Monday 3 October 2016

वैकुंठवासिनी वो जगत्रयजननी । तुझा वेधु ये मनीं वो ॥



शारदीय नवरात्र शब्दसुमनांची  ४ थी माळ

रंगा येई वो ये रंगा येई वो ये ।
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ॥
वैकुंठवासिनी वो जगत्रयजननी ।
तुझा वेधु ये मनीं वो ॥
कटीं कर विराजित मुकुट रत्नजडित । 
पीतांबरु कासिया तैसी येई कां धावत ॥
विश्वरूप विश्वंभरे कमळनयने कमळाकारे वो । 
तुझे ध्यान लागो बापरखुमादेविवरे वो ॥


सदर अभांगत माझ्या माऊली वर्णन करतात की , 
माझ्या प्रेमरूपी भजनरंगात हे विठाबाई देवी तू लवकर ये . तुला किती नावे आहे म्हणून सांगावे ? तुला किठाई म्हणतात , तुला विठाई , कृष्णाई व कान्हाई म्हणतात . वैकुंठात राहणारी असून जगत्रयाला उत्पन्न करणारी तू आहेस . त्यामुळे तुझा छंद माझ्या मनाला लागला आहे . तू कटेवर कर ठेवलेली अशी शोभत असून तुझ्या डोक्यावर रत्नजडित मुकुट आहे . कमरेला पितांबर आहे . अशा तऱ्हेच्या देविरुप विठठला तू माझे भजन रंगात धावत ये बरे . हे विश्वरूप , विश्वंभरे कमलनयने , कमलाकरे अशा स्वरूपाने असणारे हे विठठल रखुमादेवीवरे तुझे ध्यान माझ्या मनास नित्य लागो .

- ज्ञानदा 
Varkariyuva.blogspot.in