Thursday 17 November 2016

अहंकार - प.पू.श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

माणसाला जे दु:ख प्राप्त होते ते अभिमानाने ! अभिमान ही एक फार विचित्र गोष्ट आहे.ती कोणा जीवाच्या ठिकाणी नाही असे नाही.प्रत्येकाच्या ठिकाणी कशाचा ना कशाचा अहंकार आहे.कोणाला रूपाचा,कोणाला सौंदर्याचा,कोणाला धनाचा,तर कोणाला ज्ञानाचा ,पण अहंकार आहे ! जीवदशा म्हटले,की अहंकार आलाच ! अहंकार म्हणजे 'मी' पणा ! हा 'मी' कोणाला ग्रासत नाही ? तत्वज्ञानातही 'अहं ब्रह्मास्मि' मध्येही 'अहं ' आहेच ! म्हणून ज्ञानस्वरूपतेमध्ये 'अहं' रहात नाही.' मी ब्रम्हस्वरूप आहे' या ज्ञानाच्या पलीकडची ही ज्ञानस्वरूपता आहे.तेथे केवऴ 'ब्रह्म' आहे. अभिमान माणसाचा घात करतो.तो जीवाला कोणीतरी वेगऴा ठेवतो.माणूस जसाजसा मोठा होत जातो,तसातसा त्याच्या ठिकाणी अहंकार वाढत जातो.श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी याबद्दलच नवल व्यक्त केले आहे.
'नवल अहंकाराची गॊठी । विशेषे न लगे अज्ञाना पाठी ।सज्ञानाचे झॊंबे कंठी । नाना संकटी नाचवी ।'
अहंकाराचे नवलच आहे.तो अज्ञानी जीवाच्या ठिकाणी विशेषत्वाने नसतो,पण ज्ञान्याच्या ठिकाणी मात्र हा अभिमान विशेषत्वाने असतो. माणूस थोडा जरी ज्ञानी असला तरी अभिमान मात्र भरपूर असतो.म्हणून ज्ञानी कोणाचा विरोध सहन करू शकत नाही.शुकाचार्यांसारखा महात्मा, पण त्यांच्या ठिकाणीही अभिमान निर्माण झालाच ! श्रीतुकाराममहाराजांनी त्याचे वर्णन केले आहे.
'जनक भेटीसी पाठविला तेणे ।अभिमान नाणे खॊटे केले ।।'
व्यासांनी शुकाचार्यांना जनकाच्या भेटीला पाठवून त्यांचा अभिमान नष्ट करविला.असा हा अभिमान सर्वांच्या ठिकाणी आहे.आपल्या सर्व कर्तृत्वावर पाणी फिरविणारा असा हा अभिमान आहे.म्हणून श्रीज्ञानेश्वर महाराजांनी
''नाना संकटी नाचवी।' किंवा ' नाचवी चहूकडे । तॊ अहंकारू गा ।'
म्हणून त्याचे वर्णन केले आहे.
महाभारतात अहंकार सर्वस्वाचा नाश करतो हे स्पष्टपणाने दाखवून दिले आहे.
जरारूपं हरति धैर्यमाशा, मृत्यू : प्राणान्धर्मचर्
यामसूया। क्रॊध: श्रियं शीलमनार्यसेवा, ह्रियं काम: सर्वमेवाभिमान:।।
वार्धक्य रूपाचा नाश करते,आशा धैर्याचा, मृत्यू प्राणाचा,मत्सर धर्माचरणाचा,क्रोध लक्ष्मीचा,दुर्जनसेवा शीलाचा,विषयसक्ती लज्जेचा आणि अभिमान सर्वस्वाचा नाश करतो.श्रीतुकाराममहाराजांनी म्हटले आहे.

'तुका म्हणे नरकी घाली अभिमान । जरी हॊय ज्ञान गर्व ताठा ।।'

।।राम कृष्ण हरी ।।