Tuesday, 6 September 2016

शांतिब्रह्म पू. गुरुवर्य ह.भ.प.मारोतीमहाराज कुरेकर बाबा यांचा प्रगट दिन !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।
माय माऊली शांतीब्रम्ह गुरुवर्य कुरेकर बाबा

साधकांचे मायबाप अभिष्टचिंतन सोहळा

आज दिनी तेजाचा प्रकाश उदयास आला आणि सर्व वारकरी संप्रदाय प्रकाशांत न्हावुन नीघाले त्या तेजोमय प्रकाशाला कोटि कोटि प्रणाम..
          भक्त ऐसे जाणा जे देही ऊदास ।
          गेले आशापाश निवाराेनी ।।

गंगा आली आम्हावरी । संत पाऊले साजीरी ।।
तेथे करीन अंघोळी । ऊडे चरणरज धुळी ।।

      वारकरी संप्रदाय हा एक विशाल वटवृक्ष आहे. त्याच्या छायेत बसले असता तो आपल्याला सुख, शांती आणि उत्तम जीवनाची दिशा दाखवतो. परंतु त्याकरिता योग्य मार्गदर्शक असणे आवश्यक आहे. मग वारकरी संत हेच मार्गदर्शक झालेत आणि त्यांनी प्रत्येकाला सन्मार्ग दाखवला. समानतेची शिकवण दिली, बाटाबाट समूळ नष्ट करून सर्वांना ईश्वर तत्व एकच आहे याची जाणीव करून दिली. या महाराष्ट्रात हि भागवत धर्म पताका अखंड तेवत राहावी म्हणून स्वानंदसुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांचा अवतार झाला. सद्गुरु जोग महाराजांनी आपल्या शिष्यांच्या आग्रहावरून आळंदी देवाची येथे १९१७ साली चैत्र शु.१ या दिवशी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली.
     
      याच सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेत एक महान तपस्वी, साधकांचे मायबाप आणि संपूर्ण वारकरी सांप्रदायाचा जिव्हाळा म्हणजे सद्गुरू मारोती बाबा कुर्हेकर. गुरुवर्य बाबा हे विद्यार्थी म्हणून १९५६ साली संस्थेत बसले आणि ४ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून सद्गुरु जोग महाराज चरणीच सेवा समर्पित करावी या हेतूने अखंड संस्थेच्या विद्यार्थ्यांकरिता पूर्ण वेळ मार्गदर्शन आणि त्याचं चारित्र्य घडविण्यासाठी दिला.
     आज या वयातही गुरुवर्य बाबा हे विद्यार्थ्यांना ज्ञानदान देत आहेत. गुरुवर्य मोठे बाबा गेल्यानंतर आलेली अध्यक्ष पदाची जबाबदारी आपण स्वतः श्रेष्ठ असून न घेता केवळ ज्ञानदान हाच दृष्टीक्षेप त्यांनी बाळगला. गुरुवर्य बाबांचं जीवन म्हणजे सोज्वळ अंतकरण, प्रत्येकाशी प्रेमाने वार्तालाप आणि चेहर्यावरची अप्रतिम शांती आणि तेज. गुरुवर्य बाबांचं दर्शन घेतल्यावर जणू साक्षात माऊलीच भेटली अस वाटते.

     गुरुवर्य बाबांचं जीवन म्हणजे साक्षात नाथ महाराज आणि म्हणूनच बाबाला सर्व सांप्रदाय हे शांतीब्रम्ह म्हणून ओळखते. नेहमी बाबांची हास्यमुद्रा, साधकां बद्दलच नाही तर, कोणीही दर्शनाला आल तर त्याच्या विषयी असणारा प्रेमभाव आणि त्याची आस्थेने चौकशी करणे, काही अडचण असल्यास त्याच निराकरण करणे आणि अगदी सोप्या साध्या भाषेत हितोपदेश करून जाणे हेच गुरुवर्य बाबांचं विशेषत्व. कीर्तनात बाबा बोलायला लागले की जणू अमृताची वाणी बाहेर पडते. प्रसन्न भावमुद्रा, तेजपुंज भाव, वैराग्य आणि त्यागाची मूर्ती, आणि चेहऱ्यावर असणारी अप्रतिम शांती पाहून जणू साक्षात माऊलीच बोलत असते.
  
   गुरुवर्य बाबांचं जीवन म्हणजे अथांग शांतीचा सागर त्या सागरातील एक थेंब जरी आपल्या जीवनात आला तरी आपल जीवन आदर्शमय व्हाव अस त्यांच सामर्थ्य...
आमच्याकरिता गुरुवर्य बाबाच म्हणजे माऊली आणि गुरुवर्य बाबाच म्हणजे सद्गुरु जोग महाराज.. ऋषीपंचमीला (६ सप्टेंबर)  बाबा ८५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत..
          बाबांना उदंड आयु आरोग्य लाभो हीच माय माऊली चरणी प्रार्थना.....!

"तुमचिये दासीचा दास करुनी ठेवा ।
   आशीर्वाद द्यावा हाचि मज ।।"

- वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र