तत्त्वज्ञानासारखा कठीण विषय सोपा करून सांगण्याची हातोटी यामुळे जनमानसावर त्यांच्या निरूपणाचा विलक्षण प्रभाव पडत असे. आपल्या प्रवचनांमध्ये अनेक संत, सत्पुरुषांचे नामाविषयीचे अनुभव सांगत व शेवटी आपल्या सद्गुरूंच्या म्हणजे श्रीमहाराजांच्या जीवनातील प्रसंग सांगितल्याशिवाय त्यांना राहवत नसे. महाराजांच्या गोष्टी, त्यांची वचने व तत्त्वज्ञान सांगताना त्यांचे प्रेम उचंबळून येई व त्यांच्या वाणीला विशेष बहर येई.

देशविदेशातून बोलावणे असूनही त्यांनी महाराजांच्या स्थानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी क्वचितच निरूपणे केली. त्यांनी श्रीमहाराजांचा निरोप लोकांपर्यंत पोचविला. अक्षरश: हजारो लोकांना ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक झाले पण हे करत असताना ते स्वत: कधी बुवा किंवा महंत झाले नाहीत. त्यापायी येणाऱ्या लौकिकापासून स्वत:ला व आपल्या साधनेला त्यांनी अतिशय सांभाळले. शेवटी शेवटी तर त्यांचे जीवन संपूर्णपणे श्रीमहाराजमय झाले होते. अशा या महापुरुषाने ३ जानेवारी १९९८ रोजी सकाळी ८ वाजता मालाड येथे राहत्या घरी अत्यंत शांतपणे देह ठेवला. अशा महान विभुतीच्या चरणी कोटी कोटी दंडवंत.

साभार : श्रीपाद सेवा मंडळ
|| श्रीराम जय राम जय जय राम ||

- varkariyuva.blogspot.in